पुस्तक. चिप वॉर.
प्रस्तुत पुस्तकाचा विषय आहे ‘चिप’.
विषय तांत्रीक आहे पण लेखक या चिपची गोष्ट एकाद्या थरारक चित्रपटासारखी सांगतो.
चिप.म्हणजे अगदी पातळ चकती. तिच्यावर एक किंवा अधिक सर्किट्स कोरलेली असतात. प्रत्येक सर्किटमधे सेमीकंडक्टर व इतर घटक एकत्र केलेले असतात. माणूस या चिपकडं माहिती पाठवतो, त्या माहितीचं रुपांतर आज्ञेत कसं करायचं तेही चिपला सांगितलेलं असतं. ही आज्ञा नंतर एकाद्या यंत्राकडं, उपकरणाकडं, उत्पादन प्रक्रियेकडं जाते आणि ते यंत्र-उपकरण-उत्पादन व्यवस्था आपण नेमून दिलेलं काम करते.
बैलगाड्या तयार करणं आणि वापरणं. करवत-रांधा हातानं वापरून सुतारानं वस्तू तयार करणं. हातानं तयार केलेले दागिने आणि शिवलेले कपडे. नांगर आणि पाभर वापरून केलेली शेती. प्रचंड आकाराच्या भांड्यात रांधलेलं अन्न. अशा गोष्टी सोडल्या तर आता जगात तयार होणाऱ्या बहुतेक वस्तू यंत्रावर तयार होतात, यांत्रीक उपकरणाकरवी होतात.
यंत्रं, उपकरणं, त्यांनी निर्माण केलेल्या उपयुक्त वस्तू इत्यादी सारं सारं आता चिपमुळं घडत असतं.
सेलफोन, हातावरचं घड्याळ, लॅपटॉप, कॅमेरा, कार, बस, बोट, विमान, क्षेपणास्त्र, ड्रोन, वॉशिंग मशीन अशा आपल्या वापरातल्या जवळ जवळ सर्व वस्तू या चिपमुळं चालत असतात.
या चिपचा आकार आता किती लहान झालाय याची कल्पना करा. आयपॅड आणि मॅकमधे असलेल्या ॲपलच्या प्रोसेसर चिपमधे १.८ अब्ज सेमीकंडक्टर व इतर छोटे भाग असतात.
जगभरात सुमारे ६०० अब्ज डॉलरची सेमीकंडक्टर – चिप्सची उलाढाल होते. सर्वात जास्त सेमीकंडक्टर-चिप अमेरिकेत तयार होतात. त्यानंतर चीनचा नंबर लागतो. पाठोपाठ तैवान, कोरिया, जपान, हाँगकाँग इत्यादी. अमेरिका तैवान, द.कोरिया इत्यादी देशांमधून सेमीकंडक्टर-चिप करून घेते. सेमीकंडक्टरचं-चिपचं तंत्रज्ञान, संशोधन अमेरिकेच्या हातात असतं. इतर देशात त्यानुसार कारखाना उभारायला अमेरिका मदत करते. कामगार आणि कारखाना त्या देशातला, फायदा अमेरिकेला. अमेरिका असा उद्योग करते कारण अमेरिकेतल्या कामगारांचं जीवनमान उंचावलेलं असल्यानं त्यांचे पगार जास्त असतात. परिणामी अमेरिकेतला उत्पादन खर्च जास्त असतो. इतर देशात तो खर्च कमी असल्यानं तिथं स्वस्तात सेमी कंडक्टर-चिपचं उत्पादन होतं.
भरड कामं करणाऱ्या चिप्स ढबुड्या असतात, त्यावरच्या सेमीकंडक्टरची संख्या कमी असते, ती साधी कामं करतात.
खासमखास, अत्यंत नेमकी आणि गुंत्याची कामं करणाऱ्या चिप्स आकारानं सूक्ष्म असतात, त्यावरची सेमिकंडक्टर्सची संख्या खूप मोठी असते. रणगाडे, बाँबिंग करणारी विमानं, पाणबुड्या, ड्रोन, रॉकेटं, क्षेपणास्त्रं यांमधे वापरलेल्या चिप्स खासमखास असतात, महाग असतात, त्या चिप्सचा एकाधिकार जवळपास अमेरिकेकडं आहे. खास चिप्सचं तंत्रज्ञान आणि उत्पादन प्रणाली तयार करण्यासाठीही पुन्हा खास चिप्स हाताशी असाव्या लागतात. ते संशोधन बहुतांशी अमेरिकेत होतं.
द.कोरिया, तैवान, जपान इत्यादी देश अमेरिकेशी संबंधित आहेत. चीन अमेरिकेचा स्पर्धक/ शत्रू देश आहे. चिपचं संशोधन आणि उत्पादन यात चीन अमेरिकेच्या मागं आहे, पण वेगानं अमेरिकेशी स्पर्धा करतेय.
चिप तयार करण्यासाठी लागणाऱ्या पूर्वसोयी भारतात नसल्यानं भारतात तो उद्योग आज तरी असून नसल्यागत आहे. बंगलोर, गुजरातेत उद्योगाचे प्रस्ताव आहेत. ते उद्योग होतील तेव्हां होतील. तिथं होणाऱ्या चिप्स बग्गड असतील, किंमत आणि कार्यक्षमता या बाबतीत प्राथमिक असतील.
भविष्यात कोणत्याही समाजाची शक्ती ते किती सेमिकंडक्टर-चिप वापरतं यावर ठरणार आहे. चिप तयार करता यायला पाहिजेत आणि त्यांचा वापर होईल अशी उत्पादनं देशात असतील तर त्या देशाची आर्थिक प्रगती होणार असं उद्याचं चित्र आहे.
मिलर यांचं प्रस्तुत पुस्तक चिप हा विषय सविस्तर समजून सांगतं.
विल्यम शॉकली, जॉन बार्डीन आणि वॉल्टर ब्रेटेन या तिघांना सेमीकंडक्टरच्या शोधासाठी १९५६ साली नोबेल पारितोषिक मिळालं. पण गंमत अशी की १९५७ साली रशियानं पहिला उपग्रह स्पुटनिक आकाशात फेकला. म्हणजे तंत्रज्ञानात रशिया पुढं गेला होता. रशिया-अमेरिका स्पर्धा/शत्रुत्व होतंच. स्पुटनीक अवकाशात गेल्यावर अमेरिकेनं इलेक्ट्रॉनिक्समधील तंत्रज्ञानाच्या विकासासाठी विश्वशाळांना आणि कंपन्याना पैसे दिले, प्रोत्साहन दिलं.
निर्णायक क्षण आला तो १९६५ मधे. वियेतनाममधे अमेरिका बाँबिंग करत होती पण त्यात नेमकेपणा नव्हता. एक महत्वाचा पूल अमेरिकेला नष्ट करायचा होता. अमेरिकेनं त्या पुलासाठी ६८० बाँब टाकले. एकही बाँब पुलावर नेमका पडला नाही. पुलापासून ४२० फुटावर बाँब पडले. चीन आणि रशियाशी गाठ होती. सुधारणा केली नाही तर पराभव पत्करावा लागणार हे अमेरिकेला कळलं. तसं घडलंही. अमेरिकेला नामुष्की स्वीकारत वियेतनाममधून काढता पाय घ्यावा लागला.
त्या क्षणी अमेरिकन सरकारनं, अमेरिकन लष्करानं सेमीकंडक्टर-चिपची गती आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रचंड पैसे ओतायला सुरवात केली. विविध कंपन्यांना पैसे दिले.चिपच्या डिझाईनमधे अमेरिकेनं आघाडी घेतली.
ट्रांझिस्टर छोटा करणं, वायरींचं जंजाळ कटाप करून एका सिलिकॉन चकतीवर सेमीकंडक्टर व इतर घटक कोरून सर्किट तयार करणं हे तंत्र जॅक किलबी या इंजिनियरनं शोधलं. खूप सेमीकंडक्टर व इतर घटक एकाच चिपवर मावले, सेमीकंडक्टर व इतर घटकांची जुळणी अगदी आटोपशीर झाली. इथे इंजिनयरिंग कामी आलं. सर्किट, चिप, आटोपशीर, लहान झालं तरच यंत्राचा आकारही लहान होणार होता. किलबीला २००० साली नोबेल मिळालं.
नंतरचं आव्हान होतं ते चिपचा आकार लहान करण्याचं. डच आणि अमेरिकन कंपन्यानी ते घडवून आणलं. आता मीटरचे अब्ज भाग केले तर त्यातल्या तीन भागायेवढ्या क्षेत्रफळाची चिप तयार होऊ घातलीय. ही चिप तयार करत असताना, त्यावर सर्किट कोरत असताना पाच लाख सेल्सियस इतकं म्हणजे सूर्यावर असतं त्यापेक्षा जास्त तपमान तयार केलं जातं. डच, अमेरिकन कंपन्यांचा या तंत्रज्ञानावर एकाधिकार आहे.
तंत्रज्ञान, उत्पादन, उपयुक्त वस्तू आणि यंत्रांत त्या तंत्रज्ञानाचा वापर करून चिप कंपन्यांनी सारं जग ताब्यात घेतलंय. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जगाची उलाढाल आता तीन ट्रिलियन डॉलर येवढी आहे, म्हणजे भारताच्या जीडीपी येवढी आहे.
प्रस्तुत पुस्तक चिप या प्रकरणाची साद्यंत हकीकत सांगतं, त्यातल्या तांत्रिक तपशीलासह.
लेखक तंत्रज्ञ नाहीत. ते राज्यशास्त्र शिकवतात, आंतरराष्ट्रीय घडामोडी हा त्यांचा विषय आहे, रशिया आणि चीन हे त्यांचे अभ्यासाचे विशेष विषय आहेत. पैकी चिप या मुद्द्यावर चीन हा जगात दोन नंबरचा देश असल्यानं तिथली माहिती हा लेखकाचा विषय आहे.
युक्रेन आणि रशिया युद्ध सुरु झाल्यावर पुन्हा एकदा जगाची वाटणी दोन गटात झाली आहे.युरोप आणि अमेरिका हा एक गट. रशिया आणि चीन हा दुसरा गट. रशिया आणि चीनला अमेरिका आर्थिक फटके मारत आहे. त्यातला एक फटका म्हणजे अमेरिकेनं आता खासमखास चिप्सचं पायाज्ञान व तंत्र चीनला देणं बंद केलंय. चीन कितीही स्वतःच्या पायावर उभं रहाण्याचा प्रयत्न करत असलं तरी हा फटका चीनला महाग पडू शकतो.
एकेकाळी पोलाद हा अर्थव्यवस्थेचा पाया मानला जात असे. नंतर पोलादाची जागा तेलानं घेतली. आता अर्थव्यवस्था चिप्सवर आधारलेल्या असतात.
प्रस्तुत पुस्तक खूप माहितीनं भरलेलं आहे, रंजक शैलीत लिहिलेलं आहे, तंत्रज्ञान हा ज्ञानाचा वा पोटापाण्याचा विषय नसलेल्या वाचकांनाही हे पुस्तक धरून ठेवेल.
।।
CHIP WAR: THE FIGHT FOR THE WORLD’S MOST CRITICAL TECHNOLOGY.
Chris Miller.
Simon & Schuster.