रविवार/ कोण हा सॅम आल्टमन?

रविवार/ कोण हा सॅम आल्टमन?

अमेरिकेतल्या आणि जगभरातल्या  पेपरात;  टीव्हीवर; सॅम आल्टमन नावाचा माणूस सतत आठवडाभर गाजत होता. पहिल्या पानावर होता. न्यू यॉर्क टाईम्स असो की वॉशिंग्टन पोस्ट की वॉल स्ट्रीट जर्नल की सीएनएन; सर्वाना चिंता होती की सॅमचं काय होणार.

कोण हा सॅम? वय फक्त ३७. खासदार नाही, मंत्री नाही, बँकेचा अध्यक्ष नाही, सुप्रीम कोर्टाचा प्रमुख न्यायाधीश नाही,लष्कर प्रमुख नाही, चित्रपट निर्माता नाही, खेळाडू नाही. 

हा माणूस खूप श्रीमंत आहे काय? तसंही नाही.त्याची संपत्ती फार तर फार ७० कोटी डॉलर आहे. इलॉन मस्कची संपत्ती २४,४४० कोटी डॉलर आहे. बिल गेट्सची संपत्ती ११,७६० कोटी आहे.

ओपनएआय नावाची एक आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) कंपनी आहे. या कंपनीच्या प्रमुख कारभारी (सीईओ) या पदावरून त्या कंपनीच्या संचालक मंडळानं सॅमला काढून टाकलं. संचालक मंडळावर एकूण पाच संचालक होते, पैकी तिघांनी सॅमला काढलं. ही कंपनी स्थापन करणाऱ्यांतच सॅम होता आणि संस्थापकालाच संचालकांनी काढून टाकलं.

जगात हज्जारो कंपन्या आहेत. त्या कंपन्यातून संचालक,अध्यक्षांना काढलं जातं, फुटवलं जातं. दररोज हे घडत असतं. अशा बातम्या द्यायच्या ठरवल्या तर हजार पानांचा पेपर काढला तरीही बातम्या उरतील. 

ओपनएआय या कंपनीत फक्त ७७० कर्मचारी काम करत होते. तुलना करून पहा. मायक्रोसॉफ्टमधे २.१ लाख लोकं काम करतात. गुगलमधे १.३ लाख लोकं काम करतात. अगदीच नगण्य म्हणावी अशी एक कंपनी आणि तिचा कारभारी हाकलला जातो असं वरवर पहाताना दिसतं.

त्याची येवढी चर्चा?

प्रेसिडेंट बायडन, अर्थमंत्री यांच्या ऑफिसातून फोन जातात,  कां काढलं, तो काय करणार आहे याची चौकशी? 

सॅमला फुटवल्याचं प्रकरण कसं लोकांसमोर आलं पहा. 

१७ नव्हेंबरला सॅमला काढल्याची बातमी आली. आपल्याला कां काढलं ते माहित नाही असं सॅम म्हणाला. 

ओपनएआय चा शेअर बाजारातला भाव गडगडला. ओपनएआय या कंपनीशी व्यवहार करणारे लोक दुसऱ्या कंपन्याकडं चौकशी करू लागले.

१८ तारखेला बातमी आली की आल्टमन मायक्रोसॉफ्ट या कंपनीत जात आहे. १९ तारखेला बातमी आली की ओपनएआयमधल्या ७०० कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिलेत आणि बहुदा ते सर्व मायक्रोसॉफ्टमधे जात आहेत. शेअर बाजारात मायक्रोसॉफ्ट शेअरचा भाव वधारला.

२० तारखेला ज्यांनी सॅमला काढलं होतं त्या तिघांपैकी एका संचालकानं प्रेस स्टेटमेंट दिलं. ‘माझी चूक झाली. मी तसं करायला नको होतं. काही मतभेद होते पण ते महत्वाचे नव्हते. ओपनएआय ही कंपनी सॅमनंच उभी केली, ती कंपनी उत्तम चालते यात सॅमचाच वाटा मोठा आहे, या कंपनीचं नुकसान व्हावं असं मला वाटत नाही. मी चुकलो. सॅमला परत बोलवा.’

२१ तारखेला ओपनएआयमधे उरलेल्या संचालकांनी एक नवा कारभारी नेमला. त्यानं नवं संचालक मंडळ तयार केलं. नव्या संचालकमंडळानं सॅमला परत बोलावलं. २२ तारखेला सॅन ओपनएआयमधे परतला. त्यानं विरोध करणाऱ्या तिघांना रजा दिली आणि दोन नवे संचालक घेतले. त्या दोन संचालकांमधे एक लॅरी समर्स नावाचा माणूस होता. लॅरी समर्स हारवर्डमधे प्रोफेसर आहे, एके काळी प्रेसिडेंट क्लिंटन यांच्या कारकीर्दीत तो अमेरिकेचा अर्थमंत्री होता. दुसरा माणूस  कोरा नावाच्या एका एआय कंपनीचा मालक संचालक आहे.

२३ तारखेला सर्व कर्मचारी पुन्हा कामावर परतले.

२४ तारखेला ओपनएआय पूर्ववत सुरु झाली. व्यवहार करणाऱ्या कंपन्या पुन्हा ओपनएआयकडं वळल्या. ओपनएआयचा बाजारातला भाव पुन्हा वधारला.

हे सारं एकट्या सॅम आल्टमनमुळं घडलं.

कां?

सॅम आल्टमनच्या एका फोनमुळं अमेरिकेचा माजी अर्थमंत्री संचालक मंडळावर कां येतो? इंग्रजीत शब्द आहे क्लाऊट. प्रतिशब्द नाही. प्रभाव, सत्ता असे छटाशब्द आहेत. सॅम आल्टमनचा सॉलिड क्लाऊट असल्यामुळं हे घडतं.

सॅम आल्टमन वयाच्या विसाव्या वर्षी कंप्यूटर सायन्स शिकायला २००३ साली हारवर्डमधे गेला.पदवी न घेता, दोनच वर्षात, २००५ साली  त्यानं कॉलेज सोडलं आणि लूपटी नावाची स्मार्टफोनच्या वापरात सुधारणा करणारी कंपनी काढली. ही कंपनी काढण्यासाठी त्यानं ३ कोटी डॉलर गोळा केले. कंपनी चालली नाही. सॅमनं ती कंपनी ४.३ कोटी डॉलरला विकली.

सॅमचं कंप्युटरमधलं ज्ञान आणि अनुभव मर्यादित होता, शिक्षणही पुर्ण झालेलं नव्हतं.  कंप्यूटरचा वापर करून फोन, लॅपटॉप, वित्तसंस्था, बँका, उत्पादक कंपन्या यांच्या कार्यक्षमता सुधारण्यासाठी काय करता येतं हे त्याला समजलं. त्यासाठी लिहावी लागणारी कोडं, प्रोग्रॅम इत्यादीच्या भानगडीत तो गेला नाही पण ते काय असतं ते मात्र त्याला कळलं होतं. मुख्य म्हणजे जगात कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय करता येऊ शकेल हे त्याला कळलं होतं. त्याला बाजार समजत होता, नफा म्हणजे काय ते समजत होतं. तो सेवा प्रॉडक्ट देणाऱ्या  कंपन्या  काढू लागला. कंपनीत काम करणारे कंप्यूटर तंत्रज्ञ, वैज्ञानिक इत्यादी लोक तो गोळा करत असे आणि त्याना कामाला लावत असे. हा उद्योग करण्यासाठी पैसा कसा उभा करायचा ते त्याला समजलं होतं. प्रॉडक्ट कसा असेल, तो कोण वापरेल, त्या त्या कंपन्यांना तो प्रॉडक्ट कसा विकायचा आणि उभं करावं लागणारं भांडवर-इन्फ्रास्ट्रक्चर हे त्याला समजत गेलं.

कंपनी काढायची. विकायची.या कंपनीत काम करायचं, त्या कंपनीत काम करायचं असं करत करत २०१५ साली त्यानं ओपनएआय ही कंपनी स्थापन केली. तोवर त्याचं कसब आणि कीर्ती संबंधितांना कळली होती. ओपनएआय स्थापन करण्यासाठी त्यानं १ अब्ज डॉलर उभे केले. इलॉन मस्क इत्यादींनी कंपनीत पैसे ओतले. 

२००५ साली ३ कोटी उभं करणाऱ्या सॅम आल्टमननं २०१५ साली १००  कोटी डॉलर उभे केले. स्वतःच्या कंपनीसाठी १०० कोटी उभारणाऱ्या सॅमनं नंतर एकदा मायक्रोसॉफ्टसाठी १०० कोटी उभे करून दिले होते.

भले सॅमच्या खिशात १०/२० कोटीच असतील पण २/३ हजार कोटीवाल्या लोकांच्याबरोबर त्याची ऊठबस झाली होती. ओपनएआय या कंपनीचे गुगल, मायक्रोसॉफ्ट, ईलॉन मस्क इत्यादी कंपन्यांशी संबंध असतात, आर्थिक व्यवहार असतात.

सॅम हुशार आहे. त्याला धंदा समजतो आणि जगात काय चाललंय तेही समजतं. त्याची ओपनएआय ही कंपनी ननफा तत्वावर चालते. म्हणजे ती व्यापारी कंपनी नाही. परंतू ओपनएआयची एक उपकंपनी आहे, चॅटजीपीटी. चॅटजीपीटीनं उपलब्ध केलेल्या सेवा करोडो लोक वापरतात आणि ती सेवा वापरण्याबद्दल पैसे देतात. ओपनएआय ही कंपनी नैतिक आहे. एआयचा दुरुपयोग होऊ नये, एआयमुळं मानवतेला धोका निर्माण होता कामा नये ही काळजी ओपनएआय घेतं.आपल्या चॅटजीपीटी या कंपनीच्या हातून काही अनैतिक, अमानवी, बेकायदेशीर घडू नये यासाठी त्या कंपनीवर ओपनएआय लक्ष ठेवते. 

येव्हाना चॅटजीपीटी काय आहे हे मराठी जनांनाही माहित झालं आहे. मला कादंबरी लिहायची आहे, ती जयवंत दळवी यांच्या स्टाईलची असायला हवी, तिचा नायक असा आहे आणि तो विदर्भात अमूक गावात रहृातो इत्यादी गोष्टी चॅटजीपीटीला सांगायच्या. किती शब्दांची कादंबरी हवीय तेही सांगायचं. चॅटजीपीटी लिहून देईल.

चॅटजीपीटीनं गेल्या वर्षी ३ ट्रिलियन डॉलरची उलाढाल केली. भारताचं एकूण जीडीपी ३.८ ट्रिलियन डॉलर आहे.

वाईट उपमा द्यायची तर गुंड पाळायचे आणि त्या गुंडावर आपण लक्ष ठेवतो असंही मालकानं म्हणायचं.

जीपीटी स्टोअर ही एक नवी कंपनी चॅटजीपीटीनं सुरु करायचं सॅमनं जाहीर केलं. ग्यानबाच्या भाषेत बोलायचं तर जगभरातली सर्व प्रकारची इन्फर्मेशन वापरून तुम्हाला हवं ते काम करून देण्याची आजवर कोणाहीकडं नाही इतकी वेगवान सोय या जीपीटी स्टोअरकडं असेल. एआयमधली ही फार उंच उडी मानली जाते. 

या स्टोअरचा गैरवापर होऊ शकतो असं जाणकाराना वाटतं. खोटी माहिती प्रसृत करणं, जगाचा विध्वंस करणं या गोष्टी स्टोअरमुळं शक्य होतील असं जाणकारांचं म्हणणं आहे. एकूणच एआय मानवतेला धोकादायक आहे असं मानणारे आणि धोका अजिबात नाही असं मानणारे असे दोन गट जगात निर्माण झालेत.

सरकारं चिंतेत पडली आहेत.

एआय समजून घेऊन त्यावर बंधनं आणण्याचा विचार अमेरिकन सरकार करत आहे. या बाबत अमेरिकेनं जाणकार म्हणून सॅमला बोलावलं, काही तास त्यानं अमेरिकन संसदेसमोर साक्ष दिली. युरोपातले देश, इसरायल इत्यादी देशांनी सॅमला बोलावलं,त्याचं म्हणणं समजून घेतलं. सॅम दोन वेळा भारतात येऊन गेला, नरेंद्र मोदींना भेटला. 

आज अशी अवस्था आहे की सॅमचा फोन गेला तर जगातले पंतप्रधान, राष्ट्रपती तो फोन लगेच घेतात. सॅम भेटायला येणार असेल सर सगळे देश फटाफट अपॉइंटमेंट देतात, व्हिसा देतात, पायघड्या घालतात.

नरेंद्र मोदींच्या भेटी फटाफट झाल्या.

 उगाच नाही त्याला कंपनीतून काढलं की जगभर त्याची चर्चा होते.

।।

Comments are closed.