युस्कारा या भाषेची जगण्याची धडपड
भाषेची जगण्याची धडपड.
स्पेनमधे अनेक भाषा बोलल्या जातात. मुख्य भाषा स्पॅनिश. स्पॅनिशचीही अनेक रुपं बोलली जातात.
युस्कारा ही भाषा स्पेनमधे आज सुमारे ७ लाख माणसं, म्हणजे स्पेनच्या लोकसंख्येच्या दोन टक्क्यापेक्षा कमी माणसं, बोलतात. नेमका आकडा कळायला मार्ग नाही. बास्क आणि नवारा विभागातच ही भाषा बोलली जाते. ही भाषा स्पॅनिशपेक्षा इतकी वेगळी आहे की स्पॅनिश लोकांना त्यातलं हो की ठो कळत नाही.
ही भाषा दडपण्याचा प्रयत्न कित्येक शतकं होतोय. गुप्तरीत्या घराच्या अंधाऱ्या माजघरांत ही भाषा आजांनी नातवांकडं सरकवली.
स्पेनमधे बाहेरची माणसं येणं जाणं हा प्रकार इसवी सनापुर्वी अनेक शतकं चालला आहे. फ्रान्स, पोर्तुगाल हे देश तर लागूनच आहेत. परंतू ग्रीस, मध्यसमुद्राच्या किनाऱ्यावरचे आफ्रिकी देश, आखातातले देश इथली माणसं स्पेनमधे सतत येत होती. ख्रिस्ती, ज्यू आणि अनेक आदिधर्म स्पेनमधे होते. ख्रिस्ती धर्म स्थापित झाल्यानंतर पूर्वकडून अरब-मुस्लीम देशांची आक्रमणं झाली. त्यांनी इस्लाम स्पेनमधे आणला. स्पेनमधे अनेक धर्म, अनेक संस्कृत्या, अनेक भाषांची येजा राहिल्यानं युरोपातल्या भाषाही स्पेनमधे बोलल्या जातात. स्पॅनिश ही अधिकृत आणि जास्तीत जास्त लोकांकडून बोलल्या जाणारी भाषा आहे.
आज स्पेनमधे स्पॅनिश (कॅस्टिलियन) अधिकृत भाषा आहे. सुमारे ६५ टक्के माणसं ही भाषा पहिली किंवा दुसरी भाषा म्हणून वापरतात. सुमारे १७ टक्के माणसं कॅटेलोनियन भाषा बोलतात आणि ७ टक्के माणसं गॅलिशियन भाषा बोलतात. २ टक्के किंवा त्याहून कमी माणसं बास्क भाषा बोलतात.
कॅटेलोनियन, गॅलिशियन, बास्क या त्या त्या विभागातल्या भाषा आहेत, त्या त्या विभागाची सांस्कृतीक-राजकीय-आर्थिक वैशिष्ट्यं त्या त्या भाषांत विकसित झाली आहेत. कॅटेलोनियन आणि गॅलिशियन लोकांचं स्पॅनिशशी जवळ जवळ वाकडंच असतं. भारतात जसं हिंदी आणि तामिळांचं आहे तसला प्रकार.
काळाच्या ओघात ज्या ज्या सत्ता विकसित झाल्या त्यांनी कॅस्टिलियन भाषा स्वीकारल्यानं त्या भाषेला महत्व आलं.
युस्कारा ही एक प्राचीन भाषा आहे असं मानलं जातं. सुमारे ३५०० वर्षांपूर्वी पुर्वेकडून इंडोयुरोपीय भाषा युरोपात आल्या. त्या आधी, त्या वेळी स्पेनमधे म्हणजे बास्क प्रांतात आयबेरियन भाषा बोलली जात होती.बास्क प्रांतात १४ हजार वर्षांपूर्वीच्या गुहा आहेत. त्या काळात आयबेरियन भाषा बोलली जात असे. परंतू तिची लिपी किंवा बोलण्याची पद्धत काय होती त्याचा अभ्यास झालेला नाही. बाहेरून आलेल्या भाषा, उदा. लॅटिन, राज्यकर्त्यांच्या भाषा झाल्या, प्रतिष्ठित झाल्या. त्यावेळी स्थानिक आयबेरियन बोलणारी मंडळी म्हणजे बंडखोर आहेत असं मानलं जात असे. सत्ता आयबेरिनकडं दुस्वासानं पहात असे, आयबेरियन दडपण्याचा प्रयत्न करत असे. परिणामी माणसांना आपली आयबेरियन भाषा टिकवण्यासाठी कष्ट करावे लागले. ही लायबेरियन टिकली ती युस्कारा या स्वरूपात.
बास्क विभाग सुंदर आहे. पर्वत, खोरी, नद्या, जंगलं, नितळ समुद्र, समुद्राच्या पाण्याचा पारदर्शक नितळ निळा रंग, प्राणी, नाना ढंगाचे वारे. युस्कारा भाषेत निसर्गाशी संबंधित शब्द, कल्पना, रुपकं फार आहेत. युस्कारा भाषेत फुलपाखरू १०० पेक्षा अधिक शब्दांनी वर्णिलं जातं.
स्पेनमधे दोन हजार वर्षांत अनेक बदल घडले पण युस्कारा भाषा बोलणाऱ्यांनी ते बदल हातभर अंतरावर ठेवून आपली संस्कृती आपल्या भाषेत टिकवली. सभोवतालचं जग विकसित होत गेलं, बास्कमधल्या लोकांनी आपलं वेगळेपण जपलं. निसर्ग आणि इतर साधनांच्या विपुलतेमुळं बास्क मंडळी श्रीमंत होती आणि आहेत. त्यामुळंही त्यांना आपली संस्कृती भाषेच्या रुपात टिकवावीशी वाटते. जगात टिकायचं असेल, तरायचं असेल तर स्पॅनिशशिवाय गत्यंतर नाही हे लक्षात घेऊन इथल्या लोकांनी व्यवहारात स्पॅनिश भाषा वापरली तरी आपली युस्कारा भाषा मात्र घर आणि चर्चमधे टिकवली. युस्कारा भाषेतलं पहिलं पुस्तक छापलं गेलं १५४५ साली. विसाव्या शतकाच्या सुरवातीला बास्क प्रांतात युस्कारा भाषेत चालणाऱ्या शाळा उघडण्यात आल्या.
बास्क लोकांची स्वतंत्र वृत्ती स्पेनला आवडत नाही. १९३९ मधे जनरल फ्रँकोची हुकूशाही स्पेनमधे सुरु झाली. फ्रँको हुकूमशहा होता, तो स्पॅनिश राष्ट्रवादी होता. स्पेनमधे फक्त स्पॅनिश संस्कृती-भाषा असली पाहिजे, इतर प्रांतांनी आपलं अस्तित्व स्पेन राष्ट्रासमोर दुय्यम मानलं पाहिजे असा त्याचा आग्रह होता. स्पेनमधल्या सर्व संस्कृत्या,भाषांनी आपलं वेगळेपण स्पॅनिशमधे विरघळवलं पाहिजे असा त्याचा आग्रह होता. त्याच्या या धोरणामुळंच स्पेनमधे यादवी युद्ध झालं होतं.
फ्रँकोनं युस्कारा भाषेवर बंदी घातली. युस्कारा बोलणारा सापडला तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होत असे. बास्क प्रांतातल्या लोकांनी चर्चेस आणि प्राथमिक शाळांमधून या भाषेमधे चोरून चोरून व्यवहार केले. फ्रँकोला कळलं की त्याचे सैनिक चर्चमधे घुसत आणि बास्क लोकांना पकडत. युस्कारा बोलणारी, युस्कारा शिकवणारी एक शिक्षिका सैनिकांना सापडली. तिचं मुंडण करून तिची धिंड काढून तिला तुरुंगात घालण्यात आलं. लोकांवर दहशत बसावी म्हणून.
फ्रँकोशाही संपली. नंतर जगभरातलंच वातावरण बदललं. देशांच्या सीमा सच्छिद्र झाल्या. बहुमताची दादागिरी जगाला अमान्य झाली. अल्पसंख्य संस्कृती, भाषा आणि माणसांचा आदर राखला पाहिजे, त्यांना विकासाची संधी दिली पाहिजे हे तत्व हळू हळू जगानं स्वीकारलं. स्पेनमधे असलेले विविध प्रांत, तिथल्या भाषांना स्वायत्तता देण्याचं धोरण स्पेननं अवलंबलं. त्यानुसार बास्कमधे युस्कारा भाषेतून शिक्षण घेण्याची सोय करण्यात आली. एक वेबसाईट तयार करून युस्कारा भाषा वापरणाऱ्याना माहिती आणि प्रशिक्षणाची सोय करून देण्यात आली. युस्कारा शब्दकोष आणि त्या भाषेतली पुस्तकं स्थानिक सरकार प्रसिद्ध करू लागलं. बास्क प्रांतातल्या रस्त्यावरच्या पाट्या, दुकानावरच्या पाट्या युस्कारा भाषेत दिसू लागल्या.
बास्क विभाग नितांत सुंदर आहे. बिलबाव या गावात जगभरातले लाखो लोक येतात. कामधंध्यासाठी स्पॅनिश माणसंही बास्क प्रांतात येतात. तिथं रेस्टॉरंटमधे गेले की त्यांचं स्वागत युस्कारा भाषेत होतं, चर्चमधल्या प्रार्थना युस्कारा भाषेत ऐकू येतात. रेस्टॉरंटमधला मेनू युस्कारा भाषेत असल्यानं त्यांना कळत नाही. विमानतळावरच्या पाट्या युस्कारामधे असल्यानं माणसं बुचकळ्यात पडतात. पण बास्क माणसं मात्र खुष असतात, आपण आपलं बास्क जीवन जगतोय याचा आनंद त्यांना होत असतो.
।।
अशीच एक भाषा म्हणजे ब्रेटन. ही फ्रान्सच्या पश्चिम किनाऱ्यावरील ब्रिटेनी या विभागात बोलली जाते. मध्य युगात म्हणजे पाच ते पंधरा या शतकांत ही भाषा ब्रीटनमधून स्थलांतरित झालेल्या लोकांनी ब्रिटेनीत, फ्रान्समधे आणली. इंग्लीश भाषेचं ते एक रूप होतं. १२ व्या शतकापर्यंत ब्रेटन ही भाषा ऊच्च वर्णियांची, कुलीनांची होती. तत्कालीन राजकारणापोटी तसं घडलं असणार. ब्रिटीश संस्कृती त्या भागात प्रतिष्ठेची मानली जात असे. (महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील गावं, महाराष्ट्र गुजरात सीमेवरील गावं लक्षात घ्यावीत.) बदलत्या काळानुसार आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या कल्पनांनुसार फ्रान्समधे फ्रेंच भाषा प्रतिष्ठित, अधिकृत झाली आणि समातल्या कुलीनांनी ती स्वीकारली. तस तसं ब्रेटन या भाषेचं महत्व कमी होत गेलं,
एकेकाळी ब्रेटनमधे साहित्य, तत्वज्ञान, विज्ञान या क्षेत्रातलं ज्ञान होतं. ब्रीटनशी असणाऱ्या संबंधांमुळं.पंधराव्या शतकापासून फ्रेंच राजकारण बदललं. फ्रेंच राजानं फ्रेंच भाषा अधिकृत केली. इतर भाषा फ्रेंच राजांनी कमी प्रतीच्या ठरवल्या. त्या नादात ब्रेटन भाषा सरकारच्या आणि म्हणूनच वरच्या वर्गाच्या मर्जीतून उतरल्या. ब्रिटेनीमधे बहुसंख्यांकडून बोलली जाणारी भाषा मागं पडली. जगायचं असेल तर फ्रेंच वापरली पाहिजे. शाळा कॉलेजात फ्रेंचला स्थान मिळालं. हळू हळू ब्रेटन ही एक बोली भाषा होत गेली. खेडवळ, शेतकरी, कामगार, गरीब माणसांपुरतीच ब्रेटन उरली. या भाषेचा उपयोग न होता त्रासच होतो असं कळल्यावर माणसं ती भाषा वापरेनाशी झाली. हळू हळू ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या कमी होत गेली. नंतर नंतर ब्रेटनकडं अपनामास्पद पद्धतीनं पाहिलं गेलं. ब्रेटन बोलणारी माणसं फ्रेंच विरोधी, देशद्रोही आहेत असं लोक म्हणू लागले.त्या भाषेत व्यवहार करण्यावर जवळजवळ बंदीच घालण्यात आली.
भाषेची हीच गंमत असते. भारतावर मुगल राज्य करत होते तेव्हां फारसी राज्यभाषा होती, कुलीन माणसं ती भाषा वापरत. राजा राममोहन रॉय यांचं शिक्षण फारसी भाषेत झालं. मुगल गेले आणि ब्रिटीश आले. राज्यकारभाराची भाषा इंग्रजी झाली. लगोलग माणसं इंग्लीशकडं सरकली. फारसी ही एक समृद्ध भाषा भारतातून जवळजवळ नाहिशीच झाली.
फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात ब्रेटन वापरणं म्हणजे राजाला विरोध करणं असं मानलं गेलं. सुरवातीला ब्रेटन बोलणारी माणसं फ्रेंच आणि ब्रेटन अशा दोन्ही भाषा बोलत. परंतू ब्रेटन शाळेतून शिकवणं बंद झाल्यावर ब्रेटन बोलणाऱ्यांची संख्या १९५० पर्यंत जेमतेम १ लाखावर पोचली. १९७० नंतर ही एक समृद्ध भाषा मरू नये यासाठी फ्रेंच सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांनी विशेष प्रोत्साहन प्रयत्न सुरु केले. परिणामी १९९७ च्या सुमाराला ब्रेटन बोलणाऱ्यांची संख्या ३ लाख झाली. पण या ३ लाखात बहुतेक लोक साठीत पोचले होते.
ब्रेटनला राजभाषेचा दर्जा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण फ्रेंच राज्यघटनेत फक्त फ्रेंचच राज्यभाषा असेल असं लिहिलं आहे. परंतू निदान तिला विभागीय भाषेचा दर्जा मिळावा असा प्रयत्न चाललाय. ब्रेटन शब्दकोष तयार केला जातोय. ब्रेटन भाषेतल्या साहित्याचं पुनर्मुद्रण केलं जातंय. ब्रेटन विकिपेडिया होतोय, फेसबुकवर ब्रेटन भाषेत व्यवहार सुरु झालाय, मायक्रोसॉफ्टनं ब्रेटन भाषेची सोय कंप्युटरवर केलीय.
ब्रेटन निदान जगेल तरी.
।।
2 thoughts on “युस्कारा या भाषेची जगण्याची धडपड”
भारतीयांनी यात विशेष आश्चर्य वाटून घेऊ नये. एखादा मराठी भाषिक दक्षिणेत गेल्यास त्याला तामिळ, तेलगू, मल्याळम (एव्हडेच नव्हे तर शेजारील कर्नाटकातील ‘कन्नड’) भाषेतून चालणारे व्यवहार ‘ठो’ म्हणून देखील उमजत नाहीत आणि या इतर भाषिकांना त्याचे सुखदुःख देखील नसते. त्यांना हिंदी देखील आवडत नाही. थोडक्यात, ज्यांना मातृभाषेचा अभिमान असतो ते ती आपल्या कुटुंबामध्ये जपून ठेवतात व ती वृद्धिंगत करणे त्यांच्या अपत्यांच्या वृत्तीवर अवलंबून असते. आज पुण्या-मुंबईतील मराठी मुले इंग्रजीतून शिकत असतात व मराठी बोलताना त्यांची भंबेरी उडत असल्याचे त्यांचे पालकच सांगत असतात. ‘SURVIAL OF THE फिटंटेस्ट’ -हि उक्ती भाषेस देखील लागू पडत असावी.
आता महाराष्ट्रात खेड्यापाड्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे फॅड आल आहे. या पुढील काळात मराठी गरीब, खेडवळांची राहणार असच चित्र दिसतय.