परागंदा बशर असद काय करतील?

परागंदा बशर असद काय करतील?

सीरियाचे अध्यक्ष बशर असद रशियात आश्रयाला गेले आहेत. रशियात राहून ते आपल्या समर्थकांच्या वाटेनं सीरीयातलं राजकारण चालवतील? रशियन सरकारच्या मदतीनं ते पुन्हा सीरियात प्रस्थापित होतील? 

इराणचे सर्वेसर्वा खोमेनी आणि इराणचे अध्यक्ष शहा यांच्यात संघर्ष होता. शहानी खोमेनीना घालवून दिलं. जवळ जवळ पंधरा वर्षं ते इराक आणि फ्रान्समधे होते. तिथून त्यांनी आपल्या समर्थकांना संघटित केलं, इराणमधे क्रांती घडवली आणि इराणमधे परतले.

सुभाषचंद्र बोस देशाबाहेर गेले. परदेशात मदत गोळा करून त्यांनी आझाद हिंद सेना तयार केली. भारत स्वतंत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 

एक अगदी ताजं उदाहरण.

उगाहरणार्थ फेथुल्ला गुलेन.

 तुर्कियेतल्या हिझमत या पंथाचे निर्माते नेते.२४ ऑक्टोबर २०२४ रोजी ते वयाच्या ८४व्या वर्षी अमेरिकेत पेनसिल्वानियात वारले. १९९९ पासून ते अमेरिकेत स्थायिक होते. तुर्कियेतलं राजकारण ते अमेरिकेत राहूनही चालवत होते. तुर्कियेचे सध्याचे प्रेसिडेंट एर्डोअन यांचे राजकीय शत्रू. गुलेन देशद्रोही आहेत, त्यांना अमेरिकेनं तुर्कयेला परत करावं, आम्ही त्यांच्यावर खटला भरून फाशी देणार असं एर्डोअन म्हणत असत. अमेरिकन सरकारनं गुलेन यांना संरक्षण दिलं होतं.

गुलेन यांच्या जगभरच्या समर्थकांची संख्या  दोन तीन कोटी तरी असावी. खुद्द तुर्कियेत त्यांचे कोटीभर तरी भक्त आहेत. तुर्कियेतल्या एकेपी या सत्ताधारी पक्षानं गुलेन यांच्याशी वैर धरलेलं आहे.

गुलेन यांचा जन्म झाला ते वर्ष १९४१. एकेकाळी तुर्कस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या देशात १९२३ साली केमाल पाशानी क्रांती केली आणि इस्लामची हकालपट्टी करून तुर्कस्तान हा सेक्युलर देश केला. म्हणजे देशात इस्लाम होता, मशिदी होत्या, मुल्ला आणि इमाम होते. परंतू राज्यकारभारातून, राज्यघटनेतून त्यांनी इस्लाम हटवला, कुराण ही राज्यघटना ठेवली नाही, स्वतंत्र सेक्युलर राज्यघटना अमलात आणली.  सरकारनं ठरवलेल्या गोष्टीच इमाम मशिदीत किंवा मदरशात  सांगू शकत असे, तो सरकारचा पगारी नोकर झाला.

गुलेन यांचे वडील इमाम होते, खुद्द गुलेनही इमाम होते, सरकारी नोकरीत होते.

गुलेन यांचं वैशिष्ट्यं असं की त्यांनी इस्लाम लोकशाहीशी जुळवून घेतला. हिझमत म्हणजे समाजाची सेवा हे त्यांच्या पंथाचं उद्दीष्ट होतं. हिझमतची माणसं धर्मानं इस्लामी असत परंतू इतर धर्मीयांशी जुळवून घेऊन समाजात मिसळावं, शाळांमधे सर्व विषय शिकवावेत, स्त्रियांना शिक्षण मिळावं, केमाल पाशानं स्थापन केलेली पश्चिमी वळणाची लोकशाही इस्लामी समाजानं मान्य करावी असं गुलेन यांना वाटत असे, तशी त्यांची शिकवण होती.

इस्लाममधला कडवटपणा आवडत नसलेले मुसलमान हिझमतकडं ओढले गेले. हिझमतनं शाळा-कॉलेजं काढली, पेपर काढले, टीव्ही स्टेशनं चालवली, कर्मचारी संघटना काढल्या. हिझमच्या प्रभावात वाढलेली हज्जारो माणसं तुर्कस्तानात शिक्षक  झाली, सेनाधकारी झाली, न्यायमूर्ती झाली, सरकारी कारभारात गेली.

हिझमतची कुठंही ऑफिसं नव्हती, हिझमतच्या परिषदा भरत नसत, हिझमतची संघटना नव्हती. हिझमतचा विचार पसरवणारा तळातला माणूस इमाम असे. सीनियर झालेल्या इमामला मुल्ला म्हणत. सर्वोच्च स्थानावर गुलेन होते, त्यांना शेख म्हणत.

गुलेन यांचा प्रभाव आणि त्यांचे अनुयायी या गोष्टींचा उपयोग करून घ्यायचा असं एर्डोअन यांनी ठरवलं. जस्टिस अँड डेवलपमेंट पार्टी (एकेपी) या पक्षाशी गुलेन यांनी अनौपचारीकरीत्या जुळवून घेतलं. गुलेनना निवडणुक लढवायची नव्हती, सत्तेत इंटरेस्ट नव्हता. गुलेन यांच्या लाखो अनुयायांनी एर्डोअनना मदत केली. एर्डोअन २००० साली निवडून आले. त्याच्या आदलाच वर्षी म्हणजे १९९९ मधे उपचार घेण्यासाठी गुलेन अमेरिकेत गेले होते. तिथून ते आपल्या अनुयायांना एर्डोअनना मदत करायला सांगत.

एर्डोअन हा काही सरळ माणूस नाही. नाना लफडी भानगडी बेकायदेशीर गोष्टी ते करत असत, तो त्यांचा मुख्य राजकीय आधार होता. २००५ पासून तुर्कितेयली भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येऊ लागली. पैसे खाणं, सेक्स, सत्तेचा गैरवापर. अडकलेली सगळी माणसं सत्तेतली असत, एर्डोअन यांच्या जवळची असत.

प्रकरणांची वाच्यता पेपरात होत असे, टीव्ही चॅनेलवर होत असे. पेपर आणि चॅनेल गुलेन अनुयायी चालवत असत. प्रकरणांची चौकशी पोलिसांनी आरंभली. त्या पोलिस अधिकाऱ्यात बहुसंख्येनं गुलेन यांचे समर्थक असत. न्यायालयात गुन्हेगारांना शिक्षा होऊ लागली. न्यायाधीश गुलेन यांचे अनुयायी असत.

विरोधकांनी एर्डोअन यांना सळो की पळो करून सोडलं.

हा सारा गुलेन यांचा डाव आहे, आपल्याला सत्तेबाहेर ढकलून गुलेन यांना सत्ताधारी व्हायचं आहे अशी एर्डोअन यांची खात्री पटली. 

तुर्कियेतला  भ्रष्टाचार बाहेर काढणं हा गुलेन यांचा डाव होता काय, त्यांनी ती हालचाल विचारपूर्वक आखली होती काय? तसे पुरावे तरी दिसत नाहीत. गुलेन यांच्या प्रभावाखालची माणसं व्यक्तिशः राजकारण करत असतील आणि त्यांचा एर्डोअन यांना विरोध असणं शक्य आहे. गुलेननी त्यांना फूस लावली काय? ते कसं सिद्ध होणार? परंतू गुलेन यांनी त्यांना रोखलं नाही हे मात्र खरं.

एर्डोअन आणि त्यांचे राजकीय विरोधक यांच्यात संघर्ष झाला, त्या विरोधकांमधे काही प्रमाणात गुलेन यांचे अनुयायी नक्कीच असणार. विरोधी चळवल गुलेन समर्थांनीच संघटीत केली होती असं म्हणता येत नाही. कारण एर्डोअन यांची धटिंगणगिरी स्वतंत्रपणे लोकांना त्रासदायक वाटत होती. एर्डोअननी एक आलिशान राजवाडा स्वतःसाठी बांधावा, इस्तंबूलचं शोभीकरण करण्याच्या नादात ते शहर उखडून टाकावं हे इस्तंबूलच्या जनतेला आवडलं नव्हतं. विरोध करणारे पेपर बंद करावेत, निदर्शनं करणाऱ्या तरुणांना सरसकट तुरुंगात डांबावं हे लोकांना पसंत नव्हतं.

पण चवताळलेले एर्डोअन गुलेन यांच्यावर घसरले. त्यांचा वरंवटा फिरू लागला. गुलेन समर्थक असल्याचा संशय ठेवून त्यानी पेपर बंद पाडले, पत्रकारांना तुरुंगात लोटलं. शिक्षण संस्था बंद करून टाकल्या, गुलेनना सहानुभूती असल्याच्या आरोपावरून हज्जारो शिक्षकांना नोकरीतून काढून टाकलं. शेकडो न्यायाधीश आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी एकाएकी बडतर्फ झाले. कहर म्हणजे सैन्यातले मेजर पासून तर थेट जनरल पातळीवरच्या सेनाधिकाऱ्यांना एर्डोअननी नोकरीतून काढलं, त्यातल्या अनेकांवर देशद्रोहाचे खटले भरले.

२०१८ साली लष्करानं बंड केलं. बंड गुलेन समर्थकांनी केलं?  केमाल पाशांच्या विचारांच्या समर्थक सेनाधिकाऱ्यांनी केलं? एर्डोअन यांच्या हुकूमशाहीला वैतागलेल्या लोकांनी केलं? की एर्डोअननंच एक नाटक केलं? अजून निर्णायक पुरावे मिळालेले नाहीत. पण एक मात्र खरं. संशयास्पद घटनाक्रमानंतर  एर्डोअन जनतेसमोर आले, त्यांनी लोकांच्या भावनांना हात घालणारं भाषण केलं, बंडखोर सैन्याधिकाऱ्यांना अडवलं आणि आपलं स्थान पक्कं केलं.

बंडाची जबाबदारी एर्डोअन यांनी गुलेन यांच्यावर ढकलली. त्यांच्या विरोधात तयार झालेला जनतेचा राग बाजूला पडला, लोकरोष बाजूला पडून एर्डोअन पुन्हा निवडून आले.

एर्डोअननी गुलेन यांना देशाच्या हवाली करा अशी मागणी अमेरिकेकडं केली. एर्डोअननी त्यांचं वजन वापरून सौदी अरेबिया, पाकिस्तान या देशातल्या सरकारांना गुलेन यांची चळवळ धर्मबाह्य आहे, हराम आहे अशी भूमिका घ्यायला भाग पाडलं.

गुलेनना काय हवं होतं? त्यांना तुर्कियेची सत्ता हवी होती काय? सांगता येत नाही. पण त्यांना इस्लामला एक नेमस्त रूप द्यायचं होतं हे नक्की. 

जगभर सलाफी वळणाचा इस्लाम, अल कायदा-आयसिस वळणाचा इस्लाम बलशाली ठरत असताना गुलेन इस्लामी व्यवहाराला एक लोकशाही वळण देण्याचा, धर्माची चौकट ओलांडणारं सेक्युलर वळण देण्याचा प्रयत्न करत होते.

 गुलेन यांचं निधन झालं. त्यांनी निर्माण केलेला प्रभाव तुर्कियेत टिकेल? टिकला आहे? 

एकादी व्यक्तीच संप्रदाय, पंथ निर्माण करत असते. कधी कधी ती व्यक्ती नाहिशी होते पण पंथ-संप्रदाय टिकतो. कधी कधी व्यक्ती संपली की संप्रदाय आणि पंथांचाही अस्त होतो.

अर्थात एक खरंच आहे. बशर असद यांच्याकडं विचारबिचार काहीही नव्हता. त्यांच्याकडं फक्त  दादागिरी होती, सत्तेचा हव्यास होता. लोकांना त्यांच्या हुकूमशाहीचा कंटाळा आला असेल, पुरे झालं असं वाटलं असेल, तर त्यांचं सीरियात परतणं अशक्य आहे. 

ते अज्ञातालाच ज्ञात रहातील.

।। 

Comments are closed.