रविवार. ट्रंपांवर गोळीबार, आश्चर्य वाटायला नको

रविवार. ट्रंपांवर गोळीबार, आश्चर्य वाटायला नको

अमेरिका म्हणजे एक गंमतच आहे.

अमेरिकेची लोकसंख्या आहे ३३ कोटी आणि अमेरिकेत नागरिकांकडं ३९ कोटी बंदुका आहेत.

अमेरिकेचे चार प्रेसिडेंट प्रेसिडेंट असतानाच बंदुकीच्या गोळीला बळी पडून मेले आणि तीन प्रेसिडेंटवर गोळीबार झाला पण वाचले.

डोनल्ड ट्रंप हे गोळीबारात वाचलेले चौथे प्रेसिडेंट.

गेल्या वर्षी दी मंक अँड दी गन नावाचा एक चित्रपट मुंबईतल्या चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता. भूतान या शांत देशाचा राजा ठरवतो की राजेशाही बरखास्त करून लोकशाही आणायची. राजाच राजेशाही रद्द करतो. लोकशाहीची सवय नसलेल्या लोकांना लोकशाहीचं प्रशिक्षण द्यायचं राजा ठरवतो. प्रशिक्षणासाठी एक अमेरिकन माणूस भूतानमधे पोचतो आणि तो अमेरिकन लोकशाही कशी थोर आहे ते भूतानी लोकांना सांगतो.

एक नागरीक ते भाषण ऐकताना विचारतो ‘ म्हणजे तीच लोकशाही ना जिच्यात लिंकन आणि केनेडी या राष्ट्राध्यक्षांचा खून झाला होता’

तो चित्रपट आठवायचं कारण अमेरिकेचे माजी राष्ट्रपती आणि सध्याच्या निवडणुकीत पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असलेले डोनल्ड ट्रंप यांच्यावर झालेला गोळीबार. एक गोळी ट्रंप यांच्या उजव्या कानाला चाटून गेली,कानाला किरकोळ जखम झाली. गोळी दोन इंच सरकली असती तर ट्रंप यांचं काही खरं नव्हतं.

राष्ट्रपती या माणसाच्या खुनाचा प्रयत्न होणं ही खरं म्हणजे गंभीर घटना आहे. राष्ट्रपतीला जर पोलीस वाचवू शकत नसतील तर सामान्य माणसाना फक्त अयोध्येचा रामच वाचवू शकेल. असं असूनही ट्रंप यांच्यावरच्या हल्ल्यांनं जग हादरलं ना अमेरिका. याचं कारण गोळ्या घालून खून करणं किंवा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करणं अशा घटना अमेरिकेत सर्रास घडत असतात.

२०१२ साली कनेटिकटमधील न्यूटाऊनमधे सँडी हुक प्राथमिक शाळेत एक माणूस असॉल्ट रायफल घेऊन घुसला. गोळ्यांचा पाऊस पाडला. वीस कोवळी मुलं आणि सात माणसं त्यानं मारली. कर्मकांड असल्यागत लोकं रडली. शाळेबाहेर फुलं आणि खेळणी ठेवून, मेणबत्त्या ठेवून लोकांनी दुःख व्यक्त केलं. पेपरांनी आणि वाहिन्यांनी असं पुन्हा होता कामा नये असं म्हटलं. 

बस.

२०२२ मधे बफेलो शहरातल्या एका किराणा मालाच्या दुकानात मारेकरी घुसला, असॉल्ट रायफल घेऊन. दहा दिवसांनी युवाल्डे या गावातल्या एका प्राथमिक शाळेत मारेकरी घुसला. तशीच असॉल्ट रायफल घेऊन. एकूण ३१ माणसं या मारेकऱ्यांनी मारली, त्यात १९ छोटी मुलं होती.

मेणबत्त्या.खेळणी. अश्रू.भाषणं.काही तरी केलं पाहिजे असा कढ माध्यमांनी काढला.

२०२३ साली अमेरिकेत ४३ हजार माणसांचे बळी बंदुकीनं घेतले. त्यात १९ हजार खून होते, काही हजार आत्महत्या होत्या, उरलेले अपघात होते. अपघात होते म्हणजे बंदुक हाताळताना झालेले अपघात. पाच किंवा जास्त माणसं एका वेळी मारली जाणं, घाऊक खून, अशा ६५६ घटना २०२३ साली घडल्या. २०२३ साली काही तरी अघटित घडलं, एकादी दैवी साथ आली होती असं नाही. त्याच्या आदल्या वर्षीही घाऊक खुनाच्या ६४७ घटना घडल्या होत्या आणि ४८ हजार माणसं मेली होती.

अमेरिकेत दर बाराव्या मिनिटाला एका माणसाचा गोळ्या घालून खून होत असतो.

अमेरिकेत बंदूक हे माणसाच्या प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं, तो त्याचा मूलभूत अधिकार आहे असं मानलं जातं.

२०२३ साली रिपब्लिकन पक्षाचे अलाबामा राज्यातून निवडून जाणारे खासदार बॅरी मूर यांनी काँग्रेसमधे (लोकसभा) ठराव मांडला की असॉल्ट रायफल हे अमेरिकेचं प्रतीक शस्त्रं मानलं जावं. म्हणजे काय? देशाचा एकादा प्राणी देशाचं प्रतीक होतो, एकादा पक्षी देशाचं प्रतीक होतो तसं असॉल्ट रायफल हे अमेरिकेचं प्रतीक व्हावं. तो ठराव अजून तरी मंजूर झालेला नाही.

एकेकाळी अमेरिकेवर परकी सत्ता होती तेव्हां परकी सैन्य बंदुकीचा वापर करून अमेरिकन स्वातंत्र्य लढा दडपत होतं. सरकार बंदुकीचा गैरवापर करतं, म्हणून सरकारचा प्रतिकार झाला पाहिजे या भावनेनं अमेरिकन राज्यघटनेनं नागरिकाला बंदुक बाळगण्याचा अधिकार दिला. ही तरतूद अमेरिकेच्या राज्यघटनेतच आहे.

अमेरिकन नागरिकांचा सरकारवर अविश्वास असतो,  सरकार आपलं रक्षण करू शकत नाही असं अमेरिकन जनता मानते. सरकारपासून बचाव करण्यासाठी त्याला रायफल हवी असते. कमीत कमी सरकार, शक्यतो सरकार नकोच असा विचार अमेरिकेत प्रचलित आहे. २०२० साली ट्रंप जेव्हां निवडणुक हरले तेव्हां सरकार या भ्रष्ट यंत्रणेनंच त्यांना हरवलं असं ट्रंप यांचं म्हणणं होतं. 

हज्जारो माणसांचे खून होतात या बद्दल लोकांचं काय म्हणणं आहे? अमेरिकेतल्या बंदुकी विचारांचं प्रतिनिधित्व करणारी नॅशनल रायफल असोसिएशन म्हणते की खून बंदुका करत नाहीत, खून माणसं करतात. तेव्हां बंदुकीवर बंदी आणून उपयोगाचं नाही, माणसं खून करणार नाहीत याची व्यवस्था करा.

खूप दबाव आल्यानंतर १९६८ साली बंदुक वापराचं नियंत्रण करणारा कायदा अध्यक्ष जॉन्सन यानी आणला. पण बंदी कशी होती? गुन्हेगार, मनोविकार असलेल्या लोकांना बंदुका देण्यावर बंदी घातली. 

ट्रंप यांना गोळ्या घालणारा टॉम क्रूक्स गुन्हेगार नव्हता, विकृत नव्हता, अगदी सामान्य माणूस होता. येव्हाना सिद्ध झालेलं आहे की दहशतवादी मंडळी अगदी विचारपूर्वक हिंसा करत असतात, ती शिकली सवरलेली असतात, एका ध्येयानं भारलेली असतात. ट्रंप यांनी चिथावणी दिल्यावर हजारो माणसं लोकसभेवर हल्ला करायला गेली होती. ही माणसं रिपब्लिकन पक्षाची होती, शिकली सवरलेली होती, अगदी विचारपूर्वक हिंसा करायला प्रवृत्त झाली होती.

टॉम क्रूक्स शांत स्वभावाचा होता. कधी कोणाशी वाद घालत नसे, राजकीय चर्चा करत नसे. त्यानं कधी कोणावर साधा हातही उगारलेला नव्हता. मुख्य म्हणजे तो रिपब्लिकन पक्षाचा सदस्य होता. त्याच्या हाती सहजासहजी बंदूक आली म्हणून ट्रंप यांना इजा झाली. लाखो ज्यूंचं हत्याकांड करणारा आईकमन हा मुळीच गुन्हेगार नव्हता. तो एक कुटुंबवत्सल माणूस होता. जर्मनी या देशाचा तो एक सरकारी अधिकारी होता. हिटलर या नेत्यानं त्याला ज्यूना मार म्हणून सांगितलं, त्यानं वरिष्ठांची आज्ञा इमाने इतबारे पाळली.

कोण माणूस केव्हां हिंसा करायला प्रवृत्त होईल ते सांगता येत नसतं. माणसाचं डोकं केव्हां फिरेल आणि तो केव्हां काय करून बसेल ते कधीच सांगता येत नसतं.

अशा परिस्थितीत निदान माणसाच्या हाती घातक शस्त्रं नसावीत येवढी तरतूद करायला हवी. बंदुक बाळगण्याला परवानगी नसताना एकादा माणूस बेकायदेशीररीत्या चोरून मारून बंदुक मिळवून हिंसा करू शकतो. पण त्यासाठी त्याला खूप खटपट करावी लागते. तेव्हां निदान विनासायास बंदुक हाती येणार नाही अशी व्यवस्था व्हायला हवी.

अमेरिकेत शस्त्रं हा माणसाचा मूलभूत अधिकार झालाय, शस्त्रं मुक्तपणे उपलब्ध होतात याचं कारण अमेरिकन समाज व्यवस्थेत सापडतं. सरकार या संस्थेवरच विश्वास नसणं हे एक कारण आहे. पण अमेरिकेतली अर्थव्यवस्था हेही एक कारण आहे. अमेरिका धनाढ्य लोक चालवतात. अमेरिकन राजकारण, समाजकारण, शिक्षणव्यवस्था, सरकार सर्व संस्थांवर धनाढ्यांचं वर्चस्व असतं.

अमेरिकेत शस्त्रं तयार करणारे उद्योग बलवान आहेत, श्रीमंत आहेत. त्यांनी आणि एकूण समाजानं बंदुक ही एक कमोडिटी केली आहे, बाजारात विक्रीला ठेवलेल्या इतर वस्तूंचं स्थान बंदुकीला आहे. उद्या वीष बाजारात खपणार असेल तर ते विकणंही मूलभूत अधिकार आहे अशी तरतूद अमेरिकेतले धनाढ्य राज्यघटनेत करून घेतील. 

आपण कोणातरी शक्तीकडून, विचारांकडून, समाजगटांकडून घेरलेलो आहोत, आपलं संरक्षण आपलं आपल्यालाच करायला पाहिजे असा विचार अमेरिकन मनात रुजलेला आहे. त्यातूनच बंदुक ही आवश्यकता झाली आणि आवश्यकतेचं रुपांतर वस्तूत झालं. 

अमेरिकेची लोकसंख्या आहे ३३ कोटी. अमेरिकेतली बंदुकांची संख्या आहे ३९ कोटी. २.५ कोटी लोकांकडं प्रत्येकी एक तरी असॉल्ट रायफल आहे. रायफल आणि रायफल असोसिएशन या दोन्हीमधे डेमॉक्रॅट्स आणि रिपब्लिकन असे दोघेही अडकलेले आहेत. 

टॉम क्रूक्स रहातो त्या गावात क्रूक्सच्या वडिलांना कसला धोका आहे? कोण त्याना लुटायला जातंय? तरीही त्यांनी २०१३ साली रायफल विकत घेतली. प्रत्येक गावात बंदुकीची दुकानं आहेत. चॉकलेट,ब्रेड, लोणी विकत घ्यावं तशा बंदुका आणि गोळ्या विकत मिळतात. टॉमनं सकाळी दुकानात जाऊन ५० गोळ्या विकत घेतल्या आणि तो शांतपणे ट्रंप यांच्या सभेत पोचला.

जपानमधे १ कोटी माणसांत ३ माणसं बंदुकीला बळी पडतात.

युकेमधे ते प्रमाण एक कोटीमधे ५ माणसं आहे.

अमेरिकेत एक कोटी माणसांत ७०० माणसं बंदुकीला बळी पडतात.

।।

Comments are closed.