रविवार. कचकडी श्रीमंती
प्रसिद्धी आणि पुढारी ही दोन हत्यारं हातात असली की भिकारी धनाढ्य होतो.
सॅम बँकमन फ्रेड हा ३२ वर्षाचा तरूण अब्जाधीश अमेरिकन बिझनेसमन आता २५ वर्षं तुरुंगात रहाणार आहे. लोकांचे पैसे लुटणं, फ्रॉड करणं या आरोपाखाली त्याला ११० वर्षांची शिक्षा होणार होती. त्याच्या वकिलांनी मिनतवाऱ्या करून त्याची शिक्षा २५ वर्षांवर आणली.
निकाल जाहीर झाला तेव्हां सॅमचे आई वडील चेहरा झाकून मान खाली घालून बसले होते. सॅम मात्र निर्विकार होता. आपण फ्रॉड केलेला नाही, आपल्या हातून काही लहान चुका झाल्या, काही मोठ्या चुका झाल्या येवढंच. पण या चुकांसाठी आपल्याला दिलेली शिक्षा प्रमाणाबाहेर आहे असं सॅम म्हणाला.
कित्येक आठवडे खटला चालला होता, साऱ्या जगाचं लक्ष या खटल्यावर होतं. सकाळी ९ वाजता सुनावणी व्हायची ती ऐकायला मिळावी म्हणून बातमीदार पहाटे तीन वाजताच रांग लावून उभे असायचे.
निकाल लागल्यावर एका माणसाची प्रतिक्रिया होती ‘माझं वय आहे २४. मी आतापर्यंत कष्टानं वाचवलेले २० हजार डॉलर एफटीएक्स (सॅम बँकमनची कंपनी) या कंपनीत गुंतवले होते. एफटीएक्स ही क्रिप्टोकॉईनचा व्यवहार करणारी कंपनी आहे. मला क्रिप्टोकॉईनमधे रस नव्हता, पण या कंपनीतल्या पैशावर चांगला परतावा मिळेल म्हणून मी पैसे गुंतवले. माझे सगळे पैसे गेले, मी आयुष्यातून उठलो आहे.’
सॅमनं लोकांचे किमान ८ अब्ज डॉलर बुडवले.
कोण आहे हा सॅम?
सॅमचा जन्म १९९२ सालचा, कॅलिफोर्नियात. २०१४ साली त्यानं एमआयटीमधून फिजिक्स विषयाचं पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्या आधीच त्यानं जेन स्ट्रीट कॅपिटल या ट्रेडिंग कंपनीत उमेदवारी केली होती. पदवी घेतल्यावर तो तिथंच पूर्ण वेळ नोकरीला लागला. तिथं तो क्रिप्टो करन्सीचं ट्रेडिंग शिकला. त्याला कळलं की क्रिप्टो करन्सीचं मार्केट बरंचसं अनियंत्रीत आहे, तिथं धडाधड पैसे मिळवायला वाव आहे. त्यानं २०१७ साली त्यानं अलमीडा रीसर्च या नावानं एक ट्रेडिंग कंपनी स्थापन केली. क्रिप्टो ट्रेडिंगमधे तिथं त्यानं लाखो डॉलर मिळवले.
२०१९ मधे त्यानं एफटीएक्स ही क्रिप्टो एक्सचेंज ही कंपनी स्थापन केली. क्रिप्टोवर अमेरिकन सरकारची बरीच बंधनं असल्यानं सॅमनं बहामा बेटावर एफटीएक्स स्थापली. तिथं कायद्याची बंधनं असून नसल्यासारखी आहेत. कंपन्या स्थापन करा, पैसे हादडा, बहामा प्रश्न विचारणार नाही. अमेरिकेतही व्यवसाय करायचा असल्यानं एफटीएक्स युएस अशी एक बहीणकंपनी त्यानं अमेरिकेत स्थापली.
एफटीएक्स स्थापन करताना त्यानं पद्धतशीर जाहिरातबाजी केली, करोडो डॉलर जाहिरातीवर खर्च केले. स्वतःची प्रतिमा तयार केली. पत्रकारांना आयकॉन हवे असतात. पत्रकारांनी त्याच्या आई वडिलांच्या मुलाखती छापल्या. ते म्हणाले की सॅम ब्राईट आहे, त्याचं डोकं गणिती पद्धतीचं आहे, तो अद्वितीय ग्रेट आहे. आई वडील दोघंही स्टॅनफर्ड या प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीत प्रोफेसर.
येव्हाना २३ व्या वर्षी त्यानं लाखो डॉलर ट्रेडिंगमधे कमावले होते याची जाहिरात करण्यात आली.
सॅम अर्धी चड्डी आणि टी शर्टवर फिरत असे. त्यानं डोक्यावर अस्ताव्यस्त केस वाढवले होते. केस पिंजारलेले असत, विंचरलेले नसत. एका मुलाखतीत तो म्हणाला की मला प्रचंड पैसे मिळवायचे आहेत आणि ते स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी खर्च करायचे आहेत, समाजाला सुखी करायचं आहे,समाजाचं आरोग्य सुधारायचं आहे. मी माझा संसार केवळ एका सूटकेसमधे राहील येवढाच ठेवणार आहे, काटकसरीनं जगणार आहे.
ही काटकसरी, स्वतःचे कपडे स्वतः धुणारी वगैरे माणसं डेंजर असतात.
मग काय विचारता. अमेरिकेतले सॉकरपटू, नट वगैरे लोक त्याची जाहिरात करू लागले. बहामामधे त्यानं आपला/आपल्या महान कार्याचा/आपल्या कंपनीचा प्रचार करण्यासाठी एक कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमात युकेचे पंतप्रधान (माजी) टोनी ब्लेअर आणि अमेरिकेचे प्रेसिडेंट (माजी) बिल क्लिंटन सहभागी होते.
जगाच्या कल्याणासाठी त्यानं लोकांकडून भांडवल, शेअर्स, गुंतवणूक मागवली. प्रेसिडेंट, पंतप्रधान पाठीशी आहेत म्हटल्यावर अमेरिकेतल्या नामांकित धनिकांनी पैसे दिले. ही कंपनी मोठी झाली की आपला फायदा होणार असं वाटून सामान्य माणसांनीही पैसे ओतले. दहा लाखापेक्षा जास्त लोकांनी पैसे गुंतवले. सुमारे ८ अब्ज डॉलरचं भांडवल गोळा झालं.
कंपनी सुरु झाली आणि कोविड आला. सॅमनं जाहीर केलं की तो कोविडच्या लशीचं संशोधन पटापट करून लस बाजारात आणणार आहे, साऱ्या जगाला लस देणार आहे. त्याची लस तयार झाली नाही, लोकांच्या दंडात टोचली जाणं तर दूरच राहिलं.
२०२० साल उजाडलं. निवडणूक आली. सॅमनं जो बायडन आणि डेमॉक्रॅटिक पुढाऱ्यांना लाखो डॉलरची देणगी दिली. त्या बरोबरच त्यानं रिपब्लिकन लोकांनाही लाखो डॉलर दिले. दोघांनाही पैसे देणं ही लबाडी उघड होऊ नये म्हणून त्यानं रिपब्लिकनांची देणगी लपून छपून दिली. गंमत म्हणजे ट्रंपनी निवडणूक लढू नये यासाठीही ट्रंपला लाखो डॉलर दिले. सॅम हुशार खरा. ट्रंपला शेवटी खिसे तर भरायचे आहेत, त्यासाठीच त्याला प्रेसिडेंट व्हायचं आहे हे सॅमनं ओळखलं. ट्रंपचे खिसे भरले तर तो कशाला निवडणुक लढेल असा हिशोब सॅमनं केला.पण ट्रंपनं त्याला शेंडी लावली, निवडणुक लढला.
धंदा करायचा म्हणजे पुढाऱ्यांना सांभाळावं लागतं. त्यांनी पसंतीचे शिक्के मारले की सरकारी दालनं खुली होतात, लोकंही भुलतात.
२०२२ सालापर्यंत म्हणजे वयाच्या जेमतेम तिशीत असलेला सॅम २६ अब्ज डॉलरचा धनिक झाला. पेपरात आणि चॅनेलात बातम्या-सर्वात तरुण सर्वात मोठा धनिक. तुफ्फान प्रसिद्धी, तुफ्फान पैसे जमा झाले.
एके दिवशी सॅमनं बहामामधे समुद्र किनाऱ्यावरच्या पॉश लोकवस्तीत करोडो डॉलरचा बंगला बांधला. लक्षावधी डॉलर खर्च करून याट खरेदी केली. त्याला हव्या असणाऱ्या वस्तू चार्टर्ड विमानानं अमेरिकेतून येऊ लागल्या. कुठं गेलं तुझं काटकसरी रहाणं असा प्रश्न लोकांनी विचारला नाही.
सॅमचे वडील खरोखरच साध्या रहाणीवर विश्वास ठेवणारे होते. एका छोट्या घरात ते राहत होते. एके दिवशी त्यांना लाखो डॉलर किमतीचं घर सॅमनं भेट म्हणून दिलं. आई वडिलांनी त्या बद्दल नाराजी व्यक्त केली नाही.
अलमीडा आणि एफटीएक्स या कंपन्या चालत होत्या, परंतू व्यावसायिकरीत्या काम करत नव्हत्या. खर्चावर नियंत्रण आणि लक्ष ठेवणारी यंत्रणा सॅमनं कंपनीत नेमली नव्हती. कारभार ढिसाळ, अव्यावसायीक गुंतवणूक, भरमसाठ व्यक्तीगत खर्च यामुळं कंपनी तोट्यात गेली. अलमीडाची कारभारी बाई सॅमची गर्ल फ्रेंड. तिनंही मजा केली.
क्रिप्टो करन्सीतलं काहीही सॅमला कळत नव्हतं. लोकांचे पैसे फिरवण्यासाठी कोणाच्या तरी सल्ल्यानं त्यानं स्वतःची एक एफटीटी नावाची करन्सी काढली होती. मुळात एफटीएक्स आणि अलमीडा गाळात असल्यानं एफटीटी अगदीच पोकळ होती.
२०२३ साली एफटीएक्समधे गुंतवणूक करणाऱ्या माणसानं ट्वीट केलं की एफटीटी पोकळ आहे. एफटीटी वटवून पैसे घ्यायचा प्रयत्न केला तेव्हां त्या करन्सीला शून्य मोल आहे असं त्याला कळलं.
ट्वीट व्हायरल झालं. एफटीएक्सच्या तिजोरीत खणखणाट असा संदेश पसरला. लोक पैसे परत मागू लागले. काही लाख डॉलर सॅमने परत केले खरे पण नंतर सॅमकडं पैसे नाहीत हे उघड झालं. पैसे मागणाऱ्यांची झुंबड उडाली. सॅमला कंपनी सोडावी लागली. त्याच्या जागी आलेल्या माणसानं कंपनी दिवाळखोरीत काढली.
दिवाळखोरी झाल्यावर सरकारनं तपासणी सुरु केली.
लोकांचे ८ अब्ज डॉलर बुडाले होते.
लोकांना फसवलं, फ्रॉड केला असा आरोप सरकारनं ठेवला. चौकशी झाली.आरोप सिद्ध झाला.
सॅमला कोठडीत जावं लागलं. कोठडीतल्या माणसाला केस वाढवायला परवानगी नसते. पोलिसांनी सॅमचे केस कापले. गवगवा झालेल्या केसांना गमावलेला सॅम कोर्टात उभा राहिला.
याच काळात एलिझाबेथ होम्स नावाच्या एका बाईनं अमेरिकन लोकांना अशीच शेंडी लावली. रक्ताच्या एका थेंबात शेकडो तपासण्या करणारं यंत्रं आणि तंत्रं आपण तयार करणार असं तिनं सांगितलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि विख्यात मुत्सद्दी हेन्री किसिंजर एलिझाबेथच्या संचालक मंडळावर गेले. ते गेले म्हटल्यावर अमेरिकेतले सेनापतीही बोर्डावर गेले. इतकी बलाढ्य माणसं कंपनीचे संचालक म्हटल्यावर गुंतवणूक करणारे सरसारवले. करोडो डॉलर कंपनीत गुंतवले गेले.
यंत्रं तयार झालं नाही,तंत्र तयार झालं नाही, अब्जावधी डॉलर एलिझाबेथ बाईनं हडप केले. आता ती तुरुंगात आहे.
अमेरिकेतले राजकारणी पैसे घेतात, पैसे देणारा कोण आहे आणि कसा आहे याची चौकशी करत नाहीत. प्रसिद्धी हा अमेरिकेच्या अर्थकारणाचा मुख्य घटक झाला आहे. राजकारणी असो वा खेळाडू वा नट वा उद्योगपती. प्रसिद्धीच्या वाटेनं पैसे मिळवायचे. राजकारण असो वा खेळ, त्यातलं मूळ कसब नाहिसं झालंय, उरलंय तो फक्त इव्हेंट.
अमेरिकेतली जनताही थोरच म्हणायची. प्रसिद्दीच्या चकचकाटाला भुलतात. लालूच येवढी असते की बँकमन असो की होम्स असो, आपले पैसे लवकरच दसपट होणार या आशेनं कंपन्यांत पैसे घालतात.
अमळ विचार करावा, तर्कबुद्दी वापरावी असं अमेरिकेतल्या लोकांना वाटत नाहीसं दिसतंय. एका थेंबात दोनशे तपासण्या शक्य आहे काय हे नाक्यावरच्या पॅथॉलॉजी लॅबवाल्याला विचारलं असतं तरी पुरेसं होतं.
टाटाना साम्राज्य उभं करायला शंभर वर्षं लागली आणि हे उपटसुंभ चारपाच वर्षात अब्जधीश कसे होतात याचा विचार माणसं करत नाहीत.
।।