प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन. सर्वांना मतं हवीयत.
खरं म्हणजे प्रकाश आंबेडकर हे डॉ. आंबेडकरांचे अनुयायी. त्यांना देवाधर्माबद्दल आस्था असण्याची अपेक्षा नाही. मतदार, हिंदू पंथ मानणारे, आपल्याकडं यावेत यासाठी त्यांनी पंढरपूरचं मंदीर उघडावं यासाठी सत्याग्रह केला. काही तासांचाच. हज्जारो माणसं गोळा केली.
अपेक्षेप्रमाणं सरकारनं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं व यथावकाश विचार करून मंदीराचे दरवाजे उघडू असं सांगितलं. लॉकडाऊन हळूहळू कधी तरी उघडायचं होतंच, त्या वेळापत्रकात पंढपुरच्या विठोबाला सरकारनं घातलं. येवढंच.
प्रकाश आंबेडकर आणि सरकार, दोघंही खुष.
प्रकाश आंबेडकरांच्या सत्याग्रहाच्या वेळी लोकं अंतर बाळगणं, मास्क लावणं इत्यादी गोष्टींकडं पूर्ण दुर्लक्ष करून अंगात आल्यासारखे पोलिसांवर तुटून पडले. नक्कीच त्यातले काही हजार कोविडग्रस्त होते आणि नक्कीच त्यांनी आसपासच्या काही हजार लोकांना कोविड दान केला.
विठ्ठल! विठ्ठल!
प्रकाश आंबेडकरांचा विठ्ठल धावा सुरु झाला त्या आधीपासूनच राजकारणात मागं पडलेले, माध्यमांची आस लागलेले, राज ठाकरे मंदिरं उघडण्याचा धोषा लावून बसले होते. दुनियाभरच्या सगळ्या गोष्टी उघडत आहात मग मंदिर कां नाही असं त्यांचं म्हणणं.
त्यांनाही मतं हवीयत. मतं मागायची तर हिंदू पंथियांना चेतवायला हवं हा विद्यमान जनरल राजकीय हिशोब. ठाकरेंच्या राजकीय आचार वेगळा, ते खळ्ळखटकवाले. ते खळ्ळ करण्याची वाट पहात मागण्या करत आहेत.
हे झालं चिल्लर लोकांचं. तिकडे नरेंद्र मोदींनी अयोघ्येत भरपूर लोकांना गोळा करून राम लल्लाच्या मंदिराचा पाया घालायचा घाट घातला.
राम लल्ला म्हणजे बाल राम. म्हणजे अर्थातच त्याला मिशा नसणार. पण भिडे गुरुजींचा राम हा आईच्या पोटातच झुबकेदार मिशा वाढवत असल्यानं त्यांनी रामाला (रामाला की राम लल्लाला) मिशा काढाव्यात असा परस्पर सल्ला नरेंद्र मोदींना दिला.
मोदी सध्या दाढी वाढवत असल्यानं त्यांचं स्वतःच्या दाढीकडं लक्ष होतं, रामाच्या मिशीकडं पहायला त्याना वेळ नसल्यानं त्यांनी मंदीराचा पाया उरकला. तिथंही कित्येक लोकं मास्क न घालता वावरत होते. खुद्द मोदींपासून दीड फूट अंतरावर एक साधू मास्क न लावता वावरत होते आणि त्यांनाच कोविड झाल्याचं नंतर कळलं.
विज्ञान सांगतं की एकास एक ते एकास दीड ते दोन या प्रमाणात अयोध्येतही कोवीड पसरला असणार. अयोघ्येत जमलेल्या लोकांपैकी किती लोकांना कोविड झाला याची माहिती उत्तर प्रदेश वा केंद्र या दोन्ही ठिकाणची सरकारं देत नाहीत.
त्याआधी राम लल्लाची काही प्रतिकं या देवळातून त्या देवळात नेण्याचा विधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य नाथ यांनी पाच पन्नास माणसं बरोबर घेऊन, त्यात कित्येक मास्क न घातलेले, पार पाडला होता.
आधीच नोटबंदीमुळं लोकांचं कंबरडं मोडलं होतं. नंतर सदोष जीएसटी. परिणामी लहान, मध्यम उद्योग आणि स्वयंरोजगार पार रसातळाला गेले. बँकेत पैसे नाहीत. सरकारनं रीझर्व बँकेतले पैसे घेतले आणि उत्पादक कामांमधे गुंतवायच्या ऐवजी तूट भरून काढली हे दाखवण्यासाठी वापरले. थोडक्यात म्हणजे अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजले. आणि कोेविडनं हल्ला केला, अर्थव्यवस्थेची वाट लावली.
कामं थांबली. उत्पादन थांबलं. पण खर्च मात्र थांबवता येत नव्हते. त्यामुळं तीन टक्क्यावर आलेली अर्थव्यवस्था उणे २३ टक्क्यावर गेली.
या संकटाबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की ही देवाची करणी आहे.
प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, नरेंद्र मोेदी, आदित्यनाथ, निर्मला सीतारामन. सर्वाचा भर देवावर. कारण संकट ही देवाची कृपा आहे. म्हणूनच मंदिर बांधा, मंदिरं मोकळी करा असं सर्वांचं म्हणणं.
आता या पुढाऱ्यांना दोष तरी द्यायचा कां किंवा किती दोष द्यायचा असाही प्रश्न पडतो.
कारण मुंबईतले हज्जारो लोक गणपती आल्यावर ठिकठिकाणच्या बाजारांत हज्जारोंनी गर्दी करून खरेदी करत होते. गणपतीची सजावट, उकडीच्या मोदकांची सामग्री इत्यादी गोष्टी त्यांना विकत घ्यायच्या होत्या. एकमेकाला खेटून खरेदी. नंतर यातली काही हजार मंडळी कोकणात गेली.
आज एकूण जनतेच्या पंचवीस टक्क्यापेक्षा अधिक लोकांना कोविड झाला असणार, आहे, असं विज्ञान सांगतं. कोविडची लक्षणं कधी दिसतात, कधी दिसत नाहीत, पण तो शरीरात लपलेला असतो. त्यासाठीच लोकांनी होता होईतो भेटीगाठी, संपर्क टाळावा, भेटणं टाळता येत नसेल तर मास्क वापरावा असं विज्ञान सांगतंय. पण हज्जारो मराठी लोकांनी विज्ञानाची रवानगी देव्हाऱ्यात केली आणि तिथंच गणपती बसवून मोकळे झाले.
लस येऊन ती सर्व जनतेला टोचली जात नाही तोवर कोविड टाळण्याचे उपाय हे संपर्क-मास्क यावरच अवलंबून असतील हे सत्य लोकांना प्रत्येक फोन कॉलच्या आधी सांगितलं जातंय. तरीही ही लोकांच्या वागम्याची तऱ्हा.
लोकांच्या या वागण्याचा अर्थ कसा लावायचा?
महाराष्ट्रात चित्रपट निर्मिती सुरू झाली त्या काळात म्हणजे १९३० नंतर निघणाऱ्या चित्रपटात बुवाबाजी, अंधश्रद्धा इत्यादी विषयावर चित्रपट निघत होते. त्याच्या अलीकडं पलीकडं लिहिणारे लोक पेपरांतून आणि पुस्तकांतून आणि व्याख्यानातून श्रद्धा, उपासना, कर्मकांडं, विज्ञान, समाजाचं हित या विषयावर लिहीत होते. देवाधर्मावर कोरडे ओढणारे सुधारक होते आणि जरा समजुतीनं घ्या असं सांगणारेही सुधारक होते. बहुदा बंगालमधेही असाच विचार त्या काळात झाला. उत्तर प्रदेश-बिहार इत्यादी ठिकाणी सुधारकांची परंपरा असल्यास नगण्यच होती.
प्लेग आला होता, लोकांना घराबाहेर काढणं आवश्यक होतं, तत्कालीन ब्रिटीश सरकारनं बळजोरी करून, घरात घुसून, लोकांना बाहेर काढलं. आमच्या देवघरात घुसले, देवघर विटाळलं अशी बोंब लोकानी उठवली. त्याआधी १८५७ साली काडतुसांना चरबी लावून आम्हाला धर्माशी द्रोह करायला लावला असं म्हणत सैनिकांनी बंड केल्याची कथा सांगतात. ती कथा खरी असेल तर त्याचा अर्थ लोकाना आपलं राजकीय परावलंबित्व, त्यातून झालेली आर्थिक दुर्दशा दिसली नाही, आपली श्रद्धा दुखावलीय असं त्यांना वाटलं.
म्हणजे किती वर्षं हे चाललंय पहा.
राजसत्ता बदलल्या. स्वातंत्र्योत्तर काळात सत्ताधारी पक्ष बदलले. निधर्मी, सर्वधर्मी, धर्मी अशा नाना धर्मी-अधर्मी सत्ता येऊन गेल्या.
देश आहे तिथंच आहे.
म्हटल्यास बदल झालाय तो सत्ता काबीज करण्यासाठी माणसांच्या श्रद्धांचा उपयोग करून घेण्याबाबतचा. माणसांच्या जगण्याचं वाट्टोळं झालं तरी चालेल, त्यांच्या श्रद्धांचा उपयोग सत्ता काबीज करण्यासाठी करा हे नवं तंत्र राज्यव्यवहारात आलं.
श्रद्धा नावाचं एक केंद्र माणसाच्या मेंदूत आहे. कित्येक हजार वर्षांच्या उत्क्रांतीत ते निर्माण झालंय. त्या बरोबरच जगण्याच्या हिशोबात तर्क, विचार नावाचंही एक केंद्र मेंदूत विकसीत झालं. दोन्ही केंद्रं माणसाच्या मेंदूत आहेत.
तर्क नावाचा प्रदेश कटाप करा, श्रद्धेवर माणसाचा मेंदू चालवा असा प्रयत्न तर कित्येक शतकं,सहस्रकं चाललाय. तो फेल गेलाय. श्रद्धा नावाचं केंद्र कटाप करा आणि फक्त तर्क केंद्र ठेवा असा प्रयत्न झाला. तोही फेल गेल्याचं लक्षात आलंय.
दोन्हींचा एक तोल निर्माण करण्यावाचून गत्यंतर दिसत नाही. त्यासाठी पुढली किती वर्षं जातील ते सांगता येत नाही. पण तो प्रयत्न करण्याची आवश्यकता या कोविडनं आपल्याला सांगितलीय.
।।