वियेतनाम,बिनलादेन,सीरिया बाँबिंग- सरकारचा खोटेपणा नागडा करणारे पत्रकार सेमुर हर्श
शोध पत्रकारीची पन्नास वर्षं.
वियेतनाममधे अमेरिकन सैनिकांनी केलेलं निरपराध माणसांचं हत्याकांड जगासमोर उघड करण्याच्या घटनेला पन्नास वर्षं झाली.
१४ मार्च १९६८ या दिवशी वियेतनाममधील मी लाय या गावात अमेरिकन सैनिकांनी साडेतीनशे ते पाचशे निरपराध स्त्रिया आणि मुलांना गोळ्या घालून मारलं. विनाकारण. प्रेतांच्या ढिगाखाली लपलेलं एक छोटं मूल प्रेतं दूर सारून बाहेर पडलं. त्यालाही जिवंत ठेवायचं नाही असं ठरवून सैनिकांनी गोळ्या घातल्या. एका निःशस्त्र स्त्रीला सैनिकानं लाथाबुक्क्यांनी बडवलं, ती खाली पडली असताना, तिला गोळ्या घातल्या.
हेलिकॉप्टरमधून जमिनीवरच्या सैनिकांना हवाई संरक्षण देणाऱ्या सैनिकाला हा प्रकार दिसला. त्या सैनिकानं चॉपर खाली उतरवलं आणि नरसंहार करणाऱ्या सैनिकांवर मशिन गन रोखली. तुम्ही हा प्रकार थांबवला नाहीत तर मी तुम्हालाच गोळ्या घालीन अशी धमकी दिल्यावर नरसंहार थांबला.
दररोज पेपरांना वियेतनाममधील घटनांचा गोषवारा देणाऱ्या जनसंपर्क अधिकाऱ्यानं या घटनेबद्दल सांगितलं – सैनिकांनी वियेतनामी दहशतवादी कम्युनिष्टांवर केलेल्या कारवाईत काही दहशतवादी मारले गेले.
रायडेनआवर नावाच्या माणसाला हे सारं कळलं आणि त्यानं अमेरिकन संसदेकडं मागणी केली की मी लाय प्रकरणाची चौकशी करावी. संसदेच्या संबंधित समितीनं चौकशी केली आणि केली या सैनिकाला दोषी ठरवलं, त्याला सैन्यातून बडतर्फ केलं.
समितीची चौकशी, केली या सैनिकाचं बडतर्फ होणं इत्यादी गोष्टींची वाच्यता झाली नाही, सरकारनं वाच्यता टाळली. प्रकरण संसद आणि न्यायालय इथल्या फायलीत बंद झालं.
सेमूर हर्श या फ्री लान्स पत्रकाराला या प्रकरणाचा सुगावा लागला. ते कोर्टात गेले, तिथून केलीचा कबुली जबाब मिळवला. नंतर ते केलीला भेटले. केलीला त्यांनी थेट प्रश्न विचारला की त्यानं गोळीबार करून निष्पाप माणसांना मारलं की नाही. केली गुळमुळीत बोलला. थेट कबूल केलं नाही. आपण वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन केलं असं बोलत राहिला. पुन्हा पुन्हा हर्श यांनी थेट विचारलं की गोळीबार केलात काय. त्यावर तो इकडलं तिकडलं बोलत राहिला. कबूल केलंही आणि नाहीही.
हर्श यांनी नरसंहार थांबवणाऱ्या अधिकाऱ्याची भेट घेतली. तो बोलायला तयार नव्हता. घटना पाहिल्यापासून त्याच्यावर मनावर आघात झाला होता, तो नॉर्मल राहिला नव्हता, दारुच्या नशेत स्वतःला बुडवत होता. या घटनेची आठवण झाली तरी तो बेताल होत असे. सेमूर यांनी चिकाटीनं आग्रह धरल्यावर तो बोलायला तयार झाला. म्हणाला ” ते सैनिक सैनिक नव्हते, जनावरं होती. युद्धात कसं वागायचं याचं प्रशिक्षण सैनिकांना दिलेलं असतं, कायदे त्यांना शिकवले असतात. ते सारं धाब्यावर बसवून सैनिक दहशतवाद्यांसारखे वागत होते “.
या दोन मुख्य साक्षी आणि कोर्टासमोर असलेली माहिती एकत्र करून हर्श यानी त्या घटनेचा वृत्तांत १९६९ साली लिहिला. वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यू यॉर्क टाईम्सनं हर्श यांचा वृत्तांत सविस्तर छापला.
अमेरिकेत आणि जगभर गदारोळ उठला.अमेरिकन सरकारचे प्रसिद्धी अधिकारी लोकांना खोटी माहिती पुरवत होते. वियेतनाममधे किती माणसं मेली ते सांगत नव्हते. कम्युनिष्टांचा खातमा होत आहे आणि फार मोठी कामगिरी अमेरिकन सैनिक पार पाडत आहेत अशी यशोगाथा अमेरिकन सरकार लोकांना सांगत होतं. तो बुडबुडा फुटला, सत्य जनतेसमोर आलं.
तिसऱ्याच दिवशी पाच लाख अमेरिकन वॉशिंग्टनमधे गोळा झाले आणि त्यांनी वियेतनाम युद्ध बंद करा अशी मागणी केली. अमेरिकेतल्या विश्वशाळा आणि कॉलेजातली लाखो मुलं रस्त्यावर आली आणि त्यांनी सरकारविरोधात, वियेतनाम युद्धाविरोधात तीव्र निदर्शनं केली. प्रस्थापित विरोधाची एक ऐतिहासिक चळवळ अमेरिकेत उभी राहिली.
प्रेसिडेंट निक्सन भडकले. त्यानी हर्श यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला. हर्श म्हणाले मी सत्य सांगितलं, त्याचा काय अर्थ काढायचा ते ज्याचं त्यानं ठरवावं.
या वृत्तांतासाठी हर्श याना पुलित्झर पारितोषिक मिळालं. अमेरिकेत गावगन्ना गल्लीनिहाय पत्रकारांचे गौरव करण्याची, सत्कार करण्याची, पुरस्कार देण्याची प्रथा नाही. पुलित्झर हा एकच मोठा पुरस्कार दिला जातो.
ओसामा बिन लादेनला मारण्याचं प्रकरणही हर्श यांनी खोदून काढलं.
ओसामा बिन लादेनला कसं मारलं याचा एक अधिकृत वृत्तांत आहे. बराक ओबामा यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या घटनेचं वर्णन जगासमोर केलं. नंतर अमेरिकन सरकारच्या जन संपर्क अधिकाऱ्यांनी ते वर्णन खरं आहे असं सांगत अधिक माहिती पुरवली. याच माहितीच्या आधारावर सिनेमाही निघाला.
अधिकृतरीत्या जगाला माहीत झालं ते असं. सीआयएनं बिन लादेनच्या घरावर पाळत ठेवली. लसीकरणाच्या बुरख्याखाली बिन लादेनचा डीएऩए मिळवला. अबोटाबादमधलं वास्तव्य पक्कं ठरल्यानंतर नेवी सील्सनं कारवाईची कडेकोट आखणी केली, पूर्वतयारी केली. काहीही गडबड होणार नाही याची काळजी खुद्द प्रे. ओबामा यांनी व्यक्तिगत देखरेख करून घेतली. पाकिस्तान सरकार, लष्कर, पोलीस, आयएसाय यांना पत्ता न लागू देता चॉपरमधून जाऊन सील्सनी कामगिरी पार पाडली. बिन लादेननं प्रतिकार केल्यामुळ सील्सना स्वसंरक्षणासाठी गोळीबार करावा लागला व त्यात बिन लादेन मारला गेला. सैनिकांनी त्याचं शव अफगाणिस्तानात नेलं. तिथं ते साफसूफ केलं आणि नंतर त्यावर इस्लामी परंपरेनुसार संस्कार करून ते समुद्रात टाकून दिलं.
हर्शनी सीआयए, पेंटॅगॉन, व्हाईट हाऊस, लष्कर आणि यातल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. सरकारकडं असलेले कागदपत्रं मिळवले व तपासले. पाकिस्तानातल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. जनरल शुजा पाशा आणि जनरल कयानी यांच्याशी ते बोलले. ही सगळी माहिती गोळा करून त्यांनी न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्समधे एक लेखमाला लिहिली. नंतर किलिंग ऑफ ओसामा बिन लादेन या शीर्षकाचं सविस्तर पुस्तक हर्शनी प्रसिद्ध केलं. हर्श यांनी निष्कर्ष काढला की अमेरिकन सरकारनं प्रसिद्ध केलेला वृत्तांत खोटा आहे, बनवाबनवी आहे. बिन लादेन मारला गेला येवढंच सत्य आहे, कसा मारला गेला वगैरे सारी बनवाबनवी आणि सारवासारव आहे.
हर्श यांनी पुस्तकात दिलेली माहिती अशी. जनरल पाशा आणि जनरल कयानी यांच्या संमतीनं, आयएसायच्या संमतीनं आणि मदतीनंच कारवाई झाली. बिन लादेन अबोटाबादमधे आयएसआयच्या संरक्षणाखालीच रहात होता. बिन लादेनला मारल्याबद्दल मिळणारी करोडो डॉलरची रक्कम व त्यात घातलेली भर हे आमिष होतं, त्यासाठी लष्करी अधिकारी तयार झाले. आपल्या संमतीनं हे झालं हे पाकिस्तानी जनतेला कळलं तर आपली खैर नाही हे या जनरल लोकाना माहिती होतं, कारण बिन लादेन हा पाकिस्तानी लोकांचा हीरो होता. तेव्हां अमेरिकेनं हा कारवाई स्वतंत्रपणे केली असं सांगायचं असं पाकिस्तान-अमेरिका या दोघांत ठरलं होतं. बिन लादेन मेल्यानंतर आठवडा किंवा महिन्यानं ही माहिती प्रसिद्ध करायची आणि त्याला अफगाणिस्तानात मारला असं जनतेला सांगायचं असंही ठरलं होतं.
पण आयत्या वेळी गडबड झाली.कारवाई दरम्यान एक चॉपर कोसळला होता, तो नष्ट करावा लागला होता. चॉपर उध्वस्थ झाल्याचे आवाज आसमंतात पसरले होते. चॉपरला लागलेली आग खूप दूरपर्यंत लोकांनी पाहिलेली होती. त्यामुळं अफगाणिस्तानात बिन लादेनला मारलं हे सिद्ध होणं शक्य नव्हतं.
वाट काढायची होती. पेंटॅगॉन, सीआयए, नॅशनल सेक्युरिटी, व्हाईट हाऊसमधली ओबामाची टीम एकत्र झाली. ओबामा यांना या घटनेला प्रसिद्धी द्यायची घाई होती. बहुदा त्याना हीरो व्हायचं होतं. घाईघाईनं त्यांनी इतरांचा विचार न घेता गोष्ट तयार करून प्रेसला सांगून टाकली. अनेक सहकाऱ्यांचा विरोध दूर सारून.
अबोटाबादमधल्या घरात शिरल्या शिरल्या सील्सनी ओबामाच्या खोलीत प्रवेश केला आणि धाडधाड गोळ्या मारून त्याला ठार केलं. ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांना सरकारनं प्रेसशी बोलायला मनाई केली होती, हर्श त्यांच्याशी बोलले.अबोटाबादमधल्या घरामधे टेप्स, हार्ड डिस्क, कंप्यूटर वगैरे काहीही सापडलं नव्हतं. ज्या बोटीवर लादेनच्या शवावर इस्लामी संस्कार करण्यात आले असं सांगितलं जातं त्या बोटीवर कोणीही इमाम वगैरे नव्हता. प्रेतावर अंत्यसंस्कार होणं, प्रेत पोत्यात भरून समुद्रात ढकलणं याचे कोणतेही पुरावे किंवा नोंदी अमेरिकन नाविक दलाच्या दफ्तरात नाहीत. त्या बोटीवर काम करणाऱ्या लोकांना सरकारनं कोणतंही निवेदन करायला मनाई केली होती. सरकारनं सांगितलं की कंप्यूटर आणि हार्ड डिस्कमधे फार महत्वाची माहिती मिळाली. काय माहिती मिळाली ते सीआयएनं कधीच सांगितलं नाही. उलट पक्षी सीआयएच्या जगभरच्या एजंटांनी आधीच्या पाच सात वर्षांत बिन लादेन सक्रीय होता असं नोंदलेलं नव्हतं.
पाकिस्तानी लष्कर आणि अमेरिकन सरकार यांनी संयुक्तपणे कारवाई केली. कारवाईच्या वेळी तिथं आयएसआयचे हस्तक हजर होते. घटनेनंतर बिन लादेनच्या पत्न्या आणि मुलं यांचा ताबा पाकिस्ताननं घेतला.
हर्श यांचे वृत्तांत प्रसिद्ध झाल्यावर ओबामा खवळले. हर्श खोटं बोलत आहेत असा आरोप त्यांनी केला. आपण दिलेले पुरावे खोटे आहेत हे सिद्ध करा असं आव्हान त्यानी ओबामाना दिलं. संबंधित माहिती अती संवेदनशील आणि राष्ट्रहितासाठी महत्वाची असल्यानं पुराव्यादाखल देता येत नाही असं ओबामा म्हणाले.
बीबीसीच्या एका कार्यक्रमात बिन लादेनच्या हत्येचा विषय निघाला. हर्श म्हणाले ” सर्वच प्रेसिडेंट खोटं बोलत असतात…. अनेकानेक मुलाखती आणि कागदपत्रं यांच्या आधारे मी लिहीलंय. ते सारे कागद माझ्याकडं आहेत. ते खरे आहेत याची खात्री मला आहे. पत्रकार या नात्यानं मी शिस्तीत, व्यावसायिक कसोट्या वापरून माहिती गोळा करतो आणि तोच माझ्या लिखाणाचा आधार असतो. माझी माहिती खरी आहे, मी माझ्या पुस्तकातही ते प्रसिद्ध केलंय. ओबामा किंवा सरकारनं त्यांना योग्य वाटेल ती कारवाई करावी.
सेमूर हर्श यांचे अनेक वृत्तांत वॉशिंग्टन पोस्ट, न्यू यॉर्क टाईम्स, न्यू यॉर्क रिव्ह्यू, न्यू यॉर्कर या पेपरांनी छापले आहेत. माहिती छापत असताना पूर्ण खातरजमा केल्या शिवाय छापायची नाही अशी या पेपरांची परंपरा आहे.
सेमूर हर्श यांचं पुस्तक प्रसिद्ध होऊनही बराच काळ लोटला. ओबामा किंवा अमेरिकन सरकारनं हर्शवर खटला भरला नाही की हर्श यांची माहिती निर्णायकरीत्या खोटी ठरवली नाही.
ट्रंप यांनी सीरियावर बाँबफेक केल्याच्या घटनेवर हर्श यांनी एक वृत्तांत लिहिला. ट्रंप यांनी कसा निर्णय घेतला याचा तपशील हर्श यांनी लिहिला. एका क्षणी ट्रंप यांनी सैन्याला आदेश दिला की सीरियामधे सारीन वायूचे साठे असल्यानं ते नष्ट करण्यासाठी बाँबफेक करावी. आदेश देण्याआधी ते कोणाशीही बोलले नाहीत. सारीन वायू निर्माण केल्याचा, साठवल्याचा पुरावा अमेरिकन इंटेलिजन्स वा सैन्याकडं नव्हता. बाँबफेक झाली त्याच्या आसमंतात कुठंही सारीनचे साठे नव्हते. अशी कारवाई योग्य नाही असंच लष्कराचं मत होतं. पण ट्रंप कोणाचं ऐकतील तर ना.
हर्श यांचा वृत्तांत छापायला अमेरिकेतले पेपर तयार नव्हते. शेवटी जर्मनीतल्या एका पेपरात हर्श यानी तो प्रसिद्ध केला.
हर्श आता ८४ वर्षाचे आहेत. अजूनही ते शोधपत्रकारी करत आहेत, बातम्या काढत आहेत, पुस्तकं प्रसिद्ध करत आहेत.
।।
3 thoughts on “वियेतनाम,बिनलादेन,सीरिया बाँबिंग- सरकारचा खोटेपणा नागडा करणारे पत्रकार सेमुर हर्श”
>>हर्श यांचे वृत्तांत प्रसिद्ध झाल्यावर ओबामा खवळले. हर्श खोटं बोलत आहेत असा आरोप त्यांनी केला. आपण दिलेले पुरावे खोटे आहेत हे सिद्ध करा असं आव्हान त्यानी ओबामाना दिलं. संबंधित माहिती अती संवेदनशील आणि राष्ट्रहितासाठी महत्वाची असल्यानं पुराव्यादाखल देता येत नाही असं ओबामा म्हणाले.<<
राष्ट्राध्यक्षांनी वापरलेला राष्ट्रहिताचा मुद्दा खोटा आहे हे सिद्ध करणे कठीण असते.
पत्रकारांकडे असलेली वास्तव समजून घ्यायची साधने किती सक्षम असू शकतील ह्याला बरीच मर्यादा असणार.
वॉशिंग्टन पोस्ट, न्यू यॉर्क टाईम्स, न्यू यॉर्क रिव्ह्यू, न्यू यॉर्कर अशी वर्तमानपत्रे एखाद्या बातमीतील माहितीच्या खरेपणाची पूर्ण खातरजमा करतात?
हे काम कसे केले जाते? पूर्ण खातरजमा झालेली आहे हे कसे समजू शकते?
हे प्रश्न नवीन नाहीत, ते पत्रकारितेच्या इतिहासाइतकेच जुने असतील पण त्याबाबत काही समाधानकारक भूमिका विकसित झालेली आहे का?
इतिहास संशोधन, आधुनिकता व उत्तराधुनिक दृष्टिकोन ह्यांना भिडणारे प्रश्न आहेत हे.
आपल्या विधिनिषेधशून्य उद्दिष्टांकरिता स्वाभाविकपणेच निर्दयपणे वागणारी मानवांची सत्तासंस्था (या लेखात दर्शविल्याप्रमाणे) पाहिल्यावर आणि त्याच्या सार्वत्रिकीकरणाची वस्तुस्थिती पाहून मागील जिनपिंगवरील लेख वाचून जे वाटलं, तेच मत प्रतीत करावंसं वाटतं, की पृथ्वीपटावर मांडलेला विश्वकर्म्या(?)चा हा दारुण-अद्भुत बुद्धिबळ आहे. सेमुर हर्षसारखा आशावाद एका क्षीण मर्यादेपर्यंतच दिलासादायक वाटतो.
ओसामाच्या हत्येची एक नवीन बाजू कळली. अमेरिका चीन आणि रशियातले सत्ताधीश सारखेच आहेत.