ब्रीटनमधे दंगल कां झाली

ब्रीटनमधे दंगल कां झाली

ब्रीटनमधे जातीयवादी माणसं दंगली करतात. मतं मिळावी यासाठी राजकीय पक्ष जातीयवादाला चिथावणी देतात. पण जातीयावाद्द्यांना विरोध करणाऱ्या नागरिकांची संख्या जातीयवादींपेक्षा जास्त आहे. जातीयवादी अल्पसंख्य आहेत.

नागरिकांचे दैनंदिन जगण्याचे प्रश्न बिकट होतात तेव्हां जातीयवादी-अतिरेकी पक्ष लोकांच्या मनातील द्वेष/असंतोष जोजवतात.

दैनंदिन, आर्थिक प्रश्न सुटेनासे होतात तेव्हां द्वेष फोफावतो.

।।।।।। 

२९ जुलै २०२४.

उत्तर इंग्लंडमधल्या साऊथपोर्ट गावात एका नृत्याच्या क्लासमधे एक तरूण घुसला. त्यानं तिथं शिकत असलेल्या ६ ते १२ वर्षाच्या मुलींना भोसकलं. मुलीना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांवरही त्या तरणानं वार केले. या घटनेत तीन मुलींचा मृत्यू झाला,

सोशल मिडियाच्या जमान्यात बातमी वाचण्यासाठी दुसऱ्या दिवसाच्या पेपरची वाट पहावी लागत नाही. किंवा टीव्हीच्याही बातम्या पहाव्या लागत नाहीत. सोशल मिडिया जय्यत तयार असतं.

एक्स (ट्विटर), व्हॉट्सअप आणि टेलेग्रामवरून बातम्या पसरल्या. घटना घडून काही तास व्हायच्या आत काही कोटी मेसेज पसरले.

मेसेज सांगत होते की एका मुसलमान तरूणानं ब्रिटीश मुलींचे खून केले आहेत. त्या मुलाचं नावही अली असं सांगण्यात आलं. तरूण इंग्लंडमधे बेकायदा आला होता असं सांगण्यात आलं.

हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली होती. जोवर खटला भरला जात नाही तोवर आरोपीचं नाव इत्यादी तपशील प्रसिद्ध करायला पोलिसांना परवानगी नसते. सोशल मिडियावर आग भडकू लागल्यानं पोलिसांना संकेत झुगारून हल्लेखोराचं नाव प्रसिद्ध करावं लागलं.

हल्लेखोराचं नाव होतं ॲलेक्स. तो जन्मानं ब्रिटीशच होता. त्याचे आईवडील मूळचे रवांडाचे होते. तो ख्रिस्ती असावा कारण रवांडात ख्रिस्ती माणसं खूप असतात.

पोलिसांचा खुलासा वाचण्यात रस नसलेली खूप मंडळी ब्रीटनमधे आहेत. त्यांनी सोशल मिडियात मेसेज टाकले. ‘हे ब्रीटनवरचं आक्रमण आहे. मुसलमानांना ब्रीटनमधे घुसून ब्रीटन ताब्यात घ्यायचं आहे, मुसलमानांची संख्या वाढवायची आहे. आपल्याला आपला देश परत मिळवायचा आहे. ब्रीटनवरचं आक्रमण थांबवलं पाहिजे.’

यॅक्सले-लेनन नावाच्या एका माणसाची इंग्लीश डिफेन्स लीग नावाची एक संघटना आहे. तो माणूस टॉमी रॉबिन्सन या टोपण नावानं ही संघटना राबवतो. त्याच्यावर यापूर्वीचे खटले आहेत. इस्लाम द्वेष हे त्याच्या संघटनेचं मुख्य वैशिष्ट्य आहे. हा अमेरिकेत जाऊन येऊन असतो, तो ट्रंप यांचा उघड पाठीराखा आहे. मीडियात परलेल्या संदेशात त्याचा वाटा मोठा होता. 

दुसऱ्या दिवशी ब्रीटनमधे मुस्लीमांची लक्षणीय संख्या असणाऱ्या शहरांत हिंसाचार झाला. मशिदींवर हल्ले झाले. काही ठिकाणी मुसलमान माणसं हिंसाचाराचे बळी ठरली.

सरकारनं पत्रक काढून जाहीर केलं की दंगेखोर आणि वंशवादी (रेसिस्ट) लोकांची गय केली जाणार नाही. त्यांना शिक्षा केली जाईल. प्रसंगी कोर्टं चोविस तासही काम करतील. ब्रिटीश तुरुंग भरलेले आहेत, तिथं जागा नाहीये ही वस्तुस्थिती आहे, तरीही दंगेखोरांना तुरुंगात ठेवण्यासाठी तुरूंगाची क्षमता वाढवली जाईल. 

दंग्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिस आणि दंगोखोर यांच्यात झटापटी झाल्या, पोलिस स्टेशनांवर दंगेखोरांनी हल्ले केले.

सोशल मिडियातून निदर्शनं, मोर्चे यांचा कार्यक्रम जाहीर झाला. अमूक शहरं, तमूक चौक, ढमूक इमारती इत्यादी ठिकाणं ठरली. त्या ठिकाणी गोळा होण्याचं आवाहन करण्यात आलं.

 सरकारनं सोशल मिडियाला आवाहन केलं की त्यांनी खोट्या आणि चिथावणी देणाऱ्या बातम्या पसरवू नयेत. ब्रिटीश सरकारचं मिडिया धोरण आणि कायदा पुरेसा स्पष्ट नसल्यानं सरकार कारवाई करू शकलं नाही. सोशल मिडियातला प्रचार सुरुच राहिला. सरकारच्या आवाहनाला सोशल मिडियानं दाद दिली नाही. विशेषतः ईलॉन मस्क यांचं एक्स हे मिडिया खोडसाळ बातम्या देतच राहिलं,

अनेक ठिकाणी आंदोलक गोळा झाले. आमचा देश आम्हाला हवा आहे, स्थलांतरितांना घालवून द्या असे फलक घेऊन आंदोलक हजर झाले. पोलिसांना भीती होती की आंदोलन तीव्र आणि हिंसक होईल. तसं झालं नाही. पोलिसांच्या तयारीपेक्षाही कमी आंदोलक गोळा झाले. कुठं शेदीडशे तर कुठं एकाद दोन हजार. सोशल मिडियातलं आवाहन हज्जारो, लाखो आंदोलकांसाठी होतं.

आश्चर्य म्हणजे वंशवादी आंदोलनाला विरोध करणारे प्रती आंदोलक अचानक जागोजागी प्रकट झाले.  प्रती आंदोलकांची संख्या आंदोलकांपेक्षा किती तरी जास्त होती. जातीयवाद आम्हाला नको आहे असं म्हणणारे फलक त्यांच्या हातात होते. मुस्लीमद्वेष्टे मंडळींनी पोलिसांशी झटापट केली. पण जातीयवाद विरोधी लोक शांत होते, त्यांना प्रतीकार केला नाही.

।।

हिंसक आंदोलन करणारे लोक   स्थलांतरीतांच्या विरोधातले होते. विशेषतः मुस्लीम आणि काळे स्थलांतरीत. स्थलांतरीत गर्दी करतात, ते ब्रीटनमधल्या सार्वजनिक व्यवस्थेवरचा आणि अर्थव्यवस्थेवरचा बोजा आहेत, त्यांच्यामुळं ब्रिटीश अर्थव्यवस्था बिघडते असा आरोप स्थलांतरीत विरोधक करतात.

२०२३ मधे ब्रीटनमधे १२ लाख माणसं बाहेरून आली, ५.३२ लाख माणसं बाहेर गेली, बाहेरचे ६.८५ लाख स्थलांतरीत ब्रीटनमधे स्थिरावले. स्थलांतरीतांमधे रीतसर कायदेशीर रीत्या ब्रीटनमधे आलेले लोक आहेत आणि बेकायदेशीररीत्या आलेले स्थलांतरीतही आहेत.

लोकांचा राग दिसतो तो बेकायदेशीर स्थलांतरीतांवर. ते इंग्लीश खाडी होडक्यांतून पार करून येतात.ते गरीब असतात, त्यांच्या त्यांच्या देशात त्यांना जगणं अशक्य झाल्यानं ते निर्वासित होऊन ब्रीटनमधे येतात.

२०२४ सालात १२ हजार बेकायदेशीर निर्वासित ब्रीटनमधे आले. आधीच्या वर्षातले मिळून ३६ हजार बेकायदेशीर निर्वासित ब्रीटनमधे आहेत, त्यांची सोय कशी करायची त्याचा निर्णय ब्रिटीश सरकारला करता येत नाहीये. त्यांना छावण्या, हॉटेलात उतरवण्यात आलंय. त्यांच्या त्यांच्या देशात परत पाठवणं किंवा रवांडा या देशात त्यांना अस्थायी रुपात पाठवणं या पर्यायांचा विचार ब्रिटीश सरकार करतंय. या लोकांवर दररोज १ कोटी डॉलर खर्च होतात.

।।

निर्वासीत गरीब असतात, असहाय्य असतात. माणुसकी असेल आणि क्षमता असेल तर देशांनी त्यांना सामावून घेणं अपेक्षीत आहे. निर्वासितांचं ओझं ब्रीटनवर खरोखर कितपत आहे, ते सहन करण्या इतपत आहे की नाही याचा विचार ब्रिटीश जनतेनं करायचा आहे.

परंतू निर्वासितांना विरोध करणारी मंडळी बाहेरून येणाऱ्यांचा, विशेषतः काळ्यांचा आणि मुसलमानांचा द्वेष करतात. कंझर्वेटिव, ब्रिटीश नॅशनलिस्ट पार्टी, रिफॉर्म पार्टी हे पक्ष अशा द्वेषाचा बाऊ करून निवडणुकीत मतं मिळवतात.

दंगल हा भाग बेकायदेशीरच. ती कोणीही कोणत्याही कारणानं केली तरी ते अयोग्य. तरीही लोकमत आणि लोकांमधला असंतोष ही गोष्ट समजून घ्यायला हवी.

हिंसा न करणारे पण सरकारच्या एकूण धोरणाबद्दल नाराजी असणारे लोक असतात. आपला राग ते मतदानातून व्यक्त करतात. एक तर मतदानाला जातच नाहीत, गेले तर विरोधी पक्षांना मतदान करतात. ब्रिटीश नॅशनलिस्ट पार्टीला मतदान करणारे सर्वच लोक मुस्लीमद्वेष्टे असतील असं नाही. लेबर किंवा कंझर्वेटिव पक्षाच्या सरकारवरची नाराजी व्यक्त करण्यासाठी काही लोक नॅशनलिस्ट सारख्या जातीय पक्षाला मतदान करत असतात.

आज ब्रीटनमधली आरोग्य व्यवस्था कोसळली आहे. डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळायला कित्येक महिने थांबावं लागतं. ब्रीटमधली सार्वजनिक बस व्यवस्था कोसळते आहे, अनेक मार्गांवरच्या बसेस रद्द झाल्या आहेत. एक तृतियांश ग्रंथालयं बंद पडली आहेत, शाळा बंद पडत आहेत. लोकांना या गोष्टींची चिंता आहे, राग आहे.  सरकारला अर्थव्यवस्था हाताळता येत नाहीये असं लोकांचं मत आहे; काही लोकांना वाटतं की निर्वासितांमुळं अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. ते कितपत खरं आहे ते तपासावं लागेल, पण लोक त्रासले आहेत हे खरं आहे.

#

ब्रीटनमधे बार्किंग मतदार संघातून १९९५ पासून श्रीम मार्गारेट हॉज लेबर तिकिटावर निवडून येतात. २०२४ साली त्या निवृत्त झाल्या, म्हणजे ९५ ते २४ अशी २९ वर्षं त्या खासदार होत्या. त्यांच्या मतदार संघात जातीयवादी लोकांनी हिंसा माजवली. त्यावर त्यांनी आपल्या मतदार संघाची माहिती प्रसिद्द केली.

घरं, बाजार, सार्वजनिक व्यवस्था या गोष्टी खालावल्या. मार्गारेट बाई सतत लोकांमधे मिसळत, त्यांची कामं करत. काही गोष्टी त्यांना जमल्या, काही जमल्या नाहीत.  परिस्थिती बिघडल्याचा परिणाम त्यांचा मतांचा टक्का घसरला. रिफॉर्म पार्टी, नॅशनलिस्ट पार्टी यांना ६ ते १४ टक्के मतं मिळाली. जातीयवादी पक्ष सत्तेत येतील असं नाही पण अनेक कारणांसाठी लोक त्याना मतं देतात, कित्येक वेळा त्यांचा जातीयवाद मान्य नसूनही.

#

Comments are closed.