भारतात सेक्युलरिझमची व्याख्या स्वतंत्रपणे करावी लागेल

भारतात सेक्युलरिझमची व्याख्या स्वतंत्रपणे करावी लागेल

REPUBLIC OF RELIGION

The Rise and Fall of Colonial Secularism in India.

Abhinav Chandrachud.

PENGUIN-VIKING.

।।

अभिनव चंद्रचूड यांचं Republic of Religion हे पुस्तक भारतातील कायद्याच्या हिशोबात सेक्युलरिझमचा धावता इतिहास सांगतं.

सेक्युरलिझमचा अमेरिकेतला अर्थ वेगळा, ब्रीटनमधला वेगळा, भारतातला वेगळा. लेखक चंद्रचूड यांनी लावलेला अर्थ असा- no religion should be established by law as the official state religion and all citizens should have the freedom to practice their own religious beliefs.

वरील सूत्राचा आधार घेऊन ब्रिटीशांनी भारतात सेक्युलरिझम कसा आणला किंवा नाही आणला; स्वतंत्र भारतात राज्यघटना लिहून कोणता सेक्युलरिझम भारतानं स्विकारला; नंतरच्या काळात सरकारं, विधीमंडळं आणि न्यायालयं यांनी सेक्युलरिझमचा कसकसा अर्थ लावला याचा अभ्यास लेखकानं कायद्याच्या दृष्टीकोनातून या पूस्तकात मांडला आहे.

भारतात ईस्ट इंडिया कंपनी राज्य करत होती. ईस्ट इंडिया कंपनी मिशनऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य देत होती, मिशनरी हिंदू धर्मावर टीका करत, आक्रमकरीत्या धर्मांतरं घडवून आणत. अशानं राज्य करता येणार नाही असं लक्षात आल्यावर ब्रिटीशांनीच  राणीला सांगितलं की कंपनीला आवरा, राज्यकारभार हाती घ्या,  भारतात धार्मिक ढवळाढवळ केली जाणार नाही याची खबरदारी घ्या. 

प्रत्यक्षात मात्र ब्रिटीश सरकारनं भारतात फौजदारी व सिविल कायदे करताना भारतीय परंपरा दूर सारून ब्रिटीश सेक्यूलर तरतुदी कायद्यात घातल्या, भारतीय (हिंदू ) धार्मिक परंपरांमधे हस्तक्षेप केला. हिंदू मुसलमान अशी समाजाची विभागणी करून ब्रिटीशानी फोडा झोडा नीती अवलंबली, मुसलमानांना झुकतं माप दिलं आणि हिंदूं व्यवहारांमधे ढवळाढवळ केली. मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदार संघ आणि विधिमंडळात त्यांच्या लोकसंख्या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधित्व अशा तरतुदी ब्रिटीशांनी केल्या.

भारताबाबत लेखकाचं म्हणणं असं. स्वतंत्र भारतापुढं महत्वाचा प्रश्न भारताची एकता हा होता, त्या अंगानं भारतानं  स्वतःची स्वतंत्र सेक्युलर राज्यघटना तयार केली. भारतात अनेक  धर्म असतील पण देशाला धर्म नसेल असं राज्यघटनेनं ठरवलं. वेळोवेळी भारतीय विधीमंडळांनी आणि न्याय व्यवस्थेनं भारतीयांच्या धर्म व्यवहारात भारताची एकता सांभाळण्यासाठी हस्तक्षेप केला. भारतीय माणसाच्या धर्म व्यवहाराचा काही भाग धर्मानं सांगितलेला असतो आणि काही भाग धर्माचा मूलभूत भाग नसतो; पैकी जो भाग धर्माचा मूलभूत-essential- भाग नाही तो सेक्युलर असतो असं मानून भारतीय विधीमंडळं आणि न्यायालय त्या भागात सुधारणा करत राहिली, त्या भागाचं व्यवस्थापन करत राहिली.

गायींची जोपासना आणि गोहत्या बंदी; धर्मांतर; निवडणुकीत राखीव मतदार संघ आणि धर्माधारीत मतदानाचा अधिकार; मंदीर व्यवस्थापन; नागरी कायदा आणि धर्म; अनेक प्रसंगी घ्यावी लागणारी शपथ; या मुद्द्यांवर एकेक स्वतंत्र धडा लेखकानं लिहिला आहे. प्रत्येक धड्यात ब्रिटीश कसे वागले आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतात कशा कायदेशीर तरतुदी झाल्या याचा तपशील लेखकानं दिला आहे.

हे पुस्तक प्रसिद्ध होत असताना भारतात हिंदुत्ववादाला उधाण आलं आहे. त्यामुळं ती संदर्भरेषा वाचकांच्या मनात रहाणं स्वाभाविक आहे.

पुस्तक कायद्याच्या दृष्टिकोनातून लिहिलं असल्यानं सेक्युरिझमचा वादग्रस्त राजकीय भाग, हिंदुत्व परिवारानं केलेली सेक्युलरिझमची व्याख्या  पुस्तकात नाही. 

हिंदुत्व परिवाराचं म्हणणं असं की सेक्युलरिझम म्हणजे मुस्लीम तुष्टीकरण आणि हिंदूंवर अन्याय. ब्रिटीश आणि स्वातंत्र्य काळातले सत्ताधारी (भाजप वगळता) तुष्टीकरण करत राहिले. बाबरीच्या जागी राम मंदीर उभारू न देणं हे त्यांच्या मते प्रतीकात्मक उदाहरण. हिंदुत्व परिवारानं सांगितलं की हिंदू धर्म मुळातच  सेक्युलर आहे त्यामुळं पश्चिमी लोकांनी त्याना सेक्युलरिझम सांगू नये. इतिहास उलटा फिरवून मुसलमानांनी केलेले अन्याय खाणाखुणांसह नष्ट करणं आणि त्या जागी हिंदू खुणा रचणं म्हणजेच खरा सेक्युलरिझम असा अर्थ हिंदुत्व परिवारानं लावला. बाबरी पडणं, राम मंदीर उभारणं, मुसलमान गायी मारत असत म्हणून गायीला समाजात पुन्हा केंद्रस्थानी आणणं,  गायी मारतात याची शिक्षा मुसलमानांना देणं हाच सेक्युलरिझम अशी व्याख्या निरनिराळ्या प्रकारे हिंदुत्व परिवारानं सांगितली व त्यावर आपलं राजकारण आधारलं.

   ब्रिटन, अमेरिका, प.युरोप या ठिकाणी विचार करणाऱ्या मंडळींनी आणि राजकीय लोकांनी त्यांना अभिप्रेत असलेला सेक्युलिझम कागदावर मांडला, परिभाषित केला. स्टेट आणि रीलिजन यातील विभागणी हा त्यांच्या म्हणण्याचा केंद्र बिंदू.  तशी मांडणी, सिद्धांतांच्या स्वरूपात, हिंदुत्व परिवारानं केलेली नाही. बाबरी पाडणं किंवा गायीचं मांस खाल्लं, बाळगलं, विकलं अशा संशयावरून मुसलमानांचा छळ करणं, त्याना मारणं, ही हिंदुत्वाची व्यावहारीक मांडणी  हिंदुत्व परिवारानं परिभाषेच्या रुपात मांडली नाही. म्हणूनच कदाचित लेखकाला हिंदुत्व परिवाराच्या सेक्युलरिझमच्या व्याख्येवर लिहिता आलं नसावं. लेखक ब्रिटीश आणि भारतीय राज्यघटनाकारांनी काय लिहिलं, कोणत्या तरतुदी केल्या यांची चर्चा पुस्तकात करू शकले. 

सेक्युलरिझम म्हणजे काय? 

सेक्युलरिझम हा विचार किंवा आचार जगात नाना देशांत, नाना संस्कृतींत, विविध काळात जन्मला आणि वाढला. प्रत्येक देशातली स्थिती वेगळी होती आणि कारणं वेगळी होती, त्यामुळं व्याख्याही वेगळ्या होत्या.

युरोपात, मध्य पूर्वेत ख्रिस्ती धर्म होता. जगण्याच्या प्रत्येक गोष्टीत धर्म होता. स्थानिक लोकसमूह (पॅरिश) असो किंवा स्थानिक पातळीवरचं उद्योजकांचा गट असो, तिथल्या निर्णयात चर्चचा माणूस असे. जसजसा जगण्यातला आर्थिक भाग वाढत गेला, व्यापार आणि उत्पादन हा भाग वाढत गेला तसतसे लोकांचे निर्णय उत्पादक आणि उपभोक्ता या कसोटीवर होऊ लागले. त्यातली धर्माची भूमिका मर्यादित होत गेली. नंतर राज्यसंस्था, लोकशाही या गोष्टी विकसित होत गेल्या. त्यामुळं सार्वजनिक जीवनात होणाऱ्या निर्णयातूनही धर्म  कटाप होत गेला. तिथूनच स्टेट आणि धर्म यांच्या सीमा ठरल्या.

युरोपात बहुसंख्य लोकांनी धर्म आणि राज्यव्यवहार, धर्म आणि सार्वजनिक लौकिक व्यवहार यांच्यात अंतर निर्माण केलं. युरोपीय लोक अमेरिकेत स्थायिक झाले आणि त्यांनी अमेरिका घडवली. अमेरिकन माणसांनी धर्म आणि राज्य यांच्यात भिंत उभारली. आजतागायत ही विभागणी तिथं शिल्लक आहे. 

परंतू तिथले नागरीक स्वतंत्रपणे आणि समांतर पातळीवर धार्मिकही आहेत. ब्रीटनमधे पारलौकिक देवाधारित धर्मापेक्षा वेगळी अशी लौकिक नैतिक परंपरा ख्रिस्ती लोकांनी सुरु केली.हे विचार क्वेकर्स या नावानं ओळखले जातात. कालांतरानं धार्मिक पण चर्चमधे न जाणारे लोक तयार झाले. कालांतरानं धर्मच न मानणारेही तयार झाले. अशी सर्व लोकं मिळून ब्रीटनमधे, युरोपात एकत्र नांदतात. धर्म आहे, चर्च आहे, लोकांच्या घरात धर्म आहे पण सार्वजनिक निर्णयाचा आधार धर्म हा नसतो. प्रेसिडेंट किवा प्राईम मिनिस्टर देवाची शपथ घेतो, देव आपल्या देशाला आशिर्वाद देवो असं म्हणतो. पण ते तेवढंच. त्या पुढं देव नावाची गोष्ट सार्वजनिक जीवनात नसते.

हे सर्व लोकांनी निर्माण केलेल्या आणि स्वीकारलेल्या परंपरांतून घडलं आहे, ते कायदा करून लादण्यात आलेलं नाही.

सेक्युरलिझमची सगळी वळणं ब्रीटननं अनुभवली. तिथं देशाला अधिकृत धर्म आहे आणि चर्चची माणसं संसदेत बसतात. एकेकाळी तिथं ख्रिस्ती धर्मावर टीका करणं, ख्रिस्ती धर्म सोडून इतर धर्मात जाणं याला कायद्यानं मज्जाव होता. अलीकडं लोकांना संसदेत केलेले कायदे अधिक योग्य वाटत असल्यानं ब्रिटीश संसद कायदा करते आणि धर्मनिंदेचं प्रकरण कायद्यातून वगळते, धर्मावर टीका करायला हरकत नाही असं म्हणते किंवा कुठल्याही धर्माचा द्वेष फैलावणारी भाषणं करायला मज्जाव करते.

भारतात सेक्युलरिझम आला तो ब्रिटीशांकडून. तो भारतीय माणसांनी स्वतःच्या मर्जीनं आणला नव्हता. ब्रिटिशांनी भारतातल्या धर्मांत (प्रामुख्यानं हिंदू धर्मात) ढवळाढवळ केली. हिंदू चालीरीती (उदा सती) बंद केल्या, मंदिरांचं व्यवस्थापन ताब्यात घेतलं, फौजदारी आणि सिविल कायद्यात हिंदू परंपरांना दूर सारणारे बदल केले. त्या काळात ब्रिटीशांचं त्यांच्यात देशातलं वर्तन सेक्युलरीझम  आणि लोकशाहीशी विसंगत होतं. परंतू फोडा झोडा नीतीचा वापर आणि काहीसं समाजसुधारकांचा दबाव या दोन गोष्टींमुळं ब्रिटीशांनी धर्मांत ढवळाढवळ केली.

ब्रिटीश गेल्यावर भारतानं राज्यघटना तयार केली आणि या राज्यघटनेचं वर्णन सेक्युलर असं केलं. धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य असेल, धर्म या मुद्द्यावरून आपपरभाव केला नाही, नागरीकत्वाचे सर्व अधिकार हे धर्मविरहीत असतील या तत्वावर भारतीय राज्य घटनेची उभारणी केली. 

भारतात हिंदू,मुस्लीम, ख्रिस्ती, बुद्ध, जैन, शिख हे धर्म आहेत.

हिंदू नावाचा धर्म कधीच नव्हता. हिंदू माणसानं अनेक देव, अनेक उपासना, अनेक दर्शनं मानली, अनेक पंथ तयार केले. त्यातून स्वतंत्रपणे अनेक भाषा आणि लोकव्यवहारही आकारले. इतर कुठल्याही धर्मासारखा हिंदू हा संघटित, साकार धर्म नाही. शिवाय जात नावाचं एक लचांड आहे. खरं म्हणजे त्याचा धर्माशी शून्य संबंध आहे. पण भारतात तो एक समांतर धर्म आहे.

भारतीय समाजव्यवहारात धर्म जितका होता तितक्याच धर्माच्या नावावर खपवलेल्या चालीरीती आणि जात याही गोष्टी होत्या. प्रार्थना, पूजा या थेट गोष्टी समजण्यासारख्या आहेत पण कोणते कपडे घालावेत, कोणत्या गोष्टी खाव्यात कोणत्या खाऊ नयेत, गंध कसं लावावं, टोपी कोणती असावी, नमस्कार कसा करावा, बायको कशी निवडावी, झोपावं कोणत्या दिशेला तोंड करून, दरवाजा कोणत्या दिशेनं असावा, कोणत्या दिवसात काय खावं, पाळी आल्यास स्त्रीला शिवू नये, गुन्हा एकच पण जातीनुसार शिक्षा बदलाव्यात अशा असंख्य गोष्टी भारतीय माणसाला सांगितल्या जातात, धर्माच्या नावावर. त्या सर्व गोष्टी जवळपास धार्मिकच होतात. हे हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मांच्या बाबतीत घडतं.

धर्मामधे उपासना हा महत्वाचाच घटक असतो. भारतात हज्जारो उपासना पद्धती आहेत, सिद्धांत आहेत, पंथ आहेत. प्रत्येक कुटुंबाचा देव वेगळा आणि कुळाचार वेगळा. कुटुंब गटाचा म्हणजे जातीचा देव वेगळा. गावाचा देव वेगळा. राज्याचा देव वेगळा. विभागांचे देव वेगळे. या अनंत पंथ आणि गटात कधी सौहार्द असतं तर कधी प्रचंड मारामाऱ्या. हे सर्व घटक भारतात प्रचलित असतानाच स्वतंत्रपणे बाहेरून आलेल्या, जातीपंथाबाहेर असणाऱ्या गोष्टीनी माणसाचं जीवन साकारत आहे. एकीकडं पर्यावरण, जागतीक व्यापार, जगाशी संबंध इत्यादी गोष्टींना तोड द्यायचं आहे, त्यासाठी कायदे आखायचे आहे आणि हे सारे उद्योग करणाऱ्या माणसांना स्वतःच्या जाती, पंथ, स्वतंत्र चालीरीती आहेत.

भारत हा एक अद्वितीय समाज आहे. इतर देशात जशी धर्म आणि राज्यव्यवस्था अशी विभागणी करता येते तशी भारतात अजिबातच करता येत नाही. केवळ फाळणीच्या दाहक अनुभवाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून तथाकथित धर्म डोक्यात ठेवून सर्वधर्म समभावाचा विचार झाला, समाजाला विभागणाऱ्या इतर असंख्य गोष्टी सार्वजनीक व्यवहाराच्या संदर्भात टाळण्यात आल्या.

सार्वजनिक व्यवहारात सर्व माणसं सारखीच असतील हे मुख्य तत्व अमलात आणायचं असेल तर अनेक व्यवहार, अनेक वहिवाटी, जात इत्यादी गोष्टींनाही सार्वजनिक व्यवहारातून वगळावं लागेल. 

धर्म आणि राज्य यातील भिंत म्हणजे सेक्युलरिझम ही व्याख्या भारताच्या बाबतीत अगदीच अपुरी आणि फसवी आहे.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *