पुस्तकाची एकेक प्रत ३६ लाख डॉलर

पुस्तकाची एकेक प्रत ३६ लाख डॉलर

सॉदेबीज (sothebey’s) ही कंपनी मौल्यवान वस्तू गोळा करून त्यांचा लिलाव करते. कंपनीची माणसं जगभर फिरून कुठं कोणत्या वस्तू उपलब्ध आहेत, कोण काय विकायला तयार आहे, कोणती मौल्यवान वस्तू कुणाकडून मिळवायची याचा हिशोब ही कंपनी करते. व्यवसाय आहे. घेतलेल्या किमतीच्या जास्तीत जास्त पटीत लिलावाची बोली लागली पाहिजे.  वस्तूची बाजारात कोणती किमत येईल त्याचा योग्य अंदाज घेणं हे कसब असतं. चांगली किमत येईपर्यंत वस्तू थोपवून ठेवाव्या लागतात.

मौल्यवान वस्तूत पुस्तकंही येतात. डेवनशायरच्या डचेस, डेबोरा यांच्याकडल्या वस्तू सोदेबीजनं मिळवल्या. त्यात पुस्तकंही होती. एक पुस्तक होतं ईवलिन वॉ यांचं ब्राईड्सहेड रिविजिटेड ही १९४५ साली प्रसिद्ध झालेली कादंबरी.

पुस्तकाचं वेस्टन जीर्ण झालं होतं. डचेसना भेट असं सहीनिशी वॉनी लिहिलं होतं. पुस्तक प्रसिद्ध होण्याआधी काही मोजक्या म्हणजे लेखकाच्या जवळच्या लोकांना देण्यासाठी कादंबरीच्या ५० प्रती छापण्यात आल्या होत्या. त्या पैकी एक डेबोरा यांच्याकडं होती. ही प्रत ५२ हजार पाऊंडांना विकली गेली. बरेच दिवस सोदेबीजनं ही प्रत लिलावापासून दूर ठेवली होती, किमत वाढावी म्हणून. सोदेबीजचा जुगाड फायद्याच ठरला,  कादंबरीची किमत अपेक्षित १५-२० हजार पाऊंडावरून ५० हजार पाऊंडांवर गेली.

                एक लाख पाऊंड

इयान फ्लेमिंग  यांची पहिली जेम्स बाँड कादंबरी म्हणजे कसिनो रोयाल. १९५२ साली ती प्रसिद्ध झाली. लोकप्रिय झाल्यानं  या कादंबरीच्या तीन झाल्या. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या काही प्रती संग्राहकांनी जपून ठेवल्या आहेत. अजून त्या लिलावात काढलेल्या नाहीत कारण जस जसे दिवस जात आहेत तसतशी त्या प्रतीची किमत वाढत जातेय. आज घडीला ती कादंबरी लिलावात विकली तर १ लाख पाऊंड किमत येईल असा जाणकारांचा अंदाज आहे.

फ्लेमिंगनी ११ जेम्स बाँड कादंबऱ्या लिहिल्या. १९६४ साली ते वारले. जसजसे दिवस जातील तसतशा त्यांच्या इतर कादंबऱ्यांच्या प्रतीही बाजारात येतील. संग्राहकांनी त्या हुशारीनं जमवून ठेवल्या आहेत.

गंमत म्हणजे स्वतः इयान फ्लेमिंग पुस्तक संग्राहक होते. त्यांनी माणसाचं मन घडवणाऱ्या विशिष्ट पुस्तकांचा संग्रह केला. Books that shaped modern thought. सुमारे ६५० पुस्तकांमधे  डॉजसनचं एलिस इन वंडरलँड होतं, डार्विनचं दी ओरिजिन ऑफ स्पेसीज होतं, डांटेचं डिव्हाईन कॉमेडी होतं. १९६३ साली लंडनमधे Printing and the Mind of Man या सूत्रावर आधारलेलं पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्यामधे फ्लेमिंग यांच्या आपल्या संग्रहातली ४० पुस्तकं होती. फ्लेमिंगच्या संग्रहातल्या पुस्तकावर लिलाववाले आणि संग्राहक यांचा डोळा आहे. या संग्रहाची किमत अब्जांच्या घरात जाईल असा त्या लोकांचा अंदाज आहे.

                                                                    अकरा लाख युरो

मार्टिन लुथर यांचं ” 95 Theses ” हे १५१७ साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक- पत्रक  एका माणसानं मिळवलं. लोकांना पापातून सुटका देण्यासाठी विकली जाणारी सर्टिफिकिटं,  चर्चच्या भ्रष्टाचार यावर मार्टिन लूथरनं टीका करतांना ९५ मुद्दे मांडले. या छापलेल्या दस्तावेजाच्या फारच कमी प्रती निघाल्या. बाजारातल्या किमतींचा अभ्यास करत ३२ वर्षं संग्राहकानं तो दस्तावेज  जपून ठेवला. लिलावात त्या पुस्तकाला ११ लाख युरो मिळाले. ज्या कोणी ते पुस्तक-पत्रक विकत घेतलंय त्यालाही व्यवसायच करायचा आहे. आजच त्याची किमत सहज बावीस चोविस लाख युरो झाली असेल.

एकोणिसाव्या किंवा त्याही आधीच्या शतकांमधे पुस्तकाच्या फार प्रती निघत नसत. ज्या काही प्रती निघत त्या काळाच्या ओघात नष्ट होत. अगदी मोजके लोक, पुस्तकालयं, वाचनालयं पुस्तकं जतन करत. हवामान, हाताळणी यामुळं पुस्तकं नष्ट होत. वाळवी हा प्राणी सर्वात विद्वान. त्याला पुस्तकं आवडतात (खायला). पुस्तकालयांना आग लागे. घरं जीर्ण होत, जळत, त्या बरोबर पुस्तकंही नाहिशी होत. या संकटातून पुस्तकं टिकलं की त्याचं बाजारातलं मोल वाढतं. जुनी पुस्तकं त्यातल्या ज्ञानापेक्षा त्याच्या जुन्या असण्यामुळं किमती होत जातात. किमतींचा हिशोब करून जुन्या आणि दुर्लभ पुस्तकांची बाजारपेठ तयार झालीय.

माणसं म्हातारी झाली की त्यांना आपलं रम्य लहानपण आठवतं. मग त्या जमान्यातली जुनी जुनी पुस्तकं म्हातारी माणसं विकत घेऊन वाचतात.बीटल्सच्या जमान्यात वाढलेली माणसं आता म्हातारी झालीत, त्यांना त्यांचे जुने दिवस आठवत आहेत. ही माणसं बीटल्सच्या जमान्यातली पुस्तकं विकत घेताहेत. जिन्सबर्गच्या Howl च्या पहिल्या आवृत्तीच्या काही पुस्तकांवर जिन्सबर्गची सही आहे. त्यावर आता लोकांचा डोळा आहे. त्यातली एक प्रत  २० हजार पाऊंडाला विकली गेलीय.

अलीकडं लोकप्रिय लेखकांच्या पुस्तकांच्या लाखो प्रती निघतात. मुराकामीच्या कादंबरीच्या कोटी कोटी प्रती छापल्या जातात, जाहिरात आणि वितरणाच्या तंत्रामुळं कोणालाही कुठंही उपलब्ध होतात. थोडक्यात त्या दुर्मिळ नसतात. त्यामुळं तशी पुस्तकं वरील हिशोबात निरूपयोगी असतात. पुढल्या शेदोनशे वर्षांनी कदाचित त्या पुस्तकांना किमत येईल. परंतू लाखो प्रती निघालेल्या असल्यानं मोठी किमत येणार नाही. त्यामुळंच मुराकामी कितीही मोठा लेखक असला तरी  वरील पुस्तक बाजारात त्याला किमत नाही.

तंत्रज्ञान आणि विज्ञान हे विषय जनप्रिय झालेत.  तंत्रज्ञांची चलती आहे, उद्या तंत्रज्ञच जग चालवतील अशी भीती तंत्रज्ञ नसलेल्या लोकांना वाटतेय. त्या विषयाकडं संग्राहकांचं लक्ष गेलंय.अॅलन टुरिंग हा कंप्युटरचा जनक एकेकाळी गाजला तो त्याच्या समलिंगी असण्यामुळं. ब्रिटीश सरकारनं त्याचा समलिंगी असण्याबद्दल छळ केला.  कालांतरानं टुरिंगनं ब्रीटनला आणि जगाला हिटलर संकटातून वाचवल्याचं महत्व लक्षात आल्यावर ब्रिटीश राणीनं टुरिंगची मरणोत्तर क्षमा मागितली. आर्टिशिफिशल इंटेलिजन्सचा जनक असलेला टुरिंग म्हणत होता की यंत्रं माणसासारखंच शिकतात, यंत्राला दिलेल्या आज्ञेच्या पलिकडं जाऊन यंत्रं स्वतःची बुद्धी आणि विचारशक्ती विकसित करतात. आता टुरिंगच्या पुस्तकाच्या दुर्मीळ प्रती लक्षावधी डॉलर-पाऊंड खर्च करून संग्राहक विकत घेताहेत. काही वर्षांपूर्वी डार्विनच्या ओरिजन ऑफ स्पीसीज या पुस्तकाच्या दुर्मिळ प्रतींना ७० हजार पाऊंड मिळाले तर खूप झाले असं लोक म्हणत. आता त्या पुस्तकाची बाजारातली किमत एक लाख वीस हजार पाउंडांच्या पलिकडं गेलीय.

           छत्तीस लाख डॉलर्स

दुर्मीळ आणि विशेष पुस्तकांचे खरेदीदार परवा परवा पर्यंत फक्त अमेरिका, युरोपात होते. अलिकडं चीनमधे नव्यानं तयार झालेले अब्जाधीश दुर्मीळ पुस्तक खरेदी करू लागलेत. ” Dream of the Red Chamber ” या अठराव्या शतकातल्या चिनी भाषेतल्या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीतली प्रत बीजिंगमधे एका लिलावात एका चिनी माणसानं ३६ लाख डॉलरला खरेदी केली.

कतारचा राज्यप्रमुख सध्या अरबी साहित्य आणि कलाकृतींचा संग्रह करतो आहे. अब्जावधी डॉलर टाकून तो प्राचीन अरबी साहित्याच्या दुर्मिळ प्रती गोळा करतोय.

माणसांकडं पैसा आहे. सोनं, हिरे, जमीन, दागिने, घोडे, तलवारी, राजमुकूट, पेंटिंग्ज  इत्यादी गोष्टीबरोबरच दुर्मिळ आणि काही तरी विशेष असलेली मौल्यवान पुस्तकं ही एक गुंतवणुकीला योग्य वस्तू आहे हे त्यांना कळलंय. एकादी गोष्ट जेवढी अप्राप्य तेवढी ती मौल्यवान इतका साधा हिशोब केला जातो. त्यामुळंच हताश होऊन आत्महत्या करणाऱ्या व्हॅन गॉगच्या चित्राना आता करोडो डॉलरची किमत येतेय.

।।

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *