पुस्तक. अँगेला मर्केल यांचं प्रांजळ आत्मचरित्र

पुस्तक. अँगेला मर्केल यांचं प्रांजळ आत्मचरित्र

पुस्तक   : Freedom. Memoirs 1954-2021.

लेखिका : Angela Merkel

फ्रीडम या आत्मचरित्रात अँगेला मर्केल आपण राजकारणात जे जे केलं त्याचं समर्थन करत नाहीत की आपल्या विरोधकांचा समाचार घेत नाहीत. एकेकाळी   जर्मनीची राणी असं म्हटलं जात असे त्या मर्केल कशा वाढल्या आणि घडल्या याचा अंदाज प्रस्तुत आत्मचरित्रात येतो. 

आत्मचरित्रात भेटलेल्या सेलेब्रिटींपेक्षा किचनच्या आठवणी अधिक तपशीलवार आढळतात.

अँगेला मर्केल २००५ ते २०२१ अशी १६ वर्षं जर्मनीच्या चान्सेलर होत्या. २०२२ च्या निवडणुकीत भाग घेणार नाही असं म्हणून त्या आपणहून राजकारणातून निवृत्त झाल्या. निवृत्त झाल्यावर त्यांनी आपली दीर्घ काळची सहकारी बिएट बॉमनला सोबत घेऊन आत्मचरित्र लिहिलं. जर्मन भाषेत.  नंतर इंग्रजीत भाषांतर झालं. नऊ कसबी अनुवादक त्यांनी या कामी लावले. सातशे पानांच्या इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन अमेरिकेत झालं. 

मर्केल यांचा जन्म त्या काळातल्या पश्चिम जर्मनीतल्या हँबुर्ग शहरातला. १९५५ साली त्यांचं कुटुंब पूर्वजर्मनीत स्थलांतरीत झालं.१९८८ साली मर्केल पूर्व जर्मनीच्या राजकारणात सक्रीय झाल्या. १९९० साली जर्मनीचं एकीकरण झालं. मर्केल संयुक्त जर्मनीत म्हणजे आजच्या जर्मनीत सक्रीय झाल्या. १९९० त्या सीडीयू (ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक युनियन) या पक्षाच्या खासदार झाल्या आणि १९९१ साली मंत्री झाल्या. नंतर सीडीयूच्या जनरल सेक्रेटरी आणि अध्यक्ष झाल्या. २००५ साली त्या जर्मनीच्या चॅन्सेलर झाल्या. २०२१ साली निवृत्त झाल्या.

२००५ ते २०२१ या काळात जर्मनीत तुंबळ राजकीय, आर्थिक घटना घडल्या. अमेरिकेतल्या सब प्राईम घोटाळ्यानं आर्थिक मंदीची लाट आली. ब्रीटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं. सीरियातून १० लाख निर्वासित  जर्मनीत आले.कोविडनं जर्मनीला विळखा घातला. रशिया युक्रेनमधे घुसला. या सर्व संकटांवर जर्मनीनं मात केली. ही मर्केल यांची कामगिरी मानली जाते.

आज जर्मनी तेलासाठी रशियावर अवलंबून आहे. कार निर्यातीसाठी जर्मनी चीनवर अवलंबून आहे. शस्त्रांसाठी जर्मनीला अमेरिकेकडं हात पसरावे लागतात. जर्मनीची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. हा मर्केल कारकीर्दीचा परिणाम आहे असं मर्केल यांचे विरोधक म्हणतात. गंमत म्हणजे लोकशाहीप्रेमी मर्केल यांनी ज्यांच्याशी संबंध वाढवले त्या  रशिया, चीन आणि अमेरिकेचे देशप्रमुख हुकूमशहा आहेत.

२००५ ते २०१८ अशा ४ निवडणुका मर्केल यांनी लढवल्या. त्यांच्या सीडीयू या पक्षाला कधीही स्वतंत्रपणे बहुमत मिळालं नाही. इतर पक्षांबरोबर आघाडी करून त्यांनी सरकारं स्थापन केली. इतर पक्षांना, विरोधी पक्षांनाही बरोबर घेऊन मर्केल यांनी राज्यकारभार केला, हेच त्यांचं वैशिष्ट्यं. या काळात त्यांची व्यक्तीगत  लोकप्रियता आणि मान्यता नेहमीच ६० टक्क्यापेक्षा जास्त होती, त्या जर्मनीतल्या सर्वाधिक लोकप्रीय नेता होत्या. 

 जर्मनीची यशं आणि अपयशं मर्केल यांची व्यक्तिगत नाहीत, सामुहीक निर्णयामुळं ते घडलं.  

राज्यकारभार करण्याच्या ओघात जगातल्या मोठ्या पुढाऱ्यांशी मर्केल यांचा संबंध आला. त्यांचे उल्लेख पुस्तकात आहेत पण किसिंजर शैलीत त्यांचं विश्लेषण नाही. मर्केल राज्यशास्त्राच्या अभ्यासक नाहीत, त्यांची पीएचडी रसायनशास्त्रात आहे, याचा तो परिणाम असावा. त्या व्यक्ती आणि धोरणं या बद्दल मर्केल अत्यंत सांभाळून आणि समतोल लिहितात. 

जॉर्ज बुश यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते पण त्यांनी इराकवर केलेली स्वारी अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीवर आधारलेली असल्यानं आपल्याला मान्य नाही असं त्या हळूच मांडतात. डोनल्ड ट्रंप यांच्याबरोबर अनेक बैठकी झाल्या. ट्रंप यांच्या वर्तणुकीचे, त्यांच्या मख्खपणाचे आणि उर्मटपणाचे अनुभव मर्केल पुस्तकात रेखाटत नाहीत. या माणसाकडून अपेक्षा बाळगता येणार नाहीत असं अगदी बेचव   विधान मर्केल करतात. पुतीनबरोबर चर्चा चालली असताना पुतीननी त्यांचा हिंस्र कुत्रा मर्केल यांच्यावर सोडला.   त्यावर  पुतीन यांच्यात एक भीतीगंड आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करतात. 

एका परिषदेत जॉर्ज बुश हजर होते. बुश उठले, काही क्षण मर्केल यांच्या खुर्चीच्या मागं उभे ठाकले, मर्केल यांचे खांदे दाबून त्यांनी मर्केलना थोडंस मालिश केलं. मर्केलनी ते थट्टेवारी नेलं, त्या हसल्या.

मर्केल यांची लफडी नाहीत. त्यांनी गैरव्यवहार केले नाहीत. सेक्सच्या भानगडी नाहीत. पैसे खाल्ले नाहीत. राजकारणातले डावपेच त्यांनी जरूर केले पण त्यातही पाठीत खंजीर वगैरे प्रकार नाही की खोटेपणा नाही. त्यामुळं त्यांच्या आत्मचरित्रात खळबळजनक असं काही सापडणार नाही.

मर्केल यांचा मानवतेवर, माणसाच्या प्रतिष्ठेवर विश्वास आहे. लोकशाही आणि उदारमतवाद हे मानवाला मिळालेलं वरदान असं मर्केल यांना ठामपणानं वाटतं. समाजात निर्माण झालेली भरभराट साऱ्या जगानं  वाटून घेतली पाहिजे असं त्यांना वाटतं. 

मर्केल यांची राजकीय-आर्थिक मतं, त्यांचा कामाची पद्धत, प्रत्यक्ष काम करण्याच्या ओघात तयार झालेली दिसतात. मर्केल जुळवून घेतात. मर्केल टोकाची भू्मिका घेत नाहीत. मर्केल लोकांना बरोबर घेऊन वाटचाल करतात. परिस्थिती पाहून त्या निर्णय घेतात. पाठ्यपुस्तक, राजकीय-आर्थिक  सिद्धांत हे त्यांच्या निर्णयाचे आधार नसतात. त्या प्रॅक्टिकल असतात.  

पूर्व जर्मनीत कम्युनिष्ट राजवटीत मोकळेपणानं व्यक्त व्हायची  चोरी होती. परिस्थिती पाहून बोलायला मर्केल शिकल्या. 

पूर्व जर्मनीवर रशियाचं वर्चस्व होतं. मर्केल रशियन भाषा शिकल्या. 

आर्थिक परिस्थिती बेतास बात होती. असेल त्या स्थितीशी जुळवून घ्यायला मर्केल शिकल्या.

 उत्तम पोहता येत होतं पण तलावात उंचावरून उडी मारायला घाबरत असत. उडी मारायच्या क्षणापर्यंत उडी  लांबवत असत, इलाजच नाही म्हटल्यावर उडी मारत.

 हेलमुट कोलनी मर्केलना राजकारणात संधी दिली आणि त्यांनीच मर्केल यांचे पंख कापले. नंतर योग्य संधीची वाट पाहून मर्केलनी कोल यांना राजकारणाबाहेर ढकललं.

पुस्तकाचं उपशीर्षक आहे माझा जन्म चॅन्सेलर म्हणून झालेला नाही.

।।

Comments are closed.