लोकशाहीचा वापर करून लोकशाही संपवणारे…
डोनल्ड ट्रंप यांचे नॅशनल सेक्युरिटी सल्लागार जॉन बोल्टन यांचं पुस्तक प्रसिद्ध झालंय. पुस्तकाचं नाव आहे द रूम व्हेअर इट हॅपंड. या पुस्तकात बोल्टन यांनी ट्रंप यांचे विचार, कामाची पद्धत, धोरणं इत्यादी बाबत आपला अनुभव लिहिला आहे.
सी जिन पिंग यांच्याशी वाटाघाटी करताना ट्रंप यांनी काही अमेरिकन शेतमाल चीननं खरेदी करावा, त्यामुळं शेतकऱ्यांची मतं त्याना मिळतील आणि त्यामुळं ते पुन्हा निवडून येतील असं सी जिन पिंगना सांगितलं. त्या वेळी अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध चालू होतं, चीनचा माल आयात करायचा नाही असं ट्रंप म्हणत होते. म्हणजे चीनवर राजकीय दबाव आणायचा आणि मागल्या वाटेनं चीनशी व्यवहार करून स्वतःचा फायदा करून घ्यायचा असं ट्रंप यांचं धोरण होतं.
जो बायडन या आपल्या संभाव्य प्रतिस्पर्ध्याची चौकशी करा असंही ट्रंप यांनी सी जिन पिंग यांना विनवलं.
सी जिन पिंग यांनी उईगूरमधल्या मुसलमानांसाठी छावण्या उघडून त्याना वेगळं ठेवलं, वेगळं वागवलं हे योग्यच केलं असंही ट्रंप म्हणाले. अमेरिकेत अध्यक्षपद फक्त दोनच वेळा घेता येतं ही अडचण आहे, ती दूर केली पाहिजे, तहहयात अध्यक्ष रहाता येईलं असं काही तरी राज्यघटनेत केलं पाहिजे असंही ट्रंप म्हणाले.
(युक्रेनला संसदेनं देऊ केलेले पैसे ट्रंपनी रोखून ठेवले, हिलरी क्लिंटन यांच्याबद्दल डर्ट, घाण, पुरवलीत तरच ते पैसे देऊ असंही ट्रंप युक्रेनच्या अध्यक्षाला म्हणाले होते.)
अमेरिकेत काही व्यक्तीवर फौजदारी खटला होता, तो खटला तुर्की प्रेसिडेंटना मदत करण्यासाठी मागं घ्यायची ट्रंप यांची योजना होती, त्या बदल्यात त्या तुर्की प्रेसिडेंटांनी ट्रंपना मदत करायची होती.
किम जाँग उन यांच्याबरोबर क्षेपणास्त्र वाटाघाटी ट्रंपनी योजल्या पण ते सारं प्रकरण अत्यंत व्यक्तीगत पातळीवर आणि लहरीवर ते हाताळत होते, कोणाही सहकाऱ्याशी चर्चा करत नसत. ते काय वाट्टेल ते करून बसतील ही शक्यता लक्षात घेऊन सेक्रेटरी ऑफ स्टेट पाँपिओ बोल्टनना म्हणाले की ट्रंपला कधीही एकटं सोडता कामा नये, ते वाट लावतील.
व्हेनेझुएला हा अमेरिकेचाच एक भाग असून त्या देशावर आक्रमण करणं योग्य आणि शक्य आहे असं ट्रंप बोल्टन यांच्याशी बोलले.
फिनलंड हा देश रशियाचा एक भाग आहे असं ट्रंप यांचं ठाम मत होतं.
युके हा अण्वस्त्रधारी देश आहे हे ट्रंपना ते पंतप्रधान थेरेसा मे यांना भेटायला गेले त्या क्षणापर्यंत वाटत होतं.
युरोप चीनपेक्षा घातक आहे असं ट्रंप बोल्टनना म्हणाले.
हे झालं परदेश संबंधांबाबत. व्हाईट हाऊस आणि देशाचा कारभार चालवत असतांना ते क्षणोक्षणी आपल्या भूमिका बदलत असत, त्या भूमिका त्यांच्या अज्ञानावर आणि लहरीवर अवलंबून असत.
बोल्टन म्हणतात “ ट्रंप यांचं अज्ञान, अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार धक्कादायक आहे. ट्रंप यांना सर्वांकडून, देशाकडून, जगाकडून, व्यक्तीगत इमान हवं होतं, पूर्ण इमान. हे इमान कसं असावं ते सांगण्यासाठी त्यांनी पुस्तकात लिंडन जॉन्सन यांचं एक वाक्य दिलं आहे. जॉन्सन म्हणत “ लोकांनी माझं ढुंगण चाटलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की ढुंगणाला गुलाबाची चव आणि वास आहे..”
बोल्टन यांचं पुस्तक प्रसिद्ध होऊ नये यासाठी ट्रंप यांनी खूप प्रयत्न केले. पुस्तक प्रसिद्ध केल्यावर बोल्टन हताशेनिराशे, डेमॉक्रॅट्सच्या आणि डाव्यांच्या नादी लागून खोटंनाटं लिहीत आहेत असं ट्रंप म्हणत आहेत.
बोल्टन यांनी जे सांगितलं ते आधीच सर्वाना माहित होतं, पेपरांत आलं होतं. परंतू बोल्टन यांनी स्वतः अनुभव घेतल्याचं सांगितल्यानं ट्रंप यांच्यावरच्या आरोपांना बळकटी आली, त्यांना एक प्रकारे अधिकृतपणा आला.
डोनल्ड ट्रंप यांना लोकशाही, लोकहित अशा कशाशीही देणंघेणं नाही, ते कायदा पाळत नाहीत, ते नीतीमत्ता पाळत नाहीत. त्यांनी व्यवसायही धडपणानं केलेला नाही. त्याना एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे प्रसिद्धी.
प्रसिद्धी मिळाली की त्यावर पैसेही मिळतात. तुम्ही कितीही गाढव असा, कितीही गुन्हेगार आणि कसेही असा, तुम्ही टीव्हीवर झळकत असाल, तुमच्यावर मजकूर प्रसिद्ध होत असेल, तुमची पुस्तकं खपत असतील तर तुम्हाला पैसे मिळतात. हे ट्रंप यांना माहित असल्यानं येन केन प्रकारेण चमकणं हाच त्यांचा कार्यक्रम असतो. प्रेसिडेंटपदाची निवडणूकही ते केवळ प्रसिद्धी मिळते म्हणूनच लढवत होते. आपण निवडून येणार नाही याची त्यांना खात्री होती आणि बोल्टनसारख्या समर्थकांनाही वाटत होतं की ट्रंप हरतील. निवडून आल्यामुळं सरकारी खर्चात प्रसिद्धी मिळवणं त्याना शक्य झालं.
गंमत अशी की हे सारं खुद्द ट्रंपनी कधीच लपवून ठेवलं नाही. संसद, न्यायव्यवस्था, लष्कर, प्रेस इत्यादी संस्था आपल्याला उध्वस्थ करायच्या आहेत असं ते उघडपणे म्हणत होते. त्यांच्याकडं धोरण नाही, कार्यक्रम नाही, अभ्यास नाही, सतत काही तरी चमत्कारीक मतं व्यक्त करत, बालीश आणि बाष्कळ बडबड करत ते लोकांचं लक्ष वेधून घेतात. हे सारं माहित असून, दिसत असून, हताश, बहकलेल्या आणि विकृत अशा मतांची एकी झाली आणि त्यानी ट्रंपना निवडून दिलं.
निवडून आल्यावर चार वर्षात ट्रंपनी काय दिवे लावलेत ते आता सारं जग आणि अमेरिका पहातेय. अमेरिकन लोकशाही खिळखिळी झालीय. जगभरच्या धटिंगणाना ट्रंपमुळं जीवदान मिळालंय. सुमारे शंभर वर्षाचं युरोपशी असलेलं अमेरिकेचं सहकार्य नष्ट झालंय. जगाला एकत्र ठेवणाऱ्या जागतीक आरोग्य संघटना, पर्यावर रक्षण संघटना त्यांनी मोडायला घातल्या आहेत, खुद्द अमेरिका हा देशच विखंडीत करून नष्ट करण्याचा घाट त्यांनी घातला आहे.
अमेरिकेचं तर नुकसान त्यांनी केलं आहे पण जगातल्या क्षीण होत चाललेली लोकशाही नष्ट करायचं ट्रंपनी ठरवलं आहे.
येत्या नव्हेंबरात अमेरिकेत निवडणुक होणार आहे. काहीही करून त्या निवडणुकीत निवडून यायचंच असा ट्रंप यांचा खटाटोप आहे. जो कोणी आड येईल त्याला हेकलणं आणि हाकलणं ही त्यांची रणनीती आहे. लोकशाहीवादी माणसं विभागली असल्यानंच ट्रंप निवडून येतात. खोटेपणा, अपप्रचार, भ्रमनिर्मिती इत्यादी बाबतीत हिटलरही पहिली दुसरीतला विद्यार्थी ठरावा असा धडाका ट्रंपनी लावला आहे.
बोल्टन यांचं पुस्तक सांगतं की लोकशाहीत जगणाऱ्या लोकांना आपण कोणाला निवडून देतो याचा विचार करावा लागणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया वापरून लोकशाहीचे तीन तेरा कसे होऊ शकतात हे ट्रंनी दाखवून दिलं आहे. खिळखिळीत होत चाललेल्या लोकशाह्यानी यातून योग्य तो धडा ध्यायला हवा.
।।
‘ओआरएफ’ वर पूर्वप्रकाशीत.