रविवार: डी डे

रविवार: डी डे

डी डे

६ जून २०२४. 

डी डे. D Day.

फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यावर, नॉर्मंडी गावाच्या परिसरात माणसं जमली. बरोब्बर ८० वर्षापूर्वी या गावात घडलेल्या घटनेची आठवण जमलेल्या लोकांनी काढली. ‘त्या’ दिवशी दोस्त देशांचे १ लाख ३० हजार सैनिक या समुद्र किनाऱ्यावर उतरले. त्यांनी फ्रान्सवर ताबा ठेवलेल्या जर्मन सैनिकांशी लढाई सुरु केली. नंतर ते लढत लढत जर्मनीत गेले आणि दीर्घ लढाईनंतर त्यांनी जर्मनीचा पाडाव करून दुसरं महायुद्ध संपवलं.

या मोहिमेत मेलेल्या २२ हजार ४४२ ब्रिटीश सैनिकांच्या कबरी नॉर्मंडीत आहेत. मेलेल्या अेमेरिकन सैनिकांच्या ९ हजार ३८८ कबरी अमेरिकन कबरस्तानात आहेत.

#

या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी रॉबर्ट पर्सिचेट्टी नॉर्मंडीत येण्यासाठी अमेरिकेतून निघाला, इंग्लंडमधे पोचला आणि इंग्लंडमधून बोटीनं नॉर्मंडीकडं निघाला. रॉबर्ट नॉर्मंडीचा किनारा गाठू शकला नाही. बोटीवर त्याची तब्येत बिघडली. त्याला विमानानं उचललं आणि जर्मनीत हॉस्पिटलात नेलं. तिथं त्याचं निधन झालं.

त्याचं वय होतं १०२.

जपानच्या किनाऱ्यावरील आयवो जिमा हे बेट अमेरिकेनं १९४५ साली जिंकलं आणि जपानचा पाडाव केला तेव्हां त्या कारवाईत सामिल झालेल्या एल डोरेडो या जहाजावर रॉबर्ट रेडियो ऑपरेटर होता. अमेरिकेचा झेंडा उंचावला जाताना त्यानं पाहिला होता. 

कॉर्पोरल मायर  नॉर्मंडीत पोचू शकला. अमेरिकेतून तो निघाला तेव्हां त्याच्यासोबत त्याचे सहसैनिक होते,  मुलंनातवंडं होती. व्हील चेयरमधे बसून तो समारंभ अनुभवत होता.

मायर गनर होता. 

‘मी जगलो खरा, या समारंभात भाग घेतोय खरा, पण मला आठवण येतेय ती माझ्या सहगनरची. माझ्या शेजारीच होता. समोरून जर्मन शार्पनेल वेगानं आला. त्याच्या हेल्मेटला छेदून त्याच्या मेंदूत शिरला. तो गेला….’ मायरचा गळा दाटला होता.

मायरचं वय आहे १००.

‘त्या’ दिवशी कारवाईत भाग घेतलेले ४८ सैनिक नॉर्मंडीत पोचले होते. बहुतेकांची वयं १०० च्या आपसास होती. त्यातला एक सर्वात तरूण होता. त्याचं वय होतं ९८.

पाचेक वर्षं दुसरं महायुद्ध चाललं. त्यात सुमारे ९ कोटी माणसं मेली.

१९४५ नंतर युरोपातल्या दर सहा घरांपैकी एका घरात पोरकी झालेली मुलं आणि विधवा झालेल्या स्त्रिया होत्या.

।।

समारंभ देखणा झाला. अत्यंत कल्पक आयोजन होतं. या जागी ‘त्या’ दिवसांत काय घडत होतं ते दाखवणारं मूक नाट्य तरुणांनी सादर केलं. हे नाट्य सादर होत असताना एक वादक पियानोवर पश्चिमी धून वाजवत होता. मुलं गात होती.

समारंभ एकाच जागेवर नव्हता. परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहून निवेदक युद्धात भाग घेतलेले सैनिक, त्यांच्या कुटुंबातली व्यक्ती, यांची मनोगतं वाचून दाखवत होता.

‘त्या’ दिवशी जसे सैनिक विमानातून वा बोटीतून उतरले, तशी माणसं या ठिकाणी येत गेली.

  कार्यक्रम गंभीर होता, भावनाचिंब नव्हता. कार्यक्रम कसा करावा याचा एक आदर्श वाटावा असा कार्यक्रम झाला.

अमेरिकेचे प्रेसिडेंट बायडन, ब्रीटनचे राजे चार्ल्स आणि पंतप्रधान ऋषी सुनाक, फ्रान्सचे मॅक्रॉन, कॅनडाचे जस्टिन ट्रुडो यांनी भाषणं केली. पाचेक मिनिटांत त्यांनी भाषणं आटोपती घेतली. सर्वाची भाषणं लिहिलेली होती.

असे आठवण समारंभ दर १० वर्षांनी होत असतात. गेल्या खेपेच्या समारंभात १० वर्षांपूर्वी रशियाचे पुतिन हजर होते. यंदा त्यांना बोलावण्यात आलं नव्हतं.

यंदा युक्रेनचे झेलेन्सकी यांना बोलावण्यात आलं होतं, पण मुख्य समारंभात त्यांचं भाषण झालं नाही. कारण दुसऱ्या महायुद्धात युक्रेनचा देश म्हणून सहभाग नव्हता.

।।

बायडन आणि त्यांचं भाषण हे समारंभाचं मुख्य आकर्षण होतं. साहजिक आहे. जिथं कुठं पैसा लागतो तिथं लोकांना अमेरिकेची आठवण येते. अमेरिकेनं पैसा,जहाजं,विमान,दारूगोळा, ओतला नसता तर दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पाडाव झाला नसता. 

बायडन बरंच बोलले, त्यांच्या भाषणातला केंद्रीय मुद्दा लोकशाही आणि स्वातंत्र्य असा होता. त्यांनी जर्मनी किंवा हिटलर यांचा थेट उल्लेख न करता दोस्त देशांनी स्वातंत्र्य आणि लोकशाही जपली असं वारंवार ठासून मांडलं.

।।

स्वातंत्र्य? कोणाचं स्वातंत्र्य?

दुसरं महायुद्ध सुरु झालं याचं कारण हिटलरनं पश्चिम युरोपातले देश गिळायला सुरवात केली होती. जर्मनीच्या पूर्वेचे आणि दक्षिणेकडले देश हे प्रशियन साम्राज्याचा भाग होते, जर्मन वंशाचे होते वगैरे म्हणत तिथं सैन्य घुसवलं. नंतर फ्रान्स, बेल्जियम इत्यादी. काहीच कारण मिळालं नाही तर काही तरी खुसपट काढायचं आणि सैन्य घुसवायचं. मुख्य मुद्दा म्हणजे दुसरे देश काबीज करायचे. हिटलर एक राजा होता. तो सम्राट व्हायला निघाला होता.

स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं ते ऑस्ट्रिया, पोलंड, फ्रान्स इत्यादी देशांचं. इटालीचा मुसोलिनी हिटलरचा जुळा भाऊ होता. तो आपणहून हिटलरकडं गेला.

प्रकरण ब्रीटनला धडकू लागलं तेव्हां वांधे झाले. ब्रीटन काबीज करायचं काहीच कारण नव्हतं पण हिटलर स्वातंत्र्य हिरावून घेतोय या तात्विक मुद्द्यावर ब्रीटन दुःखी होतं. 

अमेरिका युद्धाच्या झळांपासून दोन महासागर  दूर होती. पहिल्या महायुद्धाच्या वेळी अमेरिका युद्धात पडायला तयार नव्हती. अमेरिकेची व्यापारी जहाजं जर्मनीनं बुडवल्यामुळं अमेरिकेला युद्धात पडावं लागलं. पहिलं महायुद्ध ते दुसरं महायुद्ध या काळात (१९१७-१९४०) अमेरिकेला हिटलरचा मुळीच त्रास नव्हता. जर्मनी अमेरिकेपासून इतके समुद्र दूर होता की अमेरिकेपर्यंत जर्मनी पोचणंच शक्य नव्हतं.

उलट या काळात अमेरिकन जनता हिटलरच्या प्रेमात होती. हिटलरचं देशप्रेम, हिटलरने केलेली जर्मनीची आर्थिक प्रगती या बद्दल अमेरिकन लोकांना जाम प्रेम होतं. हिटलरनं युद्धाच्या आधीपासून ज्यूंचा नरसंहार सुरु केल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. अमेरिकन लोकांनी आणि माध्यमानी त्याकडं साफ दुर्लक्ष केलं. हिटलरच्या विरोधात बातम्या छापायच्या नाहीत असं माध्यमांचं धोरण होतं, अमेरिकन माध्यमं  अमेरिकन धनिकांची मालमत्ता होती.

 अमेरिकेची मदत मिळाली नाही तर आपलं आणि युरोपचं काही खरं नाही हे चर्चिलच्या लक्षात आलं होतं. चर्चिल अमेरिकेच्या मिनतवाऱ्या करत होते. अमेरिका बधत नव्हती. जपाननं पर्ल हार्बर या अमेरिकन बंदरावर गाढवासारखा हल्ला केला, अमेरिका युद्धात पडली, युद्धाचं पारडं फिरलं.

अमेरिका आणि रशिया या बलाढ्य सत्ता एकत्र आल्या; हिटलरनं कोणाही हुकूमशहाच्या बाबतीत घडतं तसं गाढवपणा करून अनेक आघाड्यांवर लढाई आरंभली. जर्मनीचा पराभव झाला.

।। 

हिटलरलं ६० लाख ज्यू मारले याच्याशी कोणालाही देणंघेणं नव्हतं. हिटलरचा पराजय झाल्यानं ज्यू वाचले.

ज्यू हत्याकांडाचं बोलायचं झालं तर त्या हत्याकांडाची लहान आवृत्ती स्टालीननंही काढली. जर्मनी, पोलंड इत्यादी ठिकाणच्या ज्यूना हिटलरच्या पराभवानंतरच्या काळात स्टालीननं जाळून, अत्याचार करून, बलात्कार करून मारलं.

।।

१९४५ साली युद्ध संपलं. म्हणजे हिटरलनं हिरावून घेतलेलं स्वातंत्र्य संबंधित देशांना (फ्रान्स वगैरे) परत मिळालं. पण  युरोप शांत नव्हतं. 

पूर्व युरोप आणि बाल्टिक देशात रशियानं सैन्य घुसवलं, कम्युनिष्ट पार्टी घुसवली, बाहुले हस्तक सत्तेत बसवले आणि लक्षावधी स्थानिक माणसं मारली. पुढं चालून स्टालीन वारला, कम्युनिझमचंही निधन झालं, पण रशियाची दादागिरी संपली नाही. युगोस्लाव्हिया, युक्रेन, मध्य आशियाई देश रशियानं रगडले. बर्लीनची भिंत कोसळल्यानंतर पूर्व युरोपातली रशियाची दादागिरी संपली. 

ईस्टोनियातल्या लोकांना विचारा, स्वातंत्र्याची ऐशी की तैशी रशिया कशी करत होतं.

।।

युरोपातल्या देशांचं जर्मनीनं हिरावून घेतलेलं स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्याची मोहीम डी डेनं सुरू केली खरी. 

हंगेरी युरोपातच आहे. तिथं ओरबान नावाचा माणूस हिटलरचा एक सॉफ्ट अवतार या स्वरूपात उभा राहिला आहे. इटालीत मेलोनी नावाची बाई मुसोलिनीची परंपरा पुन्हा एकदा जिवंत करण्याची खटपट करतेय. फ्रान्समधे मेरी लपेन फ्रेंच वंशाचे नसलेल्या माणसांचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहे. खुद्द जर्मनीत नाझीवाद पुन्हा जिवंत करण्याची खटपट एक राजकीय पक्ष करत आहे.

  गेले २७ महिने रशिया या युरोपियन देशानं युक्रेन या युरोपियन देशावर आक्रमण केलंय. दररोज रशिया युक्रेनवर बाँब टाकतं, तोफगोळ्यांचा मारा करतं. आजवर सुमारे ५ लाख माणसं कबरींत पोचलीत.

।।

युरोपातले देश, अमेरिका, युनायटेड नेशन्स सतत शांतता जपमाळ ओढत असतात. त्यांच्या एका हातात जपमाळ असते आणि दुसऱ्या हातात बंदूक.

युरोपातलेच देश इसरायलला शस्त्रं पुरवतात. इसरायल पॅलेस्टिनी लोकांना, गाझातल्या आणि वेस्ट बँकमधल्या नागरिकांना कुटून काढतं. युरोपीय देश इसरायलला रोखत नाहीत. 

इसरायलनं गेल्या सहा महिन्यात गाझात ४० हजार माणसं मारलीत.

।।

डी डे म्हणजे  स्वातंत्र्याची पहाट असं म्हणतात.

 शब्दांचं पोकळपण डी डे समारंभानं दाखवलं, नाही कां?

।।

Comments are closed.