रविवार/इसरायलनं पॅलेस्टाईन जवळजवळ संपवलंय.
।।
गाझा जमीन दोस्त झालं. पुढे काय?
७ ऑक्टोबर २०२३ रोजी गाझामधले सुमारे १५०० हमासचे सैनिक इसरायलमधे घुसले.गाझामधून त्यांनी पाचेक हजार रॉकेटं इसरायलवर फेकली.इसरायलनं २००७ पासून गाझाची नाकेबंदी केली होती, गाझाभोवती कुंपण उभारलं होतं. हमासींनी कुंपण तोडलं. कार, मोटारसायकली घेऊन ते गाझाच्या हद्दीच्या नजीक असलेल्या किबुत्झमधे घुसले.किबुत्झचा हिब्रू भाषेतला अर्थ गट. स्वयंप्रेरणेनं संघटित झालेला गट.
सकाळच्या प्रहरी झालेला हल्ला अनपेक्षीत होता. हमासींनी बेधुंद गोळीबार करत वाटेत जो दिसेल त्याला गोळ्या घातल्या. नंतर ते घराघरात घुसले. इसरायली घरात एक सुरक्षीत खोली असते. रॉकेटं कोसळली तर त्या खोलीत आश्रय घ्यायचा असतो. इसरायली त्या खोलीत गेले. हमासींनी त्या खोलीची दारं तोडली आणि आतल्या माणसाना मारलं. स्त्रिया, मुलं, म्हातारे, कोणालाही सोडलं नाही. सर्व माणसं नागरीक होती, सैनिक नव्हती.
इसरायली सैन्याला पत्ता लागून ते घटनास्थळी पोचेपर्यंत ठिकठिकाणी मिळून १४०० माणसं हमासींनी मारली. नंतर २३९ इसरायली त्यांनी पकडून गाझामधे नेले, त्यांना ओलीस ठेवलं.
इसरायलची हेरयंत्रणा जगातली एक नंबरची मानली जाते. इसरायलमधला प्रत्येक नागरीक हा सैनिक असतो. इसरायल गाझा आणि वेस्टबँक या पॅलेस्टिनी भागांवर बारीक नजर ठेवून होतं. काही लाखांचं खडं सैन्य इसरायलजवळ होतं. अशा जबरदस्त इसरायलमधे हमासी घुसले, इसरायलची सुरक्षा व्यवस्था उघडी पाडली.
हे कसं काय घडलं याबद्दल वाद आहेत. असंही म्हणतात की भ्रष्टाचाराबद्दल खटला चाललेल्या पंतप्रधान नेतान्याहूना स्वतःला वाचवण्यासाठी असलं काही तरी घडवायचं होतं जेणेकरून नंतर गाझावर हल्ला करून देशभावनेला चेतवता येईल. जे असेल ते असो, हमासनं इसरायलला दणका दिला. आजवर इसरायल किमान चार मोठी युद्ध अरब देशांशी लढलं.पण शत्रू कधी आत शिरला नव्हता, इसरायलच्या नागरिकावर हल्ला झाला नव्हता. हमासचा दणका इसरायली जनतेला हादरवणारा होता.
अपेक्षेनुसार इसरायलनं प्रतिहल्ला केला. ८ ऑक्टोबरला प्रतीहल्ला सुरू झाला.आपण हमासचा खातमा करू असं म्हणत इसरायली सैन्य गाझामधे शिरलं. रणगाडे, तोफा, बख्तरबंद गाड्या, मॉर्टर्स, सगळी सामग्री घेऊन. वरून विमानं. आकाशातून बाँब. जमिनीवर तोफगोळे.
दहशतवादी हमासचे अड्डे उध्वस्थ करणं, दहशतवादी हमास नेते आणि सैनिक यांना खतम करणं आणि ओलीस ठेवलेल्या इसरायली नागरिकांना सोडवणं ही ३ उद्दीष्टं होती. हा प्रतिहल्ला म्हणजे उंदरं मारण्यासाठी रॉकेटं वापरावीत असा होता.हमासची हत्यारं अगदीच गावठी म्हणावीत अशी आणि इसरायलकडची शस्त्रं एकदम आधुनिक, अमेरिकेत तयार झालेली.
दुरवरून तोफ गोळे पडत. इमारत उध्वस्थ होई. नंतर हवेतून विमानं बाँबचा पाऊस पाडत. रस्ते आणि इमारती उध्वस्थ होत. नंतर रणगाडे घेऊन इसरायलचे सैनिक उध्वस्थ झालेल्या जागेत प्रवेश करत. कोसळलेल्या घरात शिरत. तिथं बहुदा कोणीही शिल्लक नसे. एक तर माणसं पळालेली असत नाही तर मेलेली असत. इसरायली सैनिक कोसळलेल्या तुळया आणि भिंती उलथवून आत कोणी आहे की नाही याचा तपास करत. त्यांच्यासोबत कुत्रे असत. ते वासावरून माणसांचा माग काढत. दिवसाला सुमारे १०० इमारती इसरायली सैनिक तपासत. म्हणजे तिथं कोणीही शिल्लक नाही याची खात्री करत.
हा उद्योग गाझा पट्टी, गाझा विभागाच्या उत्तर भागात चालला होता. गाझा सुमारे ४५ किमी लांबीचा प्रदेश आहे. मधोमध वाहणारी एक नदी या प्रदेशाचे दक्षिण आणि उत्तर असे भाग करते. १५ नव्हेंबरपर्यंत उत्तर गाझा इसरायलनं निर्मनुष्य करून टाकला आहे.
हमासनं केलेला हल्ला चुकीचा होता, निर्घृण होता, क्रूर होता. इसरायलच्या सुरक्षेला, इसरायली नागरिकाच्या जगण्यालाच हमासनं आव्हान दिलं होतं. हमासचं चुकलंच. त्यासाठी हमासवर कारवाई करून स्वतःला सुरक्षीत करणं हा इसरायलचा अधिकार होता. कोणीही देश, कोणताही समाज ते करेल. मग भले हमासचा हल्ला कितीही अगतिकतेतून झाला असो किंवा हमासनं केलेला हल्ला हा इसरायलनं केलेल्या वीसेक वर्षाच्या अत्याचाराचा केलेला प्रतिकार असो.
इसरायलचा प्रतिहल्ला अती होता, प्रमाणाबाहेर होता हे पहिल्याच दिवशी लक्षात आलं होतं. जगभरातून इसरायलला सांगण्यात आलं की त्यांनी संयमानं घ्यावं, कुठलीही लढाई ज्या संकेतांनुसार लढली जाते त्या प्रमाणं इसरायलनं कारवाई करावी असं अनेकांनी सांगितलं. चवताळलेलं इसरायल आणि नेतान्याहू यांनी जागतीक लोकमताची फिकीर केली नाही. युद्ध तहकुबी करू नये असं अमेरिकेनंच इसरायला सांगितलं, युद्ध थांबवण्यासाठी इसरायलला प्रवृत्त केलं नाही.
इसरायलनं शाळांवर हल्ले केले. इसरायलनं इस्पितळं उडवली. इसरायलचं म्हणणं की दहशतवादी शाळांत आणि इस्पितळात लपतात. अगदी हेच आरोप करून आयसिस म्हणजे इस्लामी जिहादीनी सीरियात नागरीक मारले. त्यानीही दणादण हॉस्पिटलर तोफगोळे सोडले.
काय करणार? माणूस एकदा युद्ध करायला निघाला की त्याचं डोकं ताळ्यावर रहात नसतं. तो आंधळा झालेला असतो. एक उन्माद आलेला असतो. म्हणूनच तर अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकीवर बाँब टाकून लाखो लोक मारले होते. हिरोशिमा नागासाकीतली सगळी माणसं निष्पाप होती, त्यांचा युद्धाशी संबंध नव्हता, ती अमेरिकेच्या लष्कराशी लढत नव्हती. ती निःशस्त्र होती. अमेरिकेनं हा उद्योग केला आणि त्याचं कौतुक झालं. लाखो लोकं मारणाऱ्या ओपनहायमर या वैज्ञानिकाचं कौतुक झालं, त्याच्यावर सिनेमा निघाला.
तुम्ही आमची १४०० माणसं मारलीत काय? थांबा, आम्ही तुमची दसपट माणसं मारतो असा विडा इसरायलनं उचलला.आणि खरोखरच १४ हजार माणसं मारली.
या हाणामारीच्या मध्यात एक अल शिफा नावाचं हॉस्पिटल होतं. एक मोठं हॉस्पिटल. त्यात पेशंट, डॉक्टर, कर्मचारी इत्यादी ६० हजार माणसं होती. इसरायलनं त्या हॉस्पिटलवर हल्ला केला. ज्या रोग्याना पळता आलं ते पळाले. पण अंथरुणाला खिळलेले, नाकात नळ्या खुपसलेले रोगी कुठं जाणार? मेले. खूप नवजात मुलं होती. ती कशी काय पळणार.ती मेली. दोन आठवड्यांच्या कारवाईनंतर इस्पितळात १५०० माणसं टिकली. त्यात बरेचसे डॉक्टर आणि नर्सा होत्या.
अल शिफावर हल्ला कां केला होता? इसरायचा दावा होता की इसरायली ओलीस हॉस्पिटलच्या तळघरात लपवलेले होते. आणखी एक कारण होतं. याह्या सिनवार आणि महंमद देईफ हे हमासचे नेते तळघरात लपले होते अशी खबर इसरायलच्या हेरखात्याला होती. दोन आठवडे झाले. हॉस्पिटल खलास झालं. तळघर खलास झालं. तिथं ना ओलीस सापडले ना हमासचे नेते.
असं आहे इसरायलचं प्रसिद्ध मोसाद किंवा शिन बेट हे हेरखातं. नेटफ्लिक्सवर एक फौदा नावाची वेब मालिका दाखवली जातेय. लोकांना ती आवडतेय. खूप वेगवान चित्रीकरण आहे आणि त्यात काम करणारे नटही कसलेले नट आहेत. या मालिकेत मोसाद, शिनबेट, पोलिस हे कसे जाम हुशार असतात, त्यांचे खबरे कसे पॅलेस्टाईनच्या गल्लोगल्ली पसरलेले असतात, हे खबरे कसे कधी भिकारी होतात कधी पानटपरीवाले होतात आणि खबरी काढतात अशी चित्तथरारक माहिती या मालिकेत मिळते. कधी कधी वाटतं की इसरायल सरकारच्या प्रसिद्धीसाठी तर ही मालिका केली नाहीये ना.
असो.
छत्तीस दिवस कारवाई चालली.कारवाईत वीज केंद्रं, पाणीपुरवठा केंद्रं उडवण्यात आली. गाझाची पूर्ण नाकेबंदी करण्यात आली.बाहेरून अन्न, पाणी, ओषधं इत्यादी गोष्टीचा पुरवठा पूर्ण बंद करण्यात आला. तेल येत नव्हतं. युनायटेड नेशन्सचं शांतता दल, मानवतावादी मदत करणारं दल इत्यादींना काम करता येणं अशक्य होतं. त्यांनी दबाव आणल्यावर तेल नेणाऱ्या काही टँकरना परवानगी देण्यात आली. पण मिळालेलं तेल त्यांच्या गरजेच्या १० टक्केसुद्धा नव्हतं.
उत्तर पॅलेस्टाईन उध्वस्थ झालं. १४ हजार माणसं मेली. जी जगली ती घरदार सोडून दक्षिण गाझामधे स्थलांतरीत झाली. आधीच गाझामधे माणसांची खूप दाटी आहे. जगातला सर्वात दाटीचा प्रदेश म्हणून गाझा ओळखला जातो. आता उत्तर गाझातली सुमारे १५ लाख माणसं दक्षिणेत आली. आता सुमारे २२ लाख लोक दक्षिणेत गर्दी करून रहात आहेत. त्यांचंही अन्नपाणी तुटलेलंच आहे. त्यामुळं ही माणसं तिथंही कशी जगतील ते कळत नाही. त्यांचं नशीब येवढंच की त्यांच्यावर बाँब आणि तोफगोळे कोसळलेले नाहीत.
इसरायलनं सूड उगवला. आता २२ लाख माणसं गाझाच्या दक्षिण भागात आणि २७ लाख पॅलेस्टिनी वेस्ट बँक विभागात उरलेत. थोडेफार हमासचे कार्यकर्ते सोडले तर बहुसंख्य लोकांना हमासबद्दल प्रेम नाहीये. २००६ नंतर हमासनं पॅलेस्टाईनमधे निवडणुका घेतलेल्या नाहीत. २००६ साली गाझामधे निवडून आलेल्या हमासचा गाझामधला कारभार भ्रष्टाचारात बरबटलेला आहे. बेकारी, अन्नपाणी, शिक्षण, आरोग्य या अगदी पायागोष्टींकडं हमासनं दुर्लक्ष केलेलं आहे. हमासबद्दल लोकांच्या मनात चीड आहे. सामान्य माणसाला सुखानं रहायचं असतं. बाँबवर्षाव आणि बंदुकीच्या धाकाखाली जगणं कोणाही सामान्य माणसाला नको असतं. हमासनं केलेला उद्योग ५२ लाख पॅलेस्टिनीना मान्य नाहीये.
पण या सर्व लोकांचा इसरायलवरही राग आहे. एका खुल्या तुरुंगात आपण रहात होतो ही त्यांची भावना आहे. अशी भावना असणारी माणसं शेजारी असतील तर इसरायल कसं सुरक्षित राहील?
या प्रश्नाचं उत्तर इसरायलला शोधायचं आहे.
।।