पुस्तकं. मुत्सद्दी आणि द्रष्टे.
अन्वर सादत. द्रष्टा.
हेन्री किसिंजर यांनी लिहिलेल्या लीडरशिप या पुस्तकात अन्वर सादत यांच्यावर एक प्रकरण आहे. नेतृत्व आणि नेते यांचं विश्लेषण करून किसिंजर नेत्यांची दोन वर्गात विभागणी करतात. मुत्सद्दी (Statesman) आणि द्रष्टे (Prophet). अन्वर सादत द्रष्टे होते असं किसिंजर यांचं मत आहे.
या धड्याची रचना पहाण्यासारखी आहे. सादत यांचं व्यक्तिगत जीवन या प्रकरणात आहे आणि त्यांच्या सार्वजनीक जीवनाचाही आढावा प्रकरणात आहे. व्यक्तिगत जीवन आणि सार्वजनिक जीवन किंवा कामगिरी यात संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न किसिंजर करत नाहीत.
उदा. सादत यांच्यावर महात्मा गांधीजींचा प्रभाव होता हे किसिंजर दोन पुराव्यांनिशी मांडतात. सादत यांच्या बोलण्यात गांधीजीचा उल्लेख येत असे, ते गांधीजींसारखे साधे कपडे घालत. पण गांधीजींचे कोणते विचार किंवा गुण सादत यांच्यामधे आले याचं विवेचन किसिंजर करत नाहीत.
सादत चित्रपटवेडे होते. दररोज चित्रपट पहात. प्रेसिडेंट असतानाही घरी असत तेव्हां दररोज किमान एक आणि कधीकधी अधिक चित्रपट सादत दररोज पहात. मोठमोठ्या संकटातून ते आणि इजिप्त जात होते तेव्हांही त्यांचं चित्रपट पहाणं थांबलं नाही. त्यांना वेस्टर्न शैलीचे म्हणजे मारधाड चित्रपट आवडत असत असं किसिंजर नोंदतात. पण चित्रपटांचा नाद आणि त्यांची विशिष्ट चित्रपटांची चटक सादत यांच्या राजकीय कर्तृत्वाशी जोडण्याचा प्रयत्न किसिंजर करत नाहीत.
तसं जर किसिंजर करते तर मजा आली असती.
किसिंजर यांनी सादत यांचं कर्तृत्व त्यांनी केलेल्या कामगिरीतून तपासलं आहे पण त्या बरोबर सादत यांचा व्यक्तिगत अनुभवही किसिंजर यांच्या विश्लेषणाचा आधार आहे. ऐन संकटकाळात किसिंजर सादत यांना भेटत असत, तासनतास त्यांच्या सहवासात असत, त्यांना काही गोष्टी सांगत असत, काही गोष्टी त्यांच्याकडून ऐकत असत.
मुत्सद्दी राजकारणी आपली धोरणं समाजाला समजून घेत, समाजाशी खुबीनं जुळवून घेत आपलं उद्दीष्ट साध्य करतात. त्यांची कामगिरी मोठी असते यात शंकाच नाही पण ती कामगिरी ते सांभाळून पार पाडतात. सामान्यतः समाजाला हव्या असलेल्याच गोष्टी ते तडीस नेतात.
द्रस्टे नेते प्रसंगी लोकमत, परंपरा, अस्मिता, रुढी इत्यादीच्या विरोधात जाऊनही हिमतीनं कामं पार पाडतात. यासाठी ते किमत मोजतात.
सादत यांना इजिप्तचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं होतं. रशिया, अमेरिका, ब्रीटन अशा कोणाच्याही जोखडाखाली त्यांना रहायचं नव्हतं. पण ते साधायचं तर आर्थिक परिस्थिती चांगली हवी. स्थिती अशी होती इस्रायलशी युद्ध करता करता इजिप्त खलास होत होता. अशा स्थितीत इस्रायल या शत्रूशी समझौता करणं आवश्यक होतं. इजिप्शियन जनतेला, अरब जनतेला, जगातल्या इस्लामी जनतेला ते कदापी मान्य होण्यासारखं नव्हतं.
अन्वर सादत लोकमताच्या विरोधात गेले. इस्रायलमधे गेले. तिथे संसदेसमोर भाषण केलं. मेनाहेम बेगिन यांच्याबरोबर शांतता करार केला. अमेरिका आणि पश्चिमी गटाच्या देशांच्या दबावाखाली तो करार केला. तसा करार करा नका असा अरब, पश्चिम आशिया, इस्लामी देशांचा दबाव होता, रशिया तर पक्कीच विरोधात होती. दोन्ही दबावातून सादत यांनी वाट काढली.
एक वास्तव विचारपूर्वक स्वीकारून आपल्या समाजाला ते पटत नाहीये हे पक्कं माहित असूनही सादत यांनी इस्रायलशी जुळवून घेतलं.
एक अगदी मूलभूत विचार. तो अमलात आणण्यासाठी सादत यांनी कधी अमेरिकेची मदत घेतली, कधी रशियाची मदत घेतली. अमेरिका आणि रशिया एकमेकाचे शत्रू असताना दोघांनाही एका अंतरावर ठेवलं आणि दोघांकडूनही त्याचे फायदे सादत यांनी घेतले.
अमेरिका आणि रशिया सादत यांच्याकडं संशयानं पहात. संधीसाधू आहे असा त्यांच्यावर आरोप करत. सादतनी ते सहन केलं. प्रसंगी त्यांनी दोन्ही देशांच्या प्रेसिडेंटांना सार्वजनीकरीत्या दम दिला, झाडलं. एकदा तर रशियाचे राजदूत सल्लागार सादतनी हाकलूनही दिले. एकीकडं त्यांनी इस्रायलशी युद्धही केलं पण त्याच बरोबर समझौताही केला. इस्रायलशी केलेल्या चकमकी, युद्धं हे नाटक होतं काय? असू शकतं. पण शेवटी करार केला.
किसिंजर यांनी प्रस्तुत पुस्तकात मर्गारेट थॅचर, डी गॉल, कोनरॉड ॲडेनॉर आणि रिचर्ड निक्सन यांचीही राजकीय चरित्र रेखाटली आहेत.
किसिंजर हे कूटनीतीज्ञ होते. कूटनीती पृष्ठभागावरही चालते आणि बरीचशी पृष्ठभागाखालीही चालते. किसिंजर चीनमधे गेले, इजिप्तमधे गेले, सीरियात आणि इराकमधे गेले. कधी कधी त्यांना हेटाळणी आणि राग यांचा सामना करावा लागला. कधी कधी त्यांना नेत्यांना शेंड्या लावाव्या लागला. कधी कधी ते नेत्यांच्या पत्न्यानाही भेटून त्यांच्या करवी नेत्यांचं मन वळवलं. किसिंजर यांच्याकडं खूप थरारक अनुभव आहेत पण तो थरार किसिंजर पुस्तकात चित्रीत करत नाहीत, ते आपले व्यक्तिगत अनुभव पचवून विश्लेषण करतात. थरारक अनुभव वाचकांना हवाहवासा असतो पण त्यामुळं मुख्य विषय दूर रहातो, मुख्य विषय अनाकर्षक ठरल्यामुळं वाचक तो वाचत नाहीत. हा धोका किसिंजरनी प्रस्तुत पुस्तकात टाळला आहे.
अशी पुस्तकं लिहिणं कठीण असतं. कूटनीतीतला माणूस पुढाऱ्याला अनेक वेळा भेटतो, त्याच्या पोटात शिरतो, त्या माणसाचा मित्र होतो. मित्र झाला की त्याचे दोष झाकण्याकडं कल जातो. लिहिताना पुढाऱ्याची चांगली बाजू मांडली जाते, वाईट बाजू लपवली जाते. त्यामुळं अशी आठवणीवजा पुस्तकं चटकदार वाटतात खरी पण अर्धसत्य असतात, उपयोगी नसतात. किसिंजर यांनी प्रस्तुत पुस्तकात थॅचर आणि निक्सन यांचे दोष लपवले आहेत, त्यांनी केलेले घोटाळे टाळलेले आहेत. थॅचर यांची उर्मट अरेरावी, निक्सन यांनी स्वतःच्या देशात केलेली गुन्हेगारी हुकूमशाही प्रस्तुत पुस्तकात येत नाही. निक्सन, थॅचर गोड होते असा भास होतो. सादतही तसेच गोड दिसतात. फरक येवढाच की सादत सरळ होते, त्यांनी गुन्हे केलेले नव्हते. निदान तशा नोंदी तरी सापडत नाहीत.
असो.
किसिंजर यांचा भारतीय नेत्यांशी संबंध आला नाही. त्यामुळं जवाहरलाल नेहरूंवर त्यांनी लिहिणं संभवत नाही. लिहिलं असतं तर नेहरूंचं वर्णन त्यांनी कसं केलं असतं?
नेहरूंची गणना द्रष्टा या सदरात केली असती?
भारतीय माणूस जात आणि धर्म यात अडकला होता. भारतीय माणसावर अद्यात्माचा प्रभाव असल्यानं तो विज्ञानापासून फटकून होता. अशा देशाला आधुनिकतेच्या वाटेवर, लोकशाहीच्या वाटेवर नेहरूनी नेलं. समाजात अनंत घटक होते, त्या घटकांची आपसातली नाती काही अंशी संघर्षाची होती. त्या विविध गटांना संघर्षापासून दूर नेऊन सामंजस्यानं एकत्र नांदायला लावून देश प्रगती पथावर न्यायचा असं नेहरूंचं धोरण होतं. त्यांच्या उत्तर काळात पक्षातल्या आणि सरकारातल्या भानगडींनी त्यांना हैराण केलं पण त्यांची वाटचाल सुरु राहिली. अस्मिता, समजुती इत्यादींना दूर सारून नेहरू पुढं सरकले. अर्थातच दुखावलेल्या अनेकांचा नेहरूना विरोध होता. पण तो विरोध अंगावर घेऊन नेहरू पुढं सरकले.
असो.
किसिंजर यांची मांडणी अमेरिकाकेंद्री आहे. जगावर राज्य करायला निघालेल्या एका देशाचे मुत्सद्दी म्हणून काम करणाऱ्या माणसाचं हे पुस्तक आहे. ही एक मुळातली मर्यादा पुस्तकात आहे. तरीही तर्क, विश्लेषण, माहिती, संगतवार विचारांची अध्यापकी शिस्त यामुळं हे पुस्तक वाचनीय ठरतं, कपाटात ठेवायला हरकत नाही.
।।
Leadership
Henri Kissinger