मोदींच्या दिल्ली विजयाचा अर्थ
।।
India’s Power elite: Caste, class and cultural revolution.
Sanjay Baru.
||
संजय बारू यांच्या प्रस्तुत पुस्तकाचा विषय दिल्लीतल्या सत्तावर्तुळातली क्रांती असा आहे.
एका वाक्यात सांगायचं तर दिल्लीवरचा एका विशिष्ट संस्कृतीचा ताबा नरेंद्र मोदी दूर करून तिथं एक पर्यायी राजकीय संस्कृती वसवत आहेत, असं संजय बारू यांचं म्हणणं आहे.
संजय बारू पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सल्लागार होते.
२०१४ पर्यंत दिल्लीतल्या सत्तावर्तुळात इंग्रजीत विचार करणारे, ब्राह्रण (ऊच्च वर्णीय), समाजाच्या वरच्या आर्थिक थरातले, हिंदी पट्ट्यातले,कुलीन (घराण्याची परंपरा असणारे)आणि उद्योगपती बसले होते. या लोकाना दरबारी लोक असंही म्हटलं जात असे, किंवा लुटेनच्या दिल्लीतले लोक असं म्हटलं जात असे.
संजय बारू म्हणतात की २०१४ नंतर हे सत्तावर्तुळ मोदींनी पुसून टाकलं आणि त्या जागी एक नवं सत्तावर्तुळ तयार केलं. या सत्तावर्तुळात मध्यम जाती, देशी भाषा बोलणारे, शेतीतून वर येऊन उद्योगी झालेले आणि शहरी मध्यम वर्गीय मोदींनी आणले.
भारतातली सत्ता रचना कशी होती यावर बारूनी सविस्तर लिहिलंय. नोकरशाही, उद्योग, न्यायव्यवस्था, शेती, फ्यूडल रचना, जातीची उतरंड अशा एकेक मुद्द्याचा धावता इतिहास बारू यांनी मांडला आहे. भारतावर कायम वरच्या जातींची सत्ता राहिली, मंडल आयोगानं वरच्या जातींची मक्तेदारी मोडली आणि इतर मागास जातीतल्या लोकाना शिक्षण आणि रोजगारात आरक्षण दिलं. हा बदल घडवण्यापाठी डॉ. लोहिया इत्यादींचा विचार कसा गुंतला होता याचं विवेचन बारू यानी केलं आहे.
शेतीतली क्रांती झाल्यानंतर शेतकऱ्यांमधे एक सधन वर्ग निर्माण झाला आणि या वर्गानं आपल्याकडला पैसा वापरून उद्योगात, रियल इस्टेट इत्यादी ठिकाणी प्रवेश केला. शेतीतले मध्यम वर्ग अशा रीतीनं आर्थिक व ताकदीच्या दृष्टीनं सत्तावर्तुळात पोचले.तामिळनाडू, आंध्र, गुजरात, महाराष्ट्र या राज्यातले देशीभाषा, देशी संस्कृती असणारे शक्तीमान लोक दिल्लीतल्या इंग्रजी दिल्लीकर दरबारीना दूर सारून एक नवं सत्तावर्तुळ तयार करत आहेत.
१९९० नंतर सेवाक्षेत्र, आयटी यात घडलेल्या क्रांतीमुळं शहरी मघ्यम वर्ग मातबर झाला, त्यानंही सत्तावर्तुळात प्रवेश केला. या बदलांची दखल भाजपनं घेतली आणि राजकीय बांधणी केली.
(संजय बारू पुसल्या गेलेल्या सत्तावर्तुळाचा भाग होते, आहेत. बारू यांचे आजोबा आणि वडील सनदी अधिकारी होते. स्वतः बारू मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार होते. आजोबा आणि वडील यांच्या सरकारातील स्थानामुळं केंद्रातले अनेक मंत्री, पंतप्रधान नरसिंह राव इत्यादींशी त्यांची व्यक्तिगत जवळीक होती. टाईम्स, बिझनेस स्टँडर्ड इत्यादी पेपरात ते संपादक होते.).
सत्तावर्तुळाची व्याख्या स्वातंत्र्यपूर्व काळातले ब्रिटीश अभ्यासक कोणत्या पद्धतीनं करत होते आणि अमेरिकेत सत्तावर्तुळ कशाला म्हणतात याचे अभ्यासू संदर्भ बारू यांनी पुस्तकात दिले आहेत.
संजय बारू यांनी व्यक्तिगत पातळीवर सत्ता खूप जवळून पाहिली असल्यानं स्वतःचे प्रथम पुरुषी रंजक अनुभव पुस्तकात येतील असं पुस्तक वाचण्यापूर्वी वाटलं होतं. वाजपेयी आपलं पामेरियन कुत्रं घेऊन खान मार्केटमधे कसे फिरत असत, नरसिंह राव यांची भेट एका माणसाला कशी मिळाली असे अगदीच नाममात्र किरकोळ रंजक अनुभव बारू यांनी पुस्तकात दिले आहेत.
घटना परिषदेतले सदस्य के संथानम यांचं एक वाक्य पुस्तकाच्या कथनाच्या केंद्रस्थानी आहे. संथानम म्हणतात ” स्वतंत्र भारतानं एक राज्यघटना तयार केली, तीन क्रांत्या साधल्या. १. राजकीय क्रांती. या क्रांतीत आपण लोकशाही स्वीकारली. २. सामाजिक क्रांती. या क्रांतीत भारतानं स्वतःला मध्ययुगीन जात, धर्म, जुन्या परंपरा इत्यादीतून सोडवलं आणि कायद्याचं सेक्युलर राज्य स्थापन केलं. ३. आर्थिक क्रांती. भारतानं फ्यूडल व्यवस्थेतून बाहेर पडून विज्ञानावर आधारित आधुनीक शेती व उद्योग विकासात प्रवेश केला.”
बारू म्हणतात की नरेंद्र मोदींनी चौथी सांस्कृतीक क्रांती घडवलीय, घडवायचं ठरवलंय. दिल्लीमधे २०१४ पर्यंत असलेलं सत्तावर्तूळ भेदून नरेंद्र मोदी तिथं देशी भाषा बोलणाऱ्या मध्यमवर्गाची आणि मध्यम जातीची भरती करून नव्या सांस्कृतीक क्रांतीचा पाया मोदींनी घातला आहे असं बारू यांचं म्हणणं आहे.
नरेंद्र मोदी स्वतःच तेली म्हणजे इतर मागासवर्गीय जातीतले आहोत असं म्हणतात. मोदी गुजराती धाटणीचं हिंदी बोलतात, इंग्रजी बोलत नाहीत, इंग्रजीत विचार करत नाहीत. मोदींचा जनाधार गुजरातेत आहे, हिंदी पट्ट्यात नाही. मोदींनी भारतात तयार झालेला शहरी मध्यम वर्ग हाताशी धरला आहे, तो त्यांचा मतदारवर्ग आहे. शहरी मध्यम वर्ग, मोठे भांडवलदार आणि शेतकरी असे वर्ग त्यांनी नाना घोषणा करून आणि त्यांच्या भल्याच्या योजना जाहीर करून गोळा केले आहेत. आधीच्या सत्तावर्तुळाला मुसलमान आणि दलित जातींचा पुळका होता. मोदींनी त्या दोन्ही वर्गांना दूर ठेवलं आहे.
२०१४ पर्यंत दिल्लीतलं सत्तावर्तुळ काँग्रेसी होतं, डावं होतं, सेक्युलर होतं. मोदी आता नवं ” हिंदू” सत्तावर्तुळ निर्माण करू पहात आहेत असं बारू म्हणतात. एका उद्योगपतीचा हवाला बारू देतात.तो उद्योगपती बारूना म्हणाला ” मोदींची कित्येक धोरणं मला पटत नाहीत, तरीही मी मोदीना मत देतो कारण मी हिंदू आहे.” थोडक्यात असं की आता हिंदू या विचाराभोवती देश फिरावा अशी मोदींची योजना आहे.
बारू नेहरू स्मारक म्युयिझम आणि ग्रंथालयाचं उदाहरण देतात.
ब्रिटीश लष्कर प्रमुखासाठी बांधलेल्या वास्तूत नेहरू राहिले. त्या वास्तूचं नामकरण तीन मुर्ती भवन असं करण्यात आलं होतं. नेहरूंच्या निधनानंतर त्या वास्तूचं रूपांतर यथावकाश नेहरू स्मारक संग्रहालय आणि ग्रंथालय असं करण्यात आलं. त्या संस्थेवर नेहरू घराण्यातली आणि काँग्रेस पक्षाची माणसं असत. तिथं काँग्रेस पक्षाच्या बैठका होत. वास्तवात ती वास्तू काँग्रेसी आणि नेहरू कुटुंबाची वास्तू झाली होती.
मोदींनी संस्थेच्या चालकांतून काँग्रेसी लोकांना हाकलून दिलं आणि भाजपच्या माणसांची भरती केली. स्मारकातले काँग्रेसी पुढाऱ्यांचे फोटो त्यांनी हलवले. तिथं भाजपच्या पुढाऱ्यांचे फोटो लावले.
यातून मोदीनी काय साधलं? नेहरू, काँग्रेस आणि त्यांचं वर्तुळ त्या वास्तूतून घालवलं. काँग्रेसच्या जागी भाजप, नेहरूंच्या जागी संघी माणसं आली.
दिल्लीचं सत्ताकेंद्र असलेल्या केंद्रीय विभागातल्या सर्व इमारती बाजूला सारून एक सेंट्रल व्हिस्टा तयार केला जातोय. बारू म्हणतात की दिल्लीवर असलेली ब्रिटीशांची छटा मोदींना पुसून टाकायची आहे, दिल्लीला एक नवं रूप मोदीना द्यायचं आहे. पण पर्यायी वास्तू ” हिंदू “अथवा ” भारतीय ” नाहीत. बारू सुरवातीला म्हणतात तशी चौथी सांस्कृतीक क्रांती काही त्यातून झालेली नाही.
न्यायमूर्ती रंजन गोगोई यांना मोदी यांनी चोंबाळलं. त्यांना राज्यसभेवर घेतलं. बाबरी मशिदीच्या जागी राम मंदीराचे पुरावे पुरातत्व खात्याला सापडले नसतांनाही गोगोई यांनी बाबरी पाडण्याला माफी देऊन राम मंदीर बांधायला परवानगी दिली. हा निर्णय न्यायव्यवहारात बसणारा नाही. या निर्णयानंतर गोगोई राज्यसभेत पोचले. या दोन घटना एकत्र केल्या तर काय दिसतं? बाबरी पाडण्याला न्यायसंस्थेनं मान्यता दिल्यासारखं झालं. पण त्यातून न्यायव्यवस्थेत सांस्कृतीक बदल झाले काय?
भारतातल्या सर्व लोकांना, सर्व राजकीय पक्षांना रामा बद्दल भक्ती आहे, बहुतेक माणसं आयुष्यभर राम मंदिरात जात असतात. मोदी आणि संघाचे कट्टर विरोधकही अयोध्येतल्या राम मंदीरात जातील.
संघानं राम मंदीर हा राजकीय मुद्दा केला, राम मंदीर उभारलं म्हणजे मुसलमानांवर सूड घेतला असं भासवलं या बद्दल भाजप विरोधकांना आक्षेप आहे. अशा स्थितीत राम मंदीर बांधायला घेतलं ही काही सांस्कृतीक क्रांती नाही.
राम मंदीर, जय श्रीराम अशी घोषणा, कपाळावर टिळक, भगवा झेंडा, स्त्रियांनी पायघोळ कपडे घालणं, शाकाहार इत्यादी गोष्टी झाल्या म्हणजे सांस्कृतीक क्रांती होणार नाहीये. त्या गोष्टी स्वतंत्रपणे भारतीय माणसं कमी अधिक प्रमाणावर करत आलीयत. मोदी आणि त्याचे संघीय लोक त्या गोष्टींचा वापर सत्ता मिळवण्यासाठी करत आहेत येवढंच. म्हणजे मोदींच्या डोक्यात सांस्कृतीक क्रांती वगैरे काहीही नाही.त्यांना फक्त राजकारण करायचंय.
व्हीके सिंग यांना मंत्री केलं. रावत यांच्यासाठी एक पद तयार केलं ज्याचा वापर लष्करावर दडपण आणण्यासाठी करता येईल. मुंबईतल्या पोलिस कमीशनरना थेट मंत्रीपदावर घेतलं. नोकरशाहीत जागोजागी आपली माणसं बसवली. ही माणसं नोकरशाही, न्यायव्यवस्था, लष्कर इत्यादीत असं काय मोठं करणार आहेत ज्याला सांस्कृतीक क्रांती म्हणता येईल. भारतीय न्यायव्यवस्था, नोकरशाही, बँकिंग, अर्थव्यवहार इत्यादींमधे काढून टाकायला हव्यात अशा कोणत्या अहिंदू गोष्टी आहेत?
सावरकर ते दीनदयाल उपाध्याय यांनी हिंदुत्व-भारतीयत्व या बद्दल जे काही लिहून ठेवलंय त्यात खूप म्हणजे खूप गोंधळ आहे, त्याला विश्वासार्ह सैद्धांतिक आधार नाही. संघानं स्वीकारलेल्या हिंदुत्व व्यवहारातून एकच गोष्ट स्पष्य होते ती म्हणजे त्या मंडळींना राजकीय सत्ता मिळत नव्हती याचा सल होता. काँग्रेसनं त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं याचा त्यांना त्रास होत होता. त्या मंडळींचा सगळा खटाटोप हिंदू मतदारांना सावकाशीनं खोटं सांगत, दिशाभूल करत, हिंदू मानसातील मुसलमानांबद्दलचा दुरावा आणि गैरसमज वापरत एक मतबँक तयार करायची येवढात होता आणि आहे. त्यांचा हा प्रयत्न खूप कष्टानं आणि खूप काळानं २०१४ साली पूर्णत्वाला गेला.
याला सांस्कृतीक क्रांती म्हणता येईल काय? बारू तसं धूसर अस्पष्टपणे सुचवतात. पण त्यांची मांडणी त्यांच्या हा विचार सिद्ध करत नाही.
सांस्कृतीक बदल,सांस्कृतीक क्रांती म्हणत असताना स्वतः बारू किंवा मोदी यांना काय अभिप्रेत आहे याचा खुलासा पुस्तकात होत नाही. बारू यानी दिलेल्या माहितीवरून येवढंच सिद्ध होतं की मोदी यांनी आधीच्या सत्तावर्तुळातल्या माणसांच्या जागी आपल्या जवळची माणसं आणली आहेत.
।।