पुस्तक टीव्हीचर्चा एक करमणूक

पुस्तक टीव्हीचर्चा एक करमणूक

जो बायडन टीव्हीवरच्या अध्यक्षीय चर्चेत अडखळले. केवळ तेवढ्यावरून, जो बायडन यांच्या अध्यक्षीय क्षमतेवरून वा कारकीर्दीवरून नव्हे, बायडन अध्यक्षीय निवडणुकीतून बाद झाले.

त्यानंतर डोनल्ड ट्रंप आणि कमला हॅरीस यांच्यात टीव्हीचर्चा झाली. काहींच्या मते कमला हॅरिस कॉन्फिडंट होत्या आणि ट्रंप आपण हरलेलो आहोत याच भावनेनं चर्चेत वावरले. आता त्याचा परिमाण मतदानावर काय होतो ते पहायचं.

टीव्हीचर्चा सुरु झाल्या तेव्हांपासून एक गोष्ट लक्षात आलीय. मतं पक्की न झालेले अमेरिकन मतदार चर्चेत उमेदवार कसे दिसले, वावरले यावरून आपला निर्णय पक्का करतात.

टीव्हीचर्चा घडवून आणणारे अँकर लेहरर यांनी लिहिलेलं प्रस्तुत पुस्तक वाचकाला खूप माहिती देतं.

ॲल गोर आणि जॉर्ज बुश यांच्यात चर्चा झाली त्याची गोष्ट.  बुश यांचं वक्तव्य ऐकताना गोर जाम बोअर झाले होते; त्यांनी असंख्य उसासे टाकले, असंख्य वेळा तोंड वाकडं केलं. टीव्हीच्या दुभागलेल्या पडद्यावर उसासे दिसले. दुसऱ्या दिवशीच्या पेपरात हेडलाईन होती गोर यांच्या उसाशांवर.

गोर यांच्या भाषणात अनेक महत्वाचे मुद्दे होते. पर्यावरण हा विषय त्यांनी जगाच्या पटलावर आणला होता. गोर काहीसे विचारवंतही होते. लोकांनी ते काय म्हणाले त्याकडं लक्ष दिलं नाही, ते कसे दिसले याकडं लक्ष दिलं.

गोर निवडणूक हरले.

टीव्ही चर्चा १९६० सालापासून सुरु झाल्या. केनेडी निक्सन ही पहिली टीव्ही चर्चा.

 चर्चेत निक्सन थकलेले दिसले. निक्सनची प्रकृती ठीक नव्हती, ताप होता. डॉक्टरनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता, चर्चा पुढं ढकलण्याची विनंती केली होती. कार्यक्रमाच्या आधी त्यांचा गुडघा दुखावला होता, ते लंगडतच स्टुडियोत आले. चेहऱ्यावरचं थकलेपण लपवण्यासाठी स्टुडियोतले मेकअपवाले सरसावले. निक्सननी मेकअपला नकार दिला, हलकीशी पावडर मारा म्हणाले. 

या उलट केनेडींनी स्टुडियोतला पडदा पाहून त्याच्याशी मॅच होईल असा शर्ट आयत्या वेळी मागवून घेतला. फुल मेकअप केला. केस हवेत उडत आहेत असे ठेवले. हीरो दिसत होते, ताजे तवाने दिसत होते.

माहिती आणि विद्वत्ता नव्हे तर टीव्हीवरची छबी प्रभावी ठरते हे केनेडींनी जोखलं होतं.

  स्टुडियोच्या बाहेर पडताना तिथं हजर असलेला कार्यक्रमाचा संचालक म्हणाला ‘केनेडींना मतदानापर्यंत वाट पहायची आवश्यकताच नाही, केनेडी जिंकले आहेत.’

रेडियोवरही निक्सन-केनेडी चर्चा झाली होती. त्या चर्चेत निक्सन जिंकले होते. कारण रेडियोवर कोणीही दिसत नव्हतं, माणसं नुसतं ऐकत होती. टीव्ही नसता, नुसती रेडियोवरची चर्चा असती तर केनेडी हरले असते.

लेखक लेहरर  १९६० च्या निक्सन-केनेडी चर्चेपासून २००८ च्या बराक ओमाबा-मॅकेन चर्चेपर्यंत ३५ चर्चांमधे अँकर होते.  टाऊन हॉल चर्चा, केवळ दोन उमेदवारांमधली आपसातली चर्चा, एकच अँकरवाली चर्चा, पत्रकारांच्या पॅनेलबरोबरची चर्चा हे सर्व चर्चेचे प्रकार त्यांनी हाताळले. २००८ नंतर चर्चेचं रूप बदलत गेलं. चर्चा करत असताना ट्रंप प्रतिस्पर्ध्याच्या बोलण्यात सतत अडथळे आणत.  एक वक्ता बोलत असताना दुसऱ्याचा माईक बंद ठेवणं अशी सुधारणा झाली. अशाअनेक सुधारणा घडत गेल्या.

अब्राहम लिंकन आणि प्रतिस्पर्धी स्टीफन डग्लस यांच्यात सात चर्चा झाल्या. रेडियोवर, त्या वेळी १८५८ साली टीव्ही नव्हता. दोघांनी चर्चेचे मुद्दे काय असावेत यावर तासनतास घनघोर चर्चा केल्या होत्या. आता उमेदवार एकमेकाला भेटत नाहीत, थेट स्टुडियोतच एकमेकाला भिडतात. दोन्ही उमेदवार संभाव्य प्रश्नांवर काय उत्तरं द्यावी लागतील यावर कसून अभ्यास करतात, बोलण्याची तालीम करतात, सराव करतात, व्यावसायीक जाणकार त्यांना सल्ला देतात.

१९६० साली चर्चा सुरु झाली तेव्हां टीव्हीचे चॅनेल अगदीच कमी होते, व्हॉट्सॅप नव्हतं, टिकटॉक नव्हतं,  रील नव्हतं, फेसबुक नव्हतं, ट्विटर नव्हतं, इन्स्टाग्राम नव्हतं. तेव्हां टीव्हीपेक्षा पेपरांचा खप जास्त होता. प्रचार मोहिमेत होणारी भाषणं नागरिकांचं शिक्षण करत असत. 

आता परिस्थिती बदललीय. ९० टक्के लोकांनी कोणाला मत द्यायचं ते आधीच ठरवलेलं असतं. १० टक्के मतदार गोंधळात असतात. ते चर्चा पाहून आपलं मत पक्कं करतात. 

एकदा रॉस पेरॉ हा उद्योगपती अध्यक्षपदाचा उमेदवार होता. क्लिंटन आणि सीनियर बुश प्रतिस्पर्धी होते. पेरॉ अधिक हुशार होता, स्पष्ट बोलणारा होता. त्यानं १९ टक्के मतं खाल्ली. बहुदा ती मतं बुश यांची असल्यानं क्लिंटन अध्यक्ष झाले. पेरॉ म्हणत की ते स्वतःच्या पैशावर निवडणूक लढवत होते, लोकांच्या पैशावर, सरकारच्या पैशावर नव्हे.

पेरॉ यांनी रॉकडेल या नौदल अधिकाऱ्याला व्हाईस प्रेसिडेंटसाठी निवडलं होतं. रॉकडेल स्वतःहून निवडणुकीत उतरले होते, फार तर तीन वेळा त्यांची आणि पेरॉ यांची भेट झाली होती. 

रॉकडेलनी धमाल उडवली.

टीव्ही चर्चा चालली होती. रॉकडेल आपले कोपऱ्यात नुसते उभे. वैतागले. ‘मी कोण आहे? मला इथं कशाला बोलावलंय?’ असं म्हणत ते चर्चेत घुसलेच. अँकरची वाटच लागली.

रॉकडेल म्हणाले ‘मी तीस वर्षं नौदलात आहे. वियेतनाममधे पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत होतो. मी बाँबिंग केलंय. मी शत्रूच्या तुरुंगात होतो. तुरुंगात माझा छळही झालाय. कठीण परिस्थितीत, संकटात वाट कशी काढायची हे मी शिकलोय, अनुभवलंय. त्यामुळं देशावर संकट आलं तर मीच उपयोगी पडणार आहे, राजकारणी उपयोगाचे नाहीत…हे राजकारणी लोक (म्हणजे क्लिंटन आणि बुश) बाहेर गेले तर यांना कोणी नोकरीवर घेणार नाही, कारण हे कामं करू शकत नाहीत, नुसती बडबड आणि राजकारण करतात. मी रस्त्यावर उतरलो तर मला नक्कीच निदान पायलट म्हणून नोकरी मिळेल…..’

पुस्तकात किश्श्यांचा खजिना आहे, लेखक गप्पा मारल्यागत लिहितो. 

गंमत वाटते वाटते आणि डोक्यात हलके हलके प्रकाश पडतो.

पुस्तक Tension City

Inside the Presidential Debates from    Kennedy-Nixon to Obama-Mccain.

लेखक Jim Lehrer

प्रकाशक Random House

||

Comments are closed.