रविवार. महाशक्तींचा ‘ओलिस ओलिस’ खेळ

रविवार. महाशक्तींचा ‘ओलिस ओलिस’ खेळ

७ ऑक्टोबरला हमासनं सुमारे २४० इसरायली नागरिकांचं अपहरण केलं, त्यांना गाझामधे नेलं, भुयारी रस्त्यांत लपवून ठेवलं. 

गाझामधे हमासनं एक भुयारी मार्ग, बोगदे यांचं जाळं उभारलं आहे. किती तरी किमी लांबीचं. बोगद्याची उंची आणि रुंदी एकाद्या खोली येवढी असते, माणसं तिथं आरामात राहू शकतात, वावरू शकतात. हमासचे सैनिक त्या बोगद्यात रहातात, तिथं हमासची ऑफिसं आहेत.  

इझरायलनं गाझावर आक्रमण केलं. त्या आक्रमणाचं एक उद्दिष्ट ओलिसांना सोडवणं हे होतं. जोवर ओलीस मुक्त होत नाहीत तोवर युद्ध थांबणार नाही अशी घोषणा पंतप्रधान बीबी नेतान्याहू यांनी केली आहे.

आणखी चार दिवसांनी ओलिसांना डांबण्याला पाच महिने होतील. हमासनं १०० ओलीस सोडले. त्या बदल्यात त्यांनी इसरायलच्या तुरुंगात असलेली २४० हमासची माणसं सोडवून घेतली.

पंधरा दिवसांपूर्वी  इसरायलनं दोन ओलीस सोडवले. 

त्याआधी इसरायलनं केलेल्या कारवाईत पाच ओलीस मारले गेले. नेमकं काय झालं ते कळलं नाही. बहुदा भुयारी मार्गात सैनिक घुसले, तिथं गोळीबार वगैरे केला, त्यात ओलिस मारले गेले. चुकून मारले गेले. 

एकदा काही ओलीस (नेमके किती तो आकडा कळत नाही) बोगद्यातून बाहेर पडले आणि इसरायली सैनिकांना दुरून सामोरे गेले. त्यांच्या हातात  इसरायलचे झेंडे होते. इतके दिवस ते झेंडे त्यांनी कसे जपले होते कळत नाही. झेंडे फडकावत, आपण ज्यू आहोत, आपण इसरायलचे नागरीक आहोत असं ते हिब्रू भाषेत  ओरडत होते. इसरायली सैनिकांनी त्यांना गोळ्या घातल्या. नंतर इसरायलनं जाहीर केलं की आपली चूक झाली.

 इसरायलच्या सैन्यानं जाहीर केलं की ३१ ओलिस मरण पावले आहेत. या ३१ मधे वरील चुकून मारले गेलेले ओलीस धरलेत की नाही कळायला मार्ग नाही.

१३६ ओलीस अजून जिवंत असावेत. 

नेमके आकडे कळणं कठीण आहे. कारण हमासनं त्यांना गटागटानं वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं आहे.

ओलिसांमधे काही छोटी मुलं आणि तरूण आहेत. काही साठी उलटून गेलेले स्त्री पुरुष आहेत. वयस्कांमधे कोणाला अलझायमर आहे, कोणाला हृदयाचे रोग आहेत, कोणाला मधुमेह आहे. 

सभोवताली गोळीबार होत असताना, मेलेली माणसं दिसत असताना, रक्ताची थारोळी सभोवती असतांना या माणसांना हमासनं पकडलं आणि फरफटत गाझामधे नेलं. हा घटनाक्रम अत्यंत धक्कादायक होता. त्यानंतर गेले सव्वाचार महिने बंद भुयारात गिचडी करून ही माणसं रहात आहेत. ही अवस्था भीषण आहे. याचा फार मानसीक परिणाम ओलिसांवर झाला आहे, ती माणसं आता नॉर्मल राहिलेली नाहीत. 

त्यांना आपल्या कुटुंबियांच्या आठवणी येत असणार. वयस्कांना त्यांची नातवंडं आठवत असणार. हमासचे लोक त्यांना छळत असणार, काय काय बोलत असणार, आमच्यावर कसे तुमच्या लोकांनी हल्ले केलेत वगैरे भाषणं झाडत असणार. ओलीसांना ऐकणं सोडून काहीही करता येत नाही. सहन करायचं. त्यांचा दोष नाहीये हे त्यांनाही कळतं आणि हमासच्या लोकांनाही कळतं. युद्ध ही गोष्ट माणसाच्या इतिहासात सुरु झाली तेव्हांपासूनची ही कोंडी आजवर कोणालाच सुटलेली नाही.

काही दिवसांपूर्वी एक महिलेला हमासनं सोडलं, तिची मुलाखत घेतली, ती प्रसिद्ध केली. मुलाखतीत त्या महिलेनं म्हटलं की ओलिसांना हमास चांगलं वागवत आहे, लोकांना योग्य औषधोपचारही पुरवण्यात येत आहेत. तिनं एक उदाहरण दिलं. ओलीस ठेवण्याच्या घटनाक्रमात एका महिलेच्या हाताचं हाड मोडलं होतं. हमासनं व्यवस्थित प्लॅस्टर वगैरे घालून तिला ठीक केलं.

पकडून ठेवलेल्या माणसांना पकडणाऱ्यांचा सहवास लाभतो. या सहवासात कधी कधी पकडली गेलेली माणसं पकडणाऱ्यांच्या प्रेमात पडतात. या प्रेमात पडण्याला, प्रेमात पडणं या मानसिक स्थितीला स्टॉकहोम सिंड्रोम असं म्हणतात. १९७३ साली स्वीडनमधल्या स्टॉकहोममधे दरोडेखोरांनी एक बँक लुटली, चार लोकांचं अपहरण केलं, त्यांना सहा दिवस आपल्या कैदेत ठेवलं. यथावकाश ओलीस लोक सुटले. सुटलेल्यांनी नंतर दिलेल्या मुलाखतीत दरोडेखोरांचं कौतुक केलं, ती माणसं किती चांगली होती, त्यांनी कसं   आपलेपणानं वागवलं ते सांगितलं.

ओलीस महिलेला स्टॉकहोम सिंड्रोम झाला असू शकेल.

हमासनं ओलिसांना चांगलं वागवलं की नाही ते माहित नाही. शेवटी पकडणारे आणि पकडले गेलेले असे दोघंही माणसंच असतात. माणसं म्हणून त्यांच्या मर्यादा, वैशिष्ट्यं असतात. हमासच्या गनिमांनाही मुलं असणार, म्हातारे आईबाप असणार. ओलिसांमधे त्यांना आपली मुलं, आईबाप दिसले असणार. केवळ वरिष्ठांनी लादलेल्या आदेशामुळं त्यांना ओलिसांना अडकवावं लागलं असणार. वरिष्ठांची नजर चुकवून ते ओलिसांशी चांगले वागले असणार. ते शक्य आहे.

हमास गनिमांमधे चक्रम आणि धर्मांधळे-राजकारणानं आंधळे झालेले लोकही असणार. त्यांनी ओलिसांना क्रूरपणानं वागवलं असेलही. तेही शक्य आहे.

 हमासनं म्हटलं की आपण ओलिसांना मानवी वागणूक दिली. इसरायलचं म्हणणं असं की त्या महिलेनं दबावाखाली मुलाखत दिली, हमास ओलिसांशी क्रूरपणानंच वागलं आहे.

हमासच्या कैदेत इसरायली नागरीक खिचपत आहेत आणि तिकडं इसरायलच्या कैदेत पॅलेस्टिनी खिचपत आहेत.

जे ओलीस अजून जिवंत आहेत असं म्हणतात तेही खरोखरच जिवंत आहेत की नाहीत तेही कळायला मार्ग नाही. 

ओलिसांचा पत्ता लागत नाही, ते सुटत नाहीत तोवर इसरायल युद्ध चालवणार. आतापर्यंत २८ हजार पॅलेस्टिनी इसरायलनं मारले आहेत. ओलिसांचा पत्ता लागला नाही, ते सुटले नाहीत तर इसरायल आणखी काही हजार माणसं मारणार आहे. समजा ओलीस आणखी काही महिने खिचपत राहिले तर इसरायल पूर्ण गाझा खतम केल्या शिवाय रहाणार नाहीत.

पॅलेस्टाईन खतम करणं हे इसरायलमधल्या अतिरेकी ज्यू नेत्यांचं ध्येयच आहे. त्यांना ओलीस हे चांगलं कारण मिळालं आहे. ओलीस आणखी काही महिने आहे तसेच राहिले तर नेतान्याहूंचं फावलंच म्हणायचं.

ओलिसांच्या फोटोंचं एक म्युझियम नेतान्याहू उभारतील. ओलिसांचे पुतळे इसरायलमधे उभे राहतील. ओलिसांच्या नातेवाईकांना करोडो डॉलरची नुकसान भरपाई नेतान्याहू देतील, ते पैसे अमेरिका त्याना देईल.

ओलीस ओलीस असा खेळच आंतरराष्ट्रीय राजकारणात खेळला जातोय.

इसरायलकडं अत्यंत आधुनिक अशी टेहळणी यंत्रणा आहे. त्यांनी गाझाचा ताबाच घेतला आहे. त्यांना ओलीस सापडत नाहीत? विश्वास ठेवणं जड जातं. एक तर त्यांना माहीत आहे तरीही लबाडी करत असावेत. नाही तर त्यांची यंत्रणा कमकुवत ठरतेय आणि हमास अधीक हुशार ठरतंय असं म्हणावं लागेल.

हमासचे नेते कतारमधे मुक्काम करून आहेत. ओलीस कुठं लपवले आहेत ते त्या नेत्यांना माहित आहे. कतारचे मुत्सद्दी, इसरायलचे मुत्सद्दी, अमेरिकेचे सीआयएचे संचालक, इजिप्त आणि सौदी अरेबियाचे अधिकारी ही मंडळी युरोपात गुप्त ठिकाणी भेटतात, वाटाघाटी करतात. हमास आणि इसरायल यांच्यात एक अप्रत्यक्ष, आडवळणाचा संपर्क आहे. तरीही इसरायलला म्हणे अजून ओलिसांचा ठावठिकाणा सापडलेला नाही.

इसरायल, सौदी अरेबिया, कतार अशी मंडळी ओलिस (आणि गाझातलं युद्द) या निमित्तानं एकत्र येतात आणि आपापले आर्थिक प्रश्न सोडवतात, आपापला धंदा करतात. इसरायलला अमेरिकेचे पैसे आणि शस्त्रं हवीयत. कतार, सौदी,इजिप्त हेही पैसे व शस्त्रांच्या बाबतीत अमेरिकेचे मिंधे आहेत. या लोकांच्या मधे अमेरिकेचा माणूस बसतो आणि त्यांचे प्रश्न सोडवत असतो.

गाझा प्रकरणात इराण उतरलंय. इराणचे हेझबुल्ला हस्तक लेबनॉनमधून इसरायलवर हल्ला करतात. इराणचे दुसरे हुटी हस्तक येमेनमधून अमेरिका-इसरायल-युरोपीय देशांना माल पुरवणाऱ्या जहाजांवर हल्ले करतात. इसरायल आणि इराणचं कडक वैर आहे. अमेरिका इसरायलला तर मदत करतेच पण इराणशी आर्थिक संबंध ठेवून खेळ करत असते. इराणनं अण्वस्त्रं तयार करू नयेत असा दबाव अमेरिका आणते आणि अण्वस्त्रं केली नाही तर इराणशी आर्थिक संबंध सुधारू म्हणते. हे इसरायलला आवडत नाही. इसरायलला अमेरिका मदत करते हे इराणला आवडत नाही. दोहोंमधे अमेरिका गुंतलेली आहे.

अमेरिका, इसरायल, इराण, कतार, सौदी अरेबिया, इजिप्त. सर्वांचे पाय एकमेकात गुंतलेले. सर्व मिळून युध्दयुध्द आणि ओलिस ओलीस खेळ खेळत आहेत.

।।

Comments are closed.