प्रतिक हा फक्त देखावा, ती वापरणाऱ्यांचा अंतस्थ हेतू वेगळाच असतो.

प्रतिक हा फक्त देखावा, ती वापरणाऱ्यांचा अंतस्थ हेतू वेगळाच असतो.

एकनाथ शिंदे शिव सेनेतून बाहेर पडले.

काल परवापर्यंत ते शिव सेनेतले नेते-कार्यकर्ते होते. त्यांनी सेनेत विविध पदांवर काम केलं, नंतर ते मंत्रीही झाले.

बाहेर पडल्यावर त्यांचं काय होईल? त्यांची संघटना कोणती असेल? शिव सेना की भारतीय जनता पार्टी?

लवकरच कळेल.

बाहेर पडल्यावर ते कुठल्या तरी पार्टीसाठी, चिन्हावर निवडणुक लढवतील. निवडून आले तर मंत्री होतील.

शिंदे यांचं म्हणणं आहे की ते सेना, बाळ ठाकरे, शिवाजी महाराज आणि हिंदुत्व यांच्याशी प्रामाणीक आहेत, तीच त्यांची प्रतिकं आणि आदर्श आजही असतील. त्यांचं म्हणणं असं पडतय – दुर्दैवानं उद्धव ठाकरे हे वरील प्रतिकांशी निष्ठावान न राहिल्यानं आपल्याला सेना सोडावी लागली. एक निष्ठावान शिव सैनिक या नात्यानं मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळायला हवं होतं, ते उद्धव ठाकरे यांना दिलं गेल्यानं आपल्याला समाजाची सेवा करता आली नाही, ठाकरे यांनी आपल्याला दिलेला आदेश पाळता आला नाही. त्यामुळंच पुन्हा मुख्यमंत्री या नात्यानं सेवा करण्यासाठी, बाळासाहेब ठाकरे यांच्या  आदेशाचंच पालन करण्यासाठी आपल्याला सेना सोडून भाजप किंवा कुठं तरी जावं लागतंय. 

मुख्य मुद्दा प्रतिकं, सिंबल्स. बाळ ठाकरे, शिवाजी महाराज, वाघ, जरीपटका, रुद्राक्षाची माळ. ती प्रतिकं आजही शिंदे मानतात.

तिकडं  फडणवीस किंवा भाजपतले लोकं म्हणतील की सेनेची प्रतिकं, हिंदुत्व, शिवाजी महाराज आणि बाळ ठाकरे ही त्यांचीही दैवतं आहेत. अर्थात त्यांची इतर अनेक असंख्य दैवतं आहेत. ती दैवतं नरेंद्र मोदींपासून वर आणि खाली पसरलेली आहेत. त्याच दैवतातली ही तीन (ठाकरे, शिवाजी महाराज, हिदुत्व.) त्यामुळं एकनाथ शिंदे सेनेत असले काय आणि भाजपत असले काय, फरक पडत नाही. शिंदे आणि भाजप हे अद्वैत आहे असं सांगितलं जाईल, आणि ते खरंही आहे.

येऊन जाऊन चिन्हं आणि प्रतिकं म्हणजे तरी काय ? ती कशासाठी असतात?

एकनाथ शिंदे सेनेतून भाजपत जाण्याआधी एकनाथ खडसे भाजपतून राष्ट्रवादीत गेले. शिंदेंनी जेवढी वर्षं सेनेत काढली त्याहीपेक्षा जास्त वर्ष खडसेनी भाजपत काढली असतील. मोदींच्या वर आणि खाली असलेली अगणित प्रतिकं खडसेंना मान्य होती. आता बहुदा त्या प्रतिकात शरद पवार व त्यांच्या वरखाली असणारी (यशवंतराव, महात्मा गांधी, नेहरू, इत्यादी) प्रतिकं खडसेंच्या प्रतीक यादीत सामिल होतील.

काही दिवस आधी नारायण राणे सेना, काँग्रेस असा प्रवास करून भाजपत सामिल झाले. त्यांची प्रतीक यादी वरील दोघांच्या यादीपेक्षा खूपच मोठी आहे.

सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, संघ हे मोठे खोके आहेत. प्रत्येक खोका हे एक प्रतिक आहे आणि प्रत्येक खोक्यात पुन्हा अनेक प्रतिकं भरलेली आहेत. माणसं हवा तो खोका बगलेत मारतात, त्यात भरलेली प्रतिकं वर खाली करून वापरतात.

प्रत्येक पक्षखोक्यात एकमेकांशी न जुळणारी प्रतिकं भरून ठेवलेली असतात. केव्हां कुठलं प्रतीक वापरावं लागेल ते सांगता येत नाही.

 भाजपच्या खोक्यात  गांधी हे प्रतिक सावरकर, गोळवलकर, गोडसे, मोदी, वाजपेयी, विवेकानंद, शिवाजी इत्यादी प्रतिकांसोबत ठेवलेलं असतं. परदेशी पाहुणे आले की ते प्रतिक फडकं मारून सेना, भाजपचे लोक टेबलावर ठेवतात.परदेशी पाहुणे गेले की पुन्हा ते प्रतीक खोक्यात तळाशी.

काँग्रेसच्या खोक्यात गांधी, नेहरूंच्या सोबत सावरकर असतात, मनोहर भिडे असतात, कागदात गुंडाळलेले मोदीही असतात. पण काँग्रेसी मंडळी हुशार असतात. गांधी या प्रतिकाचे बिल्ले ते शर्टावर लावतात, गाडीच्या बॉनेटवर लावतात, जागोजागी लावून ठेवतात, बाकीची प्रतिकं अगदीच वेळ पाहून दिसतील न दिसतील अशा तऱ्हेनं वापरतात.

येऊन जाऊन ती प्रतीकंच ना? ती मार्केटिंगसाठी असतात. तिचा आणि ती वापरणाऱ्या माणसाच्या वागण्याचा संबंध असतो असं कुणी सांगितलं?

माणसाला समाज सेवा करायची असते. आज घडीला समाजसेवेचे अर्थ जरा बरेपणानं समजू लागलेत. शिंदे, राणे, खडसे (आणि ताज्या दमाचे राज ठाकरेही) इत्यादी हज्जारोंनी असणारी माणसं सभोवताली पसरलेली असल्यानं समाज सेवा अधिक बरेपणानं समजू लागलीय.

राणेंचं उदाहरण घ्या. सेना, काँग्रेस, भाजप हा त्यांच्या समाजसेवेचा प्रवास पहा.तसा अगदी साधा माणूस. शिक्षण, अभ्यास,चिंतन वगैरेंचा कधी संबंध नाही. जगण्याच्या खटाटोपात असलेला माणूस. या खटाटोपात त्यांच्याकडून काही बेकादेशीर गोष्टीही घडल्या. पण जगण्याचा खटाटोप सोडून हा माणूस राजकारणात आला. कशासाठी? तर समाजाच्या कल्याणासाठी. मराठी, भारतीय माणसांची स्थिती बिकट होती. त्यांच्यासाठी कोणी काही करत नव्हतं. त्यामुळ राणेना आपलं जगणं दूर ठेवून समाजसेवेत उतरावं लागलं. बाळ ठाकरे यांनी राणे जसे कसे आहेत तसे स्वीकारले.त्यांना कामाला लावलं. मग राणे आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले.  

हे सर्व घडत असताना पूर आला की हो. पुराबरोबर अमाप संपत्तीही त्यांच्या घरात वाहून आली. बिच्चाऱ्या राणेंचा याच्याशी संबंधच नाही, पूर ही नैसर्गिक घटना. 

संपत्ती म्हटली की ईडी आलंच. नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून ईडीनंही समाजसेवा करायचं ठरवलं. इतकी संपत्ती की तिचा हिशोब राणेंना सांगता येईना. नैसर्गिक पूरच तो. पण ईडीला ते कसं मान्य होणार. पण ईडीनं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सल्ल्यावरून राणेना वाल्याचा वाल्मिकी करायचं ठरवलं. त्यांना भाजपच्या सुधारगृहात पाठवलं.

  आता तिथून त्यांची समाजसेवा चाललीय. क्ष२ येवढी त्यांची संपत्ती आता क्ष३ येवढी होईल. फरक येवढाच की पुढला प्रवास ईडी आणि भाजपच्या मार्गदर्शनानुसार होईल.

हिंदुत्व, शिवाजी महाराज, जरीपटका, बाळ ठाकरे ही प्रतिकं होती  मुख्य मुद्दा समाजसेवेचा आणि समाजसेवा करत असताना वाहून आलेल्या लक्ष्मीचा. आता लक्ष्मी म्हणजे साक्षात देवता.  हिंदू या नात्यानं त्या देवतेची पूजा करणं, त्या देवतेचा मान राखणं हे कर्तव्यच. कोणीही असो, लक्ष्मीची  पूजा मस्ट आहे.

तर असा हा प्रतिकांचा मामला. पुतळे असतात. फोटोफ्रेम असतात. मुंबईत कित्येक जुगारांच्या अड्ड्यांत, दारुबारमधे, वेश्यांच्या घरांमधे, कॉर्पोरेट ऑफिसांत, इतकंच नव्हे तर मंत्र्यांच्या घरातही देवदेवता, ऐतिहासिक पुरुष यांच्या फ्रेम भिंतीवर रांगेने लावलेल्या असतात.

प्रतिकं ही प्रतिकं असतात. तेवढ्यापुरतीच असतात. सोयीपुरती असतात. असं म्हणा की ती टाईमपास असतात. ती प्रतिकं बाळगणारे, त्या प्रतिकांचा हगल्या पादल्या सतत उल्लेख माणसं करतात खरी. पण ते तेवढ्यापुरतंच असतं.

मुख्य म्हणजे ते आपल्यासारख्या समाजसेवा न करणाऱ्या, समाजाचा भाग असलेल्या माणसांना चांगलंच लक्षात आलेलं असतं.

म्हणूनच तर आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती इत्यादींकडं आपण जातो; त्यावेळी त्यांच्या भिंती टेबलांवरची प्रतिकं काय आहेत याकडं आपण लक्ष देत नाही.  आपण येवढंच सांगतो की महोदय आम्ही संकटात आहोत आम्हाला मदत करा. आडवाटेनं मदत करा. हे घ्या पैसे ( प्रतिकांच्या पूजेसाठी आहेत असं हवं तर सोयीसाठी म्हणा).  हे घ्या मत. काहीही करा आम्हाला संकटातून वाचवा.

सेना, बाळ ठाकरे. भाजप, नरेंद्र मोदी. काँग्रेस सोनिया गांधी. राष्ट्रवादी शरद पवार. इतिहासातले क्ष गुणिले क्ष गुणिले य इतके महापुरुष. कोटी कोटी देव. कोटी कोटी प्रतिकं.

चालू द्या.

।।

Comments are closed.