पुस्तकं/ पुस्तकं काढणारी मस्त माणसं.

पुस्तकं/ पुस्तकं काढणारी मस्त माणसं.

THE BOOK-MAKERS

A HISTORY OF BOOKS

ADAM SMYTH

||

प्रस्तुत पुस्तकात पुस्तक व्यवसायातल्या १८ व्यक्तींची शब्दचित्रं आहेत. १४७६ साली लंडनमधे स्थापन झालेल्या छापखान्याच्या निर्मात्यापासून सुरवेत होते, १८८० सालच्या पहिल्या सर्क्युलेटिंग लायब्ररीपर्यंतचे पुस्तक व्यवहार आणि ते घडवून आणणाऱ्या उद्योगी व्यक्ती या पुस्तकात आहेत. आजच्या डिजिटल पुस्तकांपर्यंत लेखक पोचला आहे.

पुस्तक या वस्तूचा एक धावता इतिहास या पुस्तकात आहे. लेखक, प्रकाशक, कंपोझर, प्रिंटर, बाईंडर, विक्रेता असे मिळून पुस्तक छापतात. काळाच्या ओघात पुस्तकाचे आकार आणि रुप बदलत गेलं. आता घरातल्या साध्या टेबलावरही पुस्तक निर्माण होतं. एकच माणूस हस्तलिखित (?) मिळवतो, ते टाईपसेट करतो, पेज मेकिंग करतो, छापतो आणि स्पायरल किंवा इतर पद्धतीनं पुस्तक काढतो. विकण्यासाठीही दुकान काढावं लागत नाही, कुरियर किंवा ॲमेझॉनसारख्या यंत्रणेतून इच्छुकाला पुस्तक पाठवलं जातं.

पुस्तकांचे आकार बदलतात, प्रकाशन आणि विक्रीच्या पद्धती बदलतात, पण पुस्तक शिल्लक रहातं.

लेखक ऑक्सफर्डमधे साहित्य हा विषय शिकवतो. हौस म्हणून त्यानं एका गोदामात छापखानाही चालवलाय.

।।

एक नामांकित इंग्रज.विल्यम कॅक्सटन.

 १४७६ साली त्यानं वेस्टमिन्स्टर (लंडनमधे ) छापखाना सुरु केला. 

कोण हा कॅक्सटन आणि त्यानं छापखाना कां सुरु केला?

त्याची एक रंजक गोष्ट आहे.

कॅक्स्टन हा ब्रिटीश माणूस बेल्जममधे ब्रिटीश मुत्सद्दी होता. त्यानं एका फ्रेंच पुस्तकाचं भाषांतर  इंग्लीशमधे  ‘कलेक्शन ऑफ हिस्टरीज ऑफ ट्रॉय’ या नावानं केलं. लोकांना ते आवडलं. त्याच्या चाहत्यांनी आग्रह केला की त्या पुस्तकाची छपाई झाली पाहिजे. हे साल होतं १४७२-७३. कॅक्स्टनची बेल्जियममधली कामगिरी संपवून तो लंडनला परतला. मित्रानी पुन्हा धोशा लावला, पुस्तक छाप.

कॅक्सन बेल्जियमममधे होता तेव्हां कलोन या जर्मन शहरात गेला होता, तिथं त्यानं छापखाना पाहिला होता. छपाई कलेत जर्मनी आघाडीवर होता, इंग्लंडमधे छपाई विकसित झाली नव्हती.

इंग्लंडमधे परतल्यावर कॅक्सटननं  १४७६ साली आपलं पुस्तक छापण्यासाठी छापखाना सुरु केला,  ‘कलेक्शन’ छापलं. इंग्लीशमधलं ते पहिलं पुस्तक मानलं जातं.

बेल्जियममधे असताना कॅक्सटनचा विंकिन डिवोर्ड या एका छपाईचं कौशल्य असलेल्या माणसाचा परिचय झाला होता. डिवोर्ड डच-जर्मन होता. कॅक्सटन छपाई तंत्रात सुधारणा करण्यासाठी डिवोर्डला इंग्लंडमधे आयात केला. 

विंकिन डी वोर्डनं छपाईचं तंत्र आणि व्यवहार यात कायच्याकाय बदल केले. त्यानं छापखाना मोठा केला, लंडनमधे फ्लीट स्ट्रीटवर हलवला. फ्लीट स्ट्रीटवरचा पहिला छापखाना.हीच फ्लीट स्ट्रीट आज वृत्तपत्र उद्योग म्हणून ओळखली जाते. 

पुस्तक व्यवसाय यशस्वी व्हायचा तर खूप पुस्तकं छापायला हवीत. म्हणजे छपाई यंत्राची गती आणि तंत्र विकसित करायला हवं. त्यासाठी पैसे लागणार.डी वोर्डनं इंग्लंडच्या राजा सातवा हेन्री याच्या  आईकडून पैसे मिळवले.

पुस्तक वाचलं जावं, लोकप्रिय व्हावं यासाठी त्यानं पुस्तकात रेखाटनं टाकली, विपुल. वूडकट हे तंत्र त्या काळात प्रचलित होतं, ते त्यानं वापरलं. कॅक्सटनच्या काळात कागद जर्मनीतून मागवला जात असे. डीवोर्डनं लंडनमधल्याच एका कागद उत्पादकाला प्रोत्साहन देऊन कागद वापरायला सुरवात केली, वाहतूक खर्च वाचला, स्थानिक कागद स्वस्त मिळाला. 

त्यानं लंडनमधल्या सेंट पॉल चर्चच्या आवारात पुस्तकाचं दुकान, बुक स्टॉल, टाकला. जगातलं हे पुस्तकाचं पहिलं दुकान मानलं जातं. पुढं चालून ते इंग्लंडमधल्या पुस्तक व्यापाराचं केंद्र झालं.

डीवोर्डनं इटालिक टाईप वापरायला सुरवात केली. पुस्तकांमधे हिब्रू आणि अरेबिक अक्षरं वापरण्याची सुरवात त्यानं केली.

डिवोर्डनं लोकप्रिय कादंबऱ्या, कथा, कविता छापल्या. लोकांची धार्मिक आवड लक्षात घेऊन त्यानं धार्मिक पुस्तकं दणादण छापली.

मजाच मजा. त्यानं कागदी कंबरपट्टे छापले. त्या कंबपट्ट्यावर परमेश्वराचा आशिर्वाद लिहिलेला असे. तुझी प्रसुती उत्तम होवो तुझी मुलं थोर होवोत. गरोदर महिला जेव्हां प्रसुतीसाठी जात तेव्हां ते कंबरपट्टे गुंडाळत.  

त्यानं ४०० पुस्तकं, ८०० आवृत्या छापल्या. लॅटिन व्याकरणाचं पुस्तक त्यानं छापलं, त्याच्या १५५ आवृत्या निघाल्या.

आता बोला.

चार्ल्स एडवर्ड मुडी या गृहस्थानं १८४० एका वास्तूत आपली पहिली सर्क्युलेटिंग लायब्ररी सुरू केली. कुणाही सभ्य घरातल्या स्त्रीला वाचावंसं वाटेल, वाचू नये असं वाटणार नाही, अशी पुस्तकं या लायब्ररीत असतील अशी जाहिरात मुडीनं केली. वर्षाला एक गिनी (एक सोन्याचं नाणं, त्या काळी त्याचं मोल सुमारे एक पाऊंड होतं) अशी वर्गणी होती. एका गिनीत एक पुस्तक घरी न्यायला दिलं जात असे. दोन गिनी दिल्या दर दोन पुस्तकं.

या आधी लायब्ररीत सामान्यतः जागच्या जागी वाचण्यासाठीच पुस्तकं ठेवलेली असत. पुस्तक न्यायचं नाही. एकादं लोकप्रिय पुस्तक असेल तर त्याला वाचक खूप. लायब्ररी किती पुस्तकं ठेवणार? आणि लोकप्रियता संपली तितक्या प्रतींचं काय करायचं?

त्या काळात त्रिखंडी पुस्तकांची फॅशन होती. तीन खंडांत कादंबरी. प्रत्येक खंडात ३०० पानं. एक खंड प्रकाशित होई. तो लोकांना आवडे. लोक विकत घेत. त्या पैशातून दुसऱ्याची छपाई. दुसऱ्यातून मिळणाऱ्या पैशातून तिसऱ्या खंडाची छपाई. तीन खंडांची किंमत साडेचार गिनी. त्या वेळी सुस्थितीत असलेल्या मध्यम वर्गी कुटुंबांचं आठवड्याचं उत्पन्न ९ गिनी होतं. ही पुस्तकं सामान्य माणसाच्या आटोक्यातली नव्हती, श्रीमंत ती विकत घेत, ते त्यांचं फॅशन स्टेटमेंट झालं होतं. परंतू त्या कादंबऱ्या लोकप्रिय असल्यानं त्यांना मागणी असे. १००० प्रतींची आवृत्ती असे.

मुडीनं आयडिया काढली. तो कादंबऱ्या ५० टक्के डिसकाऊंटनं घेत असे. नेमक्या किती ते माहीत नाही. पण शेदोनशे तर नक्कीच. लायब्ररीत बायकांची झुंबड उडायची. मुडीनं आणखी एक दालन घेतलं, आणखी एक घेतलं असं करत त्याची लायब्ररी लंडनमधे सहा ठिकाणी पसरली. वाचक खुष. वाचक वाढले. जास्त पुस्तकं छापली जाऊ लागली. पुस्तकांचा व्यवसाय भरभराटला.

एकदा त्याच्या लायब्ररीत ७५ लाख प्रती होत्या.

यथावकाश पुस्तकं स्वस्तात निघू लागली, लोकांना ती परवडू लागली आणि सर्क्युलेटिंग लायब्ररीचा धंदा बसला. 

।।

एके काळी छापखान्यात फक्त पानं छापली जायची आणि ती गुंडाळी करून वाचकाला दिली जायची. वाचकानंच मग त्या पानांचं बाईंडिंग करून पुस्तक करायचं.

पुस्तकाला, त्याच्या कव्हरला, त्यातल्या कागदांना एक वास असतो. पुस्तक हातात घेतल्यावर बोटांना एक सुख जाणवतं. पुस्तकाची पानं उलटतांना त्या कागदाच्या टेक्स्चरमुळं बोटं सुखावतात. पुस्तक देखणंही असतं. उत्तम फाँट, उत्तम लेआऊट, कागदाचा रंग, शाईचा रंग यातून पुस्तक म्हणजे एक प्यारी प्यारी गोष्ट बनते.

।।

प्रस्तुत पुस्तक वाचतांना पुस्तकांचा गंध, पुस्तकांचा स्पर्श येवढंच नव्हे तर ट्रेडल यंत्रावर कागद झापला जात असताना येणारा आवाजही कानात घुमतो.

।।

Comments are closed.