मराठवाड्यात ७ दिवसांत ३४ शेतकरी आत्महत्या कां करतात?

मराठवाड्यात ७ दिवसांत ३४ शेतकरी आत्महत्या कां करतात?

मराठवाड्यात ११ ते १७ ऑगस्ट या ७ दिवसांत ३४ शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्र सरकार आपण शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचे आणि योजनांचे ढोल बडवत आहे. जलयुक्त शिवार काय, पीक विमा योजना काय, कर्जमुक्ती काय आणि कायन् काय. २०१४ साली भाजप आणि सेनेनं आधीच्या काँग्रेसनं महाराष्ट्र कुठं नेला होता त्याचा शोध घेऊन महाराष्ट्र पुन्हा वळणावर आणण्यासाठी सरकार स्थापन केलं. त्यालाही आता तीन वर्षं झालीत.

भाजपनं महाराष्ट्र कुठे नेलाय असं म्हणायची संधी काँग्रेसला मिळाली नव्हती कारण त्यांना स्वातंत्र्यानंतर सत्ता उपभोगण्याचा कायमचा परवाना मिळाला होता असं वाटत होतं. ती हुकलेली संधी आता त्यांना भाजपच्या सत्तेमुळं मिळणार आहे. पुढल्या दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत भाजप-सेनेची घोषणा काँग्रेस वापरणार हे नक्की.

सत्ता येतात, सत्ता जातात. शेतकऱ्यांची किवा असं म्हणूया की दुःखी लोकांची स्थिती बदलत नाही.

नेमकं काय घडलं आणि काय घडू शकतं याची एक झलक आत्महत्या घडत असतानाच झालेल्या दोन कार्यक्रमांतून मिळाली.

मराठी विज्ञान परिषदेनं १३ ऑगस्टला पाणी या विषयावर एक व्याख्यान कार्यक्रम घडवून आणला. कार्यक्रम नेमका, विषयाला घट्ट धरून होता. तीन मुख्य वक्ते  प्रत्येकी २५-३० मिनिटं बोलले. कार्यक्रमाचे अध्यक्ष परांजपे पाच मिनिटं बोलले. कार्यक्रमात मंचावर  हजर असलेले परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी एकच  मिनिट बोलले. अर्धा तास प्रश्नोत्तरं झाली. प्रश्न नेमके होते, प्रश्नाच्या आडून कोणी भाषणं ठोकली नाही. दोन तासात कार्यक्रम संपला.

कार्यक्रम  माहिती आणि ज्ञानानं भरलेला होता. कणभरही वायफळ गोष्टी नव्हत्या.  कोणाही वक्त्यानं चमकोपण केलं नाही. आरोप, प्रत्यारोप, चमकदार विधानं नव्हती.

धरणं या विषयावर बोलणारे दि. बा. मोरे हे एकेकाळी महाराष्ट्र सरकारात आधिकारी होते, ते इंजिनियर आहेत. त्यांनी धरण या विषयाचा इतिहास मांडला. धरणं आवश्यक आहेत, धरणं हीच आपली संस्कृती आहे, लहान मोठी धरणं हवीतच.   पाण्याचा न्याय्य वापर झाला पाहिजे आणि धरणग्रस्ताना न्याय मिळाला पाहिजे हे मुद्दे त्यांनी  मांडले.

मोरे यांनी मांडलेले मुद्दे असे. महाराष्ट्रात अनेक धरणं बांधून पाणी साठवण्यात आलं. परंतू धरणांची काळजी न घेतल्यानं धरणांची साठवण क्षमता कमी झाली आहे. लाभ क्षेत्रातल्या लोकांना न्याय मिळाला नाही, त्यांचं पुनर्वसन झालं नाही. धरणं बांधण्यातला भ्रष्टाचार, सिंचन क्षमतेची काळजी न घेणं. यामुळं धरणांबद्दल जनतेच्या मनात विनाकारण आक्षेप निर्माण झालेत. पाणी धरून ठेवणं, म्हणजेच धरण ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.

प्रदीप पुरंदरे, सिंचन या विषयाचे प्राध्यापक, जययुक्त शिवार या विषयावर बोलले. ही योजना काय आहे आणि तिचं काय झालंय हे त्यांनी आकडे, ग्राफ, चित्रं यांच्या सहाय्यानं सांगितलं. त्या सोबतच त्यांनी जलयुक्त शिवार ही उपकल्पना ज्या मुख्य कल्पनेचा भाग आहे ती जलसंधारण ही कल्पनाही समजून सांगितली.

पुरंदरे यांनी मांडलेले मुद्दे. प्रत्येक शेतकऱ्यानं शेतात खोलगट जागा शोधून, त्या जागेत पाणी येण्याचा ओहोळ, त्या जागेतून पाणी वाहून जाण्याचा ओहोळ शोधून, त्या जागेत खड्डा करून पाणी साठवणं ही जलयुक्त शिवाराची शास्त्रीय व्याख्या आहे. पावसाळ्यात पाणी साठवणं आणि मुरू देणं हा मुख्य उद्देश. पाणी वर्षभरासाठी साठवणं हा उद्देश नाही. मोठे तलाव करून आणि अस्तर घालून पाणी साठवणं म्हणजे पाण्याची वाफ करून ते वाया घालवणं होय. तसंच हे पाणी साठतं, मुरत नाही, त्यामुळं भूजलाचं पुनर्भरण होऊन ते पाणी वर्षभर वापरता येणं ही गोष्ट पाणी साठवण्यामुळं घडत नाही.

जलयुक्त शिवार ही जलसंधारण या मुख्य कल्पनेची उपकल्पना आहे. वाहणारं पाणी वेगानं वाहून जमिनीची धूप करतं. म्हणून ते वळणावळणानं वहाणं आवश्यक असतं, लांबलचक सरळ नाला काढणं अशास्त्रीय आहे. नाला खोल खणून खडकापर्यंत जाऊन भगर्भाच्या खडकव्यवस्थेत हस्तक्षेप करणं म्हणजे जमिनीचं कायमचं नुकसान करणं आहे. नाला खोल करणं म्हणजे आसपासची माती ढासळून नाल्यात पडून नाला बुजणं आणि ती माती वाहून जाणं होय म्हणून अती खोल करणं अशास्त्रीय आहे. नाल्याच्या आसपासची झाडं तोडून नाला रुंद करणं म्हणजे महाघोडचूक आहे कारण त्यामुळं जमिनीची धूप होते. वरील शास्त्रीय आवश्यकतांचं पालन न करता जलसंधारणाची कामं, जलयुक्त शिवार योजनांची कामं फार मोठ्या प्रमाणावर झाल्यानं फार मोठं नुकसान झालं आहे. माथा ते पायथा ही जलसंधारणाची शास्त्रीय कल्पना दूर सारून माथ्याकडं लक्ष न देता पायथ्याकडं लक्ष देण्यामुळंही फार नुकसान झालं आहे.

अमीर खान यांनी उभ्या केलेल्या पाणी फाऊंडेशन या संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते डॉ. पोळ यांनी त्यांच्या संस्थेच्या कामाची ओळख करून दिली. पाणी फाऊंडेशन पाणी साठवण्याचं-मुरवण्याचं तंत्रज्ञान व विज्ञान खेड्यातल्या लोकांपर्यंत   पोचवतं.  त्या ज्ञानाच्या आधारे गावकरी स्वतंत्रपणे जमिनीची बांधणी करत पाणी मुरवतात.

पोळ यांनी मांडलेले मुद्दे. पाणी डोंगरावरून उतारानं वहातं. उतार वरून खाली असतो तसाच बाजूला म्हणजे डावीकडं किंवा उजवीकडंही असतो. नेमका उतार शोधून बांध बांधावा लागतो, ताल घालावी लागते किंवा खड्डा करावा लागतो. शोष खड्डे करावे लागतात त्याचीही खोली नेमकी असावी लागते. रोपं लावतांनाही नेमक्या खोलीचे खड्डे करावे लागतात. संधारणाची कामं  करण्यासाठी उपकरणं वापरावी लागतात. संधारणाच्या कामातलं विज्ञान, उपकरणांचा वापर लोकांना कळला तर योजना अमलात आणणं शक्य होतं. पाणी फाऊंडेशन लोकांपर्यंत विज्ञान, तंत्रज्ञान आणि उपकरणं पोचवतं. प्रशिक्षण घेतलेली माणसं जलसंधारणाच्या योजना आपल्या आपण पार पाडतात, पार पडणाऱ्या योजनांना पाणी फाऊंडेशन बक्षिसं देतं.

महाराष्ट्रात धरण बांधली गेली परंतू सिंचनाची व्यवस्था सदोष राहिल्यानं साचवलेल्या पाण्याचा कार्यक्षम वापर होत नाही, धरणं बहुतांशी निकामी होत आहेत. पैसे खूप खर्च झाले, होतील, पण कालांतरानं ते वाया जातात असं मोरे यांच्या भाषणातून समजलं. त्यांचं भाषण ऐकताना आपण एक शास्त्रीय भाषण ऐकतोय, राजकीय नव्हे हे जाणवलं.  समारोपात ते म्हणाले की पाणी आलं म्हणजे सगळं काही झालं असं होत नाही. पाणी मिळाल्यानंतर पिकं, त्यांना भाव इत्यादी गोष्टीही तितक्याच महत्वाच्या असतात, सामाजिक न्यायही महत्वाचा असतो हे त्यांनी मोजक्या शब्दात सांगितलं.

धरण बाधणं असो, कालवे काढणं असो, वितरिका तयार करणं असो. पाणी साठवण्यासाठी माथा ते पायथा कल्पना असो की शेततळ्याचा जलयुक्त शिवार कार्यक्रम असो. तंत्र, विज्ञान जाणणारे व्यावसायिक योजना आखतात. त्या योजना अमलात आणण्याची जबाबदारी सरकार घेतं. योजना फेल जातात. लोकांना सुख लाभत नाही, दुःखच वाढतं, आत्महत्या होतात.

योजना लोकांपर्यंत पोचत नाहीत, लोकांना विज्ञान आणि तांत्रिक कौशल्य मिळत नाहीत हे योजनांच्या अपयशाचं एक कारण. पाणी फाऊडेशन ती त्रुटी भरून काढत आहे.

योजनांतलं तंत्र आणि विज्ञान समजणं ही एक गोष्ट. परंतू मुळात योजना समजणं, त्या योजनेत नाना कागदं भरून भाग घेणं, संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना योजनांचा अमल करण्यासाठी भाग पाडणं हेही काम होणं महत्वाचं असतं. सरकारी यंत्रणा भ्रष्ट झाल्यानं  योजना अमलात येत नाहीत. अमल होण्यासाठी आवश्यक दबाव तयार करण्याचं मानस आणि शक्ती राजकीय पक्षांकडं उरलेली नाही. कार्यकर्ते चोर झाले आहेत. निवडणुका जिंकणं, त्यासाठी जातींचा-धर्माचा-पैशाचा खेळ करणं येवढाच उद्योग राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करत असतात. राजकारण हा त्यांचा व्यवसाय झाला आहे. राजकारणातल्या या अवस्थेला अपवाद आहेत सांगोला मतदार संघातून १९६२ पासून निवडून येणारे आमदार गणपतराव देशमुख.

मविपनं घेतलेल्या चर्चेनंतर दुसऱ्याच दिवशी एबीपी माझा या वाहिनीनं नव्वदी पार केलेल्या आमदार गणपतराव देशमुख यांची एक दीर्घ मुलाखत घेतली. नव्वदी ओलांडलेले गणपतराव  वर्षातून किमान दोन वेळा मतदार संघातल्या प्रत्येक गावात जातात. आपल्या मतदार संघातल्या लोकांचं सुख हा त्यांचा अग्रक्रम.

मतदार संघात फिरून ते काय करतात? सरकारनं आखलेल्या कल्याणकारी योजना ते मतदारांना समजून सांगतात. नंतर त्या योजनांचा फायदा लोकांना मिळेल यासाठी ते खटपट करतात. योजना आली की संबंधित माणसांना अर्ज करायला शिकवतात, अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडं पोचवतात, अर्ज पुढे जातो याची काळजी घेतात. सतत पाठपुरावा झाल्यानं योजना अमलात येऊन लोकांचं कल्याण होतं. १९६२ नंतर महाराष्ट्रात, काँग्रेस, पुलोद आणि भाजप आघाडी अशी सरकारं आली. सरकारं कोणतीही असोत शेका पक्षाच्या तिकिटावर निवडून येणाऱ्या गणपतरावांनी सरकारी योजनांचा फायदा लोकांपर्यंत पोचवला.

देशाचा विकास का होत नाही आणि कसा शक्य आहे ते  मविपनं पार पाडलेला कार्यक्रम आणि एबीपी माझावरची मुलाखत यामधून समजलं.

मोरे, पुरंदरे हे जाणकार तंत्रज्ञ. पाणी फाऊंडेशन आणि गणपतराव देशमुख हे कार्यक्रम अमलात आणणारे घटक. त्यांना एकत्र आणणारी मराठी विज्ञान परिषद आणि एबीपी माझा. हे बिंदू जोडले तर विकासाचं चित्र रेखाटता येतं.

।।

18 thoughts on “मराठवाड्यात ७ दिवसांत ३४ शेतकरी आत्महत्या कां करतात?

  1. प्रश्न खूप आहेत.. पण सार्या्सार्या आहावानांना तोंड देत लढणाऱ्या तंत्रज्ञ, कार्यकर्ते व निळू दामलेंसारखे पञकार यांना सलाम!

  2. You always write article on serious current issues, this one is no exception. You have nailed the exact problem with our SYSTEM. The question still remainls – We know the issue, we know the answers, but shall we follow them??

  3. निळूभाऊ, उत्तम लेख. या निमित्ताने मराठवाड्यातली आणखी एक बाब आपल्या निदर्शनास आणावी असे वाटते. अलिकडच्या काळात दोन तरूण मुलींनी आत्महत्या केल्या. कारण आपल्या लग्नाच्या चिंतेने बापाने आत्महत्या करू नये असे त्यांना वाटत होते. आता अशा आत्महत्यांची नवी मालिका मराठवाड्यात सुरू होते की काय, अशी भीती वाटते. कारण या मुलींच्या आत्महत्यांना माध्यमांनी खूप प्रसिद्धी दिली. त्यामुळे बापाला वाचविण्याचा हाही एक मार्ग आहे, असा विचार अनेक समवयस्क मुली करीत नसतील, कशावरून? २००६ च्या सुमारास मी एका फेलोशिपद्वारे मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या स्थितीची पाहाणी करीत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्या कुटुंबाला मिळणाऱ्या मदतीच्या बातम्यांचा परिणाम आत्महत्येला इतरांना प्रवृत्त करणारा ठरतो आहे, असे माझ्या निदर्शनास आले होते. तीच भीती या तरूण मुलींच्या बाबतीत असू शकते, असे मला वाटते आहे. सर्वच माध्यमांनी त्या अनुशंगाने एकत्रितपणे काही धोरण ठरवायला हवे, असे वाटते.

  4. What is the conclusion finally, Sir? Or only a discussion. We are witnessing frequent droughts for the last 40 yeras in our lifetime.

  5. What is the conclusion finally, Sir? Or only a discussion. We are witnessing frequent droughts for the last 40 years in our lifetime.

  6. What is the conclusion finally, Sir? Or only a discussion. We are witnessing frequent droughts for the last 40 years in our lifetime.

  7. Journalists are suppose to discuss. That is their job. To act is the job of politicians etc. To bring all the facts and opinions and suggestions in the discussion is the professional requirement of journalists. Participating in political activity or activism is individual journalist’s personal choice, not a professional demand. His first and foremost responsibility is to be a good journalist.

  8. बापाला आत्महत्या करावी लागू नये म्हणून मुलीनं आत्महत्या करणं.ऐकून हृदयाला पीळ पडतो. आत्महत्या केल्यानंतर मिळणाऱ्या नुकसान भरपाईमुळं कुटुबांचं कल्याण होतं म्हणून नुकसान भरपाईच्या आमिषानं आत्महत्या करणं. तितकंच पीळ पाडणारं. आमिषामुळं माणसं आत्महत्या करत होती असे अहवाल पूर्वी प्रसिद्धही झाले होते, तुमचाही तसा अभ्यास होताच. अशी प्रकरणं फार काळजीपूर्वक हाताळावी लागतात. अलिकडं भाजप-संघानं ट्रोलरची फौज उभी केली आहे. ती फौज लगेच म्हणते की बघा,आत्महत्या करणारी माणसं केवळ पैसे मिळवण्यासाठी आत्महत्या करतात. अलिकडं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांबद्दल या ट्रोलरनी लिहिलंय की मराठवाड्यातले शेतकरी लबाड आहेत, ते कर्जाची रक्कम लग्नावर खर्च करतात, त्यांना चैन करायला हवी असते वगैरे. एके काळी वसंतराव नाईकांचं सरकार असताना ७२-७४ साली भीषण दुष्काळ झाला होता. तेव्हां लोकांना खायला मिळालं नाही किंवा विषारी धान्य खावं लागलं होतं. त्या वेळच्या काँग्रेसी ट्रोलरनी प्रचार केला की माणसं दुष्काळामुळं मेली नाहीत तर कुपोषणामुळं, विषबाधेमुळं मेली. दुष्काळ हे कारण त्यांनी लपवलं. मुलींना किंवा बापांना आत्महत्या कराव्या लागतात याचं मुळ कारण रोजगार आणि जगण्यासाठी आवश्यक साधनांचा अभाव हे आहे. मराठवाडा किंवा विदर्भ किंवा एकूणच भारतातला ग्रामीण भाग वंचित आहे आणि त्यातून तिथल्या लोकांची सुटका करायला सरकारांना अपेश येतंय या भागावर लक्ष द्यायला हवं. दुर्दैवानं माध्यमं चर्चा भलतीकडंच नेतात.

  9. “मराठी विज्ञान परिषदेनं १३ ऑगस्टला पाणी या विषयावर एक व्याख्यान कार्यक्रम घडवून आणला”, हे स्तुत्य आहे व त्यात भाग घेणारे वक्ते विषयाबद्दल नक्कीच तज्ज्ञ असून आपण केलेले वर्णन सुशिक्षित व शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती वाटणाऱ्या वाचकांच्या थेट हृदयास जाऊन भिडते. मात्र कांही प्रश्न मनांत उद्भवले: १. श्रोतृवर्गाची अंदाजे संख्या किती होती? २. कार्यक्रमाबद्दल वृत्तपत्रांनीं आणि टेलिव्हिजन माध्यमामांनी कितपत प्रसिद्धी दिली? ३. कार्यक्रमासाठी फडणवीस आणि उद्धव ठाकरे अश्यांसारखे प्रमुख मंत्री आणि नेते उपस्थिती टाळतात की त्यांना निमंत्रण दिले जात नाही? -या बद्दल लेखकाचे मत काय? ४. Mr Vishwas Diggikar म्हणतात तोच नेमका प्रश्न माझ्याही मनांत उपस्थित झाला व त्यास लेखकाने दिलेले उत्तर मी वर उल्लेख केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर अधिक स्पष्ट होतील, असे वाटले. एरवी सदर समारंभ म्हणजे, “पालथ्या (रिकाम्या) घागरीवर पाणी” -असे म्हणावे लागेल!

  10. निळुभाऊ,

    मविपच्या कार्यक्रमाचे तुम्ही चांगले रिपोर्टिंग केले आहे. अभिनंदन दुस-या पत्रात तुम्ही दिलेले उत्तर भावले व पत्रकाराची व राजकारण्यांची भूमिका त्यावरून स्पष्ट केली आहे.
    अ.पां.देशपांडे

  11. हेमंत कुलकर्णी यांच्या पत्रामधल्या मुद्द्यांबद्दलचे खुलासे.
    १. श्रोतृवर्गाची अंदाजे संख्या किती होती?
    सुमारे शंभर. मुंबईत अलिकडं प्रवास अशक्य झाला आहे. पाच सात किलोमीटरचं अंतर असलं तरी घामट आणि घुसमट दोन तास लागू शकतात. आठवडाभर माणूस त्यातच थकून जातो आणि चांगले कार्यक्रम होणार हे कळलं तरी जाऊ शकत नाही. संवादाच्या अन्य साधनांचा वापर हाच उपाय दिसतो. स्काईप, फेस टाईम इत्यादी. आता दूरवरच्या माणसाला भेटायला जाणं वगैरे गोष्टीही अशक्य आहेत, स्काईप-फेस टाईम हाच उपाय दिसतो. इंटरनेट-लॅपटॉप-कंप्यूटर हा आता जीवनाचा भाग झाला आहे. त्याच्या वापरातले दोष हे माणसाचे दोष आहेत, त्या तंत्र वा यंत्राचे नव्हेत. तेव्हां श्रोतृवर्ग कित्येक हजार असायला हरकत नाही, नव्या पद्धतीनं.
    २. कार्यक्रमाबद्दल वृत्तपत्रांनीं आणि टेलिव्हिजन माध्यमामांनी कितपत प्रसिद्धी दिली?
    माध्यमांचं माध्यमभान आणि समाजभान अगदीच कमी झालंय. असे कार्यक्रम असतात आणि त्यांची एक उपयुक्तता असते हे कळण्याचे मार्गच माध्यमांनी बंद करून टाकलेत. कशाला किती प्रसिद्धी द्यायची या बाबतही माध्यमातल्या माणसांची समजूत तिरपागडी झालीय. छापील आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही माध्यमांची ती स्थिती आहे. ज्या कोणाला जग समजून घ्यायचं आहे त्याला पर्यायी वाटा शोधाव्या लागणार, या माध्यमांचा उपयोग अगदीच कमी झालाय.
    ३. कार्यक्रमासाठी फडणवीस आणि उद्धव ठाकरे अश्यांसारखे प्रमुख मंत्री आणि नेते उपस्थिती टाळतात की त्यांना निमंत्रण दिले जात नाही?
    पुढाऱ्यांची नावं घेऊ नका. ते मतं गोळा करणाऱ्या कामगारांचे कंत्राटदार आहेत, लेबर काँट्रॅक्टर्स आहेत. त्यांचं वाचन, विचार इत्यादी गोष्टी आता फक्त मतं कशी मिळतील आणि नंतर सत्ता कशी टिकेल यापुरतंच मर्यादित आहे. ती अशी कां झाली वगैरे त्यांचा प्रश्न आहे, त्यावर त्यांची उत्तरं आहेत. ती असोत. व्यवहार आणि वास्तव स्पष्ट आहे. सर्वांना चोरांचा गराडा आहे. चोरीचा व्यवहार वगळता सचोटी आणि दूरगामी उपाय हे शब्द उच्चारणारी माणसं त्यांच्या भोवती टिकू शकत नाहीत. ही आजच्या राजकारणाची शोकांतिका आहे. चोरांच्या वाढदिवसांना, मर्तिकांना, रिअॅलिटी शोना, पूजाबिजा करायला, चमकायला पुढारी उत्सूक असतात. त्यांना क्षणाचाही वेळ उसंत नाही. वरील कार्यक्रमाला ते उपस्थित नव्हते म्हणून तर कार्यक्रम चांगला झाला. कार्यक्रमात व्यक्त झालेले विचार कार्यक्रमातल्या किमान दोन व्यक्तींनी त्यांच्यासमोर अनेक वेळा ठेवले आहेत. उपयोग झाला नाही म्हणून तर शेतीची दुर्दशा झाली.
    ४ एरवी सदर समारंभ म्हणजे, “पालथ्या (रिकाम्या) घागरीवर पाणी” -असे म्हणावे लागेल. अशी हताशा समाजात सर्व स्तरांवर दिसते. केवळ खाज असते म्हणून माणसं कामं करत रहातात. किंवा आपण काहीच करत नाही या गंडाचा बळी होऊ नये म्हणून कामं करावी लागतात. मराठी विज्ञान परिषद आज कित्येक वर्षं विज्ञान प्रसार आणि मराठी या दोन विषयांना धरून नेटानं खटपट करत आहे. मराठी समाजावर त्यामुळं ओरखडाही उमटलेला नाही, तरीही मविपला काम करतच रहावं लागतं. परवा झालेल्या कार्यक्रमातला जलसंधारणाचा विषय मविपचे चिंमो पंडित इत्यादींनी १९८० नंतर कित्येक वेळा ऐरणीवर आणला, परिसंवाद घडवले. मविपच्या पत्रिकेचे मागले किती तरी अंक या विषयानं भरलेले आहेत. १९९० ते २०१७. तोच तोच विषय गेली २७ वर्षं परिषद मांडतेय. मुख्यमंत्री येतात आणि जातात. सगळं कसं जागच्या जागी. परिषदेला कंड आहे. परिषद चालवणाऱ्यांना कंड आहे. तो कंड अजून शिल्लक आहे हेच त्यातल्या त्यात बरं.

  12. Nilu Sir,
    Why social activists never take up the issue of farmer suicides. They are always after dams and large projects – how many farmers have committed suicide due to displacement? If moneylenders and wrong agricultural practices are reasons for downfall of agriculture and farmers why no one says stop agriculture like they say about large projects? Is it because its easy to throw stone on glass houses? or is there some basic fault in understanding farming and poverty linkage?

  13. याला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा मार्ग आहे व त्यासाठी त्यांना पावसावर अवलंबून न राहता पिकाला पाणी देता आले पाहिजे अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे
    त्यासाठी कायम स्वरूपी कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू ठेवला पाहिजे
    या वर्षीही मराठवाड्यात पावसाने ओढ दिली , जर कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू असते तर पीक वाचविण्यासाठी आवश्यक तेवढा पाऊस पडणे शक्य असते
    पण त्याची तयारी मार्च एप्रिल पासून करावी लागते
    सोलापूर, औरंगाबाद ला कायमस्वरूपी रडार आवश्यक आहे हवामान खात्याच्या मागे लागून ते बसून घ्यावे लागेल
    असे उपाय आहेत
    पण ते आपण करत नाही
    आणि मग चीन चे केवळ कोतूक करतो की त्यांनी ऑलम्पिक उद्धघटन च्या वेळी बिजिग बाहेर पाऊस पडून कार्यक्रम सुरळीत पार पडला पण त्यासाठी त्यांनी अनेक वर्षे कृत्रिम पाउसाची पैसा खर्च केला होता हे लक्षात घेतले पाहिजे

  14. या ब्लॉग द्वारे आपण माहिती देण्याचे काम अतिशय योग्य प्रकारे केले आहे. या विषयावर काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींचे अभिनंदन.
    परंतु शेतकरी आत्महत्या हा विषय सारखा सारखा समोर येतो बाबत सगळ्यांनीच आत्मा परीक्षण करायची गरज आहे असे मला वाटते.
    एखादा माणूस आत्महत्या का करतो? कारण त्याचे मन कमजोर झाले असावे, दुःखाला सामोरे जाण्याची शक्ती कमी झाली असावी, उत्पन्नाचे मार्ग त्याने अवलंबले नसावेत किंबहुना अनाडी पणा हि कारणीभूत असावा. निराशा हे एक कारण, सहानुभूती मिळवणे दया मिळवणे हे देखील कारण असावे. किंवा प्रचंड रागातून देखील असे कृत्य होत असावे. अशाप्रकारे जगभरात मानववस्तीत अनेक आत्महत्या रोज घडत असतात. अशा प्रकारचा ठोकताळा मांडणे, रिसर्च करणे आवश्यक आहे. अनेक शहरातील आत्महत्यांचे रोजचे आकडे देखील १०-१२ च्या घरात असतात. कडो वर्षांपासून निसर्गचक्राचा भाग म्हणून असे घडत आले आहे. इतिहासात देखील असे दाखले मिळतातच कि.
    शेतकरी आत्महत्या या विषयाला मेडिया कडून मिळणारी प्रसिद्धी देखील एक सहानुभूती,भीती, निराशाच तयार करते असे मला वाटते. यामुळे देखील अनेक जण अशा आत्महत्या करण्यास उद्युक्त होत असावेत. जाहीर रित्या हा विषय न हाताळता स्थानिक पातळीवर, सामाजिक पातळीवर कौटुंबिक पातळीवर हळुवार हाताळावा व यात मानसोपचार तज्ज्ञ समाविष्ट करून घ्यावेत असे मला वाटते.
    तेंव्हा या विषयाचा उहापोह थांबवून समस्येचे निराकरण होण्यासाठी व त्यातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी योग्य प्रयत्न व्हावेत.
    यातून कोणाचीही भावना दुखवायचा हेतू नाही.

  15. शेतकर्‍यांच्या गरिबीचा प्रश्न कधीच सुटणार नाही. शेतीवर जगणारे ५५% आणि त्यांचा देशाच्या उत्पन्नातील हिस्सा १७%. म्हणजे शेतकर्‍यांची संख्या १७% पर्यंत कमी झाली तर ते इतरांच्या इतके श्रीमंत होतील! संख्या कमी होण्यासाठी १ त्यांना संतती नियमन——जोडप्याला एकच मूल. त्याला आता फार उशीर झाला आणि ते अवघड आहे. २ ३८% माणसांना शेतीबाह्य क्षेत्रात रोजगार मिळाला पाहिजे. पाचापैकी एक मिळवता धरला तर १० कोटी रोजगार नवीन तयार व्हायला हवेत. उद्योगासाठी जमीन मिळण्याला होणारा विरोध, कर्ज मिळण्यातील अडचणी, रोबोचा वाढता वापर हे सर्व पहाता नविन रोजगार इतके तयार होणे अशक्य.

  16. शेतकर्‍यांच्या गरिबीचा प्रश्न कधीच सुटणार नाही. शेतीवर जगणारे ५५% आणि त्यांचा देशाच्या उत्पन्नातील हिस्सा १७%. म्हणजे शेतकर्‍यांची संख्या १७% पर्यंत कमी झाली तर ते इतरांच्या इतके श्रीमंत होतील! संख्या कमी होण्यासाठी १ त्यांना संतती नियमन——जोडप्याला एकच मूल. त्याला आता फार उशीर झाला आणि ते अवघड आहे. २ ३८% माणसांना शेतीबाह्य क्षेत्रात रोजगार मिळाला पाहिजे. पाचापैकी एक मिळवता धरला तर १० कोटी रोजगार नवीन तयार व्हायला हवेत. उद्योगासाठी जमीन मिळण्याला होणारा विरोध, कर्ज मिळण्यातील अडचणी, रोबोचा वाढता वापर हे सर्व पहाता नविन रोजगार इतके तयार होणे अशक्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *