पुस्तकं/ईलॉन मस्क यांचं चरित्र

पुस्तकं/ईलॉन मस्क यांचं चरित्र

ईलॉन मस्क  हे २०६ अब्ज डॉलरच्या संपत्तीचे जगातले एक नंबरचे श्रीमंत गृहस्थ आहेत.  वॉल्टर आयझॅक्सन यांनी लिहिलेलं त्यांचं  चरित्र प्रसिद्ध झालंय.

 आयझॅक्सन लेखक आणि पत्रकार आहेत. त्यांनी आईनस्टाईन, स्टीव जॉब्ज यांची चरित्रं लिहिली आहेत. ती  खूप खपली आहेत. 

२०२१ सालापासून आयझॅक्सन मस्क यांच्या मागावर होते, त्यांच्या आसपास वावरत होते. हे कळल्यावर मस्क यांनी आयझॅक्सन यांना चरित्र लिहायला परवानगी दिली. मस्क यांचं निरीक्षण करण्यासाठी आयझॅक्सन संचालक मंडळाच्या बैठकीत हजर राहिले. चाळीसपेक्षा जास्त वेळा  आयझॅक्सन मस्क यांना भेटले.  मस्क यांच्याशी संबंधीत १२९ माणसांच्या मुलाखती आयझॅक्सन यांनी घेतल्या.  

ईलॉन मस्क यांचे वडील एरल मस्क द.आफ्रिकेचे रहिवासी. ते इंजिनियर होते. त्यांच्या आर्थिक जीवनात बरेच चढउतार आले. त्यानी व्यवसायही केला. शेजारच्या झांबियातून ते पाचू आणत. बेकायदेशीर रीत्या. त्या पाचूवर प्रक्रिया करून निर्यात करत. तेही बेकायदेशीर रीत्या. काही काळ या व्यवसायातून त्यांना भरपूर पैसा मिळाला. नंतर तो व्यवसाय नुकसानीत गेला.

एरल मस्क स्वभावानं विक्षीप्त होते. ईलॉन मस्क यांना त्यानी वाईट वागवलं, ‘तू मठ्ठ आहेस, निकामी आहेस, तुझ्यात हिंमत नाही’ असं म्हणत ते इलॉनला सतत हिणवत राहिले. एरल आपल्या पत्नीशीही वाईट वागले, क्रूरपणानं वागले. इलॉन मस्क यांचं बालपण त्यांच्या मनावर सतत आघात करत राहिलं. 

ईलॉन यांच्या सवंगड्यानी ईलॉनना खूप बदडलं, त्यांचं रॅगिंग केलं. 

खुद्द ईलॉनच म्हणतात की आपल्याला फार संघर्ष करावा लागला. संकटं आणि वेदना यांची त्यांना इतकी सवय झाली की त्यांच्या मनात सतत एक गंड असतो की जग त्यांच्यावर अन्याय करतंय. जग एकूणात संकटग्रस्त आणि दुःखमय आहे, त्या जगाला संकटातून मुक्त करायची जबाबदारी परमेश्वरानं आपल्यावर टाकलीय असं ईलॉन मस्क यांना गडदपणे वाटतं.

मस्क १९९५ साली अमेरिकेत गेले. कॅलिफोर्नियात त्या वेळी डॉट कॉम कंपन्या फोफावत होत्या. वडिलांकडून आणलेले पैसे त्यांनी झिपटू या कंपनीत घातले. तिथं त्यांना २.२ कोटी डॉलरचा फायदा झाला. त्यातले पैसे त्यांनी एक्सकॉम या कंपनीत घातले. ती नीट चालेना, डॉट कॉम कंपन्या तोट्यात जाऊ लागल्या होत्या. त्यांनी कॉन्फिनिटी या कंपनीत एक्सकॉम मिसळली. कॉन्फिनिटीची पेपॅल झाली. पेपॅल ईबे या कंपनीनं विकत घेतली. ईबेमधून मस्कना २५ कोटी डॉलर मिळाले. बाजारात काय चालतं याचं गणित मस्क यांना समजत होतं. ते पैसे आणखी कशात तरी गुंतवले असं होता होता आज स्पेसएक्स (१७५ अब्ज डॉलर) आणि टेसला (८०० अब्ज डॉलर) या दोन कंपन्या त्यांच्या मालकीच्या आहेत.   

 लेखक व्यावसायिक आणि कुशल पत्रकार आहेत, ईलॉन मस्क यांच्याबद्दलची खूप माहिती या पुस्तकात सापडते.   मानसीक संघर्षांना तोंड देत देत मस्क यांनी उत्कर्ष साधला असं वरील माहिती वाचल्यानंतर लक्षात येतं. मस्क हीरो झाले, त्यांच्याभोवती एका कर्तृत्ववान माणसाचं वलय कां  निर्माण झालं ते पुस्तक वाचतांना सहज लक्षात येतं. मस्क यांचं जीवन नाट्यमय आहे.

मस्क यांची दुसरी बाजू लोकांना माध्यमांतून कळलेली आहे.  

मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर खर्च करून ट्विटर ही कंपनी विकत घेतली. त्यांना ट्विटरवर एकहाती मालकी हवी होती. ट्विटर ही कंपनी काही तत्वांनुसार चालत होती.खोटी माहिती पसरवणं, घातक माहिती पसरवणं ट्विटर टाळत असे. त्यामुळं कंपनीतले बरेच संचालक, अधिकारी, कर्मचारी मस्क कार्यकारी प्रमुख असू नयेत या मताचे होते. मस्क यांनी आपले विरोधक हुडकले आणि त्यांना हुसकलं. ७५ टक्के कर्मचाऱ्यांना हाकलून दिलं. 

मस्क यांना ट्वीटरचं मुख्य कारभारी (सीईओ) व्हायचं होतं. कंपनीतल्या लोकांनी ते होऊ दिलं नाही, कारण मस्क यांची मतं विचित्र असतात, बदलतात, लहरी असतात. मस्क यांनी नाईलाजानं एका महिलेला त्या पदावर नेमलं. पत्रकारांसमोर बोलताना मस्क म्हणाले की सीईओ पदावर मी एक कुत्रं नेमलं आहे.

कंपनी ताब्यात आल्यावर मस्क यांनी खोटी, घातक, विषारी, अंधश्रद्ध प्रचार करणारे अकाऊंट पुन्हा सुरु केले. लोकशाही आणि सज्जनपणा यांचे तीन तेरा वाजवणारा ट्रंप यांचा अकाउंट मस्क यांनी पुन्हा सुरु केला. लोक सांगत होते की असा उद्योग करू नका. मस्क म्हणाले कंपनी माझ्या मालकीची आहे, मी काहीही करेन, मला कोणी विचारू शकत नाही.

ट्वीटर वापर करणाऱ्यांची संख्या घसरली, जाहिरातदारांनी ट्विटरकडं पाठ फिरवली. आज ट्विटर तोट्यात आहे. ट्विटरचं बाजारातलं मोल ४४ अब्ज डॉलरवरून १५ अब्ज डॉलरवर आलंय. मस्कना चिंता नाही. त्यांच्याकडं येवढा पैसा आहे की कंपनी पुर्ण खड्ड्यात गेली तरी त्यांना चालेल. मधल्या मधे लोकांच्या नोकऱ्या गेल्या, लोकं रस्त्यावर आले तरी त्यांना चालेल.

मस्क नोकर, सहकारी यांच्याशी दंडेली करत असतात, त्यांचे जाहीर आणि खाजगीत वाभाडे काढत असतात. कोणी विरोधटीका केली तर ताबडतोब ‘यू आर फायर्ड’ असा आदेश त्यांच्या तोंडून निघतो. त्यांच्या माजी आणि आजी पत्न्यांनी तसा आदेश अनेक वेळा ऐकला आहे.

मस्क असं बिनधास्त वागू शकतात कारण आपण परमेश्वरी कार्य पार पाडत आहोत असं त्याना वाटतं. मस्क व्यसनी आहेत, त्यांना मादक द्रव्यांचं व्यसन आहे, त्यांची निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत आहे, रात्र रात्र त्यांना झोप लागत नाही. झोप लागली नाही की ते मध्यरात्रीही आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काही तरी काम करण्यासाठी पिटाळतात.

असे ईलॉन मस्क. पुस्तकातले आणि पुस्तकाबाहेरचे.

असो.

।।

Elon Musk

by Walter Isaacson

Simon and Schuster, 670 pp., $35.00

Comments are closed.