पुस्तक. युक्रेन युद्ध, बायडन ट्रंप यांच्यातला बुद्धीबळाचा खेळ

पुस्तक. युक्रेन युद्ध, बायडन ट्रंप यांच्यातला बुद्धीबळाचा खेळ

रशियानं २०२२ मधे आक्रमण केल्यानंतर युक्रेननं पहिल्या प्रथम १८ नव्हेंबर २०२४ या दिवशी रशियावर क्षेपणास्त्रं फेकली. क्षेपणास्त्रं  आधीच युक्रेनला दिली होती, वापरण्याची परवानगी दिली नव्हती. ती परवानगी मावळते अघ्यक्ष जो बायडन यांनी १७ नव्हेंबरला दिली. 

१० जानेवारी २०२५ रोजी बायडन यांना अध्यक्षपदाची सूत्रं डोनल्ड ट्रंप यांच्याकडं सोपवायची आहेत. तोवर बायडन यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. या तरतुदीचा फायदा बायडन यांनी घेतलाय.

क्षेपणास्त्रं फेकण्याचा निर्णय फार मोठा आहे. अमेरिकेची शेकडो क्षेपणास्त्रं युक्रेनकडं आहेत. रशियाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. रशिया अण्वस्त्रं वापरून प्रत्युत्तर देऊ शकेल. युद्धाला तसं वळण मिळणं युरोपला आणि एकूणच जगाला फार घातक ठरेल.

ट्रंप पुतीनचे मित्र आणि चाहते आहेत  हे लक्षात घेऊन बायडननी ही चाल खेळलीय.

बायडन वरील निर्णय घेतील याचा अंदाज बॉब वूडवर्ड यांच्या वॉर या पुस्तकातून येतो.

वॉर या पुस्तकात वुडवर्डनी अफगाणिस्तान, युक्रेन आणि गाझा ही तीन युद्ध हे मुख्य सूत्र ठेवलं आहे. बराक ओबामा, जो बायडन आणि डोनल्ड ट्रंप या तीन अध्यक्षांचा संबंध या युद्धांशी येतो. पैकी गाझा आणि युक्रेन युद्धांच्या बाबतीत बायडन आणि ट्रंप यांचे विचार काय आहेत, ते काय काय बोलले याच्या नोंदी प्रस्तुत पुस्तकात आहेत.

बातमीदारीत डीप बॅकग्राऊंड ही एक पद्धत आहे. या पद्धतीत बातमीदार अनेकांशी बोलतो. त्या व्यक्तींचं थेट अवतरण कधीकधी बातमीदार आपल्या बातमीत देतो.   त्या व्यक्तीची परवानगी नसेल तर त्या व्यक्तीचा उल्लेख न करता अवतरणं दिली जातात किंवा त्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीचा उपयोग करून घेतला जातो.   वुडवर्ड हे प्रामाणिक व्यावसायिक बातमीदार असल्यानं त्यांना थेट अध्यक्ष आणि त्यांचं निकटचं वर्तुळ यात प्रवेश असतो. माणसं त्यांच्याशी मोकळेपणानं बोलतात. डीप  बॅकग्राऊंड माहितीचा वापर वुडवर्डनी या पुस्तकात केला आहे. व्हाईट हाऊस, पेंटॅगॉन, सेनेट, काँग्रेस इथल्या अनेक व्यक्तींशी वुडवर्ड बोलले आहेत.

जो बायडन यांची कामाची पद्धत वुडवर्ड यांच्या पुस्तकातून कळते.

रशियानं युक्रेनच्या हद्दीवर फौजा जमा करायला सुरवात केली तेव्हांच सैन्य आणि इंटेलिजन्स दोन्ही विभागानी बायडन यांना पूर्ण माहिती पुरवली. दररोज त्या दोन्ही विभागातून बायडन याना माहिती दिली जात असे.

बायडन पुतीन यांच्याशी फोनवर बोलले. पुतीननी आपण युद्ध  करणार नाही असं सांगितलं. बायडन म्हणाले तुमचे हेतू आम्हाला कळत आहेत. बायडन पुतीन यांची संभाषणं तणातणीची होऊ लागली. बायडन पुतीन यांच्या व्यक्तीगत भेटी झाल्या. बायडन यांनी पुतीनना दम दिला. ‘तुम्ही आक्रमण केलंत तर त्याची फार मोठी किमत तुम्हाला मोजावी लागेल, अमेरिका गप्प बसणार नाही’ असं बायडन म्हणाले. 

अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार,परदेश खात्यातले मुत्सद्दी, लष्करी अधिकारी युरोपातल्या देशात, युक्रेनमधे, रशियात फिरू लागले. वेळोवेळी बायडन यांना हालचालींची माहिती देत असत.

युक्रेनचं  सार्वभौमत्व आणि अखंडत्व या विषयावर तडजोड होणार नाही, युक्रेनच्या सोबत अमेरिका राहील असं बायडननी जाहीरपणे सांगितलं. शस्त्रं आणि पैसा आपण युक्रेनला देणार असं त्यांनी जाहीर केलं.

हा निर्णय मोठा होता. आपण घेतो तो निर्णय बरोबर आहे की नाही याबद्दल बायडनना धास्ती असे. ते सतत आपल्या सहकाऱ्यांना अगदी सूर्य उगवत असताना बोलावून घेत आणि आपलं काही  चुकतय कां असं विचारत.

ओबामानी अफगाणिस्तानमधलं सैन्य सतत वाढवलं. बायडनना ते पसंत नव्हतं. बायडन ओबामांचे उपराष्ट्रपती होते पण ओबामाना खूपच सीनियर होते, खूप वर्ष सेनेटमधे होते, त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा दांडगा अनुभव होता. ते  ओबामाना स्पष्टपणे सांगत की ओबामांचा निर्णय चुकीचा आहे, घातक आहे.

बायडन यांचं मत होतं -वियेतनाममधे सैन्य पाठवून अमेरिकेनं चूक केली. सैन्य इतर देशात पाठवू नये. लष्कराला स्वतःचं महत्व वाढवायची खाज असते. एकदा त्यांच्या हातात निर्णय दिला की ते सतत अधिक सैनिकांची मागणी करत असतात. लष्करावर विश्वास ठेवून नये, आपला आपण निर्णय घ्यावा. वियेतनाममधे हरत असतानाही सतत अमेरिकन सैन्य वाढवत नेलं. शेवटी नामुष्की पत्करून अमेरिकेला बाहेर पडावं लागलं. कुठल्या भूमीवरच्या लोकांना आपल्या भूमीवर परकीय सैन्य असल्याचं आवडत नसतं. वियेतनामसारखी चूक पुन्हा होऊ नये असं बायडन यांना वाटत असे.

बायडननी ठरवलं की अमेरिकन सैन्य युक्रेनमधे जाणार नाही. युक्रेननंच लढावं, त्यांना सर्व मदत करायची. युक्रेननं बचावाचं धोरण अवलंबावं आणि रशियाला जेरीस आणून युद्ध थांबवायला लावावं. युक्रेननं रशियावर हल्ले केले तर तिसरं महायुद्धही होऊ शकेल अशी भीती बायडनना होती. त्यामुळंच क्षेपणास्त्रं, दूर पल्ल्याची बाँबर विमानं वापरायला बायडननी  परवानगी दिली नव्हती.

आपण अध्यक्षपदी राहू या विश्वासानं बायडन युक्रेन युद्ध हाताळत होते. 

ट्रंप अध्यक्ष झाले.ट्रंप हे बेभरवाशाचे आहेत, लहरी आहेत, पुतीनच्या प्रेमात आहेत. ते राज्यावर आले की युक्रेनची मदत बंद करतील, युक्रेनला आपले प्रांत रशियाला देऊन तडजोड करायला लावतील असं बायडन आणि निरीक्षकांना वाटतं. म्हणून युक्रेनला हल्ले करायला परवानगी देऊन बायडन यांनी ट्रंप यांना शह दिला आहे.

बायडन आणि ट्रंप यांची पुतीनबद्दलची मतं आणि वागणूक याचे तपशील वुडवर्डनी प्रस्तुत पुस्तकात दिले आहेत. ट्रंपनी गेल्या चार वर्षात खाजगी पातळीवर किती वेळा पुतीनना फोन केले याचाही तपशील वुडवर्डनी दिला आहे. ट्रंप पुतीनशी व्यक्तिगत मैत्री असल्यागत वागतात हे अमेरिका या देशाच्या हिताचं नाही असं वुडवर्ड या पुस्तकात म्हणतात.

पत्रकारी, राजकारण या विषयांचा अभ्यास करणाऱ्यांना प्रस्तुत पुस्तक संदर्भ म्हणून उपयोगी प़डेल. पुस्तकाची शैली सामान्य वाचकाला पसंत पडेल अशी आहे.

\\

पुस्तक :   वॉर

लेखक  :  बॉब वुडवर्ड

प्रकाशक : सायमन अँड शुस्टर.

Comments are closed.