रविवारचा लेख. चित्ते कां मेले?

रविवारचा लेख. चित्ते कां मेले?

२०२२ साली सप्टेंबर महिन्यात भारतात चित्ते आणले तेव्हां खूप गाजावाजा झाला. 

काय झालं त्या चित्त्यांचं? 

पहिली नामिबियन चित्यांची बॅच १७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात पोचली. त्यात ८ चित्ते होते. नंतर २२ फेब्रुवारी २०२३ रोजी आणखी १२ चित्ते द. आफ्रिकेतून आयात करण्यात आले. एकूण चित्त्यांची संख्या २० झाली. त्यातले ९ चित्ते वारले.  एका मादी चित्त्याला ४ पिल्लं झाली. त्या पैकी तीन वारली. एक शिल्लक आहे. त्या पिल्लाची काळजी घेतली जातेय, त्याला छोट्या मुलाला जसं हातावर वाढवतात तसं वाढवलं जात आहे. 

म्हणजे एकूणात मध्य प्रदेशातल्या कुना जंगलात आता १० चित्ते उरले आहेत. हे चित्ते सध्या राखीव जागेत ठेवलेले आहेत. वैज्ञानिक पद्धतीनं त्यांची प्रकृती, दिनचर्या, त्यांचं खाणंपिणं इत्यादींची काळजी घेतली जात आहे, अभ्यास केला जात आहे.

चित्ते कां आयात केले गेले?

शिकारी, चित्त्यांच्या कातडीचा व्यापार करणारे यांच्यामुळं भारतातले चित्ते मरत गेले. राजे लोक स्वतःच्या सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करून चित्यांना मारत. पाच पन्नास माणसं चित्त्याची कोंडी करून चित्त्याला मारत. मग आपण केवढा पराक्रम केला ते दाखवण्यासाठी फोटो छापून आणत आणि चित्यांची कातडी भिंतीवर टांगत.

स्वातंत्र्यपूर्व काळात चित्ते जपले पाहिजेत असं भारतातल्या सरकारला (ब्रिटीश) वाटलं नाही. १९४७ मधे मध्य प्रदेशातले एक राजे रामानुज सिंग देव यांनी शेवटले तीन चित्ते मारले, त्यांच्या शौर्याचे फोटो प्रसिद्ध झाले. भारतातले ते शेवटले चित्ते.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात जंगलं, जंगली प्राणी जपणं आवश्यक आहे याची जाणीव झाली. चित्ते बाहेरून आणून त्यांना भारतीय जंगलात वसवण्याचा विचार सुरु झाला. आफ्रिकेतले देश, इराण इत्यादी ठिकाणी विचारणा करण्यात आली. इराणी आणि आफ्रिकी चित्त्यांचं एक विशिष्ट वाण असतं. भारतातले चित्ते वेगळ्या जातीचे होते. तेव्हां इराणी-आफ्रिकन चित्ते भारतात जगतील की नाही यावर चर्चा झाली. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. जोवर परदेशी चित्ते भारतात कसे जगतील याची वैज्ञानिक तयारी होत नाहीत तोवर चित्ते आयात करून येत असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला.

चित्ता हा मांसाहारी प्राणी आहे. त्याला खाण्यासाठी पुरेसे प्राणी जंगलात नसतील तर चित्ता जगत नाही. पुरेसे प्राणी आणि पुरेसे चित्ते हे गणित जुळण्यासाठी फार मोठं जंगल आवश्यक असतं. जंगलात पुरेसे प्राणी मिळाले नाहीत तर चित्ते जंगलाबाहेर जातात. मग जनतेला त्रास होतो. चित्ते मारले जातात.

दुसरी गोष्ट अशी की चित्त्यांना मारणारेही प्राणी असतात. ताशी ६५ मैल वेगानं चित्ता पळत असला तरी तो तितक्याच पटकन दमतोही. जंगली कुत्रे आणि तरस चिकाटीनं चित्त्यांचा पाठलाग करतात आणि चित्त्यांना मारतात. कुत्रे आणि तरस झुंडीनं शिकार करतात. त्यामुळं चित्ते मारले जाण्याचा नैसर्गिक वेग लक्षात घेऊन चित्त्यांची संख्याही तितकी मोठी ठेवावी लागते.

हे सर्व मोठ्या जंगलातच शक्य असतं.

२०२० साली भारत सरकारनं ७० चित्ते आयात करण्याचा निर्णय घेतला. चित्ते आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं मागं घेतल्यामुळं सरकार चित्ते आयातीमागं लागलं. २०२२ आणि २०२३ साली चित्ते आयात झाले.

चित्ते कां मेले?

सरकारनं अजून या बाबतची विश्वास ठेवण्यालायक माहिती प्रसारीत केलेली नाही. सरकार आणि वनखातं यावर गप्प आहे. खरं म्हणजे या बाबतची स्थिती संसदेत मांडली जायला हवी. पण अधिकृत माहिती नसल्यानं चर्चा-वादविवाद निर्माण झाला आहे.

चित्त्यांचे अभ्यासक सांगतात की परक्या वातावरणातून चित्ता आणल्यावर त्याला जास्तीत जास्त ३० दिवस विलग (क्वारंटाईन) ठेवलं जातं. विविध चाचण्या, तपासण्या, वातावरणाशी तद्रूप व्हायला लागणारा वेळ ही कारणं असतात. कुना भारतात आणले गेलेले चित्ते ५० दिवस ते १०० दिवस इतका दीर्घ काळ विलग ठेवले गेले होते. यामुळं चित्ते मेले काय? यावर वैज्ञानिकात दुमत आहे. एक चित्ता किडनी फेल झाल्यामुळं मेला. किडनी फेल झाली म्हणजे त्याला आधीपासून किडनीचा त्रास होता कां? आणण्यापूर्वी त्याची तपासणी झाली होती की नाही? त्याला कॉलर लावलेली असताना जर त्याला संसर्ग (इन्फेक्शन) झाला तर त्याचं कारणही प्राणीविज्ञान जाणणाऱ्यांना कळायला हवं.

एक चित्ता हृदय आणि फुफ्फुसं फेल झाल्यानं गेला. याचं कारण काय? संसर्ग की उन्हाळा?

तीन चित्ते पावसाळ्यात गेले. काय कारणं?

तीन पिल्लं उन्हाळ्यात तापमान सहन न झाल्यानं गेली. त्यांची गर्भधारणा मार्चमधे झाली असणार. मार्चमधे मादी क्वारंटाईनमधे होती. नैसर्गिक परिसरात न जाता क्वारंटाईनमधे मीलन होऊ देणं योग्य होतं कां? कारण एक मादी या मीलनाच्या खटाटोपातच मरण पावली होती. हा प्रयोग योग्य होता की नाही याचा खुलासा फक्त त्या शास्त्रातले जाणकारच सांगू शकतील.

चित्ते जगायला आणि वाढायला हवे असतील तर त्यांना खायलाही भरपूर प्राणी मिळायला हवेत. त्यासाठी जाणकारांच्या मते जंगलाचा परिसर ५ हजार चौकिमी असायला हवा. कुना जंगल ७८९ चौकिमी आहे.

चित्ते प्रकल्प ५०० कोटींचा आहे. पण प्रकल्पाला लागणारी जमीन, किमान चित्त्यांची संख्या, त्यांना जगवण्यासाठी लागणाऱ्या इतर गोष्टी पहाता हे ५०० कोटी अपुरे आहेत असं जाणकारांचं मत आहे.

  मुळात जंगलंच कमी होत चाललीयत आणि चित्त्यांना तर फार मोठं जंगल लागतं. पुरेसं जंगल हाताशी नाही हे माहित असताना आणि तेवढं जंगल उभं करण शक्य नसतांना हा प्रकल्प २०२० साली सरकारनं हाती घेतला. 

भारतीय संस्कृतीत आरंभशूरता नावाचा एक जीन पक्का आहे असं दिसतं. मोठ्ठी कल्पना करायची, योजना जाहीर करायची. योजना पूर्ण होण्यासाठी किती काळ लागेल, किती साधनं खर्ची घालावी लागतील, नियोजित खर्च आणि प्रत्यक्ष खर्च यातलं गणित कसं जमेल याचा विचार केला जात नाही. शेवटी योजना अमलातच येत नाही, आली तर मूळ योजना आणि अस्तित्वात येतं त्यात फार फरक असतो, एक पैशाची योजना शंभर रुपयात पडलेली असते. 

आफ्रिका आणि भारतातल्या हवामानात फरक असल्यानं चित्त्यांचं मरण वैज्ञानिकांना अपेक्षित होतं. काळजीपूर्वक, अभ्यासपूर्वक नियोजन करून चित्ते जगवणं अपेक्षीत होतं. तसं झालेलं दिसत नाही. नेमकं काय झालंय तेही सरकार सांगत नाही.

।।

Comments are closed.