मस्कची मस्क्युलर कार

मस्कची मस्क्युलर कार

अमेरिकेला बंदुका आणि कारचं वेड आहे. दर १० अमेरिकन माणसांत १२ बंदुका असतात. कारच्या बाबतीत बोलायचं तर दर १० माणसांत ९ जणांकडं कार असते. लोकसंख्येमधे अर्धी अधीक संख्या मुलांची असते, त्यांच्याकडं कार नसते. त्यामुळं अमेरिकेतल्या वयात आलेल्या १० माणसांत १५ तरी कार असतात असं म्हणायला हरकत नाही.

बंदुक आणि कार ही अमेरिकेची राष्ट्रीय चिन्हं आहेत. त्यांनी ती अजून झेंड्यावर कशी घेतली नाहीत असा प्रश्न पडतो.

अमेरिकेची अर्थव्यवस्था कार भोवती फिरते.

फोर्ड कंपनीची गंमत. फोर्डनं गाड्या इतक्या स्वस्त तयार केल्या की त्याच्या प्रत्येक नोकराला गाडी घेता-देता आली पाहिजे. कामगाराला पगारही तेवढे की कार घेता आली पाहिजे.

प्रत्येकाकडं कार असेल अशा रीतीनं अर्थव्यवस्थेची रचना.

अमेरिकेत रेलवे नावालाच आहे. कुठल्या गावाला जायचं तर बसेसही अगदी कमीच असतात. कारनंच येजा करायची. कार उद्योगानं अशी व्यवस्था केली की रस्ते बांधले जातील, चौपदरी आठपदरी रस्ते बांधले जातील पण रेलवेचे रुळ पडता कामा नयेत.  कार उद्योगाचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर, राजकारणावर, पगडा आहे.

उद्योगपतीला पैसे मिळवायचे असले की त्याचं लक्ष  कार या उत्पादनाकडं जातं. लोकांच्या कार गळ्यात बांधण्यासाठी विविध स्कीमा. बँका आणि फायनान्स कंपन्या तयार होतात. पेट्रोलही स्वस्त करून ठेवतात. प्रत्येक माणूस स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्याच्याकडं कार असायलाच हवी. तोशीश सोसून, वाट वाकडी करून कोणाला एकाद्या ठिकाणी सोडून जाणं ही पद्धत नाही.

कारचं राजकारण बघा. काही राज्यांत कार चालवण्याचा परवाना नसेल तर मतदानाचा अधिकार मिळत नाही. काही काळे आणि गरीबांकडं कार नसते, त्यांच्याकडं परवाना नसतो, ते मतदान करू शकत नाहीत.

असो.

कार. वेगवान हवी. अती वेगवान हवी. कारमधे भरपूर स्पेस हवी. कारच रूपांतर व्हॅनमधे किंवा कॅराव्हानमधे करून त्यांचा वापर प्रवासी घर अशा रीतीनं करायचा. कारची खेचण्याची ताकद येवढी ठेवायची की ती एकादी लहान बोटही खेचून नेईल. घरंच्या घरं, तयार दोन मजली घरंही, ट्रकवजा कारनं ओढून नेतात, या गावातून त्या गावात. स्पर्धा करण्यासाठी रेसकार. 

रणगाड्यासारखी कार हवी. तिची चाकं ट्रॅक्टरच्या चाकायेवढी. कुठंही म्हणे नेता यायला हवी. नदीत, पर्वतात, खडकांत आणि वाळवंटात. डिझाईनही रणगाड्यासारखं. हमर नावाची कार त्यातून निर्माण झाली. हमर असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण.

मग महाग कार. या कंपनीची ५० हजार डॉलरला, त्या कंपनीचा ७५ हजारला आणि अमूक कंपनीची २ लाख डॉलरला. जेवढी महाग कार तुमच्याकडे तेवढे महान तुम्ही. सोन्याची कार करतात, कारवर आणि चाकाला हिरे लावतात.

काहीही करा, कारचं उत्पादन वाढवा आणि त्या खपवा.त्यासाठी काहीही धुत्रुंग करा.

अमेरिकन लोकांना पर्यावरणाची पडलेली नाही. अमेरिकन लोकं पेट्रोल जाळून किंवा चैनीच्या वस्तू वापरून हवेत जेवढे विषारी वायू सोडतात तेवढं सगळं जग मिळून एकत्रपणे सोडत नसेल. मतलब असा की अमेरिका आणि पर्यावरण शुद्ध राखणं याचा संबंध नाही. ट्रंप तर म्हणतात की वातावरण बदलत आहे हेही खोटं आहे, ती एक अफवा आहे.

तर अशा अमेरिकेला एकदम कारमुळं होणाऱ्या प्रदुषणाची काळजी उत्पन्न झाली. विजेवरच्या कार. चला. नवी कार, नवी गिऱ्हाईकं. प्रत्येक कंपनी विजेवरची कार काढतेय, सामान्य कारच्या पेक्षा महाग.  विजेवर कार चालवायची तर बलवान बॅटरी लागते. त्या बॅटरीत लिथियम लागतो. लिथियम खाणीतून काढणं फार खर्चाचं आणि कष्टाचं काम. मुख्य म्हणजे लिथियम खाणीतून काढून शुद्ध करण्यात प्रचंड ऊर्जा खर्च होते, प्रदूषण होतं.  ते प्रदूषण आफ्रिकेत होत असल्यानं अमेरिकन माणसाला त्याची चिंता नसते. तो ऐटीत वीजवाली कार वापरणार.

विजेच्या कार बाजारात यायला लागल्या.

तेही जुनं झालं. लोकांना भुलवायला नवं काय?

स्वयंचलित कार. कारमधे कंप्यूटर बसवायचा. कारच्या छतावर ३६० अंशात फिरणारे कॅमेरे लावायचे. कारच्या तोंडावर, मागल्या भागावर, दोन्ही बाजूला, चाकांच्या बाजूला सेन्सर लावायचे. कॅमेरे आणि सेन्सर त्यांच्या भोवती असणाऱ्या प्रत्येक वस्तूचं मोजमाप करणार, ती वस्तू किती वेगानं कुठून कुठं जातेय ते तपासणार. ही सर्व माहिती कंप्यूटरमधे भरणार. बस झालं काम. 

तुम्ही कारमधे बसायचं. ज्या जागी जायचंय त्या जागेचा पत्ता कंप्यूटरमधे भरायचा. चल म्हटलं की कार सुरू. वाटेत माणसं आली तर कार थांबणार, लाल सिग्नल आला तर थांबणार, शेजारून जोरात कार आली तर तिला वाट करून देणार, समोरचं वाहन अँब्युलन्स असेल तर कार थांबणार. जनावर आलं तरी थांबणार.सुरु होणं,  वेग, दिशा, मंदावणं, भरधाव होणं, थांबणं, सारं काही यंत्रं करणार. तुम्ही नुसतं कारमधे बसून रहायचं.

ड्रायव्हर लोकांना कामच नाही. तुम्हीही कारमधे बसलात की कार चालवण्यात वेळ घालवायचा प्रश्न नाही, हवे ते उद्योग करत बसा, कार चालत राहील. सॅन फ्रान्सिस्कोच्या रस्त्यावर स्वयंचलित कारच्या चाचणी फेऱ्या सुरू आहेत. तुम्ही तिकडं जावा. कंपनीकडं तुमची नोंद करा. तुम्ही योग्य लायकीचे आहात की नाही याची तपासणी कंपनी करेल. त्यांच्या लेखी तुम्ही लायक ठरलात की तुम्ही सांगाल तिथं कार तुमच्यासमोर येऊन थांबेल.

स्वयंचलित कारमधे अजून बरेच प्रॉब्लेम्स आहेत. तिच्यातल्या कंप्यूटरवर बरंच काम करावं लागेल. अमेरिकेत गायी म्हशी रस्त्यावर फिरत नाहीत. त्यामुळं गाय समोर आली तर कार थांबवावी अशी तरतूद सॅनफ्रान्सिस्कोतल्या गाडीत नाही. भारतातल्या रस्त्यावर खड्डे नामक प्रकार असतो, त्या खड्यांची खोली तळ्यायेवढीही असू शकते. ते मोजण्याची सोय अजून एसेफोमधल्या कारमधे नाही. मुबईत रस्त्यावर कधीकधी लालपिवळाहिरवा असे सगळे सिग्नल एकाच वेळी चालू असतात. त्यावेळी काय करायचं याचा निर्णय कंप्यूटरनं कसा करायचा? मुद्दा असा की स्वयंचलित अजून विश्वास ठेवण्यालायक नाही. त्यामुळं  त्यांचं उत्पादन सुरु झालेलं नाही.

ठीक.

 स्वयंचलित कार झाल्या.

पुढं?

उद्योगपती दिव्यातल्या राक्षसासारखा असतो. त्याला काम पाहिजे. त्याला पैसे हवे असतात. उदा. इलॉन मस्क पहा. त्याच्याकडं २४७.२ अब्ज डॉलर आहेत. तो दर मिनिटाला ६ हजार ८८७ डॉलर मिळवतो. दर मिनिटाला. तरीही ते पैसे त्याला पुरत नाहीत. त्यानं विकत घेतलेल्या कंपनीनं त्याला नुकताच ५६ अब्ज डॉलरचा चेक दिला. हा म्हणे त्याचा वर्षाचा मेहेनताना. इंग्रजीत याला काँपेन्सेशन असा शब्द आहे. मराठीत त्याचं सामान्य भाषांतर भरपाई असं होतं.आपण त्याचं वर्षाचं मानधन किंवा पगार म्हणूया.

तरीही बिच्चाऱ्या मस्कला पैसे कमीच पडतात.

मस्कनं विजेवर चालणारी टेसला कार काढली. 

नंतर त्यानं जवळ जवळ विमानाच्या वेगानं जाईल अशा कारचं मॉडेल तयार केलंय. इतकी वेगवान कार कुठल्या रस्त्यावर चालणार? बाकीच्या गाड्यांचं काय? तर मस्कनं लास वेगसमधे एक स्वतंत्र भुयारी मार्ग बांधला. त्यात तुम्ही कार घालायची, सूसाट दुसऱ्या बाजूनं बाहेर पडायचं. वा वा. काही लोकं गंमत म्हणून त्या वाटेनं फिरून आले. पण खुद्द लास वेगसच्या मेयरला प्रश्न पडला की मस्कची ही गाडी वेगसच्या कुठल्या रस्त्यावरून फिरवायची. या वेगानं कार चालवली तर ती पाच दहा मैल जाईल पण वाटेतल्या शेदोनशे गाड्या उडवून देईल. त्या गाडीवानांचं काय करायचं? मस्क म्हणतो मला काय करायचंय? ते तुम्ही पाहून घ्या. मेयरसमोर प्रश्न आहे की शेदोनशे मैल लांबीचा आणि चार पाच पदरी रस्ता या कारसाठी स्वतंत्रपणे करावा लागणार. किती खर्च होईल? मेयर कॅलक्युलेटर घेऊन बसला. डॉलरची शून्य थांबेचनात. सध्या अमेरिकेची अवस्था अशी आहे की असलेल्या रस्त्यातले किती तरी टक्के उखडले गेलेत आणि ते दुरुस्त करायला सरकारकडं पैसे नाहीयेत. मग हे रस्ते कुठून करायचे?

मस्कनी अजून आशा सोडलेली नाही. डोनल्ड ट्रंप त्यांचे दोस्त आहेत. ट्रंपच्या निवडणुकीसाठी मस्कनं जाम पैसे दिलेत. मस्कच्या मालकीची एक्स (जुनी ट्विटर) ही कंपनी ट्रंपच्या बाजूनं भरपूर खोटी माहिती एक्सवर पेरतेय, बेकायदा. ट्रंप निवडून आले की मस्कच्या विमानवेगी कारसाठी रस्ता होईल. मस्क वाट पहातोय.

मूळ प्रश्न शिल्लकच. पैसे कमी पडतात.

पैसे पाहिजेत. लोकांना XX बनावायचं आहे.

मस्कनं आता एक सायबर ट्रक काढलाय.

सायबर ट्रक म्हणजे काय?

अमेरिकेत पिक अप ट्रक हे वाहन खूप वापरलं जातं. माणसं शेतावर जाताना पिकअपच्या मागच्या बाजूच्या जागेत वस्तू भरून नेतात. घरांना आंगण असतं. तिथं झाडं असतात, हिरवळ असते. गॅरेजमधेही खूप कामं असतात. घरातली दुरुस्ती असते. अनंत कामं, अनंत औजारं, हत्यारं. नेआणीला पिकअपचा उपयोग होतो. अमेरिकेत २०२३ साली २२ लाख पिक अप वाहनं विकली गेली.

 चला. आता पिकअप

मस्कनी नवा पिकअप ट्रक डिझाईन केला. सायबर ट्रक.या ट्रकला गोलाई नाही, नजाकत नाही, सौंदर्य नाही. अत्यंत तीक्ष्ण अशा कडा आहेत, तीक्ष्ण कोन आहेत. सिनेमात सायन्स फिक्शनमधे परग्रहावरची वाहनं दाखवतात तसा हा सायबर ट्रक दिसतो. माजात असलेल्या बलवान पुरुषासारखा तो दिसतो. सध्या मॅचो प्रतिमा आवडणारी खूप माणसं झालीत. अल्फा पुरुष. म्हणजे मर्दानी पुरुष. माज, ताकद, मर्दानी, स्त्रीला नमवणारा सेक्सी पुरुष. वगैरे. अगदी ठरवून तसं डिझाईन केलंय, तशी जाहिरात केलीय. अनंत ऑटोमॅटिक फीचर्स आहेत, बराच ऑटोमॅटिक आहे.

किमत ८० हजार डॉलरपासून सुरु होते.

पहिले काही ट्रक बाजारात आले. घेणाऱ्यांनी ते अत्यंत वेगानं चालवून अपघात घडवले. ट्रक वाळवंटात फसले, पाण्यात घरंगळले, रस्त्यावर ते नीट पार्क करता आले नाहीत. तक्रारी आल्या. 

मस्कच्या कंपनीनं जाहीर केलं की ट्रकमधे काही दोष राहिलेत. बाजारातले ट्रक कंपनीनं परत मागवलेत. आता म्हणे ते ठीक करून मालकांना परत देणार.

कोल्हापूर, लातूर इत्यादी ठिकाणी काही माणसं निश्चितच मागणी नोंदवून बसलेले असणार. त्यांची मागणी पूर्ण होईल तेव्हां आपल्याला ट्रकचं दर्शन होईल.

।।

Comments are closed.