पुस्तकं/मंगळावर वस्ती
City on Mars.
Kelly Weinersmith, Zach Weinersmith.
\\
मंगळ हा ग्रह पृथ्वीपासून सुमारे ३७.६ कोटी किमी अंतरावर आहे. मंगळावर पाणी आहे. मंगळावर हवा आहे. मंगळावरचं तपमान माणूस जगू शकेल इतकं आहे. थोडक्यात असं की खटपट केली तर माणूस मंगळावर वस्ती करू शकेल. शिवाय मंगळावर सिलिकॉन व अन्य माणसाच्या उपयोगाची अनेक खनिजं आहेत.
मंगळाबद्दल माणसाच्या अनेक कल्पना होत्या. कालपरवापर्यंत मंगळाचं वास्तव माणसाला माहित नव्हतं. तो आकाशात दिसायचा येवढंच. दुर्बिणीचा शोध लागल्यावर तो अधिक जवळून दिसू लागला. माणसानं मंगळाबद्दल काही कल्पना करून घेतल्या होत्या. भारतातली माणसं मंगळ म्हणजे कुंडलीतला त्रासदायक ग्रह मानत असत. पत्रिकेत मंगळ असला की मुलीचं लग्न वांध्यात असे. मंगळ १९६० पर्यंत फक्त दुर्बिणीवाटे माणसाला माहित होता.
१९६० नंतर मंगळावर वाऱ्या आणि स्वाऱ्या सुरु झाल्या. अमेरिका, सोवियेत युनियन, चीन, रशिया आणि भारत या देशांनी मंगळावर यानं पाठवली. तिथली खनिजं मिळवली, तिथली हवा तपासली, तिथले फोटो काढले. आजवर मंगळावर ५० स्वाऱ्या झाल्या आहेत.
बरीच माहिती गोळा झालीय. मंगळावर पोचवणारी रॉकेटं तयार झालीत. माणसाचा धीर चेपलाय. एलॉन मस्क नावाच्या माणसानं एक अवकाश कंपनी, स्पेसेक्स, काढलीय. ही कंपनी यानांतून माणसाला मंगळावर घेऊन जाणार. इलॉन मस्क महत्वाकांक्षी आहेत. त्यांना मंगळावर वसती करायचीय. मंगळावर वसाहत काढायचीय.
येव्हांना गोळा झालेल्या माहितीचा इतका सुळसुळाट झालाय की अनेक कादंबऱ्याही प्रसिद्ध झाल्यात.
प्रस्तुत विनरस्मिथ दांपत्याचं पुस्तक मंगळावर शहर स्थापन करावं असं म्हणतंय. चारेक वर्षं दांपत्यानं या विषयाचा अभ्यास केला. शेकडो मुलाखती घेतल्या. शेकडो पुस्तकं वाचली.
मंगळावर वस्ती करणं सोपं नाहीये. खरं म्हणजे अशक्यच आहे. मंगळावरचं वातावरण भीषण आहे. तिथं जगणं फारच कष्टाचं असेल. इमारती बांधायच्या. इमारतीच्या आत कृत्रीम वातावरण तयार करायचं. माणसाला लागणारं अन्न पाणी वगैरे पृथ्वीवरून नेऊन साठवायचं. क्वारंटाईन. एक बुडबुडा तयार करायचा आणि त्यात रहायचं. बुडबुड्या बाहेर पडणं म्हणजे मृत्यू. हे लेखक दांपत्याला मान्य आहे.
तरीही प्रयत्न करायला हरकत नाही असं लेखक द्वयाचं म्हणणं.
मंगळावरील जमिनीची मालकी कोणाची असणार? हवेवर मालकी कोणाची असणार? वाहतुकीचं नियंत्रण कसं होणार? मंगळावरील वस्तीचा कारभार, राज्य, कसं असेल? तिथं मुद्रा कोणती असेल? तिथं बाजार कसा असेल? या वस्तीचे पृथ्वीशी संबंध कसे असतील? तिथलं सरकार कसं असेल? तिथल्या विरळ वातावरणात माणसांचं सेक्स लाईफ कसं असेल? तिथं माणसाला मुलं होतील? ती मुलं कशी वाढतील?
इलॉन मस्क म्हणालेत की ते निवृत्त झाल्यानंतर मंगळावर रहायचं म्हणत आहेत. पृथ्वीवर येव्हांना बुडातमावेनाशी संपत्ती असणारी माणसं फार झालीत. त्यांना पृथ्वीवरील करमणुक भावत नाहीये. ते लोक मंगळावर जातील. जातीलही. उल्लेखलेले प्रश्न शिल्लकच रहातील.
लेखक वरील सर्व प्रश्न स्वतःला विचारतात आणि बहुतेक प्रश्नांची नकारात्मक उत्तरंही तेच देतात. तरीही मंगळावर जायला हवं असं त्यांचं म्हणणं. विक्षिप्तपणाच म्हणायचा.
लेखकांचं म्हणणं असं की तंत्रज्ञान गेल्या काही वर्षांत येवढं पुढं गेलंय की कोणतीही गोष्ट अशक्य राहिलेली नाही. त्यामुळं वरील सर्व नकार होकारात बदलू शकतील. पण त्याला फार वेळ लागेल. लेखक म्हणतात की म्हणूनच आता त्या दिशेनं सुरवात करायला हवी. म्हणजेच जैवशास्त्र, शरीरशास्त्र, चिकित्साशास्त्र, घरबांधणी, उद्योग, कायदे इत्यादी सर्व बाबतीत आतापासून संशोधनाला सुरवात केली तर कदाचित पुढल्या शंभर वर्षात मंगळावरील वस्ती शक्य होईल.
मंगळच कां? चंद्रावरही वस्ती शक्य आहे. म्हणजे जगात मंगळ, चंद्र आणि पृथ्वी अशी तीन माणसांची राज्यं होतील. आता त्या राज्यांची मालकी कोणाची, त्या राज्यांचे आपसातले संबंध कसे असतील इत्यादी प्रश्न येतील. पण लेखक म्हणतात त्याही प्रश्नांची तयारी आतापासून सुरु करायला हरकत नाही.
इलॉन मस्क यांचं अवकाशयान पर्यटकांना घेऊन निघालं तेव्हां बीबीसीनं जेम्स लवलॉक या वैज्ञानिक विचारवंताची मुलाखत घेतली. हा सारा काय प्रकार आहे ते समजून द्या असं बीबीसीचा माणूस म्हणाला. शंभरीकडं झेप घेणारे लवलॉक मंदसं हसले आणि म्हणाले ‘मला तर हे समजतच नाहीये. पृथ्वीची वाट लागलीय. सोन्यासारखं वातावरण पृथ्वीवर मिळालं होतं ते माणसानं बिघडवून टाकलंय, ते आणखी बिघडवण्याचा खटाटोप माणूस करतोय. असलेलं तंत्रज्ञान वापरून पर्यावरण सांभाळण्याच्या ऐवजी आता हे लोक मंगळावर जायला निघालेत. तिथलं पर्यावरण बिघडवण्यासाठी. या लोकांनी आधी पृथ्वी कां नीट करू नये?’
कठीण आहे.
रशिया म्हणतंय की युक्रेन हा आमचाच फुटून निघालेला भाग आहे, आम्ही तो पुन्हा मिळवणार. मग तो भले बेचिराख झालेला कां असेना. हाच रशिया मंगळावर जाईल तेव्हां वेगळा कसा असेल?तिथ यथावकाश युक्रेनी पोचतील तेव्हां तिथंही ते भांडल्याशिवाय रहातील?
मंगळावर आधी इसरायलचे लोक पोचतील की हमासचे गाझातले लोक पोचतील ते सांगता येत नाही. कोणीही पोचलं तरी ते त्यांचा हक्क सांगणार. पृथ्वीवर आपलं भांडण निकाली निघालं नाही, इथं ते निकाली काढूया असं म्हणून दोघंही तिथं भांडायला सुरवात करणार.
मंगळावर मिळणारं सिलिकॉन कोणाच्या मालकीचं? चीनच्या की अमेरिकेच्या? मारामारी सुरु.
भारतीय आणि पाकिस्तानी मंगळावर पोचतील तेव्हां ते भारतातलं वैर विसरलेले असतील? मंगळावर ते क्रिकेटची मॅच कुठं खेळणार?
पुस्तकाची शैली रंजक आहे. लेखक एक प्रश्न विचारतात, त्यावर चर्चा करतात आणि त्या मजकुराच्या शेवटी आपणच विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतात. उत्तरामधे व्यंगचित्रासारखी रेखाटनं असतात.
पुण्यात एक प.वि.वर्तक नावाचे गृहस्थ होते. ते सूक्ष्म देह धारण करत आणि मंगळ व गुरू या ग्रहांवर जात. त्या ग्रहांबद्दलची माहिती ते सांगत.
प्रस्तुत पुस्तकाच्या लेखक जोडप्यांना संशोधन करताना प.वि.वर्तकांचा पत्ता व माहिती मिळाली नसावी. ती मिळाली असती, लेखकांनी ती पुस्तकात वापरली असती तर लोकांनी इलॉन मस्क यांच्या मंगळयानात जाण्यासाठी करोडो डॉलर खर्च केले नसते, पवि वर्तकांबरोबर ते स्वस्तात आणि सेफली मंगळावर जाऊन आले असते.
अरेरे.
असो.
।।