धर्म आणि लष्कर या दोन अनार्थिक कचाट्यात इम्रान खान

धर्म आणि लष्कर या दोन अनार्थिक कचाट्यात इम्रान खान

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीके इन्साफ पक्षाला पाकिस्तानातल्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळाल्या पण बहुमत मिळालं नाही. सध्या तुरुंगवासी असलेल्या नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीगला दोन नंबरच्या पण खान यांच्या पक्षाच्या जवळजवळ अर्ध्या जागा मिळाल्या. इम्रान खान इतर पक्षांची, बहुदा स्वतंत्र उमेदवारांची, मदत घेऊन पंतप्रधान होतील.

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर १९९६ साली इम्रान खान यांनी पाकिस्तान तहरीके इन्साफ  हा पक्ष स्थापन केला. २००२ पासून ते लोकसभेत निवडून येत आहेत. मावळत्या लोकसभेत ते विरोधी पक्ष नेते होते. २०१३ साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा पक्ष खैबर विधानसभेत नंबर एकचा पक्ष झाला आणि जमाते इस्लामीबरोबर आघाडी करून पक्षानं सरकार केलं.

त्यांच्या पक्षाचे मुख्य कार्यक्रम असे. भ्रष्टाचार निर्मूलन, अमेरिकन प्रभावातून मुक्तता, कार्यक्षम कारभार, न्याय्य अर्थव्यवस्था. भारताशी संबंध सुधारणं, काश्मिरचा प्रश्न सोडवणं हा त्यांच्या कार्यक्रमाचा भाग नसला तरी प्रचार मोहिमेत आणि निवडणूक संपल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तसे उल्लेख केले. काश्मिरचा प्रश्न सोडवण्यात भारत एक पाऊल पुढं आता तर आपण दोन पावलं पुढं येऊ असं इम्रान खान म्हणाले.

इम्रान खान वीस वर्षापेक्षा जास्त काळ राजकारणात सक्रीय आहेत, संसदेत आहेत. मोर्चे, सभा, निवेदनं, संघर्ष इत्यादी वाटांनी ते जनतेमधे वावरत आले आहेत. विविध नावांच्या मुस्लीम लीग आणि पीपल्स पार्टी या राजकीय पक्षांच्या अपयशावर बोट ठेवत त्यांनी आपला एक स्वतंत्र पक्ष स्वतःच्या प्रतिमेभोवती उभा केला आहे. एकीकडं लीग, पीपल्स पार्टी अशा काहीशा सेक्युलर पार्ट्या आणि दुसरीकडं अनेक धार्मिक संघटना अशा दोन टोकांच्या राजकीय संघटनांच्या मधोमध इम्रान खान उभे आहेत. आर्थिक विकासाचं बोलत असताना ते तालिबानला समजून घ्या असंही म्हणत आले आहेत.

  भुट्टो, शरीफ यांच्या मुलकी कारकीर्दीत पाकिस्तानचा विकास झाला काय, पाकिस्तान भारत संबंध सुधारले काय? अयुब खान ते मुशर्रफ या लष्करशहांनी पस्तीस वर्षापेक्षा जास्त पाकिस्तानची सत्ता वापरली. त्यांच्या हातून काय घडलं? सत्ता मुलकी असो की लष्करी, पाकिस्तान घसरणीवरच आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डळमळीत आणि उतरणीवर आहे, पाकिस्तानात इन्फ्रा स्ट्रक्चरच्या नावानं बोंब आहे, पाकिस्तानात गरीबी आहे-विषमता आहे, पाकिस्तानात भीषण भ्रष्टाचार आहे, पाकिस्तान प्रचंड अस्थिर आणि हिंसाव्याप्त आहे.

इम्रान खानना सत्ता सोपवणारी संसद पाकिस्तानात एक असहाय्य प्राणी असल्यागत आहे, संसद काही करू शकत नाही आणि संसदेनं निवडलेलं सरकारही काही करू शकत नाही. धर्म आणि लष्कर या दोन  अनार्थिक (म्हणजे अर्थव्यवस्थेशी काहीही देणंघेणं व ज्ञान नसणाऱ्या) प्रेरणांच्या कचाट्यात पाकिस्तानातलं सरकार, संसद आणि राजकारण सापडलेलं असतं. 

लष्कर केवळ हुकूम आणि संघटित हिंसा या घटकांवर आधारलेलं असतं. दोन्ही संस्था समाजानं स्वतंत्रपणे निर्माण केलेल्या अर्थावर, संसाधनांवर, जगत असतात, त्यांना स्वतंत्रपणे अर्थव्यवस्था उभारता येत नाहीत, अर्थव्यवस्थांचं ज्ञान आणि त्या चालवण्याचं कौशल्य त्यांच्याकडं नसतं. स्वतंत्रपणे समाजाची अर्थव्यवस्था ठीक चालली असेल तर त्या जोरावरच धर्म आणि लष्कर या दोन संस्था चालतात. दुर्दैवानं अशा दोन संस्थाच पाकिस्तानच्या सरकारला जन्म देतात, दावणीला बांधतात. त्यांच्या हाती सरकार गेलं की काय होतं हे इराण आणि इजिप्त या दोन उदाहरणांवरून स्वच्छ दिसतं. म्हणूनच सामान्यतः देशांची सरकारं धर्माला आणि लष्कराला काबूत ठेवतात, त्यांनी कसं वागावं याचे निर्णय देशाची संसद घेत असते, धर्मप्रमुख आणि लष्कर प्रमुख देशाच्या राजप्रमुखाच्या अधिपत्याखाली वागत असतात.

पाकिस्तानात धर्माचा लोचा आहे. धर्माला तर्क समजत नाही, धर्म केवळ श्रद्धा आणि भावनांवर आधारलेला असतो.मुळात इस्लाम आधुनिक व्हायला कचरतो. लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य, व्यक्तीनं आपल्या विवेकानं निर्णय घेऊन समाज चालवणं, मार्केट, विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकांशी इस्लाम या संस्थेला जुळवून घेता आलेलं नाहीये. आजही पाकिस्तानतले इस्लामी पुढारी लस टोचायला तयार नसतात, मुलींना शिक्षण द्यायला नाराज असतात, पैसा हे पाप आहे असंच मनोमन मानतात आणि पुढल्या म्हणजे मेल्यानंतरच्या आयुष्यात सुख मिळावं यासाठी या आयुष्यात खटपट करत रहावी असं मानतात. अणुच्या काय गोष्टी करताय, ते तर कुराणातच सांगून ठेवलंय असं इस्लामी पुढाऱ्यांना मनोमन वाटतं. (तसंच अनेक हिंदूधर्ममार्तंडांनाही वाटतं) मुळात लोकशाही, लोकांनी निर्णय घेणं हेच इस्लामला मान्य नाही असं मानणाऱ्या मौदुदी यांचा प्रभाव पाकिस्तानी इस्लामी एस्टाब्लिशमेंटवर आहे. त्यामुळंच जैशे महंमद, लष्करे तय्यबा, तालिबान, अल कायदा अशा संघटनांना तिथं जनमान्यता आहे. ही सर्व मंडळी कसं जगावं हे धर्माच्या सांगण्यानुसार ठरवतात, बाकीच्या कसोट्या त्यांना मान्य नाहीत. 

पाकिस्तानात शरीया कायदा आणि सेक्युलर न्यायालय अशी दोन्ही न्यायालयं समांतर चालतात. तांत्रीकदृष्ट्या शरीया कायदा वरिष्ठ आहे असं पाकिस्तानी राज्यघटना म्हणते. 

पाकिस्तानी लष्कर हा आणखी एक स्वतंत्र लोचा आहे. पाकिस्तानी लष्कराचं उद्दीष्ट देशाच्या सीमांचं रक्षण नव्हे तर इस्लाम वाचवणं व इस्लामचा प्रसार हे आहे. भारत इस्लामविरोधी आहे, इस्लाम आणि पाकिस्तान नष्ट करू इच्छितो या मुद्द्यावर पाकिस्तानच्या लष्कराची निर्मिती आणि उभारणी झाली आहे. काश्मिरचा हा लष्कराचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. परंतू पाकिस्तानी लष्कराच्या हिशोबात तो भूभागाचा किंवा जनतेच्या इच्छेचा प्रश्न नसून तो इस्लामचा प्रश्न आहे. पाकिस्तानी लष्कराच्या या धारणा साधारणपणे जगातल्या लष्कराच्या व्याख्येशी जुळणाऱ्या नाहीत.

जिन्नांच्या मृत्यू झाला आणि पाकिस्तानच्या राज्यव्यवस्थेचं रूपच बदललं. राज्यघटना, कायदा, संसद आणि सरकार मिळून तयार होणारी व्यवस्था पाकिस्तानचा त्राता राहिलेली नाही, लष्कर हे पाकिस्तानचा त्राता आहे. तसं पाकिस्तानी जनतेलं वाटतं. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग थेट लष्कराचा हातात आहे. पाकिस्तानतले अनेक उद्योग, कॉर्पोरेशन, आर्थिक संस्था थेट लष्कराच्या हातात आहेत. ते सर्व उद्योग भ्रष्टाचार आणि लष्करी खाक्यानं चालतात, आर्थिक नियमांनुसार नव्हे. त्यामुळंच अकार्यक्षम आणि तोट्याचे असूनही ते उद्योग टिकून आहेत. मुशर्ऱफ यांची शेकडो एकरांची शेती आहे. तशी अनेक लष्करी जनरल्सची आहे. त्या शेतीवर लष्करातले लोक फुकट राबतात आणि लष्करी दादागिरीमुळं मजूर कमी मजुरीवर काम करतात. शेती अशी चालते काय?

पाकिस्तानची अर्ध्यापेक्षा कमी अधिक अर्थव्यवस्था अनौपचारिक आहे. अर्थव्यवहाराचे औपचारीक व संस्थात्मक नियम त्या अर्थव्यवस्थेला लागू नाहीत. भ्रष्टाचार, घराणेशाही, दिरगाई हे त्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख गुण आहेत. नवाज शरीफ यांची संपत्ती याच वाटेनं गोळा झालेली आहे.

ना लष्कराला आर्थिक नियम वा विचारांशी देणं घेणं आहे ना धार्मिक संघटनांना. अशा परिस्थितीत इम्रान खान काय करणार? जैश, तालिबान, तय्यबा, अल कायदा आणि नव्यानं बलवान होऊ पहाणारी आयसिस यांना आटोक्यात ठेवण्याची ताकद आणि मानस इम्रान खान यांच्याकडं आहे काय? लष्कराला बराकीत ठेवण्याचा प्रयत्न बेनझीर भुत्तो आणि नवाज शरीफनी केला. पैकी बेनझीरना लष्करानं मारून टाकलं. लष्कर लबाडीनं अणुशस्त्र तयारी करत होतं, मोठी यंत्रणा उभारत होतं, त्याचा पत्ताही पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांना नव्हता. ते सारं मला सांगा असं त्या म्हणू लागल्या तिथंच त्यांनी आपली कबर खणली.

 इम्रान खान यांना वरील वास्तव माहीत नाही? माहित आहे तरीही एका भाबड्या आशावादापोटी ते पंतप्रधानपदापर्यंत पोचले आहेत? काही तरी चमत्कार होईल आणि सगळे घटक जुळून येऊन देशाची अर्थव्यवस्था भरभराटून सर्वाना न्याय मिळेल असं त्यांना वाटतं? नाही तरी किती तरी नालायक लोकांनी आजवर राज्य करून गोंधळ घातलाच आहे, आपल्याला प्रयत्न करायला काय हरकत आहे असं त्यांना वाटतं? 

  पुढली निवडणुक येईपर्यंत काय होतंय ते पहायचं. 

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *