पुस्तक: तालिबान कां प्रभावी ठरतं?
पुस्तक : RADIO FREE AFGHANISTAN
लेखक : Saad Mohseni
❖
अफगाणिस्तान हे जगाला पडलेलं एक कोडंच आहे. तिथं काय चालतं ते कळत नाही. समजा ते कळलं तर ते तसं कां चाललंय ते कळत नाही. कारण अफगाणिस्तानबद्दल फारशी माहिती माध्यमांत येत नाही. ही अडचण पुस्तकं दूर करतात. साद मोहसेनी रेडियो फ्री अफगाणिस्तान या पुस्तकामुळं अफगाणिस्तान हे कोडं समजायला मदत होते.
❖
तालिबान कां पुसलं जात नाही.
❖
अफगाणांना बाहेरच्या लोकांचं वर्चस्व सहन होत नाही. एकोणिसाव्या शतकात ब्रिटीशांनी अनेक लढाया केल्या, हरले, अफगाणिस्तान हाती लागलं नाही. १९६० च्या दशकात रशियन कम्युनिष्ट अफगाणिस्तानात घुसले. १९७८ साली प्रेसिडेंट महमूद खानचा खून करून रशियानं अफगाणिस्तानचा ताबा घेतला, सैन्य घुसवलं. अफगाण मुजाहिदांनी रशियन सत्तेविरोधात लढा सुरु केला. १९८९ साली अमेरिका आणि पाकिस्तानच्या मदतीनं मुजाहिदांनी रशियन सैन्याचा पराभव करून त्यांना हाकलून दिलं. १९८९ ते १९९६ अफगाणिस्तानात यादवी झाली. अनेक राजकीय लष्करी गट सत्तेसाठी आपसात भांडले. शेवटी नाट्यमय घटनाक्रमानंतर १९९६ मधे तालिबाननं सत्ता हस्तगत केली. तालिबाननं ओसामा बिन लादेनला आश्रय दिला.ओसामानं अमेरिकेवर हल्ला केला. चिडलेल्या अमेरिकेनं तालिबानविरोधात युद्ध पुकारलं. २००१ साली तालिबानचा पराभव केला.२००४ साली निवडणुका होऊन अफगाणिस्तानात तालिबान विरहीत, तालिबान विरोधी सरकार स्थापन झालं. २००४ पासून तालिबान आणि अफगाण सरकार यात संघर्ष होत राहिला. शेवटी २०२१ साली अफगाणिस्तानातलं सरकार पडलं आणि पुन्हा तालिबानचं सरकार सुरु झालं.
अमेरिकेनं अब्जावधी डॉलर खर्च केले. टनावारी बाँब टाकले, अब्जावधी गोळ्या झाडल्या, अब्जावधी शब्दांचा प्रचार केला. पण तालिबान नष्ट झालं नाही.
तालिबान कां हरत नाही या प्रश्नाचं काहीसं उत्तर साद मोहसेनी यांच्या प्रस्तुत पुस्तकातून मिळतं.
मोहसेनी अफगाण आहेत. त्यांचे वडील अफगाण सरकारचे मुत्सद्दी होते. कम्युनिष्ट सरकार आल्यावर १९७८ साली ते बेवतन झाले, जपानमधे गेले. तिथून ते ऑस्ट्रेलियात गेले. साद मोहसेनीचं सारं आयुष्य जपान, ऑस्ट्रेलियात व्यतित झालं. पण ते मनानं अफगाणिस्तानातच राहिले. कारण वडील तद्दन पोलिटिकल आणि मनस्वी असल्यानं घरात कायम अफगाणिस्तानची चर्चा होत असे.
साद मोहसेनीनी अफगाणिस्तानच्या शेजारच्या उझबेकिस्तानात जाऊन व्यवसाय केला, जेणेकरून अफगाणिस्तानशी संबंध येईल. व्यवसाय जमला नाही. काहीही करून आपण अफगाणिस्तानात गेलं पाहिजे असं त्यांना वाटत असे. २००३ साली साद अफगाणिस्तानात परतले. भाऊ,बहीण, आई यांच्यासह. तिथं त्यांना अरमान हे एफएम रेडियो स्टेशन सुरु केलं. नंतर यथावकाश त्यांनी तोलो हे दूरदर्शन केंद्र सुरु केलं. स्वतःचे पैसे आणि थोडी अमेरिकेची मदत यावर त्यांचा मोबी हा ग्रुप सुरु झाला व त्या तहत त्यांनी रेडियो,टीव्हीचा प्रसार केला. आज २०२५ साली अफगाणिस्तानावर तालिबानची सत्ता घट्ट झालीय. मोबी ग्रुपच्या माध्यमांना आणि त्यात काम करणाऱ्या पत्रकारांना खूप त्रास होतोय. तालिबान सरकार सतत तोलो आणि अरमानला वाकवू पहातंय. पण साद आणि त्यांचे सहकार हार मानायला तयार नाहीत. या स्थितीत साद यांनी २००४ ते २०२३ या काळातला अफगाणिस्तानातला पत्रकारी अनुभव प्रस्तुत पुस्तकात लिहिला आहे.
२००४ ते २०२१ या काळात करझाई, घनी यांची सरकारं होती. त्यांना अमेरिकेचा भरभक्कम पाठिंबा होता. तालिबान निपटण्याचा निकराचा प्रयत्न त्या सरकारांनी केला. काबूल सोडून सर्व अफगाणिस्तानभर तालिबान प्रभावी होतं, अमेरिकन आणि अफगाण पोलिस-सैनिकांना ठोकत होतं. तालिबानची लोकप्रीयता वाढत होती. कारण करझाई, घनी यांची सरकारं भ्रष्ट होती. सरकार व आसपासचे लोक स्वतःचे खिसे भरत होते, जनता वंचित होती.
तोलोनं सरकारच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या दिल्या. पोलिस आणि लष्कर यांची तालिबान विरोधी कारवाई आचरट होती,अमानवी होती, तालिबानच्या क्रूरतेला तोडीस तोड होती. हे सारं तोलोचे बातमीदार सतत कार्यक्रमातून दाखवत होते. करझाई आणि घनी यांना ते आवडलं नाही. ते तोलो बंद पाडायचा प्रयत्न करीत, तोलोच्या बातमीदारांना तुरुंगाची हवा खायला घालत.
ही बातमीदारी करत असताना तालिबानही किती क्रूरतेनं वागतंय याच्याही बातम्या तोलो देत असे. ते तालिबानला ते आवडत नसे. तालिबाननं एकदा तोलोच्या वार्ताहरांना घेऊन जाणारी बस उडवली, त्यात तोलोचे सात बातमीदार मारले गेले.
सरकार लोकांना धडपणानं जगू देत नसल्यानं जनता तालिबानच्या आश्रयाला गेली. तालिबानला प्रचंड संख्येनं कार्यकर्ते मिळत गेले. बेकार युवकांना तालिबानकडून बंदुक आणि रोटी मिळत असे.
परिणाम अटळ होता. घनी सरकार पडलं, तालिबानचं सरकार स्थापन झालं.
तोलोनं स्त्रियांचे प्रश्न मांडायला सुरवात केली. बुरखा. स्त्रीनं घराबाहेर पडता कामा नये. स्त्रीनं शिकता कामा नये. तोलोनं स्त्रियांच्या मुलाखती दाखवल्या. तालिबानला ते आवडलं नाही. तोलोनं स्त्रियांना ऑन लाईन विज्ञान इत्यादी शिकवणारे कार्यक्रम योजले.शाळा नाही तर नाही पण निदान घरी बसून तरी त्यांचं शिक्षण व्हावं असा मधला मार्ग तोलोनं काढला. पण तोही तालिबानला मान्य नाही.
तालिबानचे अधिकारी तोलोच्या कार्यालयात घुसतात. काही तरी कारणं काढून कार्यक्रम बंद करायचा प्रयत्न करतात. तोलो बंड करतं. तालिबान तोलोच्या बातमीदारांना आणि अँकरना तुरुंगात धाडतं.
तोलोच्या बातमीदारांना कसकसा त्रास होतो आणि बातमीदार त्याला कसकसं तोंड देतात याची विपुल उदाहरणं पुस्तकात आहेत. स्वतंत्र पत्रकारी म्हणजे काय असते ते या पुस्तकातून कळतं. सत्ता आणि पत्रकारी यातले संबंध कसे असतात याचा प्रत्यय या पुस्तकातून जागोजागी येतो.
जनरल पब्लिकनं आणि पत्रकारांनी हे पुस्तक वाचायला हवं.
।।