पुस्तक. कादंबरी. लेखक – कंप्यूटर
स्टीफन मार्च या लेखकाची डेथ ऑफ ॲन ऑथर ही कादंबरी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली. कादंबरी १२० पानांची आहे. रहस्यकथा किंवा थरारकथा आहे. ती गाजतेय कारण ती एआयचा वापर करून लिहिली आहे. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे कंप्युटर या यंत्राची बुद्धी.
लेखकानं तीन ॲप्सचा वापर करून ही कादंबरी लिहीलीय. पहिल्या टप्प्यावर लेखकाला अभिप्रेत असलेल्या कथानकाची चौकट यंत्राला सांगितली गेली. कथानकातले टप्पे लेखकानं सांगितले. यंत्राने ते दिले.
दुसऱ्या ॲपनं कथानकाचा सूर, लांबी आणि शैली सुचवली.
तिसऱ्या ॲपनं भाषेतल्या सुधारणा सुचवल्या आणि वाक्यरचने बाबत सुचना केल्या.
यंत्रानं कथानक, पात्रं, संवाद, रचना, शैली इत्यादी सर्व घटकांसह मजकूर लिहून दिला. लेखकानं तो वाचला,त्यात सुधारणा सुचवल्या आणि नंतर लेखकाला मान्य असलेला मजकूर यंत्रानं दिला,कादंबरी तयार झाली.
कादंबरीतला ९० टक्के मजकूर यंत्रानं सुचवला आहे.
समजा लेखक म्हणाला असता की नेमाडेंच्या कादंबरीसारखी साताठशे पानांची कादंबरी हवीय. यंत्राला नेमाडे यांचं सारं साहित्य खायला द्यायचं. यंत्र त्या साहित्याचा अभ्यास करेल. नेमाडे साहित्याच्या कसोट्या, वैशिष्ट्यं इत्यादी गोष्टी आपण यंत्राला सांगायच्या. त्या कसोट्या, त्या गाळण्या, ते नियम लावून यंत्रं एक कादंबरी लिहील. पात्रांची नावं तुम्ही सांगायची, गावं तुम्ही सांगायची, नायकाला इंजिनियर करायचं की डॉक्टर करायचं की लष्करी अधिकारी करायचं तेही तुम्ही सांगायचं. झालं. कादंबरी तयार.
लेखकाच्या गरजेनुसार विविध प्रकारचा मजकूर लिहून देणारी हज्जारो ॲप्लिकेशन्स आता बाजारात आहेत, हज्जारो छोटछोट्या कंपन्या हा उद्योग करत आहे. नोकरीसाठी अर्ज म्हणू नका, मी पाहिलेली आग असा निबंध म्हणू नका, यान चंद्रावर पोचल्याची बातमी म्हणू नका, पर्यावरण संकटावर रीपोर्ट म्हणू नका, कथा किंवा कविता म्हणू नका, अगदी मोदी सरकारनं गेल्या पाचशे वर्षात केलेली कामगिरी म्हणू नका. तुम्हाला जे काही हवंय ते ही ॲप लिहून देतील.
यंत्राला, कंप्यूटरला हे कसं काय जमतं?
माणसांनी जगभरच्या लेखकांच्या हज्जारो कादंबऱ्या, लाखो कविता, हज्जारो कथा, लाखो पत्रं, करोडो बातम्या यंत्रामधे भरल्या. करोडो वाक्यं, करोडो ओळी यंत्रात भरल्या. नंतर या यंत्राला वाक्यरचना म्हणजे काय असतं, शब्द एका मागोमाग लिहिले, ते पुढं मागं केले तर त्याचे काय अर्थ होतात ते यंत्राला शिकवलं. कर्ता कर्म क्रियापद वगैरे शिकवलं. विभक्ती प्रत्यय शिकवले. शब्दांच्या छटा शिकवल्या. वाक्यांचे पॅरे कसे होतात, पॅरे रचून मोठा मजकूर कसा तयार होतो, त्यातून कथानक कसं तयार होतं ते शिकवलं.
विश्लेषण, रचना (पॅटर्न) शोधणं हे काम कंप्यूटर कायच्या काय वेगानं करतो.काही हजार कादंबऱ्यांतून एकादी शैली पटकन तो शोधतो, तुम्हाला देतो.तुम्ही म्हणाल की ही शैली मला पसंत नाही, तो क्षणार्धात पर्यायी शैली देतो.
या खटाटोपाला कृत्रीम बुद्धीमत्ता, आर्टिफिशल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं.
आज घडीला जे घडतंय त्याला कृत्रीम बुद्धीमत्ता म्हणता येणार नाही. ते यांत्रीक काम आहे. माणूस यंत्रात माहिती भरतो. ही माहिती कशी वाचायची आणि कशी वापरायची याच्या आज्ञा माणूस यंत्राला देतो, यंत्र त्या आज्ञा पाळतं. यंत्र हा माणसानं तयार केलेला एक वेगवान मदतनीस आहे. यंत्र एक साहित्य माणूस सांगतो त्या रीतीनंच तयार करून देतो, स्वतःची बुद्धी वापरत नाही, तशी बुद्धी त्याच्याजवळ नाही.
यंत्राला एक संत्र दाखवायचं आणि सांगायचं की याला संत्र म्हणतात. एक आंबा दाखवायचा आणि सांगायचं की याला आंबा म्हणतात. त्याच्या समोर टोपलीचं चित्रं ठेवलं आणि विचारलं की टोपलीत संत्री किती आहेत आणि आंबे किती आहेत ते सांग. यंत्र उत्तर देतं. तुम्ही संत्र्याच्या ऐवजी माणसाचा कान यंत्रासमोर ठेवलात आणि सांगितलंत की तो कान हे संत्र आहे तर यंत्र टोपलीत शून्य संत्री आहेत असं उत्तर येईल.
शब्द, चित्र, ध्वनी इत्यादी गोष्टी माणूसही याच रीतीनं शिकत असतो. माणूस इतरांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, कथा इत्यादी वाचतो. माणसं कसं बोलतात ते माणूस ऐकतो. त्यातून तो वाक्यरचना, पॅरे रचना, पॅऱ्यांची मांडणी इत्यादी गोष्टी म्हणजेच शैली शिकतो.ज्ञानेश्वर, तुकाराम, मोरोपंत, शिरवाडकर, ढसाळ, पाडगावकर, करंदीकर इत्यादी वाचत वाचत मराठी माणसाला कवितेची जाण येते. या तयार झालेल्या जाणीवेतूनच माणसाची स्वतःची कविता तयार होते. परदेशी कवी वाचले तर त्याची जाण अधिक रुंदावते. त्यातूनच त्याची स्वतःची एक रचना, शैली तयार होते.
यंत्र तेच काम करतात, अधीक वेगानं.
अजून तरी यंत्राला स्वतःची बुद्दी नाही. त्याला जे सांगाल ते यंत्र करतं. मूल्यव्यवस्था, चूक बरोबर, योग्य अयोग्य, पाप पुण्य इत्यादी निर्णय यंत्र घेत नाहीत, तेही निर्णय यंत्राला सांगावे लागतात. कथा, पटकथा इत्यादीमधेही नीतीमूल्यांचे उल्लेख पात्रांच्या संभाषणात, वागण्यात दिसतात. यंत्राला तेही सांगावे लागतात.
दिलेली आज्ञा यंत्र पाळतं.
माणूस मात्र करू नकोस म्हणून सांगितलेली गोष्ट हमखास करतो. विचाराचं स्वातंत्र्य, बंधनं आणि आज्ञा धुडकावण्याचं स्वातंत्र्य माणसाकडं आहे, ते अजून यंत्राकडं नाही.मानवी मेंदूचं ते वैशिष्ट्यं यंत्राकडं नाही.
प्रस्तुत कादंबरी कंटाळवाणी आहे, शैलीत तोचतोच पणा आहे असं मत काही लोकांनी नोंदलं. काही लोकांनी कादंबरीचं वर्णन बंडल या शब्दात केलं. लेखकाचं म्हणणं आहे की तो दोष यंत्राचा नाही, लेखकाचा आहे. लेखकानं चिकाटी दाखवून आणखी पर्याय मागितले असते तर कादंबरी सुधारली असती. यंत्रामधे अधिक मजकूर भरला असता तर यंत्रानं आणखी वेगळ्या शैली लेखकाला दिल्या असत्या.
यंत्राला मजकूर भरवणं आणि तो वाचायला शिकवणं याला यांत्रिकांच्या भाषेत ट्रेनिंग म्हणतात, प्रशिक्षण म्हणतात. हे प्रशिक्षण अधीक चांगल्या रीतीनं झालं की यंत्र अधिक चांगला मजकूर देईल.
तर हे असं आहे.
अनेक प्रश्न यातून निर्माण होतात.
लेखक, कवी, पटकथा लिहिणारा इत्यादीसाठी माणसं अनावश्यक ठरतील काय? ही सारी कामं यंत्र अगदी पटकन आणि कवडीमोल भावानं लिहून देतील काय? यंत्रं चालवणारे लोकच सारा व्यवहार सांभाळतील काय?
अमेरिकेत चित्रपट, टीव्ही या क्षेत्रातले लेखक याच मुद्द्यावर संपावर गेले आहेत.
प्रशिक्षण करण्यासाठी यंत्राला कथा, कादंबऱ्या, कविता इत्यादी भरवण्यात आल्या. त्या साहित्याचे प्रकाशक आणि लेखक आता रॉयल्टी मागू लागले आहेत.
बहुतांश माणसं अलीकडं भरड झालीत. त्यांना कडबा हवा असतो. चित्रपट, टीव्ही मालिका यांच्यातून तो कडबा लोकांना भरवला जातो. कडबा कादंबऱ्या आणि कविताही बाजारात येत आहेत. असत्यावर आधारलेला नॉन फिक्शन मजकूरही बाजारात खचाखच भरला जातोय. त्यामुळं यंत्रानं निर्माण केलेलं भरड साहित्य लोकांना आवडण्याचीही शक्यता आहे.
कस.सत्य.इतिहास जमा? .
जंता म्हणेल आम्हाला काय करायचंय? आम्हाला कडबा मिळाला की झालं.
।।