मोदींच्या जाकिटाचं बटण तुटतं तेव्हां…

मोदींच्या जाकिटाचं बटण तुटतं तेव्हां…

लोककल्याण मार्गावरच्या सात नंबरच्या बंगल्यातल्या कार्यालयात नरेंद्र मोदी बसले होते. समोर चार अधिकारी फायली घेऊन उभे होते. खूप अंतरावर.

दूरदर्शनची माणसं मोदींचं भाषण रेकॉर्ड करण्याची तयारी करत होते. कॅमेरा सेट झाला होता.  दूरदर्शनचा अधिकारी आणि रेकॉर्डिंग करणारे कर्मचारी कुजबुजत होते, सारं काही ठीक आहे ना याची तपासणी करत होते. मोदी सरांनी मान्यता दिली की रेकॉर्डिंग सुरु व्हायचं होतं.  

स्क्रिप्ट तयार झालं होतं. मोदी लॉक डाऊन १४ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर करणार होते. अर्थात हे फक्त स्क्रिप्ट तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच माहीत होतं. बाकीच्या माणसांना मोदी सर आज काय घोषणा करणार याची उत्सूकता लागून राहिली होती. 

मोदींनी स्क्रिप्टवर एक नजर टाकली. आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांशी टेलेकॉन्फरन्समधे चर्चा झाली होती. सर्व मुख्यमंत्री म्हणत होते की जो काही निर्णय घ्यायचा तो प्रधान मंत्र्यांनीच घ्यावा आपण त्या नुसार वागू. मोदी खुष दिसत होते. सारं कसं आपल्या म्हणण्यानुसार चाललंय, देशातले सगळे मुख्यमंत्री कसे निमूटपणे आपलं ऐकताहेत या भावनेनं ते सुखावले होते.

स्क्रिप्टवर नजर टाकून मोदी खुर्चीतून उठले. लगोलग बाजूला उभे असलेले दोन अधिकारी पुढं सरसावले, त्यांनी खुर्ची मागं सरकवली. मोदी उभे राहिले,  वळले आणि दालनाबाहेर जायला निघाले.

अधिकारी बुचकळ्यात पडले. कानांवर हेड फोन लावून तयार असलेल्या दूरदर्शन अधिकाऱ्यानं हेडफोन काढून ठेवला आणि सहकाऱ्याकडं प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. सर कुठं निघालेत? रेकॉर्डिंगचं काय झालं?

मोदींचं कार्यलय आहे सात नंबरच्या बंगल्यात. ते रहातात पलिकडच्या पाच नंबरच्या बंगल्यात. मोदी पाच नंबरकडं निघाले.

कमांडो त्यांच्याभोवती कडं करून चालू लागले.

मोदी गालातल्या गालात हसले. कमांडोंनी डोळ्याच्या कोपऱ्यातून एकमेकांकडं पाहिलं. मोदी सर  येवढे खुष कशानं झालेत असं त्यानी एकमेकांना डोळ्यांनी विचारलं.

“ या करोनानं काय केलंय पहा. सगळे भारतीय एकमेकापासून पाच फूट अंतरावर चालू लागलेयत. हीच माणसं मला नावं ठेवत. म्हणत की मोदींपासून सर्व माणसं पाच फुटावर असतात, कोणी त्यांच्या जवळ जायला धजावत नाही (अपवाद अर्थातच फक्त अमीतभाईचा). आता सर्व माझं अनुकरण करू लागलेत.” 

सरांनी आपल्याकडं कां नजर टाकली ते त्यांच्यापासून अंतर ठेवून चालणाऱ्या कमांडोंना कळलं नाही.

मोदी पाच नंबरच्या बंगल्यापाशी पोचल्यावर तिथल्या नोकरांची धांदल उडाली. मोदी सर या वेळी यावेत अशी त्यांची अपेक्षा नव्हती. कशासाठी बरं ते आलेत असा विचार करत एका चपराशानं  दरवाजा उघडला.  

मोदी बाहेरचा हॉल ओलांडून आतल्या खोलीकडं गेले. ही खोली कपड्यांची. हॉलमधे उभे असल्यांपैकी एक पीए मोदींसोबत खोलीत गेला. हा पीए मोदींचा कपडेपट सांभाळतो, आपण त्याला कपडेपीए म्हणूया.

खोलीतल्या  कपाटांत  शर्ट, पायजमे, नाना प्रकारच्या टोप्या, जाकिटं इत्यादी घड्या घालून ठेवलेल्या, काही कपडे हँगरवर टांगलेले.

दररोज सकाळी आणि संध्याकाळी मोदींच्या कपडेखान्यात दोन माणसं ये जा करतात. ते कपडे आणतात, काही कपडे घेऊन जातात. मोदींचा दिवसाचा कार्यक्रम ते त्यांच्या कार्यक्रमपीएकडून घेतात आणि त्यानुसार कपडे तयार ठेवतात. सकाळी योगासनं करतात तेव्हांचे कपडे, नंतर सकाळीच घरातल्या ऑफिसमधे सेक्रेटरींकडून ब्रीफिंग घ्यायला बसतात तेव्हांचे कपडे, साऊथ ब्लॉकमधे जायचे कपडे, कुठं भाषण असेल तर त्या  वेळचे कपडे, टीव्हीवर कार्यक्रम असेल तर त्या वेळचे कपडे. कपडेपीएला मोदींच्या कपड्यांची फार काळजी असते. 

कपड्यांची मापं दिल्लीतल्या शिंप्याकडं आहेत. मागं एकदा मोदीना वाटलं होतं की त्यांचं वजन काहीसं वाढलंय, घेर वाढलाय. तेव्हां शिंपी घरी येऊन मापं घेऊन गेला. पण त्यानंतर पुन्हा मापं घ्यायची वेळ आलेली नाही.

मोदी परदेशात दौऱ्यावर जात तेव्हां तर जाकिटांचा, कोटांचा ढीगच. एकदा मोदी अमेरिकेला जायला निघाले, विमानात बसले, विमान सुरु झालं आणि काही काळानं विमान बंद झालं. तळावर धावपळ क उडाली. एक अधिकारी शिडी उतरून धावपळ करत तळावर परतला. मोदींच्या घरी फोन. मग तिथून वाँव वाँव करत एक गाडी आली. तिच्यातून खोके आले. त्यात कपडे होते. मग विमान सुरु झालं. 

विमानतळावरचा एक रिटायर व्हायला आलेला माणूस ही गंमत पहात होता. त्याला नरसिंह रावांची परदेशवारी आठवली. त्यांचं विमान हवेत एक चक्कर मारून विमानतळावर परतलं. अशीच धावपळ उडाली होती. नरसिंह रावांच्या घरून पोळपाट लाटणं आल्यावर रावांचा दौरा सुरु झाला होता.

 कपडे खोलीकडं जाताना मोदी म्हणाले मला जाकीट बदलायचं आहे.

कपडेपीएची गडबड उडाली. मोदींचा ऑफिसमधला कपड्यांचा  जोड आधी वापरून झाला होता, आता ते रात्रीचे कपडे वापरणार होेते, उद्याच्या कार्यक्रमांच्या कपडे नियोजनातलं जाकीट काढायचं की काय करायचं ते त्याला समजेना. त्याला घाम फुटला.

मोदी कपाटासमोर उभे राहिले. हँगरला लावलेल्या जाकिटांकडं त्यांनी एक नजर पाहिलं. हँगर तिरपे करून एक जाकीट पाहिलं. नंतर दुसरं पाहिलं. त्यांचा निर्णय होईना. जाकीटपीए अंतरावर  गोंधळून उभा होता.

मोदींनी एक जाकीट काढलं. पाठीमागं असलेल्या फुलसाईझ आरशासमोर ते जाकीट अंगाला लावून पाहिलं. क्षणभर विचार केला. ते जाकीट पीएसमोर धरलं.

पीएनं ते हाती घेऊन बटणं काढली आणि समोर धरलं. मोदी पीएकडं पाठ करून उभे राहिले. पीएनं जाकीट त्यांच्या अंगात चढवलं. ते आरशासमोरच उभे होते. त्यांनी बटणं लावायला सुरवात केली. खालून सुरवात करून बटणं लावत वर सरकत असताना गळ्याजवळच्या बटणाला त्यांनी हात लावला आणि ते बटण तुटलं.

मोदींच्या कपाळाला आठ्या पडल्या.

पीए गोंधळला. 

मोदींनी जाकीट काढलं आणि पीएसमोर धरलं.

आधीचा घाम पुरता वाळला नसतांना पुन्हा पीएला घाम फुटला. त्यानं जाकीट साईड टेबलवर ठेवलं आणि प्रश्नार्थक नजरेनं मोदी सरांकडं पाहिलं.

मोदी काय म्हणणार आहेत याची वाट न पहाता तो खोलीतल्या टेबलाचा खण तपासू लागला. तो सुईदोरा शोधत होता.

पीएला आणि मोदींना पहिल्यांदाच कळलं की घरात सुईदोरा नाही. कारण सुई दोरा वापरण्याची वेळ कधी आली नाही, येणारही नव्हती. शर्ट, जाकीट, पायजम्यात काही गडबड झाली तर दुरुस्तीचा प्रश्न नव्हता, दुसरे पर्यायी कपडे हजर असत.

मोदींच्या कपाळावर आठ्या पडल्या. ते कपाटाकडं वळले, जाकीट शोधू लागले. त्याना एकही जाकीट पसंत येईना.

जाकीटपीए हे सर्व पहात उभा, तो काहीच करू शकत नव्हता.

एक जाकीट मोदीना आवडलं. पीएनं ते मोदींच्या अंगावर चढवलं.

इकडे ऑफिसातले अधिकारी आणि टीव्हीवाले चुळबूळ करत होते. मोदी सर का येत नाहीयेत ते त्याना कळत नव्हतं.

जाकीट घालून मोदी खोलीच्या बाहेर पडले. जाकीट ठीक ठाक करून ते बाहेर पडणार तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की जाकीटाच्या वरच्या खिशात नेहमी  एक रुमाल त्रीकोण करून उभा असतो तो दिसत नाहीये.

आता मोदीचा तोल ढळला.

“ यें क्यां हो रहा हैं? रुमांल कहां है? आंप लोंग क्यां कांम करतें हैं. किसीनें देखां नही? ” मोदी अनुनासिकीत बोलले.

पीए सटपटला. त्यानं मोदींना प्रत्यक्ष बोलताना कधी ऐकलं नव्हतं, तो नेहमी त्यांची भाषणंच टीव्हीवर ऐकत असे. त्याला क्षणभर भास झाला की तो टीव्हीच पहातोय.

मोदींनी रागारागानं बटणं काढली, जाकीट काढलं. पीएनं ते घेतलं.

मोदी जोरात म्हणाले “ भाषण रद्द. मी टीव्हीवर भाषण करणार नाही.”

ते येवढ्या जोरात बोलले की दाराबाहेर उभा असलेला नोकर आणि कमांडो घाबरून दारात येऊन उभे राहिले. त्याना काही कळेना.

मोदी खुर्चीकडं सरकले. कमांडो धावला, त्यानं खुर्ची मागं ओढायची वाट न पहाता मोदी स्वतःच खुर्ची सरकवून बसले. 

चार कमांडो, एक चपराशी, दोन पीए अर्धवर्तुळ करून उभे राहिले. मोदी रुसलेल्या लहान मुलासारखे दिसत होते. कमांडोंना हसता पण येईना. कसं हसणार?

तिकडं सात नंबरमधल्या लोकांनाही काय करायचं ते कळेना. टेलेकास्ट सुरू करायची वेळ झाली होती. टीव्ही केंद्रातले अधिकारी वाट पहात होते कारण त्यांनी मोदीजी राष्ट्राला उद्देशून बोलणार आहेत असं अनाऊन्सही करून टाकलं होतं.

एक सीनियर अधिकारी पाच नंबरमधे पोचला.

मोदी हुप्प होऊन बसलेले पाहून त्यालाही काय करायचं ते कळेना. मोदींचं हे रूप तो प्रथमच पहात होता. काय घडलंय त्याचा अंदाज काही त्याला येईना.

एकाद दोन मिनिटं सर्व मंडळी गप्प उभी.

शेवटी मोदी सभेत बोलताहेत अशा थाटात हात वर करून म्हणाले “ मै अनाऊन्स नही करूंगा. आप जानते है की लॉक डाऊन १४ तारीखतक बढाना है. जाईये. कॅबिनेट सेक्रेटरीला सांगा की त्यानं तशी घोषणा करून टाकावी.”

अधिकारी कंबरेत वाकून म्हणाला “ येस सर.” 

मोदींना हात हवेत फिरवत सर्वाना जायची खूण केली.

अधिकारी पळाले. एका अधिकाऱ्यानं एक चार ओळीची प्रेस नोट काढून प्रसिद्धी कार्यालयाकडं पाठवली.

भारतात पहिल्या प्रथमच एक मोठी घोषणा पंतप्रधान मोदींच्या आवाजात लोकांच्या कानी पडली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावानं एक  घोषणा निर्जीव कागदावरच्या चार निर्जीव ओळीतून नागरिकांसमोर आली.

।।

निळू दामले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *