पुस्तकवेड
BOOK MADNESS: STORY OF BOOK COLLECTORS IN AMERICA.
DENISE GIGANTE.
।।
पुस्तकं लोकांना वेड लावतात. नाना प्रकारे.
कोणाला पुस्तकं वाचायला आवडतं. वाच वाच वाचतात. कामासाठी किवा हौस म्हणून. त्यांना पुस्तकातले किडे असं म्हणायची पद्दत आहे.
कोणी भरपूर वाचतो पण काय वाचायचं याचा काही एक विचार ते करतात, ठरवून वाचतात. विषय, लेखक ही माणसं ठरवतात.
कोणी माणसं वाचत फारसं नाहीत पण त्यांना पुस्तकं जमवायचा नाद असतो. आपल्याकडं पुस्तकं आहेत, इतकी आहेत, असली आहेत याचा त्यांना अभिमान असतो. ती माणसं भेटली की आपल्याकडल्या पुस्तकांचा आकडा सांगत असतात.
काहींना दुर्मीळ पुस्तकं आवडतात.फार जुनी. प्रती शिल्लकच नसलेली पुस्तकं. लेखकाची सही असलेली पुस्तकं.
काही लोक पुस्तकांच्या व्यापारात गुंतलेली असतात. कोणतं पुस्तक कोण विकत घेईल याचा हिशोब ही लोकं माडतात. रुपयाला घ्यायचं आणि शंभराला विकायचं वगैरे. बाजारातली किमत हा भाग महत्वाचा, पुस्तकातलं ज्ञान नव्हे.
अमेरिकेत बॉस्टन आणि न्यू यॉर्क ही शहरं पुस्तकं आणि वाचनवेड्यांसाठी प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पुस्तक त्या दोन शहरांच्या पुस्तक वेडांची गोष्ट सांगतं.
दोन्ही शहरात आणि अमेरिकेत पुस्तकांची दुनिया १८४० च्या सुमाराला जन्मली. माणसं स्वतःच्या संग्रहासाठी पुस्तकं घेऊ लागली, पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरु झाला, सार्वजनिक वाचनालयं सुरु झाली. पुस्तकात अनेक वाचक, लेखक, विक्रेते, विक्षिप्त पुस्तक वेडे अशा लोकांचे संदर्भ येतात. भारतीय वाचकांना ते अजिबातच माहित नसतं. त्यामुळं ते तपशील वगळत वगळतच पुस्तक वाचावं लागतं.
गाळणी लावल्यानंतर जे वाट्याला येतं ते अर्थातच रोचक आहे, अमेरिका-इंग्लंडबद्दलची आपली माहिती व समज वाढवणारं आहे.
अमेरिकेतलं पुस्तकाचं वेड सुरु झालं ब्रिटीश लेखक चार्ल्स लँबच्या पुस्तकांपासून. १८३४ साली लँब वारला. १८४३ त्याच्या ६० पुस्तकांचा लिलाव झाला.पुस्तकांची अवस्था वाईट होती. पिवळी पडली होती, पानं फाटलेली होती, दुमडलेली होती, त्यावर दारूचे डाग होते, शिवण विस्कटलेली होती. एका अमेरिकन माणसानं ती विकत घेतली. अमेरिकेत आणून विकली. त्या पुस्तकांचा खूप गवगवा झाला.
भारतात चार्ल्स लँब बराच माहित आहे, त्यानं शेक्सपियरच्या नाटकांच्या गोष्टी पुस्तकात लिहिल्या आहेत. तो आणि त्याची बहीण मेरी यांनी शेक्सपियर सर्वसामान्य वाचकाला खुला केला. शेक्सपियरची भाषा सोळाव्या शतकातली. त्यातून ती गद्यही नाही, पद्यासारखं लिहिलेली. त्यामुळं एकोणिसाव्या शतकातल्या जगभरच्या शेक्सपियरच्या प्रेमींना शेक्सपियरची ओळख लॅंबच्या पुस्तकांमुळं होते.
चार्ल्स लँबच्या पुस्तकांच्या प्रती न्यू यॉर्कमधे विकल्या गेल्या, पुन्हा विकल्या, पुन्हा विकल्या अशा पसरत राहिल्या.
एक रंजक माहिती अशी.
चार्ल्स लँब मार्जिनमधे, पुस्तकाच्या वरच्या आणि खालच्या भागात, दोन ओळींच्या मधे टिपणं लिहीत असे, भाष्य करीत असे. लँबची ही भाष्यंच स्वतंत्रपणे लोकप्रीय झाली. शब्दांच्या भोवती वर्तुळ, शब्दांच्या मधे भाष्य वगैरे नक्षी पुस्तकावर असे आणि हीच पुस्तकं लोक विकत घेऊ लागले. ती पुस्तकं किमत वाढत जाऊन पुढल्या वाचकाकडं जाऊ लागली.
चार्ल्स लँब वेडा असावा. तो बहुदा चहाच्या टेबलावर, बारमधे समोर बियरचा मग ठेवून वगैरे पुस्तक वाचत असावा, ते सारे डाग पुस्तकातल्या पानावर दिसत. चार्ल्स पुस्तकाची पुंगळी करून काखोटीला मारत असावा. कारण पुस्तकाच्या स्पाईनचे तीन तेरा वाजलेले असत, पानं सुटलेली असत. मोडलेलली, चुरगळलेली पानं तर खूपच. पण लोकांना हेच आवडू लागलं.
आपल्याकडं एक वचन आहे. तेलापासून आणि पाण्यापासून माझं रक्षण करा, ते नीट जपून वापरा, ते मूर्खाच्या हातात देऊ नका असं पुस्तकं म्हणतं. अमेरिकेत तर एका माणसानं त्या काळात पुस्तक कसं कसं वापरावं, कसं उघडावं, कसं ठेवावं, पानं कशी उलटावी, कसं जपावं यासाठी वर्ग घेतले, भाषणं केली. असं असलं तरीही लँबची जीर्ण, विस्कळीत, पिवळी पानं खूप खपली हे मात्र खरं.
एक फॅशनच अमेरिकेत सुरु झाली. वाचकानं पुस्तकावर खुणा करायच्या, कमेंटा लिहायच्या. वाचक मोठा लेखक असला तर विचारायलाच नको. मग ते पुस्तक दुसरा कोणी तरी घ्यायचा आणि त्यावर तो दुसरा माणूस खुणा करायचा.कधी खुणा करणारे स्वतःच्या नावाची आद्याक्षरंही लिहीत. त्यामुळं पुस्तक कोणी वाचलंय ते कळत असे. वाचणारी मंडळी नामांकित असतील तर पुस्तकाची किमत वाढत जाई.
एक जर्मन प्राध्यापक होते. त्यांनी जर्मनीत शिक्षणाचा पाया घातला. ते पानापानावर टिपणं लिहीत. नंतर ती पुस्तकं म्हणे मार्टिन लुथर यांनी वाचली, त्यावर मार्टिन लुथरनीही काही खाणाखुणा केल्या. ती पुस्तकं बेश किमती झाली.
लँबनं लिहिलेली टिपणं आणि कमेंटा यांचं एक स्वतंत्र पुस्तकंच नंतर प्रसिद्ध झालं.
लँब कोण होता माहितेय?
लँब भारताला लुटणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीत कारकून होता. ३० वर्षं कारकुनी केली आणि उरलेल्या वेळात शेक्सपियर वाचला, टिपणं लिहिली. टिपणं लिहायला त्याच्या बहिणीची,मेरीची मदत झाली. या बहिणीनं आपल्या आईचा म्हणजेच चार्ल्सच्या आईचा चाकू खूपसून खून केला. तिचं मानसिक आरोग्य बिघडलेलं होतं. असं काही तरी आपल्या आयुष्यात घडणार आहे असं चार्ल्सला आयुष्यभर वाटत असे. जणू पूर्वकल्पनाच.
संग्राहक नावाची एक जमात अमेरिकेत याच काळात जन्माला आली. मोठ्या लेखकाची स्मृती चिन्हं गोळा करणं हा उद्योग. एक नाणं फार मोठ्या किमतीला विकलं गेलं, पसरलं. ते नाणं म्हणजे शेक्सपियरनं हाताळलं होतं. शेक्सपियर वापरत असलेले हातमोजे लोकप्रिय झाले. शेक्सपियरनं आपल्या घरात मलबेरीचं झाड लावलं होतं. त्या झाडाच्या फांद्या अमेरिकेत पोचल्या.
एका बाईंनी शेक्सपियरवर लिहिलं. त्या अमेरिकेतल्या मातबर लोकांच्या वर्तुळात वावरत असल्यानं त्यांचा दबदबा होता. त्या अमेरिकन शेक्सपियर सोसायटीच्या मानद अध्यक्ष झाल्या. त्यांच्या प्रेमींनी एक भली मोठी लाकडी खुर्ची त्यांना भेट दिली. खुर्चीच्या पाठीवर मधोमध हस्तिदंतामधे शेक्सपियरचं चित्र कोरलेल होतं. शेक्सपियरनं लावलेल्या झाडाचं लाकूड खुर्चीसाठी वापरलं होतं.
इंग्रजी पुस्तकांच्या जगात अशी चक्रम पुस्तकं नेहमी प्रसिद्द होत असतात. पुस्तक चोरांवरही अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. वाचनालयं आणि पुस्तकालयांवरही नेहमी पुस्तकं प्रसिद्ध होत असतात.
अलिकडं एक मजा झालीय. गूगल केलं की पुस्तकांची नावं येतात, त्या नावांवर क्लिक केलं की त्या पुस्तकांपर्यंत नाना रुपांत पोचता येतं. त्या पुस्तकांवरची परीक्षणं, समीक्षा, पुस्तकांची निव्वळ माहिती आणि अर्थातच ती मिळवायची सोय.
ज्ञानाचा आनंद हवा असणाऱ्यांची खूप सोय इंटरनेटनं करून ठेवलंय. ज्यांना ज्ञान नकोय त्यांचीही सोय अर्थातच आहे. व्हॉट्सॲप.
।।