पुलवामानंतर….
पुलवामामधे जैशे महंमदच्या हस्तकानं सीआरपीएफच्या ४३ जवानांना ठार मारलं. नंतर भारतीय विमानांनी पाकिस्तानात खोलवर जाऊन जैशे महंमदच्या केंद्रावर हल्ला केला. नंतर पाकिस्तानी विमानानी भारतीय हद्दीत हल्ला केला.
पाकिस्तानवर हल्ले करून त्या देशाचं जास्तीत जास्त नुकसान केलं पाहिजे अशी भावना भारतीय जनतेमधे फैलावली आहे. भाजप म्हणत आहे की पाकिस्तानला धडा शिकवण्याचं सामर्थ्य आणि इच्छाशक्ती केवळ त्यांच्याकडंच आहे, बाकीचे पक्ष कुचकामी आहेत, येत्या निवडणुकीत भाजपलाच निवडून द्या असा उघड प्रचार भाजप करत आहे.
विरोधी पक्ष म्हणतात की पाकिस्तानवर कारवाई जरूर केली पाहिजे परंतू युद्धखोरीनं प्रश्न सुटणार नाही, भाजप या परिस्थितीचं राजकारण करत आहे.
आता सारा भारत देश देशभावनेनं, युद्धानं भारला आहे. जनता विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. पाकिस्तान हा अतिरेकी वेडगळ मुस्लीमवादानं पछाडलेला देश असल्यानं आणि मुस्लीम द्वेष हा पाया असल्यानं भाजपचं काम सोपं झालंय. निवडणूक जिंकायला एक उत्तम आणि दुर्मीळ संधी भाजपला मिळालीय.
पाच वर्षात रोजगार न वाढणं, शेतीची धूळधाण, नोटबंदीचा घातक आर्थिक नुकसान करणारा खेळ, घिसाडघाईची सदोष जीएसटी ही देशाची नुकसान करणारी प्रकरणं लोकं विसरतील. भारावून भाजपला मतं देतील. देशाचे न सुटलेले गंभीर प्रश्न जागच्या जागी राहतील.
उपचार अशक्य असतात, उपचार फार दीर्घकालीन असतात, तेव्हां गुंगी आणणाऱ्या औषधांनीच माणसाला सुख वाटतं. त्यातला प्रकार.
वास्तव काय आहे?
जन्मापासून पाकिस्तानच्या सैन्यानं भारतावर दात धरला आहे. भारत आपल्याला नष्ट करायला टपला आहे असं पाकिस्तानचं सैन्य मानतं. काश्मीर आपल्यापासून हिरावून घेतला, पूर्व पाकिस्तान हिरावून घेतला, भारत आपले तुकडे करून आपल्याला नष्ट करू पहातो असं पाकिस्तानी सैन्य म्हणतं. भारताशी लढायला आपणच सक्षम आहोत, लोकशाहावादी सरकारं ते करू शकणार नाहीत असं लष्करानं लोकांना पटवलं आहे.भारताला अशा कशात इंटरेस्ट नाहीये हे भारतानं केव्हांच आणि वारंवार सांगितलंय. आणि घरचं झालं थोडं अशी अवस्था असताना भारतली कशाला नवी लचांडं खांद्यावर घेईल.
भारता बरोबर झालेल्या युद्धात आपण मार खाल्ला खावा लागला कारण आपली शस्त्रं कमी पडली, पाकिस्तानातली सरकारं आडवी येतात असं लष्कराचं मत आहे. आम्हाला अधिक पैसा द्या, अधिक शस्त्रं द्या, अधिक निरंकुष सत्ता द्या अशी मागणी पाकिस्तानी सैन्य सतत करतं.
पाकिस्तान निर्माण होत असतानाच लष्करानं टोळीवाले काश्मिरात घुसवले होते. त्याचीही कल्पना त्यांनी राष्ट्राध्यक्ष जिन्नांना दिली नव्हती. सैन्याच्या निरंकुष वागण्याला पायबंद घालणाऱ्या नेत्यांना लष्कर मारून टाकतं, बेनझीर भुत्तोंचा खून हे एक उदाहरण. पाकिस्तानी सैन्यच पाकिस्तानवर राज्य करतं.
नॉन स्टेट अॅक्टर, अनधिकृत हस्तक सैनिकांचा वापर हे पाकिस्तानी सैन्याचं एक प्रमुख लक्षण आहे. पाकिस्तान निर्माण होत असताना काश्मिरमधे घुसवलेलं सैन्य म्हणजे अफगाण टोळीवाले होते, ते अधिकृत लष्करी सैनिक नव्हते. प्रशिक्षण, शस्त्रं, वेतन इत्यादी सर्व गोष्टी लष्करानं दिल्या. अनधिकृत सैनिक असल्यानं पाकिस्तान सैन्य आणि सैन्यानं जबाबदारी झटकली, तो जनतेचा उठाव होता असं म्हणून मोकळे झाले.
खाजगी टोळ्यांच्या वापराला झिया उल हक यांनी संस्थात्मक रूप दिलं. अफगाणिस्तानात रशियाला हरवण्यासाठी पाकिस्ताननं हर्कतुल मुजाहिद्दीन ही संघटना निर्माण केली. हक्कानी नेटवर्कच्या शेकडो देवबंदी मदरशात जिहादी तयार केले आणि अफगाणिस्तानात पाठवले. अमेरिका आणि सौदी अरेबिया यांनी दिलेले अब्जावधी डॉलर आणि प्रचंड शस्त्रदारुगोळा झियानी या कामी वापरला. हा उद्योग झियानी पाकिस्तानी लष्कराच्या आयएसआय या शाखेवर सोपवला.मसूद अझर याच हर्कतुलमधे वाढला.
अफगाणिस्तानातल्या घातपाची कारवायांची जबाबदारी तालिबाननं घेतल्यानंतर हर्कतुलचं काय करायचं, बेकार झालेल्या हर्कतुलच्या जिहादींचं काय करायचं असा प्रश्न झियांसमोर उभा राहिला. जैशे महंमद ही संघटना स्थापून जिहादीना आयएसआयनं काश्मिरात पाठवलं. १९८५ मधे अफगाणिस्तानातून मोकळे झालेले मसूद अझर १९९४ पर्यंत काश्मिरात धातपात, अपहरणं करत फिरत होते. याच काळात तालिबान या अफगाण संघटनेलं मोठ्ठं केंद्र आयएसआयनं क्वेट्ट्यात, पाकिस्तानात उभं करून दिलं.
स्वतंत्रपणे झियांना स्वतःचं स्थान टिकवण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचं रुपांतर इस्लामी लष्करात करायचं होतं. पाकिस्तान केवळ आणि केवळ पारंपरीक वेडगळ इस्लामी सुन्नींचाच करण्यासाठी झियांनी पाकिस्तानी राज्यघटनेत बदल केले. शिया, अहमदी, मुहाजीर इत्यादींची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी लष्करे जांघवी, सिपाहे साहबा या दहशतवादी संघटना जन्माला घातल्या, वाढवल्या.
म्हणजे देश आणि परदेश अशा दोन ठिकाणांसाठी दहशतवादी संघटना निर्माण झाल्या.अशा वीस पंचवीस जिहादी संघटना पाकिस्तानात कार्यरत झाल्या. प्रत्येक संघटनेला स्वतःचा अहं असे, स्वतःचा इस्लामचा स्वतंत्र ब्रँड असे. कालांतरानं त्यातून भस्मासूर निर्माण झाले. या संघटना पाकिस्तानी लष्कर, पोलिस आणि सरकारवरच उलटल्या. मुशर्रफ लष्कर प्रमुख असताना या संघटनांनी त्यांच्या खुनाचे प्रयत्न केले. लाल मशीद या एका मोठ्या संकुलातून दोन आठवडे दहशतवादी संघटनेनं पोलिस आणि लष्कराशीच लढा दिला. शेवटी रणगाडे आणि विमानं वापरून लाल मशिदीतल्या दहशतवाद्यांचा नायनाट लष्कराला करावा लागला. एक काळ असा होता की इस्लामाबादमधली सत्ता दहशतवादी संघटनेनंच ताब्यात घेतली होती.
दहशतवादी संघटना जोपासणं, त्यांना सांभाळणं, प्रसंगी त्याना फटके घालणं हा आयएसआयचा एक मोठाच उद्योग आहे.
पाकिस्तानमधे वीसेक हजारपेक्षा जास्त मदरसे आहेत. मदरसे हे एक कालबाह्य आणि मोफत धार्मिक शिक्षण देणारं साधन आहे. समाजातला गरीब वर्ग तिथं आपली मुलं पाठवतो. काही मदरसे पारंपरीक इस्लामी शिक्षण देतात. काही मदरसे जिहादी तयार करतात. जिहादी तयार करणारे मदरसेही दहा एक हजार सहज असतील. इस्लाम आणि शस्त्रांचं जुजबी प्रशिक्षण येवढ्यावर जिहादी तयार केले जातात. काही आठवड्यामधे एक जिहादी तयार करता येतो. तयार झालेले जिहादी देशात, परदेशात वापरले जातात. किती सरकारी मदत मिळते यावर मदरशाचा आकार ठरतो. काही मदरशात हजारो विद्यार्थी असतात तर काहीमधे पाच पन्नास.
अशाच एका केंद्रात पुलवामा हल्ला आखण्यात आला, आत्मघातीला प्रशिक्षण देण्यात आलं, आरडीएक्स आणि स्फोटाला सहायक ठरणारी उपकरणं देण्यात आली.
हे आहे वास्तव.
दहशतवादी तयार करणारी हज्जारो केंद्र आहेत. ती केंद्रं एकेक करून उडवणं अशक्य आहे. एकाद्या केंद्रावर हल्ला करून भारतानं आपला निर्धार व्यक्त केला हे चांगलं झालं. पण तसं एकाद दोन वेळाच शक्य आहे.
दहशतवादी माणसं तयार होतात याला पाकिस्तानातली सामाजिक आणि धार्मिक स्थिती कारणीभूत आहे. ती स्थिती बदलणं भारताला शक्य नाही, ते भारताचं कामही नाही.
आयएसआय आणि पाकिस्तानी लष्करानं दहशतवादी व्यवस्था उभी केली आहे. दहशतवादी व्यवस्था उध्वस्थ करायची तर लष्करावरच कारवाई करायला हवी. ते कसं करणार? युद्ध करून ते साधणार नाही. कारण युद्ध आणि दहशतवाद हे दोन स्वतंत्र विचार आणि व्यवस्था आहेत. युद्ध करून दहशतवाद आटोक्यात येत नाही.
नावापुरतं कां होईना पण एक सरकार पाकिस्तानात असतं. देश सरकारच्या नावानं चालवला जातो. परंतू ते सहकार लष्कराच्या आदेशानुसारच चालत असतं. अशा सरकारशी वाटाघाटी करणं म्हणजे एक विधी असतो, ती एक औपचारिक घटना असते. सरकार हर्कतुल मुजाहिद्दीन या संघटनेवर बंदी घालतं. हर्कतुल अन्सार या नावानं मसूद अझर ती संस्था सुरु करतो.
पाकिस्तानातला दहशतवाद ही अशी एक गुंत्याची आणि अवघड समस्या आहे. युद्ध करून ही समस्या सुटणं शक्य नाही. विधायक, मुत्सद्देगिरी, दबाव आणि दणके अशा चारही वाटांनी पाकिस्तानवर दबाव निर्माण करावा लागेल. हे काम फार दीर्घ काळ चालणारं आहे. अनेक भारतीय सरकाराना हे काम पार पाडावं लागेल. हे काम पार पाडण्यासाठी एक असं धोरण असेल जे सर्व पक्षांना अमलात आणावं लागेल.
इसरायल दहशतवादाला गेली वीस वर्षं तोंड देतय तरीही ही समस्या अजूनही इसरायलला छळत आहे. इसरायल प्रसंगी युद्ध करते पण बहुतेक वेळा गुप्तपणे दहशतवादी माणसं आणि संस्थांचा काटा काढत असते. ही कामं करणारी स्वतंत्र माणसं असतात, त्यासाठी स्वतंत्र संघटना असतात, त्यावर सरकार भरपूर पैसेही खर्च करत असतं. म्युनिख हा स्पीलबर्गचा सिनेमा आणि त्याच शीर्षकाची बीबीसीची डॉक्यूमेंटरी पाहिली तर या कामाचं स्वरूप लक्षात येईल. अस्तित्वात असलेल्याच कायद्यांची काटेकोर अमलबजावणी व्यावसायिक रीत्या करून अमेरिका आणि ब्रीटन दहशतवादाला कशी आटोक्यात आणते तेही पाहण्यासारखं आहे. तीनही देश युद्धाच्या उन्मादात न जाता दहशतवाद आटोक्यात ठेवतात.
भारतातली सुरक्षा व्यवस्था कार्यक्षम नाहीत, त्यात त्रुटी आहेत. भारताची इंटेलिजन्स व्यवस्था अकार्यक्षम आहे. प्रत्येक दहशतवादी घटनेनंतर ते लक्षात येतं पण त्या व्यवस्थेत सुधारणा होत नाही. ३०० किलो आरडीएक्स काश्मिरमधे पोचवलं जातं, त्याकामी काही माणसं काही आठवडे काम करत असतात आणि त्याचा पत्ता भारताला लागत नाही यावरून भारतीय व्यवस्थेतल्या सुधारणांची आवश्यकता लक्षात येते.
दहशतवादाला रोखण्यासाठी परदेश संबंध व्यवस्थाही मुळातून सुधारावी लागेल, तिथं खूप, व्यावसायिक, माणसं नेमावी लागतील. भारत हा एक थोर प्राचीन देश आहे, भारताचे पंतप्रधान थोर आहेत असं सांगत रहाणं हेच दूतावासांचं प्रमुख काम असतं की काय अशी शंका येते. पाकिस्तान आणि दहशतवादाला एकटे पाडण्यासाठी सातत्यानं नाना उपाय योजणं, नाना दबाव आणणं हा उद्योग दूतावासांना करावा लागेल. निरंतर.
युद्ध ही घटना फार भयानक असते. त्यात फार पैसे खर्च होतात. त्यात फारफार नुकसान होतं. त्यात फार सैनिक मरतात. लढाईत पुढारी मरत नाहीत, उद्योगपती मरत नाहीत, श्रीमंत मरत नाहीत, सामान्य माणसं मरतात. पण त्यातून प्रश्न कधीच सुटत नाहीत. चार युद्ध होऊनही भारत पाकिस्तान तणाव जैसे थे आहेत.
भाजप निवडणुक जिंकण्यासाठी युद्धाचं वातावरण पसरवत आहे. युद्ध होणार नाही अशी आशा करूया. युद्धाच्या धमक्या देत, किरकोळ कारवाया करत भाजप लोकांच्या भावना जोजवेल आणि मतं मिळेल. तेवढंच झालं तर ठीक. पण युद्ध झालं तर? एकाद्या पक्षाला राज्य मिळावं यासाठी सैनिक मारणं हा फार अमानुष आणि क्रूर खेळ झाला.
सर्जिकल हल्ले वाजपेयींच्या,मनमोहन सिंग यांच्या आणि नरेंद्र मोदी यांच्याही कारकीर्दीत झाले. दहशतवादी घटना घडतच आहेत, काश्मिरमधली परिस्थिती सुधारली तर नाहीच, अधिक वाईट झाली.
दहशतवाद ही एक किचकट समस्या आहे. ती सोडवण्यासाठी खूप गोष्टी दीर्घ काळ कराव्या लागतील. त्यासाठी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करावी लागेल. हे सारं टाळून युद्धाचा शॉर्टकट घेतला तर एकाद्या पक्षाला सत्ता मिळेल पण प्रश्न जागच्या जागी राहील.
।।