पुस्तकं/डार्विनच्या पत्रांचा संग्रह

पुस्तकं/डार्विनच्या पत्रांचा संग्रह

डार्विनची १६ हजार पत्रं.

विश्वाचा उत्क्रांती सिद्धांत मांडणाऱ्या चार्ल्स डार्विन (१८०९-१८८२) यांच्या पत्रव्यवहाराचा ३० वा खंड नुकताच प्रसिद्ध झाला. सगळे खंड छापील आहेत, डिजिटल आहे, ऑन लाईन उपलब्ध आहेत. ऑन लाईन खंड वाचण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. 

या संग्रहात १६ हजार पत्रं आहेत. 

चार्ल्स डार्विन दररोज पत्र लिहित असत. आलेली पत्रं तारेत घालून ठेवत. तारा भरून जात. मग काही पत्रं डार्विन जाळून टाकत.

डार्विन यांचा जगाशी आणि ज्ञानाशी संबंध टिकला तो त्यांच्या पत्रांमधून. डार्विन यांचा पत्रव्यवहार अनेकांगी होती. त्यात मित्राना लिहिलेली पत्रं असत. कौटुंबिक पत्रव्यवहार असे. हौशी संशोधकांशी केलेला पत्रव्यवहार असे. अमूकाला अमूक जागी नेमा, तमुकाचा विचार प्राध्यापकपदासाठी करा अशा शिफारशी पत्रांत असत. धर्म, राजकारण, इतिहास इत्यादी विषयांवर ते पत्रातून विद्वानांशी चर्चा करत. पत्नीशी डार्विन यांचं खूप घट्ट नातं होतं, वैचारिक आणि इतर अनेक बाबतीत. पत्नीशी त्यांचे मतभेदही असत. लग्नापूर्वी आणि नंतरही डार्विननी आपल्या पत्नीशी सतत पत्रव्यवहार केला.

भूगर्भशास्त्र, प्राणीशास्त्र यांच्यासह अनेक विज्ञानशाखांचा अभ्यास डार्विन करत. या क्षेत्रातले हौशी आणि व्यासंगी अशा दोन्ही व्यक्तींशी त्यांचा पत्रव्यवहार असे. आपलं संशोधन ते व्यासंगी व्यक्तींशी ताडून पहात असत.

१८२१ ते १८८२ (मृत्यूपर्यंत) डार्विन यांनी २००० व्यक्तींशी पत्रव्यवहार केला. डार्विनकडून पत्रं जात, पलिकडून पत्र येत, डार्विन आलेल्या पत्रांना उत्तरं देत आणि नव्या शंका विचारत, एकेका व्यक्तीशी दीर्घ पत्रव्यहार चाले. 

अमेरिकेतल्या व्हरमॉंटमधील फ्रेडरिक बर्कहार्ट आणि ॲन बर्कहार्ट यांनी १९७४ साली पत्रव्यवहाराचं संपादन सुरु केलं. केंब्रिज युनिव्हर्सिटीकडं ९ हजार पत्रं होती. दोघांनी युरोप,आशिया आणि अमेरिकेतल्या लोकांशी संपर्क करून आणखी ७ हजार पत्रं मिळवली. पत्रलेखकांचे संदर्भ, विषयांचे संदर्भ यांची नोंद करत असताना दोघांनी संपादकीय टिपण्या तयार केल्या.

१९८५ साली पहिला संग्रह प्रसिद्ध झाला. २०२३ साली तिसावा संग्रह प्रसिद्ध झाल्यावर हा प्रकल्प थांबवण्यात आला. संग्रह आता ऑन लाईन मुक्तपणे सर्व जनतेला उपलब्ध आहे. बर्कहार्ट यांना ११ जणांच्या टीमनं मदत केली. स्लोन फाऊंडेशननं १९९४ साली या प्रकल्पाला १० लाख डॉलर दिले आणि नंतर प्रकल्प संपेपर्यत पैसे देत राहिले.

बर्कहार्ट यांचं म्हणणं आहे की विज्ञान कसं विकसित होतं त्याचा वस्तुपाठ या पत्रव्यवहारातून मिळतो.  

१८५९ साली On the Origin of Species by Means of Natural Selection, or the Preservation of Favoured Races in the Struggle for Life ची पहिली आवृत्ती प्रसिद्द झाली. खरं म्हणजे बीगलप्रवासातून परतल्यावर १८४० च्या सुमाराला डार्विनचा सिद्धांत तयार झाला होता. काही लोकांचं म्हणणं आहे की उत्क्रांतीच्या सिद्धांतामुळं ख्रिस्ती विचार चूक ठरत असल्यानं लोकक्षोभ होईल अशी भीती डार्विनला वाटली असावी. काहींचं म्हणणं आहे की डार्विन पुस्तक अधिकाधीक निर्दोष करण्याच्या खटपटीत होते, त्यांना प्रकृतीचा त्रास होत असल्यानं विलंब झाला. पत्रव्यवहारातून या मुद्द्याला स्पष्टता येत नाही.

दुसरी आवृत्ती १८६० मधे प्रसिद्ध झाली. १८७२ मधे सहावी आवृत्ती प्रसिद्ध झाली. आवृत्ती म्हणजे पुनर्मुद्रण नव्हे. प्रत्येक आवृत्तीचं संपादन होत असे, नवी माहिती टाकली जात असे, काही जुनी माहिती गाळली जात असे. प्रत्येक आवृत्ती नव्यानं लिहिली जात होती. अनेक बदल डार्विन यांच्या विचारात झालेल्या बदलांचे निदर्शक होते. सुरवातीला निसर्गात झालेले बदल असं डार्विननी लिहिलं होतं. त्यात उत्क्रांती हा शब्द नव्हता. बदल आणि उत्क्रांती या शब्दामधे केवळ शब्दांचा खेळ नव्हता. विश्वाच्या निर्मितीतला देवाचा हात हा त्या काळातला वादाचा मुद्दा होता आणि तो मुद्दा उघडपणे डार्विन टाळत होते. दुसऱ्या आवृत्ती उत्क्रांती हा शब्द टाकला गेला. 

पहिल्या आवृत्ती पुस्तकाचा शेवट असा होता.  There is grandeur in this view of life, with its several powers, having been originally breathed into a few forms or into one; and that, whilst this planet has gone cycling on according to the fixed law of gravity, from so simple a beginning endless forms most beautiful and most wonderful have been, and are being, evolved.

यामधे by the creator असे शब्द डार्विननी घातले. निसर्ग आणि जीवन यातलं वैभव निर्मात्यानं म्हणजे देवानं सुरवातीला निर्माण केले असं डार्विननी लिहिलं.

डार्विन प्रोजेक्टचे बर्कहार्ट म्हणतात की तेरा वर्षात पुस्तकाच्या सहा आवृत्या झाल्या याला कारण डार्विन यांच्या विचारात बदल होत होते. विद्वान आणि संशोधकांशी झालेल्या पत्रव्यहारामुळं हे बदल झाले. सांगोवांगी असलेल्या गोष्टी हा पुरावा होत नाही, पुराव्याला आधार लागतात. डार्विन ते आधार स्वतः गोळा करत, इतर संशोधकांचे  विश्वास ठेवण्यालायक प्रयोग, पुरावे डार्विन मान्य करत. 

प्रस्तुत पत्रांच्या संग्रहात हौशी संशोधक आणि प्रख्यात प्रकांड संशोधक यांच्याशी डार्विन यांनी केलेला पत्रव्यवहार डार्विन कसे घडले, डार्विन यांचं विज्ञान कसं घडलं याचं दर्शन घडवतो.

डार्विन यांचा १८८२ मधे मृत्यू झाला. १८८१ पर्यंतची पत्रं प्रस्तुत संग्रहात आहेत.   १९७४ ते २०२२ येवढा काळ खटपट करून मिळालेली १६ हजार पत्रं म्हणजे डार्विन यांचा पूर्ण पत्रव्यवहार नाही. अनेक माणसांशी झालेला पत्रव्यवहार अजूनही अज्ञात आहे. अनेकांना या प्रकल्पाची माहिती नाही. अनेक पत्रं डार्विनांच्या समकालीन लोकांच्या घरी अडगळीत पडलेली आहेत, ती हळूहळू बाहेर येत आहेत. संग्राहकांचं त्या पत्रांवर लक्ष आहे. दर वर्षी पन्नासेक पत्रं अजूनही संग्राहकांकडं येत आहेत आणि ती संग्रहात गुंफली जात आहेत. 

।।

Comments are closed.