पुस्तकं. बहुकुटुंबी रामन
THE KAOBOYS OF R&AW
B. Raman.
||
लेखक बहुकुटुंबी रामन, बी.रामन, रॉ या हेरसंस्थेचे प्रमुख होते. चार वर्षं इंडियन एक्सप्रेसमधे पत्रकारी केल्यावर ते आयपीएसमधे गेले. सुरवातीला ते इंटेलिजन्स विभागात होते. १९६८ साली रीसर्च अँड ॲनालेसिस विंग (रॉ) स्थापन झाल्यावर तत्कालीन रॉ प्रमुख राम नारायण काव यांनी त्यांना रॉमधे घेतलं. बांगला देश स्थापनेची तयारी रॉनं केली होती, तिच्यात रामन यांचा सहभाग होता. इंदिरा गांधींचे ते अत्यंत निकटचे आणि विश्वासू अधिकारी होते.
||
इसरायलकडं मोसाद नावाची हेरसंघटना आहे. ती जगातली एक नंबरची हेर संघटना मानली जाते. इसरायलला सर्वात मोठा धोका वेस्ट बँक आणि गाझामधून असतो. तिथले गनीम इसरायलमधे घुसतात, आत्मघातकी स्फोट करतात. इसरायलमधे केव्हां कुठं स्फोट होईल ते सांगता येत नसल्यानं मोसाद जागृत असते, वेस्ट बँक आणि पॅलेस्टाईनमधे पेरलेले हेर आणि खबरी मोसादला मिनिटा मिनिटाची माहिती देत असतात. या माहितीच्या आधारे मोसाद त्यांना नकोशा असलेल्या लोकांचा नायनाट करत असतं.
हेर अत्यंत गुप्तपणे काम करत असतात. हेर आणि हेरसंघटनांच्या भोवती गुप्ततेचं एक वलय असतं, दोघंही कधीही न उलगडलेली रहस्य असतात. हेर आणि हेरसंघटना यांच्याबद्दल लोकांना कुतुहुल असतं, खरं खोटं काहीही कळलं तरी लोक ते लपालप ग्रहण करतात. म्हणूनच हेरानं लिहिलेलं आत्मचरित्र किंवा आठवणी थरारक आणि वाचनीय असतात.
भारतात असेच एक हेर होऊन गेले. भक्तकुटुंब रामन हे त्यांचं नाव. ते रॉ या हेरसंघटनेचे प्रमुख होते. त्यांनी २००७ साली त्यांच्या आठवणींचं पुस्तक लिहिलं. THE KAOBOYS OF R&AW या त्यांच्या पुस्तकात कायदा आणि नीतीविवेक या गोष्टी सांभाळून रामन यांनी लिहिलेलं अनुभव रोचक आहेत, अनेक दडलेले अर्थही त्यातून वाचकांपर्यंत पोचतात.
Deniable actions असे शब्द लेखकांनी हेरसंस्थेनं केलेल्या उद्योगांबद्दल वापरले आहेत. पूर्व पाकिस्तानातल्या बंडखोरांना भारत सरकारनं मदत केली, परिणामी पूर्व पाकिस्तान फुटला आणि बांगला देश निर्माण झाला. भारतानं हा उद्योग केला की नाही? केला. पण आपण तसलं काहीही केलं नाही, ते सारं बंडखोरांनीच केलं असं भारत म्हणत रहातो, जबाबदारी झटकतो. हेरसंस्थेचं हेच वैशिष्ट्यं असतं.करून सवरून नामा निराळे रहाणं. याच तत्वावर हेरखातं आधारलेलं असतं.
हेरगिरीचा एक प्रकार छुपी हेरगिरी. रामन पॅरिसमधे हिंदू या पेपराचे प्रतिनिधी म्हणून काम करत. हिंदूसाठी ते काहीही करत नसत किंवा हिंदू त्यांना पगारही देत नसे. रॉ त्यांचं पगारपाणी पहात असे आणि ते पूर्णवेळ रॉसाठी हेरगिरी करत. त्या काळात इराणचे अयातुल्ला खोमेनी पॅरिसमधे मुक्काम करून होते. खोमेनींच्या अंतर्वर्तुळात रामन यांनी प्रवेश मिळवला होता. एका इराणी माणसाला रामन यांनी व्यक्तिगत मदत केली होती त्यामुळं तो माणूस रामन यांना आतली माहिती पुरवत असे.
रामन यांनी फ्रान्समधली माहिती काढता कामा नये असा संकेत होता. पॅरिसमधे राहून त्यांनी इतर देशांची माहिती काढली तर फ्रान्सचा आक्षेप नसे.
रामन भारताच्या स्वित्झर्लंडच्या दूतावासात मुत्सद्दी म्हणून काम करत. मुत्सद्दी या बुरख्याआडून ते हेरगिरी करत. मुत्सद्देगिरी करत असताना त्यांच्यावर सगळ्यांचं लक्ष असे. ते ज्या कोणाला भेटत त्याची नोंद होत असे. त्यामुळं त्यांना स्वातंत्र्य नव्हतं, परदेश खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं त्यांना ऐकावं लागत होतं. पॅरिसमधे ते पत्रकार म्हणून वावरत असल्यानं त्यांना मुक्तपणे आणि गुप्तपणे कोणालाही भेटता येत असे.
भारतात पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग अंतर्गत माहिती मिळवत असे आणि बाहेरची माहिती लष्कराचा गुप्तवार्ता विभाग मिळवत असे. दोन खात्यांत संयोजन नसे. लष्कराच्या खूपच मर्यादा असल्यानं बाहेरच्या वार्ता भारताला मिळत नसत. परदेशातल्या घडामोडींची माहिती नसल्यानं पाकिस्तानं केलेल्या लष्करी कारवाया (१९५६, १९६५) आणि चीनचं १९६२ चं आक्रमण भारताला अंधारात ठेवून झालं होतं. इंदिरा गांधी यांनी अभ्यास केला, एमआयसहा-मोसाद-सीआयए यांचा अभ्यास करून इंदिरा गांधीनी १९६८ साली रॉ हा विभाग स्वतंत्रपणे स्थापला. कारण त्या वेळी पूर्वोत्तर भारतात चीन, पाकिस्तान यांनी दहशतवादी कारवाया सुरु केल्या होत्या. त्या वेळी रामन पूर्वोत्तर भारत, ब्रह्मदेश, पूर्व पाकिस्तान या विभागाचे प्रमुख हेर होते. इंदिरा गांधींच्या सूचनेवरून काव आणि रामन यांनी त्या विभागात हेरांचं जाळं उभारलं, तिकडही इत्थंभूत माहिती गोळा केली. त्या आधारेच पूर्वपाकिस्तानात लढाई झाली, पाकिस्तानचा पराभव झाला, बांगला देशची निर्मिती झाली.
बांगला देश निर्मितीचं मोठ्ठं श्रेय रॉला जातं.
बांगला देशात भारताची ऊठबस जगाच्या लक्षात आली. पाकिस्ताननं आगपाखड केली. अमेरिका पाकिस्तानच्या बाजूनं हस्तक्षेप करत होती तेव्हां त्याची खबर मिळवून इंदिरा गांधीनी एकीकडं अमेरिकेला तंबी दिली आणि दुसऱ्या बाजूला रशियाला भारताच्या बाजूनं उभं केलं. या खटाटोपात भारताची भूमिका उघड झाली, भारतावर टीका होऊ लागली.
आपला त्रास बांगला देशला होऊ नये म्हणून इंदिरा गांधीनी रॉला बांगला देशातून काढता पाय घ्यायला सांगितलं. बांगला देशातली खबरबात भारताला मिळेनाशी झाली. बांगला देशात पाकिस्ताननं हातपाय पसरले. शेवटी मुजीब यांचा खून झाला. हे सारं रॉ टाळू शकलं असतं.
खालिस्तानवाद्यांच्या सर्व हालचालींवर रॉचं लक्ष होतं. कॅनडा, युके की खालिस्तानींची मुख्य केंद्रं होती. झैलसिंग यांच्या आग्रहाखातर भिंद्रानवालेंचा भस्मासुर इंदिरा गांधीनी उभा केला. प्रकरण हाताबाहेर जातंय हे कळल्यावर त्यांनी आणि राजीव गांधीनी खालिस्तानवाद्यांना थंड करण्याचे, त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू केले. पण तोवर प्रकरण हाताबाहेर गेलं होतं. ब्ल्यू स्टार आणि ब्लॅक थंडर अशा दोन कारवाया इंदिरा गांधीनी केल्या. परिणामी खालिस्तानी लोक संतापले. खालिस्तानी लोक इंदिरा गांधीना मारण्याचा कट रचत होते. रॉनं सारी माहिती इंदिरा गांधीना दिली. इंदिरा गांधीनी बुलेट प्रुफ जॅकेट वापरावं, त्यांच्या अंगरक्षकांत आणि जवळ वावरणाऱ्यांत कोणीही शिख असू नये, त्यांच्या रहात्या जागेत-ऑफिसात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करावी, एक अँब्युलन्स त्यांच्या सोबत कायम असावी इत्यादी सूचना रॉनं इंदिरा गांधीना केल्या होत्या. इंदिरा गांधीनी त्या मानल्या नाहीत. त्यांचा खून झाला.
रामन यांच्या मते इंदिरा गांधी उत्तम पंतप्रधान होत्या. मोरारजीना शिवांबू आवडतं हे कळल्यावर झिया उल हक त्यांच्याशी खाजगी संभाषण करून शिवांबू उपचार जाणून घेत, त्यामुळं मोरारजी झियांवर खुष होते.
संघाच्या कार्यकर्त्यांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण रॉनं द्यावं असा अडवाणींचा आग्रह होता. असं काही करणं बरोबर नाही असं रामन यांना वाटत होतं. अडवाणींच्या आग्रहावरून जम्मू आणि दिल्लीत रॉचे अधिकारी आणि संघाचे कार्यकर्ते यांच्या बैठकाही झाल्या. पण नंतर अडवाणी रथयात्रेत गुंतले आणि प्रशिक्षणाचा विचार बारगळला.
व्ही पी सिंग, राजीव गांधी पंतप्रधान असतानाचे रंजक किस्से पुस्तकात आहेत.
पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. कथनाच्या ओघात राजकीय व्यक्तींचे उल्लेक येतात खरे पण पुस्तक अजिबातच राजकीय नाही.
एका प्रामाणिक, कायद्यानं चालणाऱ्या, कर्तव्यदक्ष, स्वच्छ अधिकाऱ्याची ओळख या पुस्तकातून होते.
।।