पुस्तकं/बेन गुरियन यांची कुलंगडी

पुस्तकं/बेन गुरियन यांची कुलंगडी

BEN-GURION’S SCANDALS 

How the Hagannah and The Mossad Eliminated Jews 

Naeim GILADI 

।।

बेन गुरियन यांची कुलंगडी.

थियोडोर हर्झल, चाईम वाईझमन आणि बेन गुरियन हे इसरालचे निर्माते आहेत. त्यांच्या अथक परिश्रमामुळं इसरायल निर्माण झाला. 

शीर्षकामधे स्कँडल्स असा शब्द वापरला असला आहे.

परंतू पुस्तकात कुलंगडी बाहेर काढलेली नाहीत. बेन गुरियन यांच्या वर्तणुकीचं विश्लेषण लेखकानं केलं आहे. 

बेन गुरियन हे इसरायलचे निर्माते आहेत आणि लेखक त्या निर्मात्यावरच टीका करतोय म्हटल्यावर पुस्तकाकडं सावधपणे पहायला हवं.

एका देशाच्या निर्मात्यावर लिहिणारा हा लेखक कोण आहे ते पहाण्याच्या आधी पुस्तकात काय आहे ते पहायला हवं. लेखकानं गुरियन यांचं मोठेपण अगदी सुरवातीला मान्य केलेलं आहे.

लेखकाचं म्हणणं असं. इसरायलमधे (म्हणजेच तत्कालीन पॅलेस्टाईनमधे) एकही अरब शिल्लक राहू नये असं गुरियन यांचं धोरण होतं. इसरायलच्या स्थापन होण्याच्या आधी आणि नंतर गुरियन आपण अरबांसोबत सहजीवनाला तयार आहोत, त्यांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत  असं तोंडदेखलं म्हणत असत; पण त्यांचा व्यवहार कायम अरबांना पॅलेस्टाईनमधून घालवण्याचाच होता.

हे उद्दीष्ट गुरियन यांनी दोन प्रकारे साध्य केलं असं लेखकाचं म्हणणं आहे. एक म्हणजे अरबांना हाकलून देणं. इरगुन, लेवी इत्यादी संघटना आणि लष्कर यांचा वापर करून गुरियन यांनी अरबांना बेघर केलं, त्यांच्यावर अत्याचार केले, त्यांची जमीन ताब्यात घेतली.

लेखक उदाहरण देतो ते इसरायलमधून स्थलांतरीत झालेल्या पॅलेस्टिनी अरबांचं. लाखो अरब आपणहून स्थलांतरीत-निर्वासित झाले असं गुरियन म्हणाले. इसरायलवर आक्रमण करणाऱ्या अरब देशांनी म्हणे त्यांना लालूच दाखवली होती की युद्ध सुरु झाल्यावर तुम्ही स्थलांतरीत व्हा, युद्ध संपेल तेव्हां ज्यू नेस्तनाबूत झालेले असतील आणि तुम्ही पुन्हा सुखानं पॅलेस्टाईनमधे परतू शकाल.

लेखक म्हणतो की ही लबाडी होती. युद्ध काळात असं कुठल्याही अरब देशानं म्हटल्याचा एकही पुरावा गुरियन देत नव्हते, देऊ शकले नव्हते. ज्यू अरबांना हाकलून देत होते आणि म्हणत होते की ते आपणहून गेले.

गुरियन यांचं दुसरं धोरण होतं जगभरचे ज्यू आणून पॅलेस्टाईनमधे भरती करायचे. दीड दोन कोटी ज्यू पॅलेस्टाईनमधे येणं आणि अरब हाकलले जाणं या दोन गोष्टी समांतर पातळीवर घडल्या की इसरायल ही पूर्णपणे ज्यूंची भूमी होईल असं गुरियन यांना वाटत होतं.

जगभरातले ज्यू पॅलेस्टाईनमधे आले पाहिजेत या साठी गुरियन यांनी केलेल्या खटपटींची अनेक उदाहरणं लेखकानं दिली आहेत. ती भयानक आहेत.

जर्मनीत हत्याकांड झाल्यानंतर तिथले ज्यू बाहेर पडले. त्यातल्या बहुतेकांना अमेरिकेत किंवा युरोपात इतरत्र जायचं होतं. त्यांना पॅलेस्टाईनच्या रखरखीत भूभागात जायचं नव्हतं. काही ज्यू बोटीवरून इस्तंबूलकडं रवाना झाले तेव्हा त्या बोटींवर स्फोट करून त्या ज्यूंना गुरियन यांच्या हॅगाना या संघटनेनं मारलं.

इराकमधले ज्यू पॅलेस्टाईनमधे यायला तयार नव्हते. ते होते तिथं सुखी होते. गुरियन यांच्या हॅगाना या दहशतवादी संघटनेनं बगदादमधे ज्यू वस्त्या, रेस्तराँ, सिनेगॉगमधे स्फोट घडवून आणले. ज्यूमधे घबराट माजली, प्रचार करून त्यांना गुरियन यांनी इसरायलमधे आणलं. या खटापोटात अनेक ज्यू मारले गेले. 

जर्मनीमधून बोटी आल्या होत्या. त्या पॅलेस्टाईनच्या किनाऱ्यावर उभ्या होत्या. हॅगाना या संघटनेनं त्या बोटी उडवल्या, त्यावरचे हजारभर ज्यू मारले. कां? तर जगभर संतापाची लाट उसळेल आणि ज्यूना इसरायलमधे जाऊ द्या या चळवळीला जगाचा पाठिेबा मिळेल. गुरियन यांच्या या चळवळीला ब्रीटनचा विरोध होता. बाहेरच्या किती ज्यूनी पॅलेस्टाईनमधे गेलं पाहिजे यावर ब्रीटननं बंधनं घातली होती. ती बंधनं शिथील करणं, झुगारून लावणं यासाठी हा उद्योग गुरियन यांनी केला.

येवढंच नव्हे.ब्रिटीश पॅलेस्टाईनमधे अरब-ज्यूना एकत्र नांदवायचा विचार करत होते म्हणून ब्रिटीश लष्कर, पोलीस, बँका इत्यादीवरही गुरियन यांनी घातपाती हल्ले केले. 

पुस्तकाचा बराचसा भाग इराकी ज्यूवर आहे. ज्यू किती हजार वर्षांपासून इराकमधे स्थायिक होते, इराकी झाले होते याचे पुरावे लेखकानं दिले आहेत.

लेखकाचं म्हणणं असं की गुरियन यांनी इसरायलच्या निर्मितीचा ध्यास घेतला होता हे खरं आहे. परंतू त्या ध्यासापायी त्यांनी अनेक दुष्कृत्यं केली, इसरायलला बदनाम करणारी अनेक कृत्यं केली, इसरायलला एक घातक वळण लावलं हे विसरता कामा नये असं लेखकाचं म्हणणं आहे. 

इसरायल अरबमुक्त देश असावा या त्यांच्या धोरणाशी असहमत असणारी खूप माणसं ज्यू समाजात होती. पण गुरियन यांनी हडेलहप्पी करून, ब्लॅकमेलिंग करून स्वतःचं धोरण रेटलं असा लेखकाच्या म्हणण्याचा अर्थ होतो.

गुरियन एककल्ली होते, दादागिरी करत, फॅसिस्ट होते. हा आरोप त्यांच्या सोबत काम करणारे इसरायलचे निर्माते असलेल्या वाईझमन यांनी केल्याचं अवतरण लेखकानं पुस्तकात दिलं आहे.

लेखक स्वतः इराकी ज्यू आहेत. सुरवातीचा काळ ते गुरियन यांच्या देशभक्तीनं भारावून गेले होते. त्या पायीच इसरायल निर्मितीच्या चळवळीत सामिल झाले आणि इसरायल स्थापन झाल्यावर ते इसरायलमधे स्थलांतरीत झाले. पण त्यानंतर त्यांना आलेले अनुभव (गुरियन यांचेही) इतके कटू होते की त्यांनी इसरायल सोडला, अमेरिकेचे नागरीक झाले.

गुरियन जातीयवादी, वंशवादी होते असा लेखकाचा आरोप आहे. युरोपातून आलेल्या गोऱ्या ज्यूना चांगली घरं, चांगल्या नोकऱ्या देण्यात आल्या; आफ्रिका आणि मध्यपूर्वेतून आलेल्या काळ्या व अरब ज्यूना तंबूंत कोंबण्यात आलं, त्यांचा वापर मजूर म्हणून करण्यात आला असं लेखकाचं म्हणणं आहे. खुद्द लेखकालाही अशी कामं देण्यात आली ज्यात अरबांवर कारवाया होणं अपेक्षित होतं.

गुरियन यांच्यावर टीका असल्यानं, लेखक अरब (इराकी) असल्यानं हे पुस्तक ज्यू मंडळींना आवडत नाही. त्यामुळंच ते प्रसिद्ध करण्यासाठी लेखकाला खूप त्रास सहन करावा लागला, प्रकाशक त्या पुस्तकाला हात लावत नसत. कोणतीही गोष्ट लपवता कामा नये असं ध्येय असलेल्या एका प्रकाशनानं नंतर हे पुस्तक प्रसिद्ध केलंय. आज ते अमेरिकेत आणि इसरायलमधे विकत मिळत नाही पण इंटरनेटवर उपलब्घ आहे. 

पुस्तक २००४ साली प्रसिद्ध झालं आहे. वर्तमान काळात इसरायलचं गाझाबाबतचं वर्तन समजायला या पुस्तकाची मदत होते. 

।।

Comments are closed.