वॅग्नर लेख २ वॅग्नर सेना केवढी, कशी.
वॅग्नर सेनेची स्थापना Dmitry Valerievich Utkin या रशियन लष्करातल्या लेफ्टनंट कर्नलनं केली. उटकिन हिटलरप्रेमी होता. उटकिनच्या अंगाखांद्यावर स्वस्तिकं आणि नाझींच्या खुणा गोंदवलेल्या होत्या.
उटकिन रशियन सैन्यातर्फे सीरियात युद्ध करत होता. सीरियात यादवी चालली होती, बशर आसद विरोधकांची हत्याकांडं करत होता, रशियन सेना आसदना मदत करत होती. सैन्यातून निवृत्त होऊन २०१३ साली उटकिन रशियात परतला. लढण्याची खाज भागत नव्हती, २०१४ साली त्यानं स्वतःची एक तुकडी तयार केली. तिचं नाव त्यानं वॅग्नर ग्रुप असं ठेवलं. वॅग्नर हे नाव कां? तर वॅग्नर हा हिटलरचा आवडता संगीतकार होता.
अमेरिका जिथं जिथं लढाया करत होती तिथं तिथं अमेरिकेचा मुकाबला करण्यासाठी पुतीननं सैन्य पाठवलं. अमेरिका आसद यांच्या विरोधात, मग रशिया आसदच्या पाठीमागं. असा मामला.
नेहमीच्या युद्धाच्या पलीकडं जाऊन उद्योग करायचं पुतीननी ठरवलं. पुतीन आयुष्यभर प्रस्थापित सत्तेला समांतर सत्ता चालवत वाढले. तीच रीत त्यांना लढाईत वापरायची होती. अधिकृत सैन्याच्या बरोबरीनं किंवा सैन्याला समांतर अशी लष्कर व्यवस्था करायची. उटकिनची तुकडी पुतीनना प्रयोग करण्यासाठी सापडली. वॅग्नरला पुतीननी मदत केली. वॅग्नरला सीरियात पाठवलं.
सीरियातल्या युद्धात आयसिसचा दहशतवाद चालला होता. नागरीक, सैनिक पकडले जात, त्यांची मुंडकी उडवली जात आणि त्याचे फोटो प्रसिद्ध केले जात. दहशत पसरत असे. वॅग्नरची माणसं आसदच्या बाजूनं काम करत असल्यानं त्यातल्या काही लोकांना आयसिसच्या लोकांनी पकडलं आणि त्यांची डोकी उडवली. दहशतीचा युद्धात उपयोग करायचं पुतीननीही ठरवलं. वॅग्नरची माणसं अपहरण करू लागली, छळ करू लागली, छळाचे फोटो प्रसिद्ध करू लागली.
वाच्यता झाली. वॅग्नरनी केलेल्या अत्याचारांना प्रसिद्धी मिळत गेली, युनायटेड नेशन्सनं निषेध केला. पुतीननी हात वर केले. गुन्हे करणारी माणसं आपली नाहीत, त्यांचा रशियन लष्कराशी संबंध नाही असं पुतीन बिनधास्त सांगू लागले. सीरियात वॅग्नरची हजारेक माणसं मेली.
सीरियात एक नवाच उद्योग वॅग्नरनं काढला. सीरीयातल्या तेलाच्या विहीरीवर कबजा केला. बहुदा तिथलं तेल विकून चार पैसे वॅग्नरनं मिळवले. काही पैसे स्वतःसाठी आणि काही पैसे पुतीनसाठी. परंतू तिथं लोचा झाला. या विहिरींवर अमेरिकेची मालकी होती, अमेरिकेचे सैनिक विहिरींचं संरक्षण करण्यासाठी तैनात होते. वॅग्नर घुसल्यावर अमेरिकेच्या सैन्यानं पुतीनकडं तक्रार केली. आता मामला ऑफिशियल होऊ लागला होता. पुतीन कितीही म्हणाले की ती माणसं आपली नाहीत. खरं काय आहे ते अमेरिकेला माहित होतं. अमेरिकेनं आपलं सगळं बळ वापरून वॅग्नर आणि रशियन सैनिक संपवायची सिद्धता केली. रशियन सैन्य टरकलं. वॅग्नरचा पाठिंबा रशियन लष्करानं मागं घेतला. अमेरिकन सैन्यानं हल्ला करून वॅग्नर खतम केलं.
वॅग्नरच्या डोक्यात प्रकाश पडला. आपला उपयोग ‘ठेवलेली सेना’ असा केला जातोय, पुतीन आपल्याला सर्वस्वी मदत करायला तयार नाहीत हे त्यांना कळलं. वॅग्नरनं खूप माणसं गमावून सीरियातून पाय काढला.
तसाच प्रयत्न वॅग्नरनं सेंट्रल आफ्रिकन रीपब्लिकमधे केला, तिथल्या हिऱ्यांच्या खाणीवर त्यांनी कबजा करायचा प्रयत्न केला. पण तिथल्या सरकारचं उत्पन्न बुडत होतं. वॅग्नरला तिथून काढता पाय घ्यावा लागला.
मोझंबिकमधे लष्करी हुकूमशहाला मदत करायला वॅग्नर पुढं सरसावली. तिथं लष्करी हुकूमशहा विरूद्ध जिहादी असा मामला होता. जिहादींनी वॅग्नर सैनिकांना पकडून त्यांची मुंडकी उडवायला सुरवात केली. मोझंबिकमधून वॅग्नरला काढता पाय घ्यावा लागला.
पण मालीमधे मात्र वॅग्नरचं बस्तान बसलंय. मालीमधे यादवी झाली तेव्हां युनो आणि फ्रेंच सैनिक तिथं शांतता प्रस्थापनेसाठी गेले होते. एका फ्रेंच सैनिकावर समजा माली सरकारला १०० रुपये खर्च करावे लागत असतील तर तेच काम एक वॅग्नर सैनिक तीस चाळीस रुपयात पार पाडत होता. युद्धातही व्यापार. तुमच्यापेक्षा कमी पैशात आम्ही जास्त माणसं मारून दाखवतो. माली सरकार वॅग्नरला महिन्याला १ कोटी डॉलर देत होतं. वॅग्नर ही मालीची तैनाती फौज झाली होती.
थोडक्यात असं की वॅग्नर एक अनधिकृत सैन्य झालं होतं, पुतीन ते वापरत होते. या सैन्याकडं रणगाडे, तोफा, इत्यादी शस्त्रसामग्री गोळा झाली होती.
लिबियातल्या यादवीत वॅग्नर घुसलं. पण तिथंही विरोधकांनी वॅग्नरला हाकलून दिलं.
उटकिनची कार्ती पसरत होती. त्याला लष्करी सन्मान दिले जात होते. २०१६ त्याचा सन्मान पुतीन यांच्या हस्ते झाला, त्याचे फोटो पेपरात झळकले.
माली वगळता इतर ठिकाणाहून वॅग्नरनं काढता पाय घेतला होता. पण या काळात वॅग्नर हा एक फायदेशीर उद्योग झाला होता. युद्धात कामी आला तर त्याच्या नातेवाईकाना वॅग्नर मोबदला देत असे. सैनिकाना जसा लष्करात पगार मिळतो तसा पगारही वॅग्नर देत असे. गंमत म्हणजे सारा मामला दोन नंबरचा. कशाचाही रेकॉर्ड नाही. लुटालुट करा, बलात्कार करा, खपून जातं. अधिकृत लष्कर नसल्यानं चौकशी नाही, कायद्याचं बंधन नाही.
जगभरच्या सरकारानी वॅग्नरची नोंद घेतली होती, त्यावर पुस्तकं लिहिली जात होती. वॅग्नर वाढत होतं, पण त्याच बरोबर अनेक देशांतून त्यांना बाहेर पडावं लागत होतं.
युक्रेनमधल्या डोनबासमधे रशियानं साध्या वेशात वॅग्नर आधीपासूनच पाठवले होते. क्रायमियात वॅग्नरची माणसं घुसवून रशियानं २०१४ साली क्रायमिया गिळला होताच. त्यामुळं वॅग्नरना युक्रेनचा परिचय होता. वॅग्नरमधे युक्रेनी लोकंही होतेच. वॅग्नरचं नशीब थोर. २०२२ साली रशियानं युक्रेनचं आक्रमण काढलं. आता पुन्हा एकदा रशियाला अनधिकृत सैन्याची गरज होती.
आता गरज इतकी होती की शिल्लक असलेले पंधरा वीस हजार लोकं पुरे पडणार नव्हते.
वॅग्नरनं सैन्य भरती हाती घेतली. रशियातल्या तुरुंगात वॅग्नरचे अधिकारी पोचले. १५/२० वर्षं लांबीची शिक्षा झालेल्या खतरनाक गुन्हेगारांना वॅग्नरनं धरलं. ‘वॅग्नरच्या सैन्यात या. सहा महिने वर्षभर काम करावं लागेल. मेलात तर तुमच्या कुटुंबाची सोय होईल. जगलात तर रशियात परतल्यावर तुमची शिक्षा माफ होईल, तुम्हाला तुरुंगात जावं लागणार नाही. म्हणजे परतल्यावर तुम्ही पुन्हा गुन्हे करायला, म्हणजेच गुन्ह्याचा व्यवसाय करायला मोकळे असाल. आता युक्रेन हे वॅग्नरचं मुख्य कार्यक्षेत्र झालं. चाळीसेक हजाराच्या आसपास सैन्य वॅग्नरनं गोळा केलं. पुतीन पैसा पुरवत होते.
जून २०२३ पर्यंत सारं काही ठीक चाललं होतं. बिनसलं. २०२३ पर्यंतचा हा वॅग्नरचा प्रवास एकट्या उटकीनचा नव्हता. २०१६च्या आसपास कधी तरी उटकिनचा प्रिगोझीनशी परीचय झाला. वॅग्नर हा चांगला धंदा आहे हे प्रिगोझीनच्या लक्षात आलं. प्रिगोझीननं वॅग्नरमधे पैसे गुंतवले आणि हां हां म्हणता प्रिगोझीन वॅग्नरचा प्रमुख झाला. कोणताही सैनिकी अनुभव नसलेला माणूस केवळ राजकीय काँटॅक्ट्सच्या जोरावर एका अनधिकृत सैन्याचा कां होईना पण प्रमुख झाला.
२०१४ च्या छोटेखानी दोन पाच हजारांच्या सेनेचा विस्तार ५० हजारांच्या घरात पोचला तो प्रिगोझीन या माणसामुळं.
कोण आहे हा प्रिगोझीन.
पुढल्या भागात पाहूया.
❖