वसंत सरवटे, विजय तेंडुलकर, यांची शाखा
वसंत सरवटे गेले. शाखेवरचा एक स्वयंसेवक गळाला.
रविवारची शाखा. शाखेचे संस्थापक विजय तेंडुलकर. शाखेत उपस्थित रहाणारे स्वयंसेवक- वसंत सरवटे, बाजी कुलकर्णी, निळू दामले. साधारणपणे रविवारी शाखा भरे. तेंडुलकर कधी कधी परगावी असत. तेव्हां ते अनुपस्थित. बरेच वेळा निळू दामले दुनियाभर भटकत असत. तेव्हां ते अनुपस्थित. अशा वेळी आठवड्यातल्या इतर दिवशी शाखा भरत असे, इतर स्वयंसेवक शाखा भरवत. शाखेवर गेस्ट स्वयंसेवकही येत असत. जसे अवधुत परळकर, सुबोध जावडेकर, संदेश कुलकर्णी, पंकज कुरुलकर, सचिन कुंडलकर.
शाखेचा कार्यक्रम म्हणजे पुस्तकांची चर्चा, पुस्तकांची देवाण घेवाण, एक सिनेमा पहाणं आणि दुनियाभरच्या गोष्टींवर चर्चा. सरवटे मितभाषी. मोजकं बोलणारे, कोणालाही न दुखावणारे. तेंडुलकरही सवाई मितभाषी. मान हलली की नाईलाजानं शब्द हिंदकळून बाहेर येत. बाजी कुलकर्णी तर या दोघांचेही बाप. हाताची घडी आणि तोंडावर बोट. तिघेही एकूणात खालच्या पट्टीत बोलणारे. शाखेत दणादण ऐकू येई ते निळू दामले बोलू लागल्यावर.
बाजी कुलकर्णींच्या घरच्या शाखेत जमणाऱ्या लोकांच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त सुधाताई कुलकर्णी करत असत. शाखा चालू असताना त्यांचं पदार्थ करणं चालू असे. मधून मधून त्यांच्या शेलक्या सुचना आणि प्रतिक्रिया येत असत. कारण त्यांचा एक कान कुकरच्या शिट्टीकडं असे आणि दुसरा शाखेच्या कामकाजाकडं. कधी कधी शाखा सरवटेंच्या घरी भरत असे. त्यांचा मुलगा सत्यजीत फार लाघवी. त्याला माणसांची ओढ. त्याच्या आग्रहामुळं सरवट्यांच्या घरी शाखा भरे. सरवटेंच्या कुटुंबातली सर्व माणसं शाखेत भाग घेत, प्रामुख्यानं ऐकत. सरवट्यांची मुलगी मंजू खाण्यापिण्याचा उत्तम बंदोबस्त ठेवत असे.
तेंडुलकर आणि बाजी कुलकर्णी ते वाचत असलेल्या पुस्तकाबाबत बोलत. तेंडुलकरांभोवती वाचणारी आणि लिहिणारी माणसं फार. ती तेंडुलकरांना पुस्तकं देत, पुस्तकं सुचवत. त्या पुस्तकावर तेंडुलकर बोलत. जगभरच्या अनेक नावाजलेल्या लेखकांचा, सिनेमावाल्यांचा, नाटकवाल्यांचा तेंडुलकरांशी जिवंत संपर्क. ती माणसं, त्यांचं त्यांचं जे काही असेल ते तेंडुलकरांच्या बोलण्यात प्रथम पुरुषी एक वचनी येत असे. कुसुमाग्रज काय म्हणाले, डॉक्टर (म्हणजे लागू) पुस्तकांत असं असं म्हणतो, दामूमुळं मी नाटककार झालो, सेनापती बापटांना शेवटी शेवटी त्यांच्या लहापणच्या गोष्टीच आठवायच्या, कमलाकर आणि लालन सारंगनं खूप सोसलंय, बेनेगलशी काय बोलणं झालं. वीणा सहस्रबुद्धेंची गायनकुस्ती. पैलवान बेगम अख्तर असं खूप बरंच.
बाजी कुलकर्णी तर वाचण्यासाठीच जगतात. ते इंजिनियर. व्यवसाय करतात पुस्तकं विकत घेण्यासाठी आणि वाचण्यासाठी. हज्जारो पुस्तकं. त्यांनी पुस्तकं सुचवायची, स्वयंसेवकांनी ती वाचायची असं घडत असे. एकदा बाजींनी स्टालिनचं एक साताठशे पानांचं पुठ्ठा बांधणीचं चरित्र तेंडुलकरांना दिलं. बाजींना भलावण-आग्रह करण्याची सवय नाही. ते नुसतं वाचून पहा असं म्हणतात.
साताठ दिवसांतच तेंडुलकरांचा सर्व स्वयंसेवकाना फोन. ” स्टालीन चरित्र उत्तम आहे. स्टालीन हा आपल्याला क्रूरकर्मा म्हणून माहित आहे. पण त्याची इतर अंगं कधी आपल्याला कळली नाहीत. स्टालीन दांडगा वाचक होता. आठवड्या आठवड्याला कादंबरी संपवत असे. कादंबरी पान क्रमांक आणि ओळीसकट उल्लेखित असे. साहित्यात तो रमलेला होता.वाः. मी पुस्तक हातात घेतलं आणि संपवून टाकलं.”
नंतर ते पुस्तक इतर स्वयंसेवकांनी वाचलं.
अनेक चर्चा घनघोर असत. भांडण चाललंय असं वाटावं इतक्या. एकदा सर्वांनी पृथ्वीवर पोलान्स्कीची मॅक्बेथ पाहिली. तेंडुलकर नाटकवाले. त्यांना मॅक्बेथवर सिनेमा करणं मुळातच आवडलेलं नव्हतं. सरवट्यांचंही तेच मत होतं. दोघांचंही नाटकांवर प्रेम. ते वाढले तो जमाना नाटकांचा होता. तेंडुलकरांचा सिनेमाशी संबंध भरपूर. पण तरीही त्यांचा पिंड नाटककाराचा. सिनेमा पहातानाही ते कधी कधी डोळे मिटून घेत, संवाद ऐकत. एकूणात दोघांनाही मॅक्बेथ फिल्म आवडली नव्हती. दामले खुष होते. त्यांना नाटकांची ओढ नसे, ते सिनेमावाले. पोलान्स्कीनं मॅक्बेथ करतांना सिनेमात असायला हवेत ते तपशील घेतले होते. मॅक्बेथ हा सिनेमा होता, नाटक नव्हतं. शेक्सपियरच्या काळातलं फिजिकल वास्तव नाटकात दिसत नाही. ते पोलान्स्कीनं अभ्यास करून तपशिलासह सिनेमात दाखवलं होतं. तेंडुलकरांना त्या काळातलं राजकारण, इतिहास इत्यादीत रस नव्हता, त्यांना नाटकातली पात्रं-त्यांच्यातला गुंता-संवाद हेच महत्वाचे वाटत होते. ते बरोबरही होतं कारण तेच नाटकाचं मर्म असतं. दृष्टीकोनाचा फरक होता. पृथ्वी थिएटरवर चर्चा सुरु झाली. कारमधे ती चर्चा चालू राहिली. नंतर घरीही ती चर्चा सुरु राहिली. सरवटे आणि तेंडुलकर दोघेही अस्वस्थ होते.
सरवट्यांकडील शाखा वेगळ्या वळणानं जात असे. मराठीतले सर्व मोठे लेखक आणि प्रकाशक सरवट्यांच्या परिचयाचे. मुखपृष्ठ करण्यासाठी ते लेखकांशी, प्रकाशकांशी बोलत. सरवटेंचा स्वभाव गोड. सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध. पुल देशपांडे, दुर्गाबाई, लागू, श्रीपु भागवत, मंत्री,गडकरी, कानेटकर, मोकाशी, दळवी, अशा अनेक माणसांचा त्यांचा दीर्घ संबंध. त्यांच्या गोष्टी सरवटे सांगत. त्यात किल्मिष नसे टीका नसे तिरकसपणा नसे.
सरवट्यांनी दृष्टी त्यांच्या व्यंगचित्रातून दिसते. ती तुम्हाला हसवतात,विचार करायला लावतात, त्यात एकादी हलकीशी टपली असते. ज्याचं व्यंग चित्र असे तो माणूसही चित्र पाहून खुदकन हसे. सरवट्यांनी रेखाटलेला दळवींचा ठणठणपाळ हातोड्याला टेकून उभा असतो. आता कोणाच्या टाळक्यात हातोडा घालणार असा विचार करत वाचक वाचन सुरू करतो. साहित्य आणि साहित्यीक यांची बित्तंबातमी त्यात असे. स्तंभ वाचून लेखक संतापलेत, खटला भरायला निघालेत असं कधी झालं नाही. दळवी आणि सरवटे. एकाचे शब्द, दुसऱ्याच्या रेघा. एकाच माणसानं दोन्ही गोष्टी केल्यात असं वाटावं. विंदा करंदीकराच्या कवितांसाठी सरवटेंनी काढलेली व्यंगचित्रं आणि तेंडुलकरांचा सरवटेंनी रेखाटलेला घाशीराम. घाशीरामचं चित्र बाजी आणि तेंडुलकर दोघांच्याही भिंतींवर.
सरवट्यांच्या व्यंगचित्रांना व्यापक समाजाचं नेपथ्थ्य असे. त्यातली माणसंही व्यापक समाजाचा भाग असत. व्यंगचित्रातल्या मुख्य माणसाचं वैशिष्ट्यं हलकेपणानं चित्रात येई पण शेवटी ते पात्र व्यापक नरेशनचा भाग असे. सरवटे कमीच बोलत. गंमती सांगत. ते जगाकडं एका अंतरावरून पहात आहेत, त्यात कुतुहुल आणि उत्सुकता आहे, राग वगैरे नाही असं नेहमी जाणवत असे. तेंडुलकर म्हणत की सरवटे हा फार खोल माणूस आहे, संत आहे. सरवटे म्हणत की तेंडुलकरांबरोबर पन्नासेक वर्षाचा घनिष्ट संबंध असला तरी आपल्याला ते कधीच पूर्णपणे समजलेले नाहीत.
नवी माहिती, जुन्यांना उजाळा असं चर्चेचं स्वरूप असे. सरवटे आणि तेंडुलकर यांचा साहित्य क्षेत्रात पन्नासेक वर्षाचा वावर होता. मराठी साहित्यातल्या महत्वाच्या व्यक्तींच्या सहवासात दोघं आले होते. त्यांच्या कडुगोड आठवणी सरवटे आणि तेंडुलकर काढत. कडू कमी गोड जास्त. साहित्यिक आणि कलाकारांचं मर्म आणि त्यांच्या गमती जमती जास्त असत.
शाखेवरच्या गप्पांची हकीकत ऐकून आकाशवाणीचे जयंत एरंडे, मेधा कुलकर्णी यांनी सरवटे आणि तेंडुलकर यांच्या गप्पा रेकॉर्ड करायचं ठरवलं. दोन भाग झाले. नंतर रेकॉर्डिंग कां थांबलं कळलं नाही. आकाशवाणीकडं ते रेकॉर्डिंग शिल्लक असेल तर मराठी माणसांना ते जरूर ऐकायला मिळावं.
गप्पामधे कधी कधी बंडल साहित्यिक, बंडल कलाकार यांचे उल्लेख येत. सरवटे आणि तेंडुलकर सावधगिरीनं बोलत. सरवटे किंवा तेंडुलकर कधी आवाज चढवून, रागावून बोलत नसत. राजकारणावर चर्चा होत असे. पुढारी हे सर्वांचं एक आवडतं टार्गेट असे. या चर्चेत मात्र तेंडुलकर खुलत, कडक बोलत. एकदा महाराष्ट्रातल्या एका पुढाऱ्यावर तेंडुलकर भयंकर खवळले होते. क्वचितच ते इतके खवळत. त्यांनी त्या पुढाऱ्याला नाव ठेवलं – मादरणीय अमूक तमूक. हा शब्द नंतर गप्पांत नेहमी येत असे.सरवटे मात्र राजकारणी लोकांचा विषय निघाला की गप्प असत. असतात अशी माणसं, आपण बोलून काय फायदा असा त्यांचा कल असे.
कधी कधी सहल निघे. प्रदर्शन पहायला, सिनेमा पहायला. तिथे शाखा भरे. एकदा शाखेनं पिकासोचं प्रदर्शन पाहिलं. सरवट्यांनी पिकासोचं चित्रकार असणं म्हणजे काय ते समजावलं. एकदा शाखा दामलेंच्या पेणमधल्या चित्रकुटीरमधल्या घरात भरली. दर दिवाळीला एक सहल असे. पाच बागेत फिरणं आणि नंतर मणीज मधे जाऊन वडासांबार आणि कॉफी. फिरतांना, मणीजमधे शाखेचं कामकाज चालत असे.
शाखेत किती पुस्तकांची आणि सिनेमा नाटकांची चर्चा झाली याची गणती करता येणार नाही.
तेंडुलकरांची तब्येत ढासळू लागली तशी शाखा विस्कळित झाली. ते दीर्घ काळ पुण्यात उपचार घेत होते. तेव्हां त्यांच्या हॉस्पिटलातल्या खोलीत शाखा भरे.
तेंडुलकर गेले. शाखेचा संस्थापक स्वयंसेवक गायब झाला. शाखा चालू राहिली. सरवटेंच्या घरी आणि बाजींच्या घरी. यथावकाश सरवट्यांची तब्येत त्यांना त्रास देऊ लागली. सरवटेंच्या मुलाची, सत्यजीतची प्रकृती ठीक नसे. सरवटे स्वतःच्या आणि सत्यजीतच्या प्रकृतीत गुंतत गेले. त्यांच्या घरी शाखा भरेनाशी झाली.
सरवटे गेल्यानं शाखेवरचा आणखी एक स्वयंसेवक अनुपस्थित झाला.
बाजी कुलर्णींच्या घरची शाखा अजूनही सुरु आहे. बाजी, सुधाताई आणि दामले शाखेवर हजर असतात.
।।