ब्लर्ब. सजीव निर्जीवांचं नामकरण करणारा वैज्ञानिक.

ब्लर्ब. सजीव निर्जीवांचं नामकरण करणारा वैज्ञानिक.

कार्ल लिनियस

  पुस्तक : The Man Who Organised Nature: The Life of Linnaeus (२०२३)

मूळ लेखक  Gunnar Broberg (२०१९).  भाषांतर   Anna Paterson (२०२३)
प्रकाशक Princeton. 

पानं ४८४.

।।

कार्ल लिनियस (१७०७-१७७८) या वनस्पती शास्त्रज्ञाचं हे चरित्र आहे. चरित्र व्यक्तीचं आणि कार्याचंही आहे. 

जगात २०२० सालापर्यंत ३.१ लाख वनस्पती आणि जीवांची नोंद झालेली आहे. दर वर्षी सुमारे २५०० नव्या वनस्पती/जीव शोधले जातात, त्यांना नावं दिली जातात. शोध न लागलेल्या अजून किती वनस्पती/जीव आहेत ते माहित नाही.

वनस्पती/जीवाना नाव द्यायला सुरवात केली कार्ल लिनियस या वनस्पतीशास्त्रज्ञानं. कुठल्याही वस्तूला नाव दिलं की नोंद होते, खरं म्हणजे जगातल्या कुठल्याही वस्तूचं असणं हे नावामुळंच सुरु होतं. नाव नसेल तर ती वस्तू आपल्या लेखी अस्तित्वातच नसते.

लिनियसनं वनस्पती/जीवांचं  निरीक्षण केलं, त्यासाठी त्यांच्या  प्रजोत्पादक अवयवांचा अभ्यास केला. नंतर वनस्पती/जीवांचं नामकरण करण्याची पद्धत त्यांनी सिद्ध केली. या पद्धतीला द्वीपदनाम पद्धती असं म्हणतात. दोन नावांची पद्धत. एक नाव वनस्पतींची जाती (Genus) सांगतं आणि दुसरं नाव वनस्पतीची प्रजाती (species) सांगतं.

लिनसनं १२ हजार प्रजाती (स्पिसीज)चं वर्गीकरण आणि नामकरण केलं.

एक उदाहरण. Corvus spenden. पैकी Corvus चा अर्थ आहे कावळा, spenden चा अर्थ होतो तुकतुकीत. कावळा ही जाती, Corvus. तुकतुकीत दिसणारा spenden ही प्रजाती. पैकी कावळा ही जाती मुख्य आणि वेगवेगळी वैशिष्ट्यं असणाऱ्या प्रजाती.

Corvus spenden हा भारतीय कावळा. आखूड चोचीचा brachyrhynchos हा होतो Corvus brachyrhynchos अमेरिकन कावळा.

हीच द्वीपदी पद्धत नंतर वापरली गेली फक्त त्यातली पदं बदलत गेली,  लॅटिन ऐवजी इतर भाषांतली\संस्कृतीतली पदं वापरली गेली. आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात जीवाणूंना गाळू शकणाऱ्या हवा शुद्ध करणाऱ्या HEPA फिल्टरमधे वैज्ञानिकांना एक नवीन जीवाणू सापडला. solibacillus kalami असं नामकरण झालं. कलामी हे पद अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ ठरवण्यात आलं.

लिनस स्वतः वनस्पती, प्राणी गोळा करण्यासाठी हिंडला.पण नंतर त्याचा पसारा येवढा वाढला की तो विद्यार्थी व इतर लोकाना वनस्पतींचे नमुने गोळा करण्यासाठी पाठवू लागला. त्याचा हा उद्योग जगाला माहित झाल्यावर लोक आपणहून त्याच्याकडं नमुने पाठवू लागले. पंधरावा लुई या फ्रेंच राजानं स्वतःच्या उद्यानातल्या वनस्पती लिनियसकडं पाठवल्या. भारतात एक ब्रिटीश महिला Anne Monson वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून काम करत होत्या. त्यांनीही अनेक वनस्पती लिनसकडं पाठवल्या. त्यांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी एका दक्षिण आफ्रिकन वनस्पतीचं नाव त्यांनी Erica monsoniana असं ठेवलं.

लिनियसनी प्रथम वनस्पतीशास्त्राचा अभ्यास केला, तो विषय ते विद्यापीठात शिकवत.नंतर त्यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आणि ते वैद्यकीय व्यवसाय करू लागले.  वनस्पतीशास्त्र, वनस्पतीशास्त्राचं तत्वज्ञान या विषयावर त्यांनी पुस्तकं लिहिली. १७५३ साली लिहिलेल्या Species plantarum या पुस्तकात त्यांनी द्विपदी वापरून १२ हजार वनस्पती नोंदल्या. Systema naturae या पुस्तकामधे त्यांनी एकूणच सजीव आणि निर्जीवांच्या नोंदी सुरु केल्या. १७३७ साली पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली तेव्हां पुस्तकात फक्त १२ पानं होती. १७६६ साली १२ व्या आवृत्तीत २५०० पानं होती.

एक गंमत आहे. लिनियस यांच्या अभ्यासाला जोर आला याचं कारण दळणवळण तंत्रज्ञानात झालेली. बोटी आकारानं मोठ्या झाल्या,दूरवर जाऊ लागल्या. व्यापार सुरु झाला. युरोपियन देश व्यापाराठी इतर खंडात जाऊन तिथले प्रदेश काबीज करू लागले. या खटापोटात इतर खंडातल्या वनस्पती लिनियसकडं पोचू लागल्या.

लिनियस हा हरहुन्नरी माणूस होता. एका क्षणी त्याच्या डोक्यात देशप्रेम जागृत झालं. परदेशातून वनस्पती आयात केल्यामुळं आपल्या देशातलं सोनं बाहेर जातं. आपण आपल्या उपयोगाच्या सर्व वस्तू आपल्याच स्वीडनमधे तयार केल्या पाहिजेत असं त्याला वाटलं. एक दिवस आपण आपल्या जमिनीत उगवलेला चहा पिऊ आणि आपणच वाढवलेल्या किड्यांपासून रेशीम करून रेशमी कपडे वापरू असं त्याला वाटलं.

वरील विचारात आर्थिक विचार होता आणि वैज्ञानिक किडाही होता. पण दोन्ही बाबतीत त्याला अपयश आलं. रेशमी किडा खातो ती तुती स्वीडनच्या हवामानात वाढू शकत नव्हती आणि चहाची झुडपं वाढवण्यासारखी जमीन स्वीडनमधे नव्हती.

लिनियस विक्षिप्त होता. त्याला प्रसिद्धीची हौस होती. थोरा मोठ्याच्या ओळखी करून आपला व्यवसाय (नावलौकिक) वाढवायच्या प्रयत्नात तो असे. आपल्याच पुस्तकांची भलामण करणारी परीक्षणं तो स्वतःचं लिहून पेपराना पाठवत असे. स्वतःची ओळख स्वतःच ‘थोर वनस्पतीशास्त्रज्ञ’ अशी करून देत असे,उद्या कोणी आपल्याला थोर म्हटलं नाही तर? असा विचार तो करत होता. गंमत म्हणजे त्यानं स्वतःचे मृत्यूलेखही लिहून ठेवून वर्तमानपत्रं आणि प्रकाशकांकडं पाठवले होते. अर्थातच त्यात त्यानं स्वतःची थोरवीही लिहून ठेवली होती.

पुस्तक मूळ स्विडीश भाषेत आहे. लेखक बोरबर्ग इतिहासकार, प्राध्यापक आहेत (२०२२ मधे निधन), लिनियस हा त्यांच्या अभ्यासाचा विशेष विषय होता. 

लेखकाचं त्याच्या विषयपुरुषावर येवढं प्रेम दिसतंय की अनावश्यक गोष्टी देण्याचा मोह लेखकाला आवरता आला नाही. 

अगदी अनावश्यक तपशीलांसह भरपूर तपशील आहेत. लिनियसच्या एका विद्यार्थ्याला तीन स्त्रियांपासून ३० मुलं झाली होती या तपशीलाची काय गरज होती? लेखकाची हौस म्हणायची.   

।।

Comments are closed.