परमेश्वराचे दलाल

परमेश्वराचे दलाल

केनयाच्या किनाऱ्यावरच मलिंडी हे गाव. या गावापासून काही अंतरावर एक नॅशनल पार्क आहे. या अभयारण्यात वाघ, सिंग,चित्ते,तरस, लांडगे इत्यादी प्राणी रहातात. या अभयारण्याला लागूनच एक शाकाहोला नावाची गाववस्ती आहे.जंगलात झाडं तोडून ही वस्ती तयार करण्यात आलीय.

२०२४ च्या जून जुलैमधे केनयाचे पोलिस शाकाहोलात गेले. शाकाहोलात एक चर्च आहे. त्या चर्चपासून काही अंतरावर पोलिसांनी खोदकाम केलं. फार खोलवर जावं लागलं नाही. पोलिसांना प्रेतं मिळाली. काही ताजी होती,काही काही मातीमय झाली होती. 

प्रेतांची संख्या ४००.

पॉल मॅकेंझी नावाच्या एका पेंटेकोस्टल बिशपनं ही माणसं मारली होती. 

पॉलबद्दल अनेक तक्रारी पोलिसांकडं येत होत्या. पोलिस त्याला हात लावायला धजावत नव्हते,  पॉलला केनयाच्या प्रेसिडेंटचा पाठिंबा होता. प्रेसिडेंटनं स्वतः आणि सरकारकडून पॉलला भरपूर पैसे दिले होते, त्याच्या चर्च-आश्रमाला देणग्या आणि कार दिल्या होत्या. प्रेसिडेंटची पत्नी पॉलच्या प्रवचनांना जात असे, ती पॉलची भक्त होती.

पॉलवर खून, अत्याचार या आरोपांखाली खटला सुरु झाला आहे. त्याच्याबरोबरच त्याचे चर्चमधले ३० सुरक्षा जवान आणि पहारेकरी सहआरोपी आहेत.

कोर्टात खटला सुरु असताना अजूनही पोलिस खणत आहेत, त्यांना नवी प्रेतं सापडत आहेत.

#

न्यायालयात पोचेपर्यंत म्हणजे अगदी परवा परवापर्यंत पॉल मेकेंझी त्याच्या शाकाहोलातल्या चर्चमधे प्रवचनं देत असे. प्रवचनं आणि बाप्तिझम. बाप्तीझम म्हणजे मुला माणसांमधे स्पिरिट पेरणं. स्पिरिटची व्याख्या अवघड आहे. चर्चवाले काही तरी म्हणतात, हिंदू परंपरेतले लोक काही तरी म्हणतात. त्यात खूप घोळ आणि झोल आहे. 

त्याच्या प्रवचनातला मुख्य मंत्र असा होता. ‘जगबुडी, जगाचा नाश जवळ आलाय. त्या नाशाला तयार व्हा. त्या नाशाच्या आधीच मरा, स्वतःला मारा. मेलात की तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल, तुम्ही येशूच्या जवळ जाल.’  मॅकेंझी म्हणत असे मरण म्हणजे विवाह सोहळा आहे. मरण पवित्र आहे.

मॅकेंझीची प्रवचनं म्हणजे एक मोठ्ठा परफॉरमन्स असे. हातवारे, नाचणं, आवाजाचे चढउतार.प्रवचन लयीत चालत असे. लय कधी कमी होई कधी वेगवान होई. शेकडो माणसं प्रवचनाला हजर असत. 

मॅकेंझी चमत्कार करतो. मॅकेंझी रोग दूर करतो. मॅकेंझी व्याधी आणि वेदना दूर करतो. अशी मॅकेंझीची ख्याती होती. ती ऐकून लोक प्रवचनाला येत. प्रवचनात मग्न होत, ट्रान्समधे जात, त्याच्यासोबत गाऊ लागत, डोलू लागत. 

प्रवचन आटोपे. मग एक स्त्री, पुरुष, मूल, कोणीतरी त्याच्यासमोर हजर. ते माणूस डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी, ताप, हृदयाचा रोग, भूक न लागणं, अशक्तपणा, अपस्माराचे झटके इत्यादी लक्षणांनी हैराण असे. डॉक्टर झाले, औषधोपचार झाले. काहीही उपयोग झाला नाही. ‘तुमची महती ऐकून तुमच्याकडं आलोय, आलेय, आणलंय.’

मॅकेंझी त्या माणसाला स्पर्श करे. मॅकेंझीच्या अंगात आल्यासारखं होई. त्याच्या तोंडून असंबद्ध शब्द उमटत. शब्द तरी कसं म्हणायचं? कुठल्याही भाषेत बसणार नाही अशी स्वरव्यंजनं उमटत. काही सेकंद. मॅकेंझी शांत होई. स्पर्शानं पावन झालेलं माणूस एकदम ताजं तवानं होत असे, त्याची व्याधी दूर झालेली असे. मग जयघोष होई. उपस्थित माणसं भारून गेलेली असत, डोलत, चित्कारत.

ती व्यक्ती, तिच्याबरोबर आलेल्या व्यक्ती आश्रमात दाखल होत. ही माणसं आश्रमाला देणग्या देत. घरं, दागिने, बँक बॅलन्स इत्यादी गोष्टी साफ करून ही माणसं आश्रमात आलेली असत.

आश्रम काही एकरात पसरलेला होता. त्यात मॅकेंझीचं घर होतं. चर्चची इमारत होती. शंभेरक सुरक्षा अधिकारी, पहारेकरी आणि इतर कर्मचारी होते. या सर्वांची रहाती घरं होती. मॅकेंझीनं एक रेडियो स्टेशन चालवलं होतं. एक टीव्ही केंद्रही होतं. दोन्हीवरून मॅकेंझीचा आणि चर्चचा प्रचार केला जात असे, महती सांगितली जात असे, संदेश पसरवला जात असे. शिवाय पुस्तकं, प्रचार पत्रकंही प्रसारित होत. यासाठी पैसा हवा की नको? माणसं आपलं किडूकमिडूक विकून आश्रमाला दान करत.

चर्चच्या इमारतीजवळ एक मंडपासारखी जागा होती. तिथं प्रवचनाच्या आधी नंतर गेलं तर माणसं हात पाय बांधून जमिनीवर ठेवलेली असत. फिटा येणारी, काही कारणानं झटका येणारी माणसं. झटका आली की ती माणसं हिंसक व्हायची, म्हणून त्यांना बांधून ठेवलेलं. ती अधे मधे किंचाळायची. प्रवचनाला आलेल्या माणसांना या किंचाळण्याचा त्रास व्हायचा. त्या काळापुरतं त्याना कुठं तरी दूर नेऊन ठेवलं जायचं.

मॅकेंझीचे स्पर्श उपचार चालू असायचे, दिवसातून एकदा वगैरे. मग काही माणसांना वाटे की ते बरे झालेत. बरे झाले तरी ते आश्रम सोडून जात नसत. जात नसत म्हणजे  जायची परवानगी नसे. 

मॅकेंझीनं संदेश दिला की कोविड थोतांड आहे. कोविडची लस घेऊ नका. कोविडची लस तुम्हाला येशूपासून दूर नेणार आहे, ते तुम्हाला धर्मापासून दूर नेणारं षडयंत्र आहे. सरकारनं मॅकेंझीवर खटला भरला.

मॅकेंझीनं टीव्ही प्रवचनातून संदेश दिला. मुलांना शाळेत पाठवू नका,शाळेतून मागं खेचा. शाळा धर्मविरोधी असतात. शिक्षण ही धर्माशी प्रतारणा आहे.

सरकारनं टीव्ही स्टेशनचं लायसन्स रद्द केलं.

प्रलयाचा दिवस जवळ आला.

आश्रमातल्या लोकांना आठवडाभर ब्रेडचे दोन तुकडे आणि चहा देण्यात आला.

नंतरच्या आठवड्यात कडक उपास सुरु झाला. पाणीही प्यायचं नाही.

मॅकेंझी व्यवस्थीत जेवत असे.

एका स्त्रीला उपास सहन होईना. तिनं पळून जायचा प्रयत्न केला. पहारेकऱ्यांनी तिला पकडून आणलं. एका झाडाला बांधून ठेवलं. तिची इच्छा नसतांनाही तिचा उपास सुरु झाला.

उपासानं हैराण झालेली माणसं क्षीण होत गेली. त्यांच्यात त्राण उरलं नाही. मेली.स्वर्गात गेली.

आश्रमात मुलंही दाखल असत. कित्येक स्त्रिया आपल्या मुलांसकट उपचारासाठी मॅकेंझीकडं आलेली असत.त्यांचाही उपास. मुलं मनापासून उपास करत होती की त्यांच्यावर तो लादला होता?

काही मुलांनी दंगा केला. उपासाला नकार दिला. सुरक्षा जवानांनी त्यांचे गळे दाबून त्यांना मारून टाकलं. काही वेळा मुलांच्या आया मावश्या आत्या यांच्यावर गळा दाबून मारण्याची जबाबदारी टाकण्यात आली.’मुलं ही परमेश्वराची लेकरं. परमेश्वरानंच त्याना जन्माला घातलं. ती परमेश्वराकडं गेली तर त्यात काय बिघडलं, उलट चांगलंच झालं की’ असं मॅकेंझीचं म्हणणं.

रक्षक लोक व्यवस्थित खात पीत होते. त्यांची घरं सकस अन्नानं भरलेली होती. ते बरोबरच आहे. जेवल्याशिवाय लोकांना मारण्यासाठी आवश्यक ताकद कशी येणार?

दिवसात किती माणसांना गळा दाबून किंवा भोसकून मारलं? माणसांचा आकडा गुणिले इतके डॉलर येवढी रक्कम दिली जात असे.

काही माणसांनी पळ काढला. सभोवताली जंगल. ती माणसं जनावरांच्या तावडीत सापडली.

तरीही काही माणसं वाचली. त्यांनी मुलाखती दिल्या. पोलिसांत तक्रार केली.

पोलिस कारवाई कशी करणार? चर्चचं काम. धर्माच्या आड कस यायचं?  शेवटी अती झालं. तक्रारी फार वाढल्या. 

#

मॅकेंझीच्या चर्चचं नाव पेंटेकोस्टल चर्च. 

इव्हँजेलिकल, पेंटेकोस्टल  हे प्रोटेस्टंट पंथाचे काही फुटवे आहेत. प्रोटेस्टंट हाही एक वेगळा पंथ आहे. ख्रिस्ती धर्मात  अनेक पंथ. बायबल एकच, येशू एकच. देव हिंदू देवांप्रमाणं शरीराच्या रुपात दिसणारा नसल्यानं तो एकच असला तरी अगदीच अस्पष्ट. या देवाकडं कसं पोचायचं, देवाचा आशिर्वाद कसा घ्यायचा, देवाची कृपा कशी घ्यायची, देवाशी थेट संपर्क की मधे कोणी तरी असतो, देवाची भाषा कोणती असे अनंत मुद्दे.या मुद्द्यांची मिश्रणं करून पंथ स्थापन केले जातात.  

देवाला किंवा येशूला काय म्हणायचंय ते  प्रवचनकार, बिशप,सांगतात. देव आणि स्वर्ग या ठिकाणी पोचवणारे अनेक टुरिस्ट गाईड चर्चमधे असतात.

 येशू शाळेत गेला नव्हता, संत पीटरच्या काळात कॉलेज नव्हतं, येशूच्या काळात कार आणि विमान नव्हतं असं म्हणत मॅकेंझी येशूच्या काळात जा असं सांगत असतो. 

होली घोस्ट, म्हणजे होली स्पिरिटचा माणसाशी संपर्क करून देणं हा एक विधी या चर्चमधे असतो. या संपर्कानंतर व्यक्ती खरी ख्रिस्ती होते, शुद्ध होते. कोण शुद्ध आणि कोण अशुद्ध हे बिशप लोक ठरवणार.अनेक हिंदू आणि मुसलमान ख्रिस्ती अशुद्ध असतात असं म्हणतात. फार घोळ आहे. कधी काळी हे खपून गेलं, एकविसाव्या शतकात ते पटणारं नाही. 

 मॅकेंझी चमत्कार करतो,लोकांच्या व्याधी दूर करतो. 

माणसाचे आजार औषधं आणि मानसोपचार यांच्या योग्य मिश्रणामुळं दूर होतात. मानसोपचार करतांना औषधंही दिली जातात, सल्ला आणि मार्गदर्शनही केलं जातं. मॅकेंझी मनोविकार असलेल्या लोकांवर अडाणी अघोरी  पद्धतीनं उपचार करतो. मॅकेंझी पोट भरण्यासाठी, धंदा करण्यासाठी हा उद्योग करतो. मॅकेंझी प्रशिक्षित नाही, अगदी लहानपणापासून त्याचा मानसीक तोल ढळलेला आहे,त्यालाच खरं म्हणजे मानसोपचाराची गरज आहे.असा मॅकेंझी देव आणि धर्म या अत्यंत निसरड्या वाटेनं जातो, तिथं घोळ वाढतो. 

 केनयात अनेक मॅकेंझी आहेत. 

।।

Comments are closed.