निवडणुका, उमेदवार, पक्ष, विचारसरणी

निवडणुका, उमेदवार, पक्ष, विचारसरणी

निवडणुका, उमेदवार, पक्ष, विचारसरणी

गेल्या काही दिवसांतली घटनाचित्रं

मुंबईतल्या दादर भागातला एक रस्ता. दुकानांच्या रांगेत एक टीव्ही सेट विकणारं दुकान. अनेक टीव्हीचे सेट्स, त्यावर निवडणूक निकालावर दोन तीन वाहिन्यांनी चालवलेले कार्यक्रम. पडद्यावर  चारही बाजूंना पक्षांना मिळालेल्या जागांचे चौकटींत मांडलेले आकडे. मधल्या छोट्याशा भागात  अँकर आणि चर्चक. चर्चकांमधे पत्रकार आणि पक्षांचे प्रवक्ते. विष्लेषणं चाललेली असतात. मधे मधे विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, पेढे भरवणं इत्यादी दिसतं. फूटपाथवरची माणसं टीव्हीवरचे कार्यक्रम दाटीवाटीनं पहात उभे असतात.  मतदारसंघाचा निकाल लागला की जमलेले प्रेक्षक टाळ्या वाजवत, चुकचुकत, किंवा अचंब्यात पडत. गर्दी वाढत गेली. फूटपाथ गर्दीनं व्यापला.

दुकान ज्या इमारतीत होतं त्या इमारतीची दुरुस्ती चालली होती. परांच्या लावलेल्या होत्या. गोणपाटं टांगलेली होती. आज निकाल असल्यानं दुरुस्तीचं काम होत नव्हतं. पण दुरुस्तीच्या राड्यारोड्याचे ढीग फूटपाथवर आणि रस्त्यावर पडून होते. नागरीक राडारोड्यांच्या छोट्या टेकड्या ओलांडून वाटचाल करत होते.

नागरीकांचं मार्गक्रमण म्हणजे अडथळ्यांची शर्यत होती. कारण फूटपाथवर खूप खड्डे होते. काही दिवसांपूर्वीच बसवलेल्या टाईल्स उखडलेल्या होत्या. निवडणुक जाहीर झाल्या झाल्या पालिकेनं टाईल्स बसवायला घेतल्या होत्या. एका ठिकाणी  न्हाव्यानं फूटपाथवरच दुकान थाटलं होतं. एकावर एक सहा सात विटा आणि त्यावर एक लाकडाचं फळकूट, त्यावर न्हावी बसलेला. तशाच आसनावर बसलेल्या माणसाचे केस कापत होता, आसपास कापलेले केस फूटपाथवर पसरलेले होते. काही अंतरावर एक भलीमोठी गाय रवंथ करत होती. गायवाली एका दुकानाच्या पायरीवर बसून लाडू वळत होती. भक्त येई. बाईकडून लाडू घेई. चाऱ्याची एक जुडी घेई. बाईला पैसे देई. लाडू आणि चारा गायीला भरवी. गायीची शेपटी आपल्या डोक्यावर फिरवी. सभोवताली पसरलेलं शेण आणि मुतात पाय पडू नये याची दक्षता घेत पुढे सरके.

खड्डा, न्हावी, गाय आणि मिनी टेकड्यांमधून वाट काढत नागरीक पुढं सरकत होते.

पडद्यावर एका पुढाऱ्याची मुलाखत सुरु झाली. पुढारी सांगत होता की त्यांनी केलेल्या कामाला लोकांनी दाद दिल्यानं त्यांना विजय मिळाला होता.

टीव्हीच्या पदद्यावर एक पत्रकार विश्लेषण करत होते. ” मतदार राजा शहाणा असतो. तो कामं करणाऱ्या माणसांना मतं देत असतो. तो पक्ष पहात नाही. ”

घोळक्यात एक माणूस दुसऱ्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला ” च्यायला कसलं आलय काम राव. मुंबईत जगणं कठीण झालंय. रस्ते पहा. गटारं पहा. फूटपाथ पहा. चुकीच्या दिशेनं येणारी वाहनं पहा. रात्री अपरात्री मोठा आवाज करत फिरणाऱ्या बाईक पहा. कचऱ्याचे ढीग पहा. फूटपाथवर पसरलेली दुकानं पहा. फूटपाथवरच विसावलेले संसार पहा. दवाखान्यांसमोरच्या रांगा पहा. हॉस्पिटलसमोर साचलेली डबकी आणि घाण पहा.मठ पहा. मठाच्या बाहेरची वडापावची दुकानं आणि रस्त्यावर पसरलेल्या प्लेट्स पहा. चहावाल्यांनी ग्लासं विसळून रस्त्यावर फेकलेलं पाणी पहा. पालिका असा कारभार चालवतेय. कित्येक वर्षं. या कामासाठी यांना लोकांनी मतं दिलीयत.”

।।

कोल्हापूरहून रत्नागिरीकडं जाणारा रस्ता.

अनेक लाल डबा बसेस आणि गाड्या खोळंबलेल्या. कारण रस्ता तुंबला होता. कारण रस्त्यावर एक मुंगीच्या पावलांनी सरकणारी मिरवणूक खोळंबली होती. ट्रॅक्टर्स, जिपा, उसाच्या ट्रेलर गाड्या. सर्व वाहनांमधे तुरळक माणसं निर्वीकारपणे  सभोवताल निरखत गप्प बसून होती. ट्रॅक्टरवर लाऊड स्पीकरवरून एक माणूस मतं मागत होता. वाहनांवर मतदाराच्या निशाणीचे बोर्ड, फ्लेक्स टांगलेले होते. प्रत्येक वाहनावर दोन झेंडे होते. एक होता सेनेचा, दुसरा होता राष्ट्रवादीचा.

शे दोनशे वाहनं असतील.

।।

सांगली. स्थानिक वर्तमानपत्रं.  पहिल्या पानावर प्रचार कार्यक्रमाच्या बातम्या.  प्रत्येक बातमी एका आघाडीची. विकास आघाडी. शेतकरी कल्याण आघाडी. जनता आघाडी. प्रत्येक आघाडीत दोन,तीन, किंवा अधिक पक्ष. काँग्रेस – भाजप. राष्ट्रवादी – सेना. शेतकरी संघटना – काँग्रेस. शेतकरी संघटना – भाजप. भाजप – राष्ट्रवादी. एका मतदार संघात भाजप – राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध काँग्रेस – शिवसेना. पलिकडं दुसऱ्या आघाडीत भाजप – काँग्रेस – शेतकरी संघटना विरुद्ध  शिवसेना – राष्ट्रवादी आघाडी.

प्रत्येक बातमीत दुसऱ्या आघाडीवर किंवा उमेदावारावर टीका.

पत्रकारीमधे काही दंडक सिद्ध झाले आहेत. प्रत्येक उमेदवार दैनिकाच्या वार्ताहराकडं आणि संपादकाकडं पाकिट पोचवतो. एक पाकीट दैनिकाच्या पुण्यातल्या किंवा कोल्हापुरच्या मुख्य कार्यालयाकडं पोचवलं जातं. पाकिट घेणाऱ्याला इतर पाकिटात किती रक्कम आहे ते माहित नसतं.

बातमीची लांबी आणि बातम्यांची संख्या येवढंच ठरलेलं असतं. उमेदवाराकडून येणारा मजकूर काटछाट न करता छापायचा असा करार. इतर विरोधकांचा मजकूर छापायचा नाही असं बंधन नसतं. सर्वाना खुलं मैदान असतं. सर्वांच्या बाजूच्या किंवा सर्वांच्या विरोधाच्या बातम्या.

 

एक गाव.

तिथले आमदार शिवसेनेचे.

आमदारांच्या बऱ्याच शिक्षण संस्था.

उद्धव ठाकरे फक्त एकदाच या गावात येऊन गेले होते. निवडणुकीच्या काळात शिवसेनेचे पुढारी या गावात प्रचाराला आले नव्हते. आमदारांनीच स्वतःची मोहिम चालवली, पार पाडली.

आमदार कधी बाळासाहेब ठाकऱ्यांना भेटलेले नाहीत. निवडणुकीपूर्वी ते शिव सेनेचे नव्हते, बाळासागेबांबद्दल ऐकून होते, बाळासाहेब म्हणजे मोठा माणूस येवढंच ते ऐकून होते. आमदारांचं मुंबईला जाणं येणं नव्हतं. निवडणुकीपूर्वी आमदारांचं घर काँग्रेसचं होतं. वडील दोन टर्म काँग्रेसचे आमदार होते. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातलं वातावरण बदललं. वडिलांना तिकीट मिळण्यासारखं नव्हतं. पक्षातल्या प्रतिस्पर्धी गटानं तिकीट कापलं. वडिलांचं वय धावपळ करण्याइतकं राहिलं नव्हतं. आमदारांवर वारसा जपण्याची जबाबदारी आली. आमदारांनी भाजपत जायचा प्रयत्न केला. जमलं नाही. त्याच वेळी सेनेचे लोक चाचपणी करायला आले होते. त्यांना उमेदवार मिळत नव्हता. जमलं. निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे एक सभा घेऊन गेले तेवढंच. बाकी सगळे प्रयत्न आमदारांचे स्वतःचे. वडिलोपार्जित शाळा कॉलेजेस आहेत. आमदारकी आली. सरकारही आलं. संस्था चालवण्यात येणाऱ्या अडचणीचं पूर्वीप्रमाणंच निवारण होऊ लागलं, परवानग्या आणि ग्रँट्स मिळू लागल्या. आमदार अधिवेशनापुरतं मुंबईत जातात. सेनेचं कोणी मतदार संघात फिरकत नाही. सारं सुरळीत चालतं.

आमदार म्हणतात की इथून तिथून शेवटी समाजाची सेवा करायची असते. ती करायला सरकारची मदत असावी लागते. मग सरकार काँग्रेसचं असो की भाजपाचं की सेनेचं. सेवा झाली म्हणजे झालं.

।।

आमदारांच्या मतदार संघाला लागून असलेल्या मतदार संघात भाजपाचे आमदार आहेत. गावातल्या सहकारी संस्था आमदारांनी स्थापल्या आहेत, चालवल्या आहेत. आमदारांचे चिरंजीव आणि सुना संस्थांचे संचालक. एक चिरंजीव जिल्हा परिषदेचे सदस्य. गावात शाळा आहे, कॉलेज आहे, सामाजिक संस्था आहेत, पतपेढी आहे. सर्व संस्थांमधे आमदारांच्या घरची माणसं असतात, त्या संस्थांना आमदाराचा आर्थिक पाठिंबा आहे. संस्थांच्या कारभाराबद्दल लोक समाधानी आहेत, तक्रारी नाहीत.

आमदार भाजपचे आहेत. या आधी दोन टर्म्स ते काँग्रेसचे होते. मोदींचं  वारं वाहू लागलं. काँग्रेसचं काही खरं नाही, आता सत्तेत बदल होणार आहे हे आमदारांनी ताडलं. जिल्ह्यातली सत्तेची समीकरणंही बदलू लागली होती, आमदारांना तिकीट मिळणं कठीण झालं होतं. या भागात सहकारी चळवळ आणि काँग्रेसची परंपरा होती. भाजप या भागात नव्हती. भाजपला पाय रोवायचा होता. आमदार आणि भाजप दोघांचं जमलं, दोघांची सोय झाली. आमदार भाजपच्या तिकिटावर आरामात निवडून आले.

घरावरचा आणि संस्थांवरचा झेंडा तेवढा बदलला.

सुरवातीच्या काळात भाजपची भाषा, भाजपच्या प्रतिमा, भाजपचे पुढारी, भाजपची कामाची पद्धत समजून घेताना त्रास झाला. पण वर्षभरात गाडीनं रूळ बदलले.

आमदारांचा सहकारी आर्थिक पसारा शिल्लक रहाणं महत्वाचं होतं. त्यात आमदारांचं हित होतं आणि उद्योगावर अवलंबून असणाऱ्या शेकडो कुटुंबांचं सुख होतं. आमदारांच्या,  कार्यकर्त्यांचा घरात वसंतदादा, यशवंतराव, शरदराव, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नेहरू इत्यादींचे फोटो असतात. यात काही वावगं आहे, असं ना कार्यकर्त्यांना  वाटतं ना आमदाराना. अजूनपर्यंत भाजपनंही कश्शालाही आक्षेप घेतलेला नाही.

।।

सिंधुदुर्गातलं एक गाव.

चौरस्ता. एका रस्त्यावर एका बाजूला दोन पक्षांची आणि समोरच्या बाजूला दोन पक्षांची कार्यालयं. मंडपांत थाटलेली. काँग्रेस. भाजप. सेना. राष्ट्रवादी.

प्रत्येक कार्यालयात माणसांची ये जा. कार, जिपा थांबतात, माणसं उतरतात, मंडपात जातात. काही बाही करतात. बाहेर येतात. गप्पा करतात. बाजूलाच असलेल्या हॉटेलात चहा घ्यायला जातात. चारही कार्यालयातली माणसं एकमेकांच्या कार्यालयात जा ये करत असतात.  कोण कुठल्या पक्षाचा आहे ते कळत नाही कारण ना छातीवर बिल्ले ना गळ्यात पक्षाच्या चिन्हांच्या ओढण्या. सारे हसत खेळत असतात.

पोलिस  जीप थांबते. जीपची काच खाली होते. एक कार्यकर्ता आत खिडकीत डोकावतो. ” साहेब. टेन्शन नाय. आमचो उमेदवार काँग्रेसचो. आमची कामं तो कित्येक वर्ष करत आलाय. जिल्हा परिषदेत आम्ही काँग्रेसचे आणि विधानसभेत आम्ही शिवसेनेचे. सर्व  मिळून खेळीमेळीनं रहातो. अजिबात टेन्शन नाय. साहेब च्या घ्यायला या.”

आतला साहेब म्हणतो ” आता नको. पुन्हा कधीतरी. पुढल्या गावात जायचंय. ”

कार्यकर्त्याचा हस्तांदोलन करणारा हात चमकतो. चारही बोटातल्या सोन्याच्या आंगठ्या चमकतात. हातातलं जाडजूड सोनाचं कडं चमकतं. हात बाहेर येतो. कार्यकर्ता दोन्ही हात जोडून नमस्कार करतो. आता दुसऱ्याही हातातल्या आंगठ्या चमकतात. गाडी पुढं सरकरल्यावर कार्यकर्ता कॉलर ठीक करतो. गळ्यातला किलोभर सोन्याचा कंठा चमकतो.  कार्यकर्ता मागं वळून कार्यालयापासून दहा वीस पावलांवर असलेल्या आपल्या बारमधे जातो. उद्या मतदान असल्यानं बारमधली दारुविक्री बंद आहे. सरकारनं हमरस्त्यापासून पाचशे फुटाच्या अंतरात बार असण्यावर बंदी घातलीय. कार्यकर्त्याला चिंता नाही. तो निवडणुक आटोपल्यावर नवा बार काढणार आहे. आमदारच बारचं उद्घाटन करणार आहे. बार रोड टच होता तेव्हां ड्रायवर दोन पेगमधे भागवत असे. नवा बार दूर असल्यानं ड्रायव्हर दोन पेग जास्त घेईल आणि एक क्वार्टर सोबत घेईल. म्हणजे कार्यकर्त्याचा धंदा वाढेल. कार्यकर्ता म्हणतो की सरकार जेवढी बंधनं घालेल तेवढा धंदा आणखी वाढत जाईल. सरकारनं दारूबंदी केली तर बरंच होईल असं त्याचं म्हणणं.

।।

 

 

 

 

 

 

One thought on “निवडणुका, उमेदवार, पक्ष, विचारसरणी

  1. खूप छान निरीक्षण व विचार करायला लावणारा निबंध.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *