रविवार. शँपेन.

रविवार. शँपेन.

गेल्या वर्षी शँपेनचा विक्रमी खप झाला. जगभरात ७ अब्ज डॉलरची शँपेन विकली गेली. म्हणजेच प्याली गेली.

शँपेन प्राशन करण्याची एक पद्दत आहे.

एका बकेटमधे बर्फ असतो. त्यात शँपेनची बाटली ठेवलेली असते. दर्दी माणूस ती भरपूर गार झालीय की नाही ते प्रेमानं बाटलीला स्पर्श करून तपासतो. मग फॉक असा खोलीभर पसरेल असा आवाज करून बूच उघडलं जातं. मग ग्लास तिरपा करून त्यात शँपेन ओतली जाते. बुडबुडे येत असतात. सोनेरी चमक असलेली शँपेन समोरच्या माणसाच्या ग्लासावर किणकिणवून शँपेनचा घोट घेतला जातो.

सारं कसं तब्येतीत होत असतं.

अलीकडं एका शँपेन ब्रँडच्या जाहिरातीत ग्लासात बर्फाचे खडे आहेत आणि त्यावर शँपेन ओतली जातेय असं दाखवलं होतं.

‘शँपेन म्हणजे व्हिस्की नाही, ऑन द रॉक्स घ्यायला’. अनेक लोकं खवळले.

मद्य घेणारे लोक चस्की असतात. प्रत्येकाची एक स्वतंत्र पद्धत असते. कोणी पाणी घालतं, कोणी सोडा घालतं,  कोणी आणखी काही. कोणी बर्फ घालतात. कोणी म्हणतात की बर्फ किंवा पाणी किवा सोडा घालणं म्हणजे मद्याची चव घालवणं, मद्य पातळ करणं. तसंच शँपेनचही.

शँपेन मंद संगित चाललेलं असताना घेणं, पार्टीत वॉल्टझ चाललेलं असताना शँपेन घेणं, टेबलावर बसून मंद प्रकाशात हलक्या आवाजात गप्पा मारत शँपेन घेणं म्हणजे खरं शँपेन प्राशन असं मानणारेही खूप लोक असतात.

तर बर्फाचे खडे आणि शँपेन या जाहिरातीनं लोक खवळले.

अलीकडं तर एका ब्रँडच्या जाहिरातीत शँपेनमधे काकडीचे कापही टाकलेले दाखवण्यात आले.

थोडक्यात असं की आता तालेवार मातबर लोकांच्या तावडीतून शँपेन काढायचा प्रयत्न चाललाय.

अर्थात हा प्रयत्न काही आजचा नाहीये. पन्नासेक वर्षांपूर्वीच अमेरिकेत शँपेनच्या जाहिराती झळकल्या होत्या आणि त्यात शँपेनच्या बाटलीच्या शेजारी बर्गर दाखवण्यात आला होता. गोंगाट असलेल्या पबमधे मोठ्ठा आ करून बर्गर तोंडात कोंबताना कोणताही एक अल्कोहोल  लागतो (मग ती बियर असेल वा इतर काहीही असेल) तशी एक शँपेन. मंद संगित असेल याची खात्री नाही. जॅझही सभोवताली असेल.

वरील बर्गरची जाहिरात झळकल्यावरही दर्दी शँपेनवाल्यांनी नाकं मुरडली असणार. पण या जाहिरातीनंतर अमेरिकेतला शँपेनचा खप वाढला हे मात्र खरं.

#

बुडबुडे येणारी, फिझ असलेली, सोनेरी शँपेन हे एका ख्रिस्ती मंकचं अपत्य. 

डॉम पेरेनॉन (१६३८-१७१५) हा एक बेनेडिक्ट पंथाचा मंक होता. Marne नदीच्या काठावरच्या उत्तर फ्रान्समधल्या मठात तो रहात असे. त्यानंच बबलिंग वाईन तयार केली (असं म्हणतात). शँपेन घेणाऱ्यांना बबलिंग म्हणजे काय ते चांगलं समजतं. नुसते बुडबुडे नसतात. त्यापेक्षा अधीक काही तरी शँपेनमधे असतं. असं म्हणतात की खुद्द डॉमच म्हणत असे ‘या आपण चमचमणारे तारे पिऊया.’

शँपेन अनेक ठिकाणच्या असतात पण डॉमनं तयार केलेली त्या नदीच्या खोऱ्यातली शँपेन नंतर त्याच नावानं प्रसिद्ध झाली. आता ही  शँपेनची बाटली २५० ते ४०० डॉलर या भावानं लोक विकत घेतात.

वाईन तर फ्रान्समधे कित्येक शतकं आधीपासून होत होती. पण चमकणारी शँपेन डॉम पेरेनॉननं सुरु केली. ती लोकप्रिय झाली. हळूहळू ती तालेवार लोकांची वाईन झाली.

नेपोलियन स्वारीवर जाताना पेरेनॉनच्या गावाच्या जवळ असलेल्या Épernay या गावात जात असे. तिथं त्याला स्थानिक चमकती शँपेन मिळत असे. नेपोलियन लष्करी कॉलेजात शिकत होता तेव्हापासून तिथली शँपेन त्याच्या आवडीची आणि परिचीत झाली होती.ती घेऊन त्याला स्फूर्ती येत असावी, लढाईत तो यशस्वी होत असे. लढाईवरून परतताना तो पुन्हा Épernay मधे मुक्काम करे, शँपेन घेत असे. नेपोलियन म्हणत असे जिंकल्यावर विजय साजरा करण्यासाठी आणि हरल्यावर पराभव विसरण्यासाठी शँपेन आवश्यक असते.

#

अठराव्या शतकातली शँपेन एकविसाव्या शतकात कायच्या काय बदललीय. समजण्यासारखं आहे. काळ किती तरी बदललाय नाही कां?

शँपेनसाठी आवश्यक द्राक्ष पिकवणाऱ्या खोऱ्यात एक वर्षी जास्त बर्फ पडलं, जास्त पाऊस झाला. जमिनीत ओल शिल्लक राहिली. सूर्यप्रकाशाचे तासही कमी झाले.

फोटोसिंथेसिस पुरेसं न झाल्यानं पानांनी कमी साखर निर्माण केली, द्राक्ष पुरेशी पिकली नाहीत. शँपेनमधलं साखरेचं प्रमाण घटलं. द्राक्षाची चव बदलली, शँपेनची चव बदलली. उत्पादन घटलं. शेतकरी आणि वायनरी यांचं अर्थकारण बिघडलं.

पुढल्या वर्षी वेगळाच घोटाळा. अवर्षण झालं. पाऊस कमी आणि तापमान वाढलं. परिणामी द्राक्षातलं साखरेचं प्रमाण वाढलं. शँपेनची चव बदलली. उत्पादनही घटलं.

पुन्हा शेतकरी-वायनरी यांचं आर्थिक गणित बिघडलं.

पर्यावरण बदलाचा हा परिणाम.

उपाय काय?

मुख्य मुद्दा साखरेचं प्रमाण. डॉम पेरेनॉननं शँपेन केली तेव्हां द्राक्षाचा वेल आणि द्राक्षाचं वाण नैसर्गिक पद्दतीनं द्राक्षातलं साखरेचं प्रमाण ठरवत असे. किती काळ आणि कशा रीतीनं शँपेन साठवली की तिला रंग, चव आणि बुडबुडे येतात यावर अनेक प्रयोग करून पेरेनॉन या साधूनं शँपेन सिद्ध केली होती.

पेरेनॉनसमोर अख्खं आयुष्य पडलेलं होतं, प्रयोग करायला. २१ व्या शतकात बाजाराचा खेळ असतो. कोसळलेला बाजार सांभाळायला वेळ नसतो, पटापट निर्णय घ्यावे लागतात.

वायनरीनी साखरेचा पाक शँपेनमधे मिसळायला सुरवात केली. पण त्यामुळं पारंपरीक शँपेनपेक्षा वेगळ्या खुमारीच्या शँपेन तयार करणंही शक्य झालं. त्यातून शँपेनचे अनेक ब्रँड तयार होत गेले.

द्राक्ष तयार झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या प्रक्रिया हा एक भाग झाला. पण मुळात वेगळी वाणंच शोधली तरी हव्या त्या खुमारीची शँपेन तयार होऊ शकते. शेती शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी प्रयोगशाळेत नवी वाणं शोधली. ती शोधताना अमेरिकेतल्या जमिनीत आणि वातावरणात द्राक्ष पिकवायची ठरल्यावर त्यानुसार वाणं तयार केली. आफ्रिकेतील आणि ऑस्ट्रेलियातली जमीन आणि वातावरण फ्रान्सच्या पेक्षा किती तरी वेगळं आहे. हे वेगळेपण लक्षात घेऊन तिथे स्वतंत्र वाणं शोधण्यात आली. आता तर आफ्रिकेतल्या शँपेनही फ्रेंचांना चक्रावून टाकतील इतक्या चवदार असतात.

शिवाय जपानी माणसाची जीभ वेगळी, चिनी माणसाची वेगळी आणि अमेरिकेतल्या अठरापगड लोकांच्या जिभा वेगळ्या. त्यांच्या आवडीही अर्थातच वेगळ्या. 

एकूणात काय तर जगभरच्या मागण्या वेगळ्या, बाजार वेगळे, त्यानुसार शँपेनच्या चवी आणि घटक बदलावे लागले. शेकडो ब्रँड तयार झाले.

कोविडच्या काळात आणखीनच गोची झाली. दुकानात जाऊन शँपेन विकत घेणं शक्य नव्हतं. लोक नेटवर शोध घेऊ लागले. तर नेटवर त्याना असंख्य ब्रँड दिसू लागले. हे असंख्य ब्रँड कुठून आले? तर वाहतूक व्यवस्था कोलमडल्यानं जागोजागी छोटे छोटे ब्रँड तयार झाले. पाच पन्नास एकर जमीन आणि त्यावर एक वायनरी. प्रत्येक वायनरीची द्राक्ष वेगळी आणि वायनरीत द्राक्षरसावर झालेले संस्कार वेगळे, साखरेचं प्रमाण वेगळं. हे छोटे छोटे ब्रँड दोनतीनशे वर्ष जुन्या ब्रँडशी स्पर्धा करू लागले. बाजाराचं गणितच बदललं, अचानक बाजारात स्पर्धा तेजीत आली.

डॉम पेरेनॉन तीनशे डॉलरला विकली जात होती तर एका अगदीच नव्या आणि माहित नसलेल्या ब्रँडची बाटली साताठशे डॉलरला विकली गेली. उपलब्ध होणं आणि जाहीरात या दोन मुद्यांवर शँपेनची किमत ठरू लागली.

  एके काळी एकच ठराविक चव. ठराविक जागची द्राक्ष आणि वायनरी. तो उत्पादक पिढ्यान पिढ्या शँपेनचाच व्यवसाय करणार. आता जग बदललंय. उद्योजक पैसा कुठं मिळेल ते पहातो. तो कोळशाची खाण काढतो, कॉलेज काढतो, फर्नीचर विकतो, कपडे शिवतो आणि शँपेनला किमत येतेय म्हटल्यावर शँपेनमधे घुसतो. घराणं आणि उत्पादन यांची सांगड तुटली.

उद्योगपती काहीही करतो, शँपेनही तयार करतो.

एक मित्र म्हणाला ‘शँपेन आता सांस्कृतीक राहिली नाही, तो एक प्रॉडक्ट झालाय’

।।

Comments are closed.