लेबनॉनमधल्या बिनतारी हिंसा
जगणं नव्हे मरणं आपल्या हाती
लेबनॉनमधे लागोपाठ दोन दिवस बिनतारी साधनांचे स्फोट झाले. त्यात ३२ माणसं मेली, ३१५० माणसं जखमी झाली. साधनं हाताळतांना कोणाचे हात जळले, कोणाचे चेहरे जळले. पहिल्या दिवशी स्फोटात मरण पावलेल्यांच्या मयतासाठी दुसऱ्या दिवशी गोळा झालेल्या लोकांच्या हातातल्या साधनांचा स्फोट झाला.
जगभर या बातमीमुळं माणसं हादरली आहेत. माणसं मारण्याचं हे नवं तंत्र आपल्याला कुठं नेणारे अशी चिंता लोकांना लागलीय. पेजर, सेलफोन, रेडियो, टीव्ही, वॉकीटॉकी इत्यादी सर्रास वापरली जाणारी साधनं अशा रीतीनं जर वापरली जाणार असतील तर लोकांचं जगणंच कठीण होणार आहे.
लेबनॉनमधे काय घडलं? लोकांच्या हातातले सेल फोन वाजले, थरथरले, स्फोट झाले. यंत्रामधे वीस पंचवीस ग्राम स्फोटकं ठेवलेली होती, फोन-वॉकीटॉकी दुसऱ्या व्यक्तीशी कनेक्ट झाल्यावर साधनातला डिटोनेटर सक्रीय झाला, स्फोट झाला.
ही साधनं तैवान, हंगेरी या ठिकाणच्या कंपन्यांतून आयात केलेली होती. कंपनीनं किंवा कुणी तिसऱ्या संस्थेनं या साधनांत काही ग्राम स्फोटक डकवलं होतं. इसरायलनं हे घडवून आणलं असा आरोप होतोय. इसरायलनं आरोपाचा इन्कार केलेला नाही.
मुंबईत दहशतवाद्यांनी हेच तंत्र वापरून स्फोट केले होते. इमारतीच्या बाहेर एक सायकल उभी केली होती. सायकलला एक जेवणाचा डबा लटकावला होता. डब्यात एक सेलफोनसारखं काही तरी साधन होतं. सेलफोन, पेजर, रेडियो, वॉकीटॉकी इत्यादी साधनं बिनतारी संदेश वहनानं काम करतात. तारेविना रेडियो लहरी साधनांत पोचतात. लहर पोचल्यावर डिटोनेटर सक्रीय करण्याचा मंत्र साधनात बसवलेला असतो. सायकलवरच्या डब्याचा कोणाला संशय यायचं काहीच कारण नव्हतं. आदल्या रात्री कधी तरी सायकलडबा ठेवला गेला. दुसऱ्या दिवशी ऐन गर्दीच्या वेळी दूरून कोणी तरी फोन केला. धडाम.
याचा अर्थ आता कोणतंही बिनतारी साधन विकत घ्यायचं असेल तर त्याची तपासणी करणं आलं. रेलवे स्टेशन, एयरपोर्ट, कुठंही, सेलफोन उघडा, त्यात स्फोटकाची तपासणी करा. एक नवं लचांड.
हे झालं बिनतारी हिंसा तंत्र. असंच आणखी एक रासायनिक युद्धतंत्र आहे. रशियानं ते विकसित केलंय. रशियात हे तंत्र वापरणारा एक स्वतंत्र विभागच पुतीन यांनी उभारलाय. विषारी रसायन. माणसाला विकलांग करण्यापासून तर मारण्यापर्यंत अनेक गोष्टी करू शकणारं रसायन. रशियन हस्तकांनी एक घातक रसायन नेवाल्नीच्या कपड्यांवर फवारलं होतं. नेवाल्नी हा पुतीनचा विरोधक. जर्मनीत त्याच्यावर तातडीनं उपचार झाले नसते तर तो मेलाच असता.
रशियन हस्तक घातक रसायनांच्या कुप्या घेऊन जगभर फिरतात, कुठल्याही देशात जाऊन तिथल्या विरोधकांचा काटा काढतात. स्क्रिपाल या डबल एजंटवर डीओडरंट फवारून त्याला मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला, इंग्लंडमधे जाऊन.
आपल्यापैकी कित्ती तरी लोक दररोज अत्तर, डीओडरंट आपल्या अंगावर फवारतो. लग्नात अत्तरदाणीतून सुगंधी द्रव फवारला जातो. मनगटावर, कपड्यावर अत्तर लावण्याची प्रथा अजूनही आहे. अत्तराचा फाया कानात ठेवतात. फासायचं आणि फवारायचं अत्तर, त्यात रशियन रसायन मिसळलं की काम झालं. एकादं लग्न, एकादा समारंभ हे लक्ष्य करता येतं. किंवा एकादं हॉटेल लक्ष्य करून तिथं फवारणीची व्यवस्था करता येते. इंग्लंडमधे एका माणसाला मारण्यासाठी कॉफीमधे रसायनाचे दोन थेंब टाकले होते. फाऊंटन पेनात ते रसायन भरलेलं होतं, पेन झटकून कॉफीत थेंब टाकण्यात आले.
एके काळी विषप्रयोग केवळ पौराणिक कथामधे किंवा रहस्यकथांमधे वाचायला मिळत असत. रशियानं पुराणं वास्तवात आणलीत.
लेबनॉनमधे हेझबुल्लाच्या लोकांना मारण्यासाठी इसरायलनं स्फोटकानं भरलेली साधनं वापरली. हेझबुल्ला या इराणी हस्तक संघटनेचा वावर लेबनॉनमधे असल्यानं इसरायल आणि लेबनॉन यांच्यात पंचवीस वर्षांपासून मारामारी आहे. गाझात इसरायलनं चालवलेल्या उत्पाताची प्रतिक्रिया म्हणून लेबनॉनमधून इसरायलवर रॉकेटं सोडली जातात. त्याची प्रतिक्रिया म्हणून इसरायलनं लढाईला हे नवं वळण दिल्याचं दिसतंय.
शस्त्रांचा वापर जगभर इतका होतोय की शस्त्र निर्मिती ही जगातला पहिल्या नंबरचा उद्योग होऊ पहातोय. हमखास खप होणारा माल. कुणीही उठावं, या उद्योगात पैसे गुंतवावेत. तंत्रज्ञान हा मुद्दाच राहिलेला नाही. ते कुठंही मिळतं, टपरीवर दोन रुपये दिले की बिस्किटाचा पुडा मिळावा तसं. जगभर घरगुतीपासून तर शहरव्यापी शस्त्रनिर्मितीचे उद्योग पसरलेत. सेल फोन आणि वॉकीटॉकी आता कोणीही अगदी घरातही तयार करू शकतो. त्यात दोन चमचे स्फोटक घालणं अगदीच सोपं. विका स्फोटक फोन. गिऱ्हाईकं फार. घरोघरी उद्योग निघू लागल्यावर कोणता कायदा आणि कोणतं सरकार या उद्योगावर लक्ष ठेवू शकणार.
हल्ली शस्त्रं आणि नीतीमत्ता यांच्यातलं नातं पार तुटलेलं आहे. कुणाला दुसऱ्या धर्माचा द्वेष आहे. कुणाला दुसऱ्या जातीचा द्वेष आहे. कुणाला दुसऱ्या देशाचा द्वेष आहे. कुणाला भाषेचाही द्वेष आहे. मारून टाका त्या माणसांना. मारण्याचा अधिकार कुणी दिला असा प्रश्न विचारू नका. तुम्ही जसं इतरांना मारणार तसंच इतरही तुम्हाला मारण्याच्या प्रयत्नात असणार या शक्यतेचाही विचार करू नका.
मारत सुटा.
बिनतारी युद्ध, बिनतारी हिंसा.
भयानक आहे हे.
।।