रविवारचा लेख/पत्रकारीचा नमुना
न्यू यॉर्करने जुलै २०२३ मधे एक बातमीपत्र प्रसिद्ध केलं.
एक गाव आहे. त्या गावाचा एक शेरीफ आहे. शेरीफ म्हणजे गावाच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेला अधिकारी. त्याच्या हाताखाली नाना कामं करणारे पोलिस आहेत. पोलिसांची संख्या आहे सत्तर. हा शेरीफ आपल्या हाताखाली दोन माणसं नेमतो. या माणसांना पोलिस कामाचा काहीही अनुभव नाही. नेमलेल्या एका पोलीस बाईनं कधी तपास केलेला नाही, ती कधी रस्त्यावर उतरलेली नाही. तरी त्या पोलिस बाईला कॅप्टन असा दर्जा देऊन तिच्यावर तपासाच्या जबाबदाऱ्या शेरीफनं टाकल्या, तिला हाताशी इतर पोलिस दिले.
हा शेरीफ बेकायदेशीर वागतो. भ्रष्ट आहे. गुन्ह्यांचा तपास करत नाही. केला तर त्यात अनेक दोष असतात. तपासात दडपादडपी करतो. अनेक गंभीर गुन्हे गावात घडतात, शेरीफ त्या गुन्हेगारांना पकडत नाही. काही वेळा पोलिस किरकोळ गुन्हा केलेल्या माणसाला बदडतात, त्यात एकाचा मृत्यूही होतो.
गावात एक पेपर निघतो. त्या पेपरचा तरूण संपादक शेरीफची कारकीर्द; पोलिसांचा भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता; पोलिसांनी न शोधलेले गुन्हे; लोकांच्या पोलसांच्याबद्दलच्या तक्रारी; या गोष्टी पेपरात छापतो, ठळकपणे छापतो.
गावाची जबाबदारी तीन कमीशनरांवर असते. कमीशनर म्हणजे ग्रामपंचायतीचे सदस्य.त्यांनी गावाची अर्थव्यवस्था, कायदाव्यवस्था, यावर लक्ष ठेवायचं असतं. कमीशनरांकडं तक्रारी जातात. कमीशनरही गुन्ह्यांत अडकलेले असतात. ते काही करत नाहीत.
एके दिवशी कमीशनरांची बैठक होते. या बैठकीत शेरीफ आणि संबंधित भ्रष्ट पोलिस अधिकारी पोचतात. खरं म्हणजे त्यांना तिथं जायचं कारण नसतं, परवानगी नसते. पेपरात पोलिसांबद्दल लिहिलं जातंय याबद्दल ते तीव्र वैतागलेले असतात. पोलिस कॅप्टनबाई बैठकीत सांगूनच टाकते की संपादकाच्या अंगावर ट्रक घालून त्याला मारलं पाहिजे.अशी खुनाची सुपारी घेणारी माणसं आपल्या परिचयाची आहेत असंही ती सांगते.
पेपराच्या एका बातमीदारानं पेनात लपवलेला रेकॉर्डर या बैठकीच्या टेबलावर ठेवलेला असतो. त्यात सारं रेकॉर्ड होतं.
दुसऱ्या दिवशी पेपरात पोलिसांच्या वक्तव्याची हेड लाईन होते. प्रकरणाला वाचा फुटते. राज्य, देश या पातळीवर हे प्रकरण गाजतं. वृत्तपत्र आयोगाकडं ही केस जाते. शेरीफ आणि पोलिस अधिकाऱ्यांवर खटला भरला जातो.
कोर्टाचा निकाल असा. शेरीफ-पोलिसांचं बैठकीतलं बोलणं Inflamatory, Offensive आहे पण ते गुन्हेगारी स्वरूपाचं नाही. तेव्हां शेरीफ निर्दोष आहे.
रीपोर्ताजमधे गावाचा तपशील आहे.Idabel हे गाव ओक्लाहोमा या राज्यात आहे. हे गाव इंडियन म्हणजे आदिवासी बहुल लोकसंख्येचं आहे.गावाची लोकसंख्या आहे ३१ हजार. McCurtain Gazette हा पेपर या गावात १९०५ सालापासून चालतो आहे. चार हजार चारशे प्रती विकल्या जातात. संपादकाच्या टेबलापासून छपाई यंत्रापर्यंतचं अंतर फक्त २५ पावलं आहे.
पेपर गुन्ह्यांच्या बातम्या प्रामुख्यानं देतो. बातमीत तपशील नसतात.
वानगीदाखल काही बातम्या.
पाच मैल वेगाच्या भरधाव गाडीला अपघात.
रस्त्यावर एक लांबलचक साप दिसला.
कोंबड्या आणि डंपलिंग नागरिकांच्या अंगावर फेकून मारण्याची गंभीर घटना.
आई मेल्यानंतर वर्षभर तिच्या मुलानं तिच्या सोशल सेक्युरिटीचे चेक वटवून पैसे घेतले.
धनुष्याचे दोन बाण मारून एका माणसानं एका स्त्रीची हत्या केली.
स्त्रीवर तिच्या मुलासमक्ष बलात्कार.
पोलिस कॅप्टनबाईची सेक्स प्रकरणं गावात कशी चघळली जातात याच्या बातम्या पेपरात येतात.
संपादक गावातल्या माणसाच्या लफड्याची बातमी छापतो. नंतर रविवारी गाव चर्चमधे जातं तेव्हां तो लफडेबाज माणूस आणि संपादक चर्चमधे पोचतात. मग दोघांमधे जाम बाचाबाची.
एके दिवशी गावातल्या काही पोरानी दुकानात घुसून बियरचे कॅन चोरले, पार्किंगला परवानगी नसलेल्या ठिकाणी गाड्या लावल्या, मस्ती केली.मॅककर्टन गॅझेट या प्रस्तुत पेपरात ही बातमी छापून आली.गंमत म्हणजे या मस्ती करणाऱ्या चोर पोरांत पेपराच्या संपादकाचा मुलगा होता. तरीही संपादकानं त्याच्या नावासह बिनधास्त बातमी छापली. गंमत पहा. पुढं चालून हाच मुलगा त्या पेपराचा संपादक झाला.
पेपरात बॉब वेस्ट नावाचा एक बातमीदार आहे. त्याचं वय आहे ८१. साठेक वर्षं तो या पेपरात काम करतो. म्युझियम, शाळा आणि दैनंदिन हवामान याच्या नोंदी तो करतो. त्याच्या नोंदीवरून गावाचा इतिहासच तयार होतो. हे गृहस्थ कारनं ऑफिसात येतात. कार चालू ठेवूनच ऑफिसात जातात. बाहेर पाऊस पडत असतो, कारच्या काचा उघड्या असतात, दिवसभर ते पेपराच्या ऑफिसात आणि बाहेर कारचं इंजिन चालू आणि उघड्या खिडकीतून गाडीत धोधो पाणी जातं.एकदा ते पेपराच्या ऑफिसात आले तेव्हां त्यांच्या शर्टाच्या खिशात टूथ ब्रश होता, तोंड धुवून खिशात ठेवलेला ब्रश.
Paige Williams या महिला बातमीदारानं न्यू यॉर्कर या पेपरमधे ५४६५ शब्दात वरील रीपोर्ताज लिहीलाय.
पेज विल्यम्स माहिती मिळवण्यासाठी गावात राहिल्या. पोलिस, गुन्हेगारी, पत्रकारांना दिला जाणारा त्रास, पत्रकारांचे खून या गोष्टींचे तपशीलही पेजनं या बातमीपत्रात दिलेत. गावातल्या कित्येक घटनांचे आणि माणसांचे तपशीलही बातमीत आहेत.
बातमीपत्र वाचत असताना गावाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं रहातं.
एकेकाळी या गावांचा गुन्हेगारी, खुनांत अख्ख्या अमेरिकेत पहिला नंबर होता. म्हणूनच तर पेपरात गुन्ह्यांना प्राधान्य असावं.
अमेरिकेत राजकीय धमाल चालली होती. ट्रंप निवडणूक हरले होते. तरीही धत्तिंग करत फिरत होते. पण या गावातल्या पेपराच्या लेखी ट्रंप, बायडन इत्यादी लोक अस्तित्वातच नव्हते. पेपर आणि गावातल्या लोकांचा इंटरेस्ट कशात? तर शेरीफनं आपल्या जावयाला कशी बढती दिली आणि शेरीफचे त्याच्या सहकारी पुरुषाशी असू शकणारे समलिंगी संबंध.
छोट्या शहरातली माणसं, छोट्या गावातली माणसं, त्यांचं जगणं, त्यांचं वाचन, त्यांच्या चिंता, त्यांची करमणूक, त्यांचं ज्ञान, त्यांचा पेपर.
पत्रकारीची तऱ्हा. तपशीलवार, भरपूर माहिती. बातमीदार जागेवर जाऊन लोकांना भेटून बातमी लिहितो.
अमेरिका थोर आहे की चोर आहे की काय आहे वगैरे विशेषणांत बातमीदार जात नाही. ते वाचकांनी स्वतः ठरवायचं.
हजारो लोकांना फॉर्वर्ड झालेला १०० शब्दांचा व्हॉट्सॲपी मजकूर विरुद्ध साडेपाच हजार शब्दांचं बातमीपत्र.
काय वाचायचं ते वाचकांनी ठरवायचं.
काय प्रसिद्ध करायचं ते पत्रकारांनी ठरवायचं.
।।