फादर.
‘ फादर ‘ या चित्रपटाला हा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि अभिनयासाठी नामांकनं मिळाली आहेत. अँथनी हॉपकिन्स यांची फादरमधे प्रमुख भूमिका आहे.
।।
स्मृती गमावत चाललेल्या वृद्ध माणसाची गोष्ट ‘ फादर ‘ मधे आहे.
इंजिनियर असलेल्या अँथनीला कधी वाटतं की आपण नृत्यकलाकार होतो तर कधी वाटतं की आपण सर्कसमधे काम करत होतो. आपण नाचणारे कलाकार होतो हे दाखवण्यासाठी फादर अँथनी चक्क टॅप नृत्यही करून दाखवतो.
पत्नी आणि एक मुलगी गेली आहे. शिल्लक असलेली, मुलगी,अँन, बापाची काळजी घेतेय. बाप दिवसेंदिवस अवघड होत चाललाय, काळजी घेण्यासाठी ठेवलेल्या मुलींशीही तो भांडतो.
मुलीनं नवं लग्न करून पॅरिसमधे स्थायिक व्हायचं ठरवल्यानं लंडनमधे रहाणाऱ्या बापाला ती आता वृद्धाश्रमात पाठवतेय. आपण घरी आहोत की वृद्धाश्रमात हेही कळत नाही अशा अवस्थेत असंबंद्ध आठवणी उफाळून येणारा बाप अँथनी हॉपकिन्सनी या सिनेमात रंगवलाय.
डिमेंशिया, अलझायमर या रोगांनी ग्रासलेली माणसं आणि त्यांचे नातेवाईक ही गोष्ट अलीकडं वाढत चाललीय. कदाचित ती पूर्वीही असेल पण आरोग्य जाणीवा, आरोग्य साक्षरता नसल्यानं तिकडं लोकांचं लक्ष गेलं नव्हतं. आता वैज्ञानिक साक्षरता आणि माहिती फोफावल्यानं माणसं फार फार फार चर्चा करतात. परंतू घनगंभीर चर्चा, त्यावरचं चिंतन, उपाय अशा लेक्चरबाजीचा सिनेमा न करता, एका लघुकथेच्या रुपात हा सिनेमा आपल्यासमोर येतो.
अँथनी या आजोबाचे गोंधळ होत असतात. तो मुलीलाही ओळखत नाही. अनेक माणसं आपल्याला पडद्यावर दिसतात पण अँथनी आजोबाला ती वेगळीच दिसतात. पडद्यावर असलेलं घर आपण पहातो पण आजोबाला वेगळंच घर दिसतं. जाम गोंधळ. कधी कधी गोंधळ त्या आजोबाचा आहे की आपला आहे तेच कळेनासं होतं. आजोबा म्हणतो की माझ्या मुलीच्याच आठवणीचा घोटाळा आहे. हे वाक्य ऐकत असताना आपल्याला शंका येते की आपल्याच आठवणीचा काही तरी घोटाळा आहे.
एका दृश्यात मुलगी अँन बापाचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न करताना दिसते. म्हणजे आपण ते पहातो. प्रत्यक्षात दुसऱ्या दृश्यात असं दिसतं की तसं काहीही घडलेलं नाहीये.
म्हणजे बापाला मारण्याचा प्रसंग अँथनीच्या मनातला की अँनच्या मनातला की दिक्दर्शकाच्या मनातला की खरोखरच तसं घडूनही गेलंय. काSSSही कळत नाही.
दिक्दर्शकानं आठवणींचा घोळ, विभ्रमांचा घोळ फार उत्तम हाताळलाय. या घोळातूनच आपल्याला संदेश मिळतो, परिस्थितीचं गांभिर्य कळतं. संगीत वाजवून, कायिक वाचिक अभिनयाच्या आयडिया लढवून तो संदेश प्रेक्षकांपर्यंत पोचवायची खटपट दिक्दर्शक करत नाही.
कोणतीही गोष्ट, चित्रपट,कादंबरी, कविता वगैरे गोष्ट अशी हवी जी वाचकाला धरून ठेवेल, हलू देणार नाही. थरार, सेक्स, गुन्हा, चमत्कार, दृश्यांची गती, आकर्षक ध्वनी, इत्यादी भावना चेतवणाऱ्या गोष्टी लेखक-दिक्दर्शक बरेच वेळा वापरतात. पण यातलं काहीही न करता घटनांची रचना संथपणे करायची आणि ती रचना अभिनयानं पेलायची हे कसब काही औरच. प्रेक्षक-वाचक पडद्याला चिकटून रहाणारच. ते या सिनेमात घडतं.
दीडेक तास आजोबा आपल्याला जाम हिंदकळवतो आणि शेवटच्या दृश्यात आपल्या पत्नीच्या आठवणीनं हमसून रडतो. अँथनी हॉपकिन्स आउटस्टँडिंग आहे.
या सिनेमाची गुंडाळीही फार मजेशीर आहे.
मुळात हे होतं एक फ्रेंच नाटक. फ्लोरियन झेल्लरचं. फ्रँक लँगेला या नटानं त्यात आजोबाची भूमिका केली होती, त्या बद्दल लँगेलाना बक्षिसं मिळाली होती. लँगेला आणि हॉपकिन्स, एकच भूमिका दोघांनी केल्या. गंमत म्हणजे १९९८ मधे हॉपकिन्सनी प्रे. निक्सन यांची भूमिका त्याच नावाच्या फिल्ममधे केली होती आणि २००८ साली निक्सन यांची भूमिका लँगेला यांनी फ्रॉस्ट निक्सन या चित्रपटात केली होती आणि त्या भूमिकेसाठी त्यांना ऑस्कर नामांकनं मिळालं होतं.
झेल्लरनी या कथानकाचा सिनेमा करायचं ठरवलं. त्या क्षणीच म्हणजे २०१७ च्या सुरवातीला झेल्लरच्या डोळ्यासमोर अँथनी हॉपकिन्स यांनीच हे काम करावं असं होतं. पक्कं. त्यासाठी त्यांनी आजोबाचं सिनेमातलं नावही अँथनी असं ठेवलं आणि सिनेमातल्या अँथनीची जन्म तारीखही अँथनी हॉपकिन्स यांची ३१ डिसेंबर १९३७ ही जन्मतारीख ठरवून टाकली.
हॉपकिन्सच भूमिका करतील आणि ते करणार नसतील तर सिनेमाच करायचा नाही असं झेल्लरनी ठरवलं होतं.
काय गंमत आहे पहा. २०१७ मधे हॉपकिन्सना गाठायचा प्रयत्न झेल्लर करत होते, त्यांना पटकथा वाचायला पाठवण्यात आली होती. त्याच वेळी भारतात नसीरुद्दीन शहा यांनी मूळ फ्रेंच नाटकाचं इंग्रजी भाषांतर वाचलं होतं आणि त्याचे प्रयोग भारतात करायचं ठरवलं.
डिसेंबर २०१७ मधे नसीरुद्दीन शहांनी ते नाटक घडवलं, मुंबईत पृथ्वीमधे त्याचे प्रयोग झाले. अप्रतीम. चित्रपटात कॅमेरा असल्यानं घटनास्थळं बदलता येतात, पात्रं ओळखण्यात होणारा गोंधळ सहज हाताळता येतो. मंचावर ते शक्य नसतं. पण मंचाची आखणी आणि अभिनय याची कमाल नसीरुद्दीन शहा यांनी करून दाखवली.
अँथनी हॉपकिन्स आणि नसीरुद्दीन हे दोन्ही प्रयोग शेजारी शेजारी ठेवून पाहिले तर आपली मती गुंग होऊन जाईल.कोण हॉपकिन्स, कोण शहा असा गोंधळ होईल. म्हणजे हा आणखीन नवा विभ्रम. ‘ फादर ‘ मधला आजोबा लंडनमधला आहे, नसीरुद्दीनच्या त्याच नावाच्या नाटकातला आजोबा आपल्यातला वाटतो असं नाटक पहाताना वाटतं.
‘ फादर ‘ हा सिनेमा ऑस्करच्या रांगेत उत्तम सिनेमा आणि उत्तम अभिनेता बक्षिसांसाठी उभा आहे. अँथनी हॉपकिन्सनी १९९२ साली उत्तम अभिनेत्याचं ऑस्कर दी सायलेन्स ऑफ दी लँब्जसाठी पटकावलं होतं. त्यानंतर चार वेळा त्यांना अभिनयासाठी ऑस्कर नामांकनं मिळाली आहेत.आता वयाच्या ८३ व्या वर्षी ते पुन्हा ऑस्कर मिळवू पहात आहेत.
गेल्याच वर्षी टू पोप्स या सिनेमात त्यांना सहाय्यक अभिनेता या वर्गातलं नामांकन मिळालं होतं. त्या चित्रपटात पोप बेनिडिक्टची भूमिका हॉपकिन्सनी केली होती आणि पोप फ्रान्सिसची भूमिका जोनाथन प्राईसनी केली होती. प्राईसना मुख्य अभिनेता आणि हॉपकिन्सना सहाय्यक अभिनेता अशी नामांकनं होती. चित्रपटामधे दोन पोपांची अभिनयाची जुगलबंदी इतकी जबरदस्त होती की त्यातला प्रमुख पात्रं कोणतं आणि सहाय्यक कुठलं हेच ठरवणं कठीण होतं. पोप फ्रान्सीस अधिक काळ पडद्यावर दिसत असले तरीही पोप बेनेडिक्ट त्यांना मिळालेल्या वेळात इतके भारी होते की वेळाची मोजपट्टीच प्रेक्षक विसरत होता.
हॉपकिन्स हे नाट्यकर्मी आहेत. त्यांनी कित्येक वर्षं शेक्सपियर केला आहे. चित्रपटातल्या भूमिकेसाठीही ते वेड्यासारखी मेहनत घेतात. नाटकात नटाचं पाठांतर हा महत्वाचा मुद्दा असतो. चित्रपटात मोजकीच वाक्यं बोलायची असल्यानं पाठांतराचा प्रश्न येत नाही. पाठांतराचे स्वतंत्र फायदे असतात. पाठांतरामुळं नट नाटकात अधिक गुंततो, भूमिकेशी एकरूप होतो. स्पिलबर्गच्या सिनेमात एका भूमिकेमधे एक साताठ पानाचं भाषण होतं. हॉपकिन्सनी ते तोंडपाठ केलं होतं. स्पीलबर्ग चकीत झाला होता. इतका भारावला होता की हॉपकिन्सना अमेरिकन पद्धतीनं टोनी या नावानं संबोधायला तो तयार नव्हता, तो सर हॉपकिन्स अशी हाक मारून दृश्याच्या सूचना देत असे.
अर्थात दीर्घ स्क्रिप्टचं पाठांतर न करता चित्रपट पद्धतीनं हाताळणारे नट कमी प्रतीचे असतात असंही मानायचं कारण नाही. कारण ते एक वेगळं कसब आहे. नसीरुद्दीन शहा आणि हॉपकिन्स या दोघांचाही विशेष असा की ते दोन्ही कसबं लीलया हाताळतात.
हॉपकिन्सची कारकीर्द खूपच मोठी आहे. त्यांना दुसऱ्यांदा अभिनयाचं बक्षीस मिळतंय का ते पहायचं.
।।