पुस्तकं.
अमेरिका शंभर वर्षं मागे गेलीय.
२१ जानेवारी १९२५ रोजी अमेरिकेतल्या टेनेसी राज्यातल्या विधानसभेमधे जॉन बटलर या आमदारानं एक विधेयक मांडलं. फक्त २०० शब्दांच्या विधेयकात म्हटलं होतं की राज्यातल्या शाळेमधे विज्ञान हा विषय शिकवताना बायबलमधे मांडलेला विश्व निर्मितीचा सिद्धांत सोडता इतर कोणताही सिद्धांत शिकवला जाऊ नये. एका खालच्या श्रेणीतल्या प्राण्यापासून माणसाची निर्मिती झाली हा सिद्धांत शिकवणं बेकायदेशीर आहे. थोडक्यात असं की डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा ख्रिस्ती विचारापेक्षा वेगळा असल्यानं तो शिकवू नये.
२१ मार्च १९२५ रोजी विधेयक मंजूर होऊन बटलर कायदा अस्तित्वात आला.
१० जुलै १९२५ रोजी जॉन स्कोप्स या शिक्षकावर टेनेसीच्या सरकारनं खटला भरला. कारण त्यानं वर्गामधे डार्विन सिद्धांत वाचून दाखवला. कोर्टानं स्कोप्सला दोषी ठरवून १०० डॉलर दंड केला.
केस वरच्या कोर्टात गेली. वरच्या कोर्टात स्कोप्सच्या बाजूनं अनेक मुद्दे आले, पण त्यातले दोन महत्वाचे. एक म्हणजे टेनेसीच्या राज्यघटनेत विज्ञान आणि साहित्य शिकवलं पाहिजे असं म्हटलंय. स्कोप्स विज्ञान शिकवत होते. दुसरा मुद्दा होता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. स्कोप्सना त्यांची मतं मांडायचं स्वातंत्र्य अमेरिकेच्या राज्यघटनेनं दिलेलं आहे. पण कोर्टानं ते मान्य केलं नाही.
कोर्टानं गंमतच केली. खटला खारीज केला, पण डार्विनचा सिद्धांत शिकवणं या मुद्द्यावरून नव्हे. तीन मुद्यावर केस काढून टाकून स्कोप्सला सोडलं. १. अशा केसेसमधे जास्तीत जास्त ५० डॉलर दंड न्यायाधिश करू शकतो, न्यायाधिशाचा निर्णय बेकायदेशीर. २. टेनेसीच्या कायद्यानुसार शिक्षा ज्यूरीनं ठरवायची असते, न्यायाधिशानं शिक्षा देणं कायद्याला धरून नाही. ३. देशात फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे असताना असल्या फालतू गोष्टींवर सरकार विचार करते हे बरोबर नाही.
बटलर कायदा आणि स्कोप्स खटल्याची चर्चा सामान्यपणे विज्ञान आणि धर्म यातील संबंधांभोवती फिरते. विश्वाची निर्मिती नेमकी अमूक साली देवानं केली आणि अमूक इतक्या दिवसात केली असं बायबल सांगतं.पण तसे पुरावे मिळत नाहीत. मुळात विश्व कसं निर्माण झालं तेही अजून पुराव्यानिशी सिद्ध झालेलं नाही. पण पुराव्यांवर आधारलेल्या वैज्ञानिक विचार पद्धतीनुसार कोणी तरी ठरवून, आखून विश्वाची निर्मिती केलीय, त्यापाठी काही डिझाईन आहे असाही पुरावा वैज्ञानिकांना सापडलेला नाही. पण विश्व कसं विकसित झालं याचे पुरावे मात्र सापडलेत आणि ते डार्विननं उत्क्रांती सिद्धांतात मांडले आहेत. डार्विन आणि बायबल यांच्यात विसंगती आहे. त्यामुळं बायबलवाले वैतागत असतात.
बटलर कायदा आणि स्कोप्स खटला या दोन गोष्टी अमेरिकेच्या इतिहासातले महत्वाचे टप्पे मानले जातात. प्रस्तुत पुस्तकात दोन्ही गोष्टी केंद्रस्थानी आहेत. लेखिका ब्रेंडा वाईनॲपल या लेखिका इतिहास आणि साहित्य या विषयावर लिहित असतात. इतिहासातला किंवा साहित्यातला एकादा मुद्दा त्या घेतात आणि त्यावर संशोधन करून लिहितात. विस्मृतीत गेलेल्या घटना त्या निवडतात, छोट्या घटना त्या निवडतात आणि त्यांच्या पद्धतीनं त्या घटनांचं महत्व त्या सांगतात. त्यांचं विश्लेषण पठडीच्या बाहेरचं असल्यानं त्यांची पुस्तकं गंभीरपणानं वाचली जातात. प्रस्तुत पुस्तक त्यांच्याच शैलीतलं, परंपरेतलं आहे.
कीपिंग दी फेथमधे लेखिका विज्ञानाची चर्चा करत नाहीत. राजकारणातले लोक बायबलचा विचार विज्ञानाच्या संदर्भात न करता केवळ मतं मिळवण्यासाठी करतात या मुद्द्याची चर्चा पुस्तकात आहे. लेखिका बटलर कायदा लोकशाहीशी जोडतात. लेखिका म्हणते लोकशाही म्हणजे मतभिन्नता, मतं बाळगण्याचं स्वातंत्र्य, विविध मतांनी एकत्र नांदणं. या सूत्राभोवती त्या अमेरिकेचा इतिहास तपासतात आणि बटलर कायदा त्या इतिहासाच्या केंद्रात ठेवतात.
१९२५ साली बटलर कायदा कां झाला? त्यावेळचं वातावरण काय होतं?
बटलर कायदा करणारे बटलर आणि स्कोप्स विरोधात कोर्टात उभे असलेले जेनिंग्ज बायरन ही दोन्ही माणसं राजकारणी होती. जेनिंग्ज बायरन तीन वेळा अध्यक्षपदाचे उमेदवार होते आणि एक टर्म टेनेसीचे परराष्ट्रमंत्री होते. अमेरिकेतलं राजकीय वातावरण आणि मतदार आपल्या बाजूनं आणण्यासाठी आखलेल्या रणनीतीमधे धर्म हा एक घटक ते आणू पहात होते.
पहिल्या महायुद्धानंतर अमेरिका बदलली होती. घरोघरी रेडियो आले होते. प्रत्येकाकडं कार आली होती. अमेरिकेची भरभराट होत होती. नाना प्रकारच्या वस्तूनी अमेरिका, अमेरिकन माणसाचं घर व्यापलं होतं. माणसं अधिकाधीक वस्तूरूप, ऐहिक होत होती. माणसं धर्मापासून दूर जात आहेत असा एक विचार प्रवाह तेव्हां जोरात होता. डार्विनचा सिद्धांत त्याच काळात चर्चेत होता. जगातल्या प्रत्येक गोष्टीवर चर्चचं मत असतं. जगातली प्रत्येक गोष्ट बायबलमधे असते, जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल बायबल मार्गदर्शन करू शकतं अशी चर्चची श्रद्धा आहे. त्यामुळंच बदललेली अर्थव्यवस्था, डार्विन इत्यादी गोष्टी देव, बायबलनं सांगितलेल्या गोष्टीविरोधात आहेत असं सांगायला चर्चनं सुरवात केली.
त्या काळातल्या ‘उजव्यांनी’ या धर्ममताची कास धरली आणि वातावरण तापवायला सुरवात केली. शेवटी गाडी कम्यूनिष्ट, डावे, काळे यांच्यावर जाऊन थडकली. अमेरिकेतलं सार्वजनिक मन दुभंगलं. हा दुभंग सामाजिक होता. काळे-गोरे, विषमता हे मुद्दे त्यात गुंतलेले होते. राजकारणातल्या लोकांनी त्याचा वापर निवडणुकीसाठी केला. सामाजिक दुभंगानं राजकीय रूप घेतलं. डार्विन शिकवणं हा मुद्दा राजकीय झाला.
आज डोनल्ड ट्रंप यांच्या पक्षाचे लोक पुन्हा एकदा उत्क्रांतीचा सिद्दांत शाळात शिकवता कामा नये असं सांगत आहेत, काही राज्यातल्या पाठ्यपुस्तकातून तो विषय काढून टाकण्यात आला आहे.
लेखिका प्रस्तुत पुस्तकात गेल्या दहा वर्षात अमेरिकेत निर्माण झालेल्या ट्रंपीझमकडं लक्ष वेधतात.
प्रस्तुत पुस्तक चर्चेत आहे, त्यावर खूप लिहिलं जातंय याचं कारण १९२५ साली जे घडत होतं तेच २०२५ साली घडतय, त्याचंच विश्लेषण प्रस्तुत पुस्तकात आहे.
।।
पुस्तक Keeping the Faith
GOD, DEMOCRACY, AND THE TRIAL THAT RIVETED A NATION
लेखिका Brenda Wineapple