पंतप्रधान थॅचर आणि राणी एलिझाबेथ यांच्यातली मारामारी
क्राऊन मालिकेच्या ४ थ्या सीझनमधे मार्गारेट थॅचर यांचं पंतप्रधान होणं आणि पायउतार होणं या दोन्ही गोष्टी आहेत.
युकेमधे क्राऊन- राजमुकुट (राणी किंवा राजा) घटनाप्रमुख असतो. निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवणाऱ्या पक्षाच्या नेत्याला क्राऊन बोलावतो आणि पंतप्रधानपद स्विकारा असं सांगतो.
तांत्रिकदृष्ट्या राजमुकुटाला काहीही अधिकार नसतो. पंतप्रधान अकार्यक्षम ठरला, त्याचं सरकार अकार्यक्षम ठरलं तर ते बडतर्फ करण्याचा अधिकार मुकुटाला नसतो. परंतू देशातल्या एकूण राजकीय किंवा एकूण परिस्थितीवर लक्ष ठेवून ब्रीटनच्या हिताचा विचार मुकुट करतो आणि पंतप्रधानाला बोलावून जाणीव करून देतो. राजमुकुटाचा सल्ला मानायला पंतप्रधान बांधील नसतो पण सामान्यतः राजमुकुटाच्या सल्ल्यातून योग्य तो बोध पंतप्रधान घेत असतो.
राजमुकुटाचे सल्लागार असतात, राजमुकुटाच्या ऑफिसमधली माणसं परिस्थितीचा स्वतंत्रपणे अभ्यास करत असतात आणि त्या आधारेच राजमुकुट निर्णय घेत असतो.
चर्चिल पंतप्रधान असताना लंडनमधे प्रचंड प्रदूषण झालं होतं. प्रदूषण करणारे वीज निर्मिती उद्योग बंद ठेवायला चर्चील तयार नव्हते. माणसं मरू लागली होती, जनता जाम खवळली होती. जनतेची ही भावना राणीनं चर्चीलना बोलावून त्यांच्या कानावर घातली होती. मामला इतपत पोचला होता की चर्चीलवर राजीनामा देण्याची पाळी आली होती, विरोधी पक्ष या संधीची वाटच पहात होते.
अनेक प्रश्नावर चर्चील टीकेचे धनी झाले होते, ते आणि लोकसभा यात बेबनाव होता. चर्चील म्हातारे झाले होते, चर्चिल हेकेखोर झाले होते आणि सत्ता सोडायला तयार नव्हते. तेव्हां राणी एलिझाबेथनं त्यांना बोलावून घेतलं आणि तशी जाणीव करून दिली. म्हणजे लोकभावना काय आहे ते सांगितलं. चर्चिल चिडले. आपल्याला तसं सांगणारी राणी कोण असं त्यांच्या मनात आलं.
राणीनं त्यांना सत्ता सोडा म्हणून सांगितलं नाही. पण एकूणात शेवटी चर्चील यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षात बंड झालं, चर्चीलना जावं लागलं.
मार्गारेट थॅचर यांच्या धोरणामुळं ब्रीटनमधे बेकारी वाढली होती, लोक नाराज होते. वर्णद्वेषी दक्षीण आफ्रिकेवर निर्बंध घाला अशी राष्ट्रकुलातल्या सर्व देशांची मागणी होती पण थॅचर तयार नव्हत्या. सर्व जग विरुद्ध थॅचर अशी स्थिती निर्माण झाली होती. राणीनं त्याना बोलावून घेतलं, नाराजी आणि राग व्यक्त केला. थॅचर खवळल्या. राणी वि. पंतप्रधान असं प्रकरण पेटलं. पेपरात आणि जनतेत चर्चा होऊ लागली.
थॅचरनी राणीचं ऐकलं नाही.पद सोडलं नाही.
त्यांच्याच पक्षात बंड झालं आणि त्याना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला.
राजमुकुट हा ब्रिटीश संस्कृती आणि इतिहासाचं प्रतीक असतो. काळ पुढं सरकतो, बदलतो, जनता त्यानुसार बदलते, जनमत बदलतं, सरकारं बदलतात पण राजमुकुट स्थिर असतो. राजमुकुट ब्रिटीशपण सांभाळत असतो. ब्रिटीश संस्कृतीचं मुख्य लक्षण म्हणजे परंपरा. ती राजमुकुट सांभाळत असतो. राजमुकूट राजघराण्यातल्या, विंडसर घराण्यातल्याच एका डोक्यावरून दुसऱ्या डोक्यावर जात असतो. ते डोकं कसं आहे आणि ते योग्य आहे की नाही असला विचार त्यात नसतो.
वेळोवेळी ब्रिटीश लोकं म्हणतात की राजघराणं म्हणजे घराणेशाही आहे, राजा हा लोकांचा प्रतिनिधी नसतो, राजे लोकांवर पैसे खर्च करणं म्हणजे पैशाचा अपव्यय आहे वगैरे. कित्येक वर्षं ही टीका होतेय पण तरीही राजमुकुट शिल्लक आहे.
पंतप्रधान नियमीतपणे राजमुकुटाला भेटतो. चर्चील प्रथम राणीला भेटायला गेले तेव्हां पूर्णवेळ उभे होते, राणी बसली होती. चर्चील प्रवेश करताना आणि परतताना वाकून राणीला मान देत असत. प्रत्येक माणसाकडून तशी अपेक्षा असते, चर्चील ती अपेक्षा मान्य करत. चर्चील वयानं मोठे, तब्येतीनंही लडखडलेले, त्यांचा रुबाबही मोठा होता. पण तरीही ते एलिझाबेथ आणि त्यांचे वडील यांच्यासमोर वाकत.
थॅचर कुर्यात असत. क्राऊनमधे दाखवलंय की त्या नाईलाजानं राणीसमोर वाकत. त्या राणीशी काहीशा हेटाळणीच्या आविर्भावात वागत. एकदा त्यानी राणीला सांगून टाकलं की त्या राणीपेक्षा वयानंही जास्त आहेत.
थॅचर एकदा राणीच्या बोलावण्यावरून बालमोरल किल्ल्यात गेल्या होत्या. राणीच्या घरच्या लोकांनी थॅचरची कुचेष्टा केली, त्यांची पायताणं योग्य नाहीत, त्यांचे कपडे राजवाड्याला शोभणारे नाहीत इत्यादी गोष्टी थॅचर यांना झोंबतील अशा रीतीनं दर्शवण्यात आल्या. एकूणच थॅचर म्हणत असत की राजवाडा आणि राजघराणं हा एक फालतू रिकामटेकड्या लोकांचा खेळ आहे. क्राऊन या मालिकेत थॅचर आणि त्यांचा नवरा डेनिस तसं बोलून दाखवतो.
थॅचरचा दोन दिवसांसाठी राजवाड्यात मुक्काम असतो. सवयीनुसार थॅचर रात्री फायली उघडून काम करत असतात. राजघराण्यातली एक बाई त्यांना सांगते की सुट्टीच्या दिवशी, संध्याकाळी, काम करायचं नसतं, राणी सुट्टीच्या दिवशी काम करत नाही. थॅचर सांगतात की मी तर कायम काम करत असते, कारण पंतप्रधानपदाची ती जबाबदारी आहे.
थॅचर या एका किराणा दुकानदाराच्या घरातल्या आहेत आणि राणी ही राणी आहे असं क्राऊन मालिकेत अनेक वेळा ठळकपणे लक्षात येतं.
राजवाड्यातली भव्यता, तिथलं ऐश्वर्य, तिथला संथपणा, तिथला एक रिकामटेकडेणा आणि ऐषोआराम क्राऊनमधे पदोपदी दिसतो. तो खरंच तसा आहेही. त्याच बरोबर लंडनमधलं, इजिप्त-झांबिया-भारत या ठिकाणचं प्रजाजनांचं जगणंही आपल्याला समांतर पातळीवर दिसत असतं. जनता आणि पंतप्रधान असे एका बाजूला आणि राजवाडा आणि राणी दुसऱ्या बाजूला अशी विभागणी क्राऊनमधे सतत दिसते.
ते वास्तव, ती गंमत, क्राऊन या मालिकेनं रंगवलीय. राणी आणि थॅचर, राजा-राणी- चर्चील यांच्यातले कल्पित संवाद मालिकेत आहेत. पंतप्रधानपद आणि राणीपद यावर असलेली माणसं शेवटी माणसंच असतात आणि माणसातले सारे गुणदोष त्यांच्यात असतात हे त्या दोघांच्या संबंधांतून दिसतं. थॅचर आणि राणी एलिझाबेथ यांच्यातलं भांडण पहाताना मजा येते.
थॅचर आणि एलिझाबेथ यांच्यात भांडण तर होतंच, मतभेदही होते. परंतू थॅचर किंवा एलिझाबेथ यांनी ते मतभेद कुठंही लिहिलेले नाहीत. त्यांच्यात काय बोलणं झालं ते दोघांपैकी कोणीही लिहून ठेवलेलं नाही. क्राऊन मालिकेचे जनक पीटर मॉर्गन यांनी ते प्रसंग आणि संवाद कल्पिले.
राणी व त्यांचा लवाजमा शिकारीला-घोडदौडीला बाहेर निघतो. आवश्यक असे गुडघालांबीचे चामड्याचे बूट घालून मंडळी तयार होतात. थॅचर बाईनी कधी घोडदौड वगैरे केलेली नसते, त्यामुळं त्यांच्याकडं ते बूट कुठून येणार? त्यांच्या पायात असतात नॉर्मल उंच टाचाच्या चपला. थॅचर अडखळतात, पडता पडता वाचतात. त्यांचं हसं होतं.
हे घडलं तेव्हां पीटर मॉर्गन तिथं हजर नव्हते. समजा तसा प्रसंग घडला असेल तरी ना राणीनं ते लिहिलंय ना थॅचर बाईनं. त्यामुळं हा प्रसंग घडला नसला तरी घडल्यासारखाच मानायचा.
थॅचर किल्ल्यातल्या खोलीत जातात तेव्हां त्यांचे आणि त्यांच्या पतीचे कपडे राजवाड्यात शोभणारे नाहीत हे त्यांना सांगितलं जातं.
पीटर मॉर्गनना हे कसं कळलं?
शेवटी क्राऊन ही एक मालिका आहे, एक सिनेमा आहे. तो इतिहास नव्हे.
आणि इतिहास इतिहास कशाला म्हणतात? तारीख, वेळ, जागा, कोण आधी बोललं, कोण नंतर बोललं वगैरे गोष्टी बरेच वेळा इतिहासवाले लिहितात, तेही असेच कल्पिलेले असतात. बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलंय तेही बहुतेक सारं असंच आहे.
बरेच ब्रिटीश लोकं क्राऊन मालिकेवर रागावले आहेत. कोणी राणीच्या बाजूनं रागावलाय, कोणी थॅचर बाईंच्या बाजूनं.
इतिहासातली माणसं कशी होती हे खरंच पहायचं असेल तर चीनमधे अलीकडं असतात तसे दर दहा फुटावर एक असे करोडो कॅमेरे ठेवावे लागतील. आणि समजा तसे कॅमेरे ठेवले तरीही लोकांच्या मनात काय आहे ते कसं समजणार? थॅचर बाईना राग आला होता आणि राणीला थॅचरबाईंचा आडमुठेपणा पसंत नव्हता हे त्यांच्या मनातलं शेवटी कल्पनाशक्तीचा वापर करणाऱ्या लेखकालाच समजणार.
त्यामुळंच साहित्य, चित्रपट या माध्यमावर वैतागणारे लोक असणं स्वाभाविकच आहे.
क्राऊनमधली आणखी एक गंमत पुढल्या शुक्रवारी पाहूया.
।।