वसंत वाचनालय, टिकून आहे.
मुंबईत, शिवाजी पार्क मैदानापासून एक गल्ली सोडून दुसऱ्या समांतर गल्लीच्या तोंडाशी वसंत वाचनालय आहे. वाचनालयातून बारे पडून काही पावलं गेलं की समोर सेनाभवनावरचं बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य चित्र दिसतं.
वसंत वाचनालय १९५८ साली स्थापन झालं. वसंतराव सावकर यांची चालवलेलं ते खाजगी वाचनालय आहे.
आज म्हणजे दोन हजार एकवीस सालाच्या मार्च महिन्यात तिथं गेलं तर शाळकरी मुलं, तरूण, वयस्क दाटीवाटीनं उभं राहून पुस्तकं चाळतांना दिसतात.
पलिकडच्या शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसलेल्या वयस्कांची चर्चा ओझरती ऐकलीत तरी त्यात अलीकडं वाचन संपलेलं आहे अशी खंत कानावर येईल. साठी उलटलेली माणसं कट्ट्यावर बहुसंख्येनं असतात आणि ती आपल्या मुला नातवंडांच्या सवयीबद्दल बोलत असतात. सेलफोन, लॅपटॉप, इंटरनेट यात मुलं गुंतलेली असतात, त्यांना पुस्तक वाचावंसं वाटत नाही, वाचताही येत नाही असं यांचं म्हणणं असतं.
दोन गल्ल्या पलिकडं वसंत वाचनालयात दिवसाला बावीस ते सत्तावन्न वाचक येतात, पुस्तक निवडतात आणि वाचायला घरी घेऊन जातात. वर्गणी भरून पुस्तकं नेतात. पुस्तक नेणाऱ्यांत वयस्क बहुसंख्य पण तरूण आणि छोटी मुलंही असतात.
माणसं वाचेनाशी झालीत हेही खरं आणि इकडे पन्नास साठ कां होईना पण माणसं दररोज वाचायला येतात हेही खरं.
कोविडचं संकट येण्याआधी या वाचनालयात पंचवीस हजार पुस्तकं होती आता ती संख्या थोडीसी कमी होऊन १८ हजारवर आलीय. कोविड ऐन भरात होता तेव्हां काही महिने वसंतरावांना वाचनालय बंद ठेवावं लागलं होतं. काही कपाटांना आणि पुस्तकांना वाळवी लागली होती. वाचनालय उघडल्यावर वाळवी लागलेली पुस्तकं टाकून द्यावी लागली होती.
वयाची ऐंशी पार केलेले वसंतराव वाचनालय पुन्हा सुरु करावं की नाही या विचारात होते. माणसं येतील की नाही अशी शंका त्यांना वाटत होती. भीत भीत त्यांनी शटर वर केलं. माणसं हळूहळू येऊ लागली. सुमारे ३५० सभासद पुन्हा सकाळ संध्याकाळ वाचनालयात येऊ लागले.
वसंतरावांनी वाचनालय व्यवसाय म्हणूनच सुरु केला. त्या मागची प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावकरांची होती. स्वातंत्र्यवीर म्हणाले होते की जा, लोकांना ज्ञान दे. कोकणातून मुंबईला आल्यावर कोणीही माणूस नोकरी शोधतो, कुठं तरी चिकटतो. पण वसंतरावांनी शिवाजी पार्क नाक्यावरच्या आझाद हिंद इराणी हॉटेलच्या बाहेर दोन कपाटात पुस्तकं ठेवून वाचनालय सुरु केलं.
वाचकांची गरज ओळखून वसंतरावांनी सुरवातीला मासिकं ठेवली. नंतर शाळा कॉलेजच्या मुलांसाठी गाइडंही ठेवली. जमेना. मग गाइडांची संख्या कमी करून रहस्यकथा, कादंबऱ्या इत्यादी ठेवायला सुरवात केली. अनेक वेळा वसंतराव लोकांना घरी पुस्तकं पोचवत, घरून त्यांनी वाचलेली पुस्तकं गोळा करत. यथावकाश सध्याची जागा त्यांना मिळाली. कर्जाऊ पैसे घेऊन ही जागा त्यानी घेतली. पुस्तकांची संख्या वाढू लागल्यावर त्यांनी एक पोटमाळा काढला आणि तिथं पुस्तकं ठेवायला सुरवात केली.
काळ बदलत होता. मधे एक काळ असा आला की मराठी वाचकही इंग्रजी पुस्तकांची मागणी करू लागले. इंग्रजीतल्या भरड,लगदा कादंबऱ्या लोकांना वाचाव्याशा वाटल्या.ते साहित्य वसंत वाचनालयात पोचलं. काही वाचकांनी सूचना केली की परदेशातल्या प्रमाणं लहान मुलांसाठी खेळणीही वाचनालयात ठेवा. वसंतरावांनी मर्यादित जागेत एका कपाटात खेळणी ठेवली. मग मागणी आली आताच्या पिढीला आवडणारी कॉमिक्स ठेवण्याची. तीही मराठी अभिजात साहित्याला खेटून वाचनालयात शिरली.
मराठी वाचकाला दिवाळी अंकाचं वेड असतं. दिवाळी अंक पुस्तकासारखेच वाचले जातात. अगदी दहा वर्ष जुना दिवाळी अंकही माणूस चवीनं वाचत असतो. वाचक कितीसे दिवाळी अंक विकत घेणार? अंकांच्या किमतीही वाढत गेल्या. वाचक वाचनालयाकडं वळले. केवळ दिवाळी अंक वाचणारेही खूप वाचक आहेत. मराठीतले वाचकप्रिय असलेले सुमारे ७५ दिवाळी अंक वाचनालयात आहेत.
वसंतराव वाचनालयात येणाऱ्या प्रत्येकाशी आपलेपणानं बोलतात, त्यांची चौकशी करतात, त्यांच्या वाचनाच्या आवडीनिवडी समजून घेतात आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्या ओघात बदललेला काळही त्यांना समजतोय. त्यांना समलय की गंभीर वाचनाकडचा कल कमी होत चाललाय, वैचारिक कमी वाचलं जातंय, कल त्यातल्या त्यात लोकप्रिय साहित्याकडं आहे.
मराठी वाचकांचं इंग्रजीतलं वाचन वाढत गेलंय. त्यांची ज्ञानाची आणि माहितीची भूक मराठी भाषा भागवू शकत नाही, इंटरनेटवरून इंग्रजीत माणसं जगाशी जोडली जातात. जगातल्या नाना विषयांवरची अद्यावत माहिती, ज्ञान इंग्रजीत मिळतं, मराठीत मिळत नाही. साहजिक माणसं इंग्रजी पुस्तकं वाचतात.
वसंतराव तरी काय करणार? मराठी पुस्तकात येणारे विषय मर्यादित असतात त्याला ते काय करणार? मराठी लेखक एका निरुंद अशा स्पेसमधेच वावरत असतात याला ते तरी काय करणार?
वाचनालयात बरीच वयस्क माणसं येतात. ती वाचनाच्या ओढीनं येतात आणि वसंतरावांशी गप्पा करायलाही येतात. वसंतरावांना अनेक विषयावर बोलायला आणि ऐकायला आवडतं. ते काहीसे सार्वजनिक कार्यकर्तेही आहेत. समोरच असलेल्या ब्राह्मण सहाय्यक संघात ते बराच काळ सक्रीय कार्यकर्तेही होते.बरीच माणसं पुस्तकांच्या ओढीबरोबरच वसंतरावांशी घडणाऱ्या संवादानंही वाचनालयाला जोडलेली आहेत.
वाचनालय काय, पुस्तकाचं दुकान काय, बँकेची शाखा काय, या गोष्टी खरं म्हणजे भेटण्याची ठिकाणं असतात. पुस्तक चाळणं हे एक निमित्त असतं. सार्वजनिक नळावर जसं पाणी गोळा करणं हे निमित्त असतं; कुचाळक्या आणि भांडणासाठी ते ठिकाण जास्त वापरलं जातं. तसंच. पुस्तक चाळायला येणाऱ्या, पुस्तकं परत करायला आणि नवी घायला आलेली माणसं वसंतरावांशी, आपसात किरकोळ गप्पा करतात.
अमेरिकेत, इंग्लंडमधे, युरोपात, बऱ्याच वाचनालयात आणि पुस्तकांच्या दुकानात चहा कॉफीची सोय असते.
मुंबईतल्या एका पुस्तकाच्या दुकानात तर घुटकाभर वाईनची सोय योजली होती. घुटकाभर वाईन, घटकाभर वाचन. सरकारनं परवानगी दिली नाही.
वसंतरावांची पिढी वाईनचा विचार करू शकत नाही. पण वाईन इतक्याच चवदार गप्पा मात्र ते करू शकतात. १९५०च्या आसपासच्या काळातल्या किती तरी रंजक आणि माहितीनं मोहरून टाकणाऱ्या गोष्टी त्यांच्या बोलण्यात येतात. उदा. सध्या ते माकडांनी त्रस्त झालेत. त्यांच्या गावात माकडांनी धुमाकूळ घातलाय. माकडांना हिंदू जगात एक सांस्कृतीक धार्मिक महत्व. त्यामुळं माकडं मारताही येत नाहीत. वसंतराव हैराण आहेत. पत्रकार, लेखकांना एक विषय.
पत्रकार, लेखक अशांना खरं म्हणजे पुस्तकाची दुकानं, दुकानांचे मालक, वाचनालयातली सावरकरांसाराखी माणसं हे एक विषयांचं भांडारच असतं.
पण अलीकडं पत्रकार आणि लेखक फोनवरून अनुभव घेतात, लोकांना कमीच भेटतात. त्यांच्या लेखनात अनुभव अमळ अभावानंच असतात. त्यामुळं त्यांचे पाय वाचनालयं, पुस्तकांची दुकानं, सिनेमाघरं याकडं कमीच वळतात.
आज कोविडच्या संकटकाळानंतरही सुमारे ३५० माणसं वाचनालयाची सभासद आहेत.
सावरकर थकलेत. चेंबुरला खडके नावाचे एक पोलिस अधिकारी शास्त्रीय संगिताचे समारोह घडवून आणत. संगिताचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कार्यकर्ते त्यांना मिळेनासे झाले. एकेकाळी माणसं रात्रभर गाणं ऐकत, नाटक पहात आणि सकाळच्या पहिल्या गाडीनं आपल्या घरी पोचत. आता साताठ तास बसून एकामागोमाग गायक वादकांना ऐकायला तयार असणाऱ्या माणसांची संख्याही रोडावली.खडकेंनी चालवलेले प्रयत्न अस्ताला गेले.
अलिकडं माणसांना एकमेकांना भेटायलाही वेळ मिळेनासा झालाय किंवा भेटण्याची गरजही त्यांना वाटेनाशी झालीय. गाठीभेटी फक्त पैसे मिळवण्यासाठी.
खरं म्हणजे वाचनालय प्रशस्त आणि ऐसपैस असायला हवं. पण मुंबईत इंच इंच जागेची किमत कोटी कोटी असल्यानं मुंबईत जागा ही माणसं कोंबण्याचं ठिकाण अशी व्याख्या झालीय. खाणावळीत जाऊन पहा. पाठीला पाठ लावून माणसं बसलेली असतात. धक्का लागल्या शिवाय तिथं काहीही करता येत नाही. बकाबका खावा आणि पटापटा जावा.
पेंटिंग. पेंटिंग अंतरावरून पहायचं असतं. रसीक पेंटिंगसमोर तासन तास बसून आस्वाद घेतात. पेंटिंग आणि रसीक यांच्यामधे जागा निर्माण करायची तर कोटीभर पैसे लागतील. तेवढ्या जागेत ऑफिस टाकलं तर कोटीभर निघतील, पेंटिंग पाहून काय मिळणार?
तर अशी झालीय मुंबई.
वसंतराव सावरकर काय करणार?
तरीही वसंतराव सावरकर अजून वय नाकारून उत्साहानं वाचनालय चालवत आहेत.
ढगाळलेल्या आकाशात उन्हाची एक तिरीप.
।।