पाशवी शक्तीसमोर युक्रेन अजून टिकून आहे
काय होणार युक्रेनचं?
आज रशियाची युक्रेनस्वारी १४ दिवस झालेत. युद्ध संपण्याची चिन्हं दिसत नाहीयेत.
२४ फेब्रुवारीला रशियाच्या दबा धरून बसलेल्या फौजा युक्रेनमधे घुसल्या. नेमक्या किती ते सांगता येत नाही. कारण पुतीन हा एक नंबरचा फेकू माणूस आहे. खोट्या बातम्या पसरवणं, अपप्रचार करणं, कुभांड रचणं ही केजीबीत असताना अंगी बाणवलेली कला पुतीन वापरत आहेत. दीड लाख म्हणतात या दीड लाखात सुमारे ७० हजार आहेत राखीव जवान, म्हणजे सक्तीनं भरती केलेले तरूण. त्यांना युद्धाचा काहीही अनुभव नाही. काही आठवड्यांच्या जुजबी प्रशिक्षणानंतर त्यांना गणवेष घालून आघाडीवर पोचवलंय. आकडा फुगवून सांगितला की शत्रू पक्ष हादरतो आणि शरण जातो असा रशियातल्या लोकांना नमवण्यासाठी वापरलेला डाव पुतीन युक्रेन युद्धात वापरू पहात आहेत.
येवढी फौज युक्रेनमधे ओतल्यावर युक्रेन एका दिवसात खलास होणार असं पुतीन भासवत होते, रशियातल्या लोकांना खात्री देत होते. दोनच दिवसांनी म्हणजे २६ फेब्रुवारीला नोवोस्ती या सरकारी माध्यमात संपादकानं जाहीर करून टाकलं ” रशियाला विरोध करणारा युक्रेन आता नाहिसा झालाय. आपण युक्रेन जिंकलंय.”
वास्तवात सैन्याच्या हालचाली थबकल्या होत्या. वास्तवात युक्रेननं चिवटपणे प्रतिकार केला होता. रशियाचे रणगाडे आणि तोफा युक्रेनी सैनिक नष्ट करत होते, निष्प्रभ करत होते. त्यामुळं रशियानं रॉकेट्स सोडायला सुरवात केली. युक्रेनच्या सैन्यानं काही विमानंही पाडली. नेटोतल्या देशांनी पाठवलेली विमानविरधी अस्त्रं युक्रेनमधे जसजशी पोचू लागली तसतसा रशियन रॉकेट्सचा प्रभाव कमी होऊ लागला.
रशियाचे दोन जनरल युद्धात मारले गेले ही बातमी रशियाच्या माध्यमात प्रसिद्ध झाली नाही. बेलिंग कॅट या एलियट हिगिन्सच्या पत्रकारी करणाऱ्या संस्थेनं ती घटना हुडकली. दोन जनरल मरणं ही सामान्य गोष्ट नाही. सैन्यातल्या अनंत अधिकाऱ्यांमधे त्या माहितीची देवाण घेवाण झाली असणार. बेलिंग कॅटनं ती माहिती मिळवली आणि प्रसिद्ध केली.
आक्रमण करताना रशियन सरकार आणि लष्कराला खूप अडचणी येताहेत. खूप मोठ्या प्रदेशावर रशियन युनिफॉर्ममधली माणसं पसरलीयत. दुसऱ्या महायुद्धानंतर इतकी व्यापक लढाई रशियन सैन्यानं केलेली नाही. पुतीननी चेचन्या, क्रिमिया, जॉर्जिया या प्रदेशात कारवाया केल्या खऱ्या. पण त्या खूपच मर्यादित होत्या. पसरलेल्या सैन्याचं संयोजन, लॉजिस्टिक्स यात सैन्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.
२००० साली पुतीन यांच्या कारकीर्दीची सुरवात होत असतानाच कर्स्क पाणबुडीवर अपघात झाला होता. पाणबुडीवरची यंत्रसामग्री, यंत्रणा गंजलेली होती. पाणबुडीतले टॉर्पिडो जुनाट झाले होते, त्यांचं तेलपाणी ठीक झालेलं नव्हतं. पाणबुडीवर गोळा झालेले इंजिनियर, नौसैनिक इतर बोटींवरून गोळा केलेले होते, त्यांना कर्स्कचा परिचय नव्हता.सरावासाठी गोळा झालेल्या नौदलांनी सरावाचा पूर्वाभ्यास केलेला नव्हता, तयारी केलेली नव्हती. सैन्यात एक व्यावसायिक शिस्त असते, कामाची एक पद्धत असते. तिचा अभाव रशियन सैन्यात होता. चक्रमसारखा निर्णय झाला होता. परिणामी अपघात झाला. पाणबुडीवरचे सगळे लोक मेले. नॉर्वेजियन नौदलानं मदतीचा हात पुढं केला होता तोही रशियानं नाकारला कारण म्हणे की त्यांनी पाणबुडीत प्रवेश केला असता तर रशियन लष्कराची गुपितं त्यांना कळली असती.
कोणीही सेनाधिकारी किंवा देशाचा प्रमुख आपला सैनिक हकनाक मरू देत नसतो. पण पुतीन वेगळेच आहेत. त्यांच्या डोक्यात एकादी गोष्ट आली की परिणाम काय होईल याची क्षिती त्याना नसते, माणसं मेली तर त्याचीही फिकीर त्याना नसते.दादागिरीची सवय असलेले रशियन स्टालीनपासूनच बेफिकिरीचा बळी होत होते. पुतीन क्रूर बेफिकिरीनं वागल्याची अनंत उदाहरणं आहेत.
मुद्दा असा की रशियन सरकार काय सांगतं, पुतीन काय सांगतात यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. दोन दिवसात युक्रेन काबीज करू असं पुतीन म्हणत होते त्यामुळंच प्रत्यक्षात काय घडतंय ते न पहाताच रशियन माध्यमानं तिसऱ्याच दिवशी युद्ध संपलं, युक्रेन संपला असं जाहीर केलं.
२७ फेब्रुवारी रोजी पुतीननी क्रेमलिनमधे बैठक घेतली. तेच मैदानाच्या आकाराचं मोठ्ठं टेबल. टेबलाच्या एका टोकाला एकटे पुतीन आणि त्यांच्यापासून वीस तीस फूट अंतरावर टेबलाच्या दुसऱ्या टोकाला जनरल लोकं बसले होते. पुतीन कोणाला विचारत नसतात, ते आदेश देत असतात. घाईघाईनं आयोजित केलेल्या या बैठकीत पुतीननी आदेश दिला ” अण्वस्त्रं सिद्ध करा.”
युक्रेनची लढाई संपली होती तर ही धमकी द्यायचं काय कारण होतं.?
ती बैठक झाल्या झाल्यावर माजी अध्यक्ष मेदवेदेव यांनी जाहीर करून टाकलं की अमेरिका-नेटो देश आता नेस्तनाबूत झाले आहेत, आता त्यांची जरूर रशियाला नाही, त्यांचं अस्तित्वच शिल्लक नाहीये, आता त्या देशातल्या दूतावासांना टाळी लावणार आहोत.
लष्करी कारवाई अपेक्षेप्रमाणं यशस्वी होत नव्हती त्यामुळं पुतीन यांची चिडचिड होत होती. जमिनीवरची लढाई निर्णायक होत नाहीये, लॉजिस्टिक्सच्या अडचणी येताहेत, अनेक रणगाडे तेलाविना बंद पडत आहेत अशा स्थितीत युक्रेनमधल्या शहरांवर हवाई हल्ले केले की चवताळून नेटो देश हवाई लढाईत उतरतील आणि तसं झालं की रशिया युरोपातल्या देशांवर हल्ले करायला मोकळा होईल अशी काही तरी आयडिया पुतीनच्या डोक्यात असावी असा निरीक्षकांचा अंदाज होता. सुखाला चटावलेले युरोपीय देश तोफगोळे पडू लागले की हादरतील आणि शरण येतील अशी पुतीन यांची अटकळ असावी.
अमेरिकेनं आणि नेटो देशांनी हवाई लढाईचा मोह टाळला. लढाऊ आणि बाँबर विमानं युक्रेनला द्यायचं अमेरिकेनं टाळलं. लष्करी लढाई न करता आर्थिक कोंडी करण्याची रणनीती नेटो-अमेरिकेनं आखली. या नीतीमुळं युद्ध लांबलं, युक्रेनचे हाल वाढले हे खरं आहे. परंतू हवाई लढाई सुरु होती तर युक्रेन आणि युरोपचे हाल किती तरी पटीनं वाढले असते. ते अमेरिकेनं टाळलं.
अमेरिका, युरोपीय देश, द.कोरिया, जपान इत्यादी देश आर्थिक युद्धात उतरले. सर्वानी मिळून टप्प्याटप्प्यानं रशियाची आर्थिक नाकेबंदी केली. आर्थिक नाकेबंदीचे परिणाम व्हायला वेळ लागतो. कधी कधी नाकेबंदी झालेले देश नाकेबंदीवर मात करतात असाही अनुभव आहे. चीनच्या मदतीनं रशिया दीर्घ काळ तग धरू शकेल असा पुतीन यांचा होरा असावा. प्रत्यक्षात रशियात अन्न, पाणी, औषधं, वेतन इत्यादी गोष्टी मिळेनाशा झाल्या, बँकेतून पैसे काढणं कठीण झालं, नागरीक निदर्शनं करू लागले, युद्ध करू नका असं म्हणू लागले. निदर्शनं दडपली गेली, त्या बातम्या माध्यमात आल्या नाहीत.
आर्थिक कोंडी म्हणजे युद्धच आहे, रशिया असा दणका देईल की पूर्वी कधीही झालेलं नुकसान होणार आहे, त्याला तोड द्यायला तयार व्हा असं पुतीन आता म्हणू लागले आहेत.
दोन दिवसात युक्रेन ताब्यात घेऊ, आपल्या बलाढ्य ताकदीसमोर युक्रेनला मान तुकवावीच लागेल अशा विश्वासानं रशियानं सुरु केलेली लढाई पंधरा दिवस झाले तरी संपत नाहीये.
एक विचित्र कोंडी झालीय. मोठं युद्ध झालं तर काय हाल होणार आहेत याची चुणुक युक्रेनला आणि युक्रेन शेजारच्या देशांना मिळालीय. युद्ध तर नको पण धटिंगणाचा त्रासही नकोय अशा दोन्ही गोष्टी कशा साझायच्या असा पेच आहे. रशियाच्या कारवाईला प्रती आक्रमण असं उत्तर टाळून संरक्षक बचाव असं धोरण युक्रेननं स्वीकारलंय. शस्त्रंच नसल्यानं संरक्षक बचावाला इलाज नाही असंही घडलं असेल. कारण काहीही असो पण युक्रेनची प्रतिकार एक विचित्र गांधीगिरीच म्हणायला हवी.
झेलेन्स्की सुरक्षीत राजवाड्यात न रहाता लोकामधे मिसळले. दररोज सामान्य नागरीकासारखेच लढाईला सामोरे जातात आणि लोकांसमोर येतात. सेलफोन, सेल्फी, स्वतःचं भाषण स्वतःच रेकॉर्ड करून लोकांना ऐकवतात. साधा टी शर्ट घालून लोकांसमोर येतात, डिझायनर ड्रेसेस वापरत नाहीत. त्यांचं वागणं पारदर्शक आहे, लोकांना तो माणूस आपल्यातला वाटतोय. खूप माणसं, युक्रेनी किंवा युक्रेनी नसलेली, युक्रेनमधे दाखल होताहेत, लढण्यासाठी.
रशियाला वाटतंय तितकं हे प्रकरण सोपं नाही येवढं मात्र सिद्ध झालंय.
।।