बायडननी माघार कां घेतली?

बायडननी माघार कां घेतली?

प्रेसिडेंट जो बायडन प्रेसिडेंट पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. २१ जुलैच्या २०२४ च्या दुपारी त्यांनी रिंगणातून बाहेर पडल्याची घोषणा केली. पहिली टर्म संपल्यानंतर दुसऱ्या टर्मसाठी ते निवडणुक लढवत होते.

 सत्ताधारी आपणहून सत्ता सोडतो असं सहसा होत नसतं.कारण खूप मेहनत करून तो सत्तेत पोचलेला असतो. सत्ता हे एक व्यसन असल्यानं सत्ता सोडणं आणखीनच कठीण असतं. मंडेलांनी आपणहून सत्ता सोडली होती. झेकोस्लोवाकियाचे अध्यक्ष वास्लाव हावेलनी ‘पुरे झालं’ म्हणून सत्ता सोडली होती.अँजेला मर्केल चॅन्सेलरपदी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना आणि सत्तेत घट्ट रुतल्या असतांनाही त्यांनी निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्या राजकारणातून बाहेर पडल्या. अमेरिकेचे पहिले प्रेसिडेंट जॉर्ज वॉशिंग्टन दोन टर्म प्रेसिडेंट होते, तिसऱ्या वेळी निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. (त्या वेळी अध्यक्षांना फक्त दोनच टर्म पदावर रहाता येतं हा नियम नव्हता). वॉशिंग्टन, मंडेला, हावेल, मर्केल, यांचं कौतुक झालं.

बायडन यांची केस वेगळी आहे. सत्तेचा लोभ नाही नाही म्हणून त्यांनी सत्ता सोडलेली नाही.   आदल्या दिवसापर्यंत ते ठणकावून सांगत होते की आपण कुठंही जाणार नाही, निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच.  

२७ जून २०२४ रोजी टीव्हीवरच्या ट्रंप यांच्यासोबत झालेल्या जाहीर चर्चा कार्यक्रमात बायडन अडखळले. काही सेकंद ते शब्दांचा शोध घेत होते. 

अमेरिकेत आणि जगभर चर्चा उसळली. बायडन यांचा मेंदू ठीक काम करत नाहीये. तो काहीसा मंद झालाय. बायडनच्या बाजूचे लोक म्हणाले की असं कधी कधी होत असतं, तणावाखाली काम करत असताना अगदी तरूण माणसंही अडखळू शकतात.

खरं म्हणजे निवडणुक मोहिम सुरु झाली त्या आधीपासूनच बायडन संथावले आहेत हे त्यांच्या जवळच्या लोकांच्या लक्षात आलं होतं. बायडननी हुशारीनं उत्स्फूर्त बोलणं कमी केलं, टेलेप्रॉम्पटरचा वापर ते जास्त करू लागले. त्यांनी पत्रकार परिषदाही कमी केल्या, पत्रकारांशी थेट बोलणंही कमी केलं. या गोष्टी बायडन यांच्या टीमनं लोकांपासून लपवून ठेवल्या होत्या.

  १९८७ च्या प्रेसिडेंटपदाच्या निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्यांना एका व्याधीनं त्रास दिला होता. त्यांच्या मेंदूत रक्तवाहिन्यांवर फोड झाला होता. प्रकरण इतकं गंभीर झालं होतं की ते आता जिवंत रहाणार नाहीत असं वाटल्यावरून ख्रिस्ती परंपरेनुसार शेवटलं कन्फेशन घेण्यासाठी प्रीस्टालाही बोलावण्यात आलं होतं. बायडन वाचले. नंतर पुन्हा एकदा तो त्रास त्यांना झाला होता. पण औषधोपचारानंतर तो त्रास पुन्हा उद्भवला नाही.

आणखी मागं जायचं झालं तर बालपणात बायडन काहीसे तोतरे होते. नंतर तोतरेपणं गेलं, किंवा त्यांनी प्रयत्नपूर्वक घालवलं असावं. तोतरेपणाचा संबंध मेंदूत काही भागनड आहे असा होत नाही. त्यामुळं २०२४ सालच्या चर्चेमधे ते अडखळले याचा अर्थ त्यांचा तोतरेपणा कदाचित पुन्हा उद्भवला असावा.

काय असेल ते असो पण २० जुलैच्या संध्याकाळपर्यंत पूर्ण निर्धारानं बायडन निवडणुकीच्या मैदानात होते. खोकला फार त्रास देऊ लागला म्हणून बायडन यांनी तपासणी केली तेव्हां १५ जुलैला कळलं की त्यांना कोविडची लागण झालीय. १७ जुलैला ते डेलावेअरमधल्या आपल्या गावी विश्रांतीसाठी रवाना झाले. चारेक दिवस विश्रांती झाल्यावर त्यांचा प्रचार दौरा सुरु होणार होता. लिंडन जॉन्सन यांच्या गावी जाऊन ते भाषण करणार होते. काय गंमत पहा. लिंडन जॉन्सन यांची प्रकृती साथ देईनाशी झाल्यावर त्यांनी १९६८ साली प्रेसिडेंटपदाच्या दुसऱ्या टर्मच्या निवडणुकीतून माघार घेतली होती.

डेलावेअरमधे दररोज त्यांना वाहिन्यांचे फोन येत असत. तुम्ही काय करणार असा प्रश्न त्यांना विचारला जाई. कारण बायडन यांनी माघार घ्यावी असा दबाव त्यांच्याच पक्षातून येत होता. बराक ओबामा थेट माघार घ्या असं म्हणाले नाहीत पण तसा विचार करायला हरकत नाही असं गुळमुळीत बोलले होते. नॅन्सी पेलोसी या बायडन यांच्या खंद्या समर्थक पण त्यांचा पाठिंबाही डळमळीत झाला होता. पक्षामधे एक कुजबूज मोहिम चालली होती पण उघडपणे कोणी बोलायला धजावत नव्हतं.

डेलावेअरमधे होते तेव्हा ३८ खासदारांनी जाहीरपणे बायडन यांनी माघार घ्यावी असं म्हटलं होतं. राजकारण म्हटलं की नाना प्रकारचे ताण असतातच. ओबामांनी जरी बायडन यांना व्हाईस प्रेसिडेंट म्हणून घेतलं असलं तरी प्रेसिडेंटपदासाठी त्याना पूर्वी बायडन हे योग्य उमेदवार वाटले नव्हते. त्यांच्या ऐवजी हिलरी क्लिंटन यांना ओबामा यांनी पाठिंबा दिला होता. तेव्हां आपल्याला माघार घ्या म्हणणारे तसे फारसे आपल्या बाजूचे नव्हतेच असा विचार बायडन यांच्या टीमनं केला आणि तिकडं दुर्लक्ष केलं. २६८ काँग्रेस सदस्यातले  फक्त ३८च तर विरोधात आहेत. बाकीचे पाठिंबा देत आहेत. बर्नी सँडर्स, क्लिंटन इत्यादी लोक पाठिंबा देत आहेत. म्हणजे आपली उमेदवारी योग्य आहे असं बायडन आणि त्यांची टीम मानत राहिली. 

आपणच निवडलेल्या माणसाला कसा विरोध करायचा असं वाटल्यानं पक्षातले लोक गप्प बसणं समजण्यासारखं आहे. पण बाहेरच्या लोकांनी कां गप्प बसावं? गेले सहा एक महिने लोक म्हणत होते की अमेरिकेत म्हातारशाही सुरु झालीय, दोन म्हातारे सत्तेसाठी भांडत आहेत. ट्रंपपेक्षा चारच वर्षांनी बायडन जास्त म्हातारे. न्यू यॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट या डेमॉक्रॅटिक पक्षाकडं कल असणाऱ्या, ट्रंप विरोधी पेपरांनीही जवळ जवळ मोहिमच उघडली की बायडन यांनी माघार घ्यावी.

ट्रंप बायडनना फाडून खाणार, हरवणार असं सर्वांचं मत झालं होतं. जर ट्रंप यांचा पराभव व्हावा असं वाटत असेल तर बायडन यांनी माघार घ्यावी असं या मोहिमेचं मत होतं. बायडन यांची कारकीर्द ठीक होती, त्यांनी घेतलेले काही निर्णय चांगलेही होते पण सध्याचं जनमत बायडन यांच्या बाजूनं नाही, अँटी इनकंबंसी आहे असं अनेक पहाण्या सांगत होत्या.

बायडन आणि त्यांचे पाठिराखे ठाम होते.

कारण बायडन हा लढवय्या माणूस होता. घोर संकटांवर मात करत, प्रचंड अडथळे पार करत त्यांची ५० वर्षांची करियर उभी राहिली होती. १९७२ साली ते प्रथम सिनेटवर निवडून गेले, तेव्हा निक्सन लाट होती, अभूतपूर्व मताधिक्यानं निक्सन निवडून आले होते. त्या लाटेतही बायडन निवडून आले होते. 

१९७२ साली बायडन यांच्या कारला अपघात झाला. अपघातात त्यांची पत्नी आणि एक वर्षाची मुलगी मरण पावली. या जबरदस्त आघातानं कोणीही माणूस कोसळला असता. पण बायडन उभे राहिले. राजकीय जीवन हाच त्यांचा विरंगुळा झाला असावा. नंतर त्यांच्या मुलाला तरूणपणीच कॅन्सर झाला, त्यात तो गेला.  हंटर हा त्यांचा मुलगा व्यसनी झाला. बायडन व्हाईस प्रेसिडेंट असताना त्यांच्या घराच्या आसपासही हंटर ड्रग गोळा करत असे. हंटरनं सत्तेचा गैरवापर केला असा आरोप झाला.

बायडन डगमगमले नाहीत. सतत सेनेटवर निवडुन येत राहिले. दोन वेळा प्रेसिडेंट पदाची निवडणूक लढवली. यथावकाश व्हाईस प्रेसिडेंट झाले.  

पन्नास वर्षं बायडन सेनेटमधे आहेत. कित्येक प्रेसिडेंटांसोबत त्यांनी काम केलं. जुळवून घेण्याची क्षमता असल्यानं रिपब्लिकन पक्षातही त्यांचे मित्र असतात. प्रेसिडेंटपदाच्या काळात त्यांनी अनेक विधेयकांना, कायद्याना विरोधी रिपब्लिकनांचा पाठिंबा मिळवला.

असा हा लढणारा माणूस माघार घेणार नाही, सध्याच्या संकटावर मात करेल अशी त्यांच्या सहकाऱ्यांची अपेक्षा होती, खुद्द बायडन यांनाही पक्का आत्मविश्वास होता.

कोविड झाल्यानं बायडन सोशल डिस्टन्सिंग पाळूनच प्रचार मोहिमेची कामं करत होते. शुक्रवारी दुपारपर्यंत त्यांनी सहकाऱ्यांबरोबर चर्चा केल्या, कामं मार्गाला लावली. पेपरवाले आणि चॅनेलवाले विचारत की काय निर्णय झालाय, बायडन म्हणत मी ठाम आहे.

शनिवारी सकाळी बातम्या पोचल्या की आणखी काही काँग्रेस सदस्य बायडनला राजिनामा द्यायला सांगत आहेत. बायडन कातावले होते.   ते सोशल डिस्टन्सिंगमधे असल्यानं त्यांचा मूड कोणाला कळत नव्हता.बायडन काय विचार करत होते याची कल्पना कोणालाच नव्हती.बहुदा ते पत्नीशी बोलत असावेत.

शनिवारी दुपारी बायडननी आपले अगदी जवळचे सल्लागार Steve Ricchetti यांना फोन केला. ‘तू आणि Mike Donilon असे दोघेही मला हवे आहात, लगोलग घरी पोचा.’ माईक डोनिलॉन हे बायडन यांचे अगदी जवळचे सहकारी, बायडन यांची भाषणं ते लिहायचे. भाषणं लिहून काढणारा माणूस प्रेसिडेंशी एकरूप झालेला असतो. प्रेसिडेंटनं एका वाक्यात सांगायचं की मला अमूक एका प्रसंगी भाषण करायचं आहे की लेखक भाषण तयार करतो कारण त्याला प्रेसिडेंट चांगलाच समजलेला असतो. एकाद दुसरा किरकोळ बदल सोडला तर ती भाषणं प्रेसिडेंट तशीच वाचतात.

दोघं डेलावेरमधे पोचले. त्याना कल्पना आली असणार.

तिघं जण एका खोलीत जाऊन बसले. रात्री उशीरापर्यंत ते एकत्र होते. तिघांनी मिळून एक दीर्घ पत्र पक्कं केलं. त्यात बायडननी आपली माघारी जाहीर केली होती. पण या तिघांपलिकडं कोणालाही या निर्णयाची कल्पना नव्हती.

आपला निर्णय पत्रकार परिषदेत किंवा वाहिन्यांवर जाहीर करायचा नाही असं बायडननी ठरवलं होतं. पत्रकार परिषदेत बोलतांना शब्द इकडचे तिकडे होतात, आयत्या वेळी काही तरी वेगळंच बोललं जातं. लिहून काढणं उत्तम. असा विचार बायडननी केला.

दुपारी दीड वाजता बायडननी आपलं पत्र माध्यमांकडं पाठवलं.  लगोलग त्यांनी कमला हॅरिसना फोन करून निर्णय सांगितला आणि त्यांना आपला पाठिंबा आहे असं जाहीर केलं. व्हाईट हाऊसमधल्या कर्मचाऱ्यांना त्यानी बोलावून घेतलं. झूम बैठक बोलावली. मंत्रीमंडळातले सहकारी आणि काँग्रेस सदस्यांशी ते बैठकीत बोलले.

२१ जुलै २०२४ च्या दुपारी दोन वाजता बायडन निवडणुकीच्या मैदानाबाहेर झाले.

।।

Comments are closed.